सूर्यास्त

गेले काही दिवस बातम्या वाचतच होतो. त्याआधीही काही महिने प्रकृती अस्वास्थ्याबद्दल वाचलं होतं. वय (हो, एकदा मानवी अवतार घेतला, की स्वर्गीय सुरांनाही वयाचा शाप जडतो!), कोव्हीड - दोन्हीशी झुंज होती. संध्याकाळ दाटून आलेली जाणवत होती. पण मन नाही नाही करून ओरडत असतं.
लिहिण्यासारखं काही नसतंच. लिहायचं कशासाठी? आपल्या भावना दुसऱ्याला समजावून देण्यासाठी. पण मराठी वाचून समजू शकतील अशा सगळ्याच लोकांच्या भावना त्याच तर आहेत. फेसबुक आणि वर्तमानपत्रांमधून तेच तर पुन्हापुन्हा छापून आलंय. स्वर्गीय आवाज, दैवी देणगी, 'मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे' - गर याद रहे म्हणे! शक्य तरी आहे का त्या आवाजाच्या आठवणी श्वासांपासून वेगळ्या करणं?
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू गेले, तेव्हा अत्र्यांनी 'मराठा' मध्ये 'सूर्यास्त' हा अग्रलेख लिहिला होता. नंतरचे तेरा दिवस रोज ते नेहरूंच्या वेगवेगळ्या पैलूंवर लेख लिहीत होते. अत्रे शब्दप्रभू होते; त्यांनी त्यांच्या ताकदीने श्रद्धांजली वाहिली. माझ्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यातून लता दिदी तसूभरही दूर गेल्या नाहीच आहेत. त्यांची गाणी आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या आसपास गुंजतच राहणार. त्या दैवी आवाजाला आपण शब्दात काय बांधणार!
हिंदी सिनेसंगीतातला सूर्यास्त झाला आहे खचित! एवढा बिनचूक, एवढा मधुर, एवढा भावदर्शी आवाज एका माणसाचा असू शकतो ह्यावर विश्वास ठेवणंच पुढच्या पिढयांना कठीण जाईल. आमचं भाग्य, की आम्ही समकालीन होतो; तो चमत्कार प्रत्यक्ष पाहिला.
पुढचे तेरा दिवस माझी श्रद्धांजली फक्त माझ्या अतोनात आवडीच्या गाण्यांमधून! दिदींच्या संगीताच्या प्रवासातील तेरा महत्वाच्या संगीतकारांची ही गाणी. ही गाणी माझ्या मनाच्या फार खोल कप्प्यातली, कायमची जवळची. आता ह्या आवाजात पुन्हा कधीच नवीन काहीच ऐकता येणार नाही, हे डोक्यात शिरल्याक्षणी वर उफाळून आलेल्या आठवणींची. ह्या अलिबाबाच्या गुहेमधली, आयत्या वेळी माझ्या लहानशा मुठीत मावलेली ही हिरेमाणकं! हा आठवणींचा आल्बम खास माझा स्वतःचा. ह्यातल्या एकेका गाण्यावर एक स्वतंत्र पोस्ट लिहिता येईल एवढी लाडकी, शब्दाशब्दाचं कौतुक करत बसता येईल अशी गाणी. थोडा संयम बाळगून प्रत्येक संगीतकाराची सहा सहा गाणीच निवडणार आहे. त्यामुळे, काही कोहिनूर घाईघाईत राहून जाणारच. तुम्हाला ह्यात भर घालावीशी वाटली, तर कॉमेंट्समध्ये अवश्य घाला - फक्त त्या दिवशीच्या संगीतकाराचीच गाणी निवडा मात्र.

संगीतकार अनिल विश्वास:
१.१ तुम्हारे बुलानेको जी चाहता है - https://youtu.be/IUtGUY2X9gc
१.२ अब इस मरमरके जीने से, मिटा देते तो अच्छा था - https://www.youtube.com/watch?v=T9dqWqa2rIE
१.३ जा मैं तोसे नाही बोलूं - https://www.youtube.com/watch?v=vryl95tw62o
१.४ बेईमान तोरे नैनवा, निंदियाँ ना आये - https://www.youtube.com/watch?v=UpnT4Cth0pQ
१.५ कटती है अब तो जिंदगी - https://www.youtube.com/watch?v=w44lHkwujSI
१.६ बदली तेरी नज़र तो नजारे बदल गये - https://www.youtube.com/watch?v=AxkmHBhMOns

* * * *
संगीतकार सी. रामचंद्र:
सी. रामचंद्र - लता हे एक खास कॉम्बिनेशन आहे. दिदींच्या आवाजाचा मधाळ स्पर्श सर्वात जास्त प्रकर्षाने जाणवतो तो ह्या गाण्यांमध्ये. कदाचित तो त्या वयाचा परिणाम असेल, कदाचित त्या गोड चालींचा असेल. नंतर हा आवाज जास्त परिपक्व, जास्तजास्त परिपूर्ण होत राहिला, तरी त्यातला कोवळा निरागस गोडवा ह्या सुरुवातीच्या गाण्यांमध्ये जास्त जाणवतो. 'ओ निर्दयी प्रीतम' मधल्या एका ओ वरची अनेक सुरांची पखरण, 'कटते हैं दुखमे दिन' किंवा 'तुम क्या जानो' मधल्या दुखऱ्या मनावरून फुंकरेचं हळुवार मोरपीस फिरवायची किमया, किंवा 'मेरे मन का बाँवरा पंछी' मधला खळखळता आनंद - ही सगळीच गाणी फार लाडकी!
२.१ः तुम क्या जानो, तुम्हारी याद में हम कितना रोये: https://www.youtube.com/watch?v=vmzPqIKrNXw
२.२ः ओ निर्दयी प्रीतम: https://www.youtube.com/watch?v=deNDYRXMG6U
२.३ः कटते हैं दुख में दिन, पहलू बदल बदल के: https://www.youtube.com/watch?v=PHJa2gj9Kj8
२.४ः मुझपे इल्ज़ामे बेवफाई है, ऐ मुहब्बत तेरी दुहाई है: https://www.youtube.com/watch?v=Ka69XK51dEU
२.५ः मुझसे मत पूछ, मेरे इश्क मे क्या रखा है: https://www.youtube.com/watch?v=6CpC_LeMScY
२.६ः मेरे मन का बाँवरा पंछी, क्यूँ बारबार डोले: https://www.youtube.com/watch?v=ffixLJhH9GE

* * * *
संगीतकार नौशाद:
हिंदी सिनेसंगीताच्या सुवर्णयुगामध्ये नौशाद ह्यांचं स्थान अढळ आहे. जास्त करून भारतीय शास्त्रीय पद्धतीचं, रागदारीवर आधारित संगीत देण्यासाठी ते सर्वाधिक प्रसिद्ध आहेत. उपशास्त्रीय संगीत हे तर लतादीदींचं बलस्थान असल्यामुळे, ह्या दोघांची अनेक गाणी केवळ अविस्मरणीय आहेत. त्यातली ही माझी खास आवडती थोडी.
३.१: मोहे भूल गये साँवरिया - https://www.youtube.com/watch?v=lPg4vXRhiFA
३.२: न मिलता ग़म तो बरबादी के अफ़साने कहाँ जातें - https://www.youtube.com/watch?v=YkZ1FMrGpAY
३.३: जोगन बन जाऊंगी सैंया तोरे कारन - https://www.youtube.com/watch?v=NIseV-ElMkk
३.४: मोहे पनघटपे नंदलाल छेड़ गयो रे - https://www.youtube.com/watch?v=vK6deUO9BgE
३.५: जानेवाले से मुलाक़ात ना होने पाई - https://www.youtube.com/watch?v=r5fRILhmlYo
३.६: मेरे मेहबूब तुझे, मेरी मुहब्बत की कसम - https://www.youtube.com/watch?v=Sgg43x0xhgs

* * * *
संगीतकार शंकर-जयकिशन:
शंकर जयकिशन ही जोडी आणि लतादीदी, तिघांच्याही कारकिर्दीची सुरुवात थोडीफारच आगेमागे झाली. बरसात ह्या त्यांच्या एकत्र अशा पहिल्या सिनेमापासूनच तिघांनीही यशाची शिखरं गाठायला सुरुवात केली; आणि पुढची पंचवीसेक वर्षे ही सुरेल साथ निभावली, श्रोत्यांचे कान तृप्त केले. शंकर जयकिशननी हिंदी सिनेरसिकांना जशी शंभरेक वादकांच्या ताफ्याने वाजवलेल्या पाश्चात्य ढंगाच्या सुरांची ओळख करून दिली, तशीच दीदींच्या तारसप्तकामध्ये सहजपणे फिरणाऱ्या तानांचीही! रसिक बलमा आणि तेरा जाना सारख्या गाण्यांमध्ये तो आवाज मंत्रमुग्ध करत होता; तर अजी रुठकर किंवा एहसान तेरा होगा मुझपर मध्ये केवळ थक्क करत होता. त्याच दीदी, ह्या जोडीची सायोनारा, का करूँ राम, मुझे तुम मिल गये हमदम किंवा अजीब दास्तां है ये सारखी गाणी समुद्राच्या लाटांवरच्या फेसाएवढ्या हलक्याफुलक्या, अल्लड, केअरफ्री आवाजातही गात होत्या. ह्या त्रयीची, ही माझी खास आवडती गाणी. 'मनमोहना' मधला सच्चा, अचूक स्वर, शेवटची तानांची आतिषबाजी; 'जा जा रे जा' मधला लाडिक रुसवा; 'रुक जा रात' च्या पार्श्वसंगीताच्या झगमगाटामध्ये कुजबुजलेलं 'आऊंगी मैं संग तुम्हारे' हे वचन; 'नील गगन' मधली बेचैनी ... आणि भारतीय सुरांनी आणि पाश्चात्य वाद्यांनी नटलेलं 'सजन संग काहे' - सगळंच अतिशय आवडतं:
४.१: सजन संग काहे नेहा लगाये - https://www.youtube.com/watch?v=fBPWIZAhU9g
४.२: रसिक बलमा, हाये दिल क्यूँ लगाया तोसे - https://www.youtube.com/watch?v=hMk-JSGH1AE
४.३: जा जा रे जा, बालमवा - https://www.youtube.com/watch?v=TwBNRmvwAxA
४.४: रुक जा रात, ठहर जा रे चंदा - https://www.youtube.com/watch?v=M8vXozSgXkw
४.५: मनमोहना बड़े झूठे - https://www.youtube.com/watch?v=uXGMxTTB_Dg
४.६: नील गगनकी छाँवमे, दिन रैन गलेसे मिलते हैं - https://www.youtube.com/watch?v=55LRrp3XNA4

* * * *
संगीतकार सचिन देव बर्मन:
सुरुवातीलाच, फुल डिस्क्लोजर म्हणतात तसं सांगून टाकतो, एस डी हे माझे सर्वाधिक लाडके हिंदी सिनेसंगीतकार आहेत. त्यामुळे, आजच्या पोस्टमध्ये थोडं झुकतं माप पडलंय असं वाटलं तर त्याकडे दुर्लक्ष करा. सचिनदांच्या एवढा खराखुरा एव्हरग्रीन, वैविध्यपूर्ण, लोकप्रिय आणि तरीही दर्जेदार संगीत सातत्याने दीर्घकाळ देत राहणारा दुसरा हिंदी संगीतकार झाला नाही, एवढंच माझं नम्र मत आहे. लतादीदींच्या सुरांच्या रत्नांना सचिनदांच्या संगीताचं कोंदण मिळणं हा एक सुरेल योग होता. सचिनदा स्वतः उत्तम गायक होते; त्यांचा भारतीय शास्त्रीय संगीत, बंगाली आणि आसामी लोकसंगीत आणि रवींद्र संगीत ह्यांचा चांगलाच अभ्यास होता. त्याहीपलीकडे, कुठचं गाणं कोणाच्या आवाजात, जास्तीत जास्त प्रभावी कसं होईल ह्याचे त्यांचे ठोकताळे अचूक होते. त्यामुळे, एक छोटासा कालावधी सोडता, त्यांच्या बहुसंख्य गाण्यांमधील स्त्रीस्वर दीदींचाच आहे ह्यात नवल नाही. ह्या दोघांची फक्त सहाच गाणी निवडणं, हा मीच स्वतःवर केलेला जुलूम आहे.
अखेर मोठ्या कष्टाने निवडलेली सहा गाणी खाली दिलीच आहेत. पण त्यासाठी बाजूला सारून दुखावलेल्या काही गाण्यांचाही उल्लेख करणं आवश्यक! बऱ्याच जणांना ह्यात 'चाँद फिर निकला', किंवा 'तुम ना जाने किस जहाँमे', 'पवन दिवानी', 'पिया तोसे', 'रुलाके गया सपना मेरा', 'मेघा छाये आधी रात' ही गाणी नाहीत ह्याचं आश्चर्य वाटेल. अनेकवेळा ही आणि अशी इतर गाणी, गेल्या काही दिवसातील बेरीज-वजाबाकीमध्ये, घेऊन पुन्हा खोडली आहेत. प्रो. ठिगळेंच्या भाषेत, 'मी सॉरी आहे'! सहाच सीट्स असल्यामुळे, मुंबईतल्या बेस्ट कंडक्टरसारखं 'जगा नही, नीचे उतरो' म्हणतांना वाईट वाटतं. सचिनदा-लतादीदींच्या एकत्र गाण्यांचा खजिना मनात अक्षय्य वाजतच असतो. पुढच्या सहा गाण्यांबद्दल काय बोलणार, त्यांची रत्नप्रभा स्वयंसिद्धच आहे. एस. डी. - लता म्हटल्याक्षणी माझ्या मनात येणारी ही सहा गाणी:
५.१: मोसे छल किये जाय - https://www.youtube.com/watch?v=8ChzI6CgsAk
५.२: झनझन झनझन पायल बाजे - https://www.youtube.com/watch?v=--sgloyPAII
५.३: होठोँमेँ ऐसी बात मैं दबाती चली आयी - https://www.youtube.com/watch?v=2TmaXNiIuME
५.४: फैली हुई हैं सपनोंकी बाहें - https://www.youtube.com/watch?v=u8GK5FT_9Mc
५.५: ये तनहाई जाने फिर आये ना आये - https://www.youtube.com/watch?v=bPM9DmbBKk8
५.६: अब, आगे तेरी मर्ज़ी - https://www.youtube.com/watch?v=jPbNrIa-5h4

* * * *
संगीतकार मदन मोहन:
लतादिदींच्या आवाजाचा सुयोग्य वापर करून घेणारे महान संगीतकार हिंदी चित्रसृष्टीत अनेक होते; पण ज्याच्याशी दीदींचे सूर पुरेपूर जुळले होते असे कदाचित एक मदनमोहनच असतील. शिरीष कणेकरांनी गंमतीने म्हटल्याप्रमाणे 'मदन मोहनच्या संगीतामधून लता बाजूला काढा, तळाशी थोडासा तलत शिल्लक रहातो'! मदनजींच्या चाली दीदींना डोळ्यासमोर ठेऊनच रचलेल्या वाटतात; किंवा त्या चालींमधली सौन्दर्यस्थळं न सांगताही दीदींना दिसत असावीत. त्या दोघांच्या एकत्र रचना ऐकणे हा एक खास आनंद असतो. 'गज़लका शहेनशहा' ही मदन जींची ख्याती आहे. त्यामुळे मदन मोहन - लता हा विषय निघाल्यावर 'वो चूप रहे', 'यूँ हसरतोंके दाग़', 'आपकी नजरोँने समझा', 'है तेरे साथ मेरी वफ़ा', 'हम प्यारमेँ जलनेवालोंको' ही आणि अशी गाणी आपोआपच माझ्या डोक्यात दुतर्फा गर्दी करून उभी राहतात. पण ह्या सगळ्या ओळखीच्या, वारंवार भेटणाऱ्या गाण्यांना नुसतं हाय-हॅलो करून, मी वाट काढत पुढे जातो... माझी खास आवडती, कितीही वेळा ऐकून समाधान न होणारी गाणी मुद्दाम पुन्हा एकदा ऐकण्यासाठी. ती ही गाणी... ह्याही यादीत भर घालायला जागा नाही म्हणून केवळ बाजूला राहिलेली, 'बैरन नींद ना आय', 'नैनोमें बदरा छाये', 'तू प्यार करे या ठुकराएँ', 'मेरी बिना तुम बिन', 'जो हमने दास्ताँ', 'आज सोचा तो आँसू' अशी असंख्य आहेतच.
६.१: तुम चाँदके साथ चले आओ - https://www.youtube.com/watch?v=KK3S1I_P1Rk
६.२: सपनेमें सजनसे दो बातें - https://www.youtube.com/watch?v=ZFZKCWfRkuo
६.३: हमारे बाद अब मेहफ़िलमें - https://www.youtube.com/watch?v=zJWsra2-MA4
६.४: दो दिल टूटे, दो दिल हारे - https://www.youtube.com/watch?v=hp6rG0N-qPs
६.५: जा रे बदरा बैरी जा - https://www.youtube.com/watch?v=TUphod2EKOs
६.६: दिल उनको उठाके दे दिया - https://www.youtube.com/watch?v=cG2p5XLS1Wk

* * * *
संगीतकार सलील चौधरी:
सलील चौधरी - लता ह्या द्वयीची गाणी, म्हणजे मूर्तिमंत माधुर्य! बंगाली लोकसंगीत, आणि पाश्चात्य शास्त्रीय संगीत ह्या दोन्हींचा सलिलदांच्या रचनांवर फार मोठा प्रभाव जाणवतो. अतिशय गेय, सहज गुणगुणता येतील अशा वाटणाऱ्या ह्या चाली प्रत्यक्षात मात्र फार गुंतागुंतीच्या आणि अवघड. चालींमधील सुरांचे विलक्षण आणि अनपेक्षित चढ-उतार, हा तर सलिलदांच्या संगीताचा स्थायीभाव म्हणता येईल! उदाहरणं अनेक आहेत: 'मेरे ख्वाबोंमें ख़यालोंमें छुपे' किंवा 'रिमझिमके ये प्यारे प्यारे गीत लिये' ही दोन अगदी सहज आठवणारी ड्यूएट्स. फुलांवरून हलकेच टपाटप उड्या मारत फिरणाऱ्या फुलपाखरांचा आभास होतो, लतादीदींच्या तोंडून ही गाणी ऐकतांना. ह्या बरोबरच त्यांच्या गाण्यांमधला वेस्टर्न क्लासिकल टच! दिदींनी ह्या पद्धतीचं गायन कधी केलं असतं तर ते किती थ्रीलिंग झालं असतं ह्याची चुणूक 'ऐ दिल कहाँ तेरी मंज़िल' किंवा 'रातोंके साये घने' मध्ये दिसते ('वो इक निगाह क्या मिली' सुद्धा, पण ते ड्यूएट आहे).
दिदींनी 'चढ गयो पापी बिछुआ' ह्या गाण्याच्या सुरुवातीचा सबंध प्रेल्यूड आणि विशेषतः त्याअखेरची 'ओय ओय ओय... ' ही आलापी ज्या रितीने म्हटली आहे, ते केवळ जानलेवा! ती चाळीसेक सेकंदं मी कित्येकदा परतपरत ऐकतो (थँक्यू यू ट्यूब!) - सहगायक मन्ना डे ह्यांनीही ह्याच आलापीची एका मुलाखतीत मुक्तकंठाने तारीफ केली होती. एवढं आवडतं असल्यामुळे मी ते ड्यूएट न घेण्याच्या नियमाला आज हा एक अपवाद केला आहे. बहुसंख्य - चांगल्या सुद्धा - गायकांचा खालच्या सुरात गातांना कस लागतो. इथे 'मेरे मनके दिये' मध्ये दिदींनी संपूर्ण गाणंभरच जेमतेम कुजबुजत्या आवाजात, अतिशय खालच्या सुरात, किमान वाद्यमेळामध्ये, जे काही केलं आहे ते आपल्याला अवाक करणारं. परख मधल्या एका 'ओ सजना' ला - अर्थातच संपूर्ण सकारण - लोकांनी डोक्यावर घेतलं; पण त्यातली सगळीच गाणी (मिला है किसीका झुमका!) सुंदर होती.
सलिलदा आणि लतादीदी ह्यांनी बंगाली संगीतामध्येही इतिहास घडवला. त्यातली बरीच गाणी हिंदीमध्येही आली (वानगीदाखल एकच, माझं फार आवडतं 'जिया लागे ना' घेतलं आहे). एवढंच नव्हे, हृदयनाथ आणि दीदींची कित्येक गाजलेली मराठी गाणी (मेंदीच्या पानावर) सलिलदांनी स्वतः त्यासाठी काव्यरचना करून ती त्याच चालींवर, त्याच गायिकेसह बंगालीतही नेली. ह्या पार्श्वभूमीवर, त्या दोघांचं एक बंगाली - माझ्या माहितीप्रमाणे हिंदीमध्ये न आलेलं - गीत 'प म ग रे सा' सुद्धा ह्या यादीत घेतलं आहे.
त. टी. - इतर संगीतकारांप्रमाणेच 'सलील चौधरी - लता' गाण्यांचाही खजिना खूपच मोठा आहे; त्यांची इतर अनेक गाणी माझीही फार आवडती आहेत. ह्या पोस्ट्स ही माझी दीदींच्या आवाजाला वैयक्तिक श्रद्धांजली आहे; लता आणि संगीतकार ह्या जोड्यांच्या सर्वश्रेष्ठ गाण्यांची यादी नाही. सर्वानीच वारंवार ऐकलेली गाणी टाळण्याचा प्रयत्न आहे; पण मला कशी शेकडो गाणी माहिती आहेत हे दाखवण्याचा अट्टाहासही नाही. तुमच्या आवडीची, माझी राहून गेलेली गाणी अवश्य कॉमेंट्समध्ये पोस्ट करा.
७.१: ऐ दिल कहाँ तेरी मंज़िल - https://www.youtube.com/watch?v=t8LQ_lrEGyw
७.२: बिछुआ - https://www.youtube.com/watch?v=M0prEueTYTA
७.३: मेरे मन के दिये - https://www.youtube.com/watch?v=tkVxXZVx7l8
७.४: रातोंके साये घने, जब बोझ दिलपर बने - https://www.youtube.com/watch?v=aJz2mCcXe7E
७.५: ना, जिया लागे ना - https://www.youtube.com/watch?v=-3VxRoiq_sE
७.६: प म ग रे सा - https://www.youtube.com/watch?v=NEKwrdslc-Y

* * * *
संगीतकार रोशन:
रोशनच्या संगीतामध्ये, विशेषतः त्यांची ६०च्या दशकातील गाणी ऐकतांना मला बऱ्याचदा प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडल्याचा भास होतो. त्यामध्ये त्यांच्या लाडक्या यमन रागाच्या अप्रतिम वापराचा भाग आहेच. अतिशय नाजूक आणि सुंदर चाली! ह्या चाली, ही गाणी लतादीदींच्या आवाजात ऐकतांना हा सुगंध जास्तच दरवळतो. 'रहें ना रहें हम, महका करेंगे' ही रोशननी स्वतःच्याच एका जुन्या गाण्याची चाल (एस डीच्या ‘ठंडी हवाएं' बरोबर दोन्ही चालीचं साम्य लक्षणीय) थोडी बदलून तयार केली होती. 'ममता' मधलं दीदींचं हे गाणं तर 'चार्टबस्टर' म्हणावं असं झालंच. 'लता' ह्या त्यांच्या परफ्यूमच्या जाहिरातीची टॅग लाईन म्हणून - अर्थातच - हीच ओळ वापरली होती! ममता हे रोशन - लताच्या एकत्र गाण्यांचं शिखर म्हणता येईल. ममतामधील दीदींच्या अनेक उत्कृष्ट गाण्यांपैकी, कालसंक्रमण (पॅसेज ऑफ टाईम) दाखवण्यासाठी वापरलेली, 'हम गवनवा', 'सकल बन गगन' आणि 'विकल मोरा मनवा' ही रागमाला माझी अतिशय आवडती. 'ज़ुर्मे उल्फ़त' च्या सुरुवातीलाच जो 'आs' आहे, तेवढ्यासाठी सुद्धा हे सुंदर गीत मी अनेकदा ऐकलेलं आहे. जेव्हा एकच गाणं स्त्री आणि पुरुष गायक गातात, तेव्हा सहसा पुरुष गायकाचं गाणं जास्त प्रभावी ठरतं. माझ्या बाबतीत एकच अपवाद म्हणजे, 'दिल जो न कह सका' - हे गाणं रफी आणि लता दोघांनीही म्हटलं आहे; पण मला दीदींचं गाणं कांकणभर (!) सरस वाटतं; कदाचित त्यातल्या ड्रीमी रोमँटिक मूडमुळे असेल.
आजही, ही सहा गाणी निवडतांना एरी जाने ना दूंगी, रहतें थे कभी, दुनियामे ऐसा कहाँ सबका नसीब आणि महलोंका राजा मिला सारखी फार लाडकी गाणी मागे ठेवली आहेत. तुमच्या आवडीच्या गाण्यांची अवश्य भर घाला.
८.१: सकल बन गगन पवन चलत पुरवाई - https://www.youtube.com/watch?v=EC1Y1A0rOl8
८.२: दुनिया करें सवाल - https://www.youtube.com/watch?v=T8w9Se9HzzA
८.३: ज़ुर्मे उल्फ़त पे हमें लोग सज़ा देते हैं - https://www.youtube.com/watch?v=iloH_mdeiNM
८.४: कभी तो मिलेगी, कहीं तो मिलेगी - https://www.youtube.com/watch?v=UMZWtjM7Xa8
८.५: संसार से भागे फिरते हो - https://www.youtube.com/watch?v=4xlN0UvN8XA
८.६: दिल जो न कह सका - https://www.youtube.com/watch?v=bh_h89yYV4g

* * * *
संगीतकार हेमंत कुमार:
गायक संगीतकार हेमंत कुमार ह्यांनी ५० आणि ६० च्या दशकांमध्ये लतादीदींकडून हिंदी आणि बंगाली सिनेसंगीत, तसेच बंगाली लोकप्रिय संगीतामधील, अनेक गाणी गाऊन घेतली. दीदींनी स्वतः म्हटल्याप्रमाणे हेमंतदांच्या चाली बऱ्याच वेळा साध्या-सोप्या, पण अतिशय गोड असत. त्यामध्ये फार मोठा वाद्यवृंद, विविध प्रकारची वाद्ये वगैरेचा वापर नसे; जास्त भर गीताचे शब्द, अनुरूप चाल आणि गायकाचे सूर ह्यावरच असे. तरीही, आनंदमठ ह्या त्यांच्या पहिल्याच हिंदी सिनेमातली हेमंतदांची 'वंदे मातरम' ही रचना अगदी खास दीदींच्याच आवाजाला सुयोग्य अशी अवघड आहे! नंतर लवकरच आलेल्या 'नागीन' मधील दीदींच्या 'मन डोले'. 'ऊँची ऊँची दुनियाकी दीवारें' आणि 'जादूगार सैंया' सारख्या गाण्यांनी लोकप्रियतेची शिखरं काबीज केली. तोच अनुभव पुन्हा आणखी काही वर्षांनी ह्या दोघांच्या 'कहीं दीप जले कहीं दिल' ने दिला.
हेमंतदांकडे दीदींनी गायलेल्या गाण्यांचे असंख्य मूड्स आहेत. त्यांनी एखाद्या मुग्ध अबोल युवतीचं हळुवार 'कुछ दिल ने कहा' गायलं, तसंच अल्लड उत्साहाने सळसळणारं 'सपने सुहाने लडकपनके' पण गायलं. मदहोश तृप्ततेचं 'जिंदगी कितनी खूबसूरत है' गायलं (ह्यामधली, 'धुंदीत' असताना देखील 'आपकी जरूरत' ची फेक अप्रतिम!), तसंच गूढ, रहस्यमय 'झूम झूम ढलती रात' ही गायलं. त्याशिवाय प्यासी हिरनी, बस एक चूपसी लगी है, हमने देखी है आणि धीरे धीरे मचल सारखी ह्या जोडीची अनेक अविस्मरणीय गाणी कायमच डोक्यात घोळत असतात.
हेमंतदांचा खास ठसा असलेलं बंगाली ढंगाचं 'भूल गये थे राहे' माझं फार आवडतं. ह्यातला सुरुवातीच्या मितवा मधला आलाप, आणि नंतरच्या 'भूल' वरची फिरत, 'सब ऱंगोंके देखे चेहरें' मधल्या देखे वरची हरकत - सगळंच गुलज़ारच्या शब्दांसारखंच - केवळ अप्रतिम! ह्याशिवाय, ह्या जोडीने बंगाली सिनेसंगीतामध्येही किती सुंदर भर घातली ह्याचं एक उदाहरण म्हणून 'मोनीहार' ह्या संगीतासाठी गाजलेल्या सिनेमामधलं दीदींचं एक गाणं घेतलं आहे. ह्याचं हिंदी रूपांतर 'सावनमें बरखा सताये' हेमंतदांनी स्वतः गायलंय; पण दुर्दैवाने ते मात्र खूपच अप्रसिद्ध राहिलं.
नेहमीप्रमाणे, तुमच्या आवडीच्या गाण्यांची अवश्य भर घाला.
९.१: कुछ दिल ने कहा - https://youtu.be/69dnqIFfrnE
९.२: सपने सुहाने लडकपनके - https://youtu.be/TX8OfvAHNvU
९.३: जिंदगी कितनी खूबसूरत है - https://youtu.be/2Q_3wx7ajTs
९.४: झूम झूम ढलती रात - https://youtu.be/eArec8UyNh0
९.५: भूल गये थे राहें रे मितवा - https://youtu.be/qkQag3G7eS0
९.६: आशार श्राबोन, माने ना तो मोन - https://youtu.be/ObJezJNgGJA

* * * *
संगीतकार जयदेव:
अतिशय गुणी असूनही त्यामानाने फारच मोजक्या सिनेमांना संगीत देणारे जयदेव, ह्यांच्याकडे लतादीदींनी त्यांची काही अविस्मरणीय गाणी गायली आहेत. जयदेव ह्यांच्या चाली बऱ्याचदा खूप अनवट असत; खूप विचारपूर्वक रचलेल्या, तोंडात बोट घालायला लावणाऱ्या असत. एकुणातच त्यांची गाणी कमी, त्यात दीदींनी गायलेली आणखी कमी, त्यामुळे ही सहा रत्नं निवडायला अगदीच सोपी होती; ती नजरेतून निसटणं शक्यच नव्हतं. लतादीदींच्या उत्कृष्ट गाण्यांच्या आठवणी, ह्या सहा गाण्यांशिवाय अपुऱ्याच राहतील.
नेहमीप्रमाणे, तुमच्या आवडीच्या गाण्यांची अवश्य भर घाला.
१०.१: तू चंदा, मैं चाँदनी - https://youtu.be/WmuA1dzelN0
१०.२: ये दिल और उनकी निग़ाहोंके सायें - https://youtu.be/QeR3xkLp5do
१०.३: हर आस अश्क़बार है, हर साँस बेक़रार है - https://youtu.be/ygRAoRo-Wts
१०.४: अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम - https://youtu.be/prJ9NbOycEI
१०.५: मैं जानूँ नाही - https://youtu.be/lYFYY-0BmUE
१०.६: रात भी है कुछ भीगी भीगी - https://youtu.be/6jHCOLUsW6I

* * * *
संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल: लक्ष्मीकांत प्यारेलाल ही जोडी साठच्या दशकाच्या सुरुवातीला, हिंदी सिनेसंगीताच्या सुवर्णयुगाच्या ऐन बहरातच, हिंदी सिनेमांमध्ये अवतरली. त्या काळातील सर्व अतिरथी महारथी संगीतकारांबरोबर टक्कर देऊन ठामपणे उभी राहिली; एवढंच नव्हे तर नंतर ७० आणि ८०च्या दशकातही सिनेसंगीतामध्ये राज्य करत राहिली. एवढी प्रदीर्घ कारकिर्द तीन प्रख्यात गायकांच्या सहाय्याशिवाय शक्य झाली नसती म्हणणं वावगं ठरू नये. ते तीन गायक होते लतादीदी, महंमद रफी आणि नंतरच्या काळात किशोर कुमार. लतादीदींनी तर एल पी च्या पदार्पणापासून अखेरपर्यंत त्यांची साथ दिली. लतादीदींच्या आवाजाशिवाय एल पी च्या एखाद्या संपूर्ण सिनेमाची कल्पनाही करता येत नाही. एल पी च्या संगीताचे माझ्या मनात आपोआप दोन भाग पडतात - साधारणपणे पहिल्या दहा-बारा वर्षातील गाणी; आणि एकदा ढोलकीचा पूर्ण साक्षात्कार होऊन दीक्षा घेतल्यानंतरची त्यांची उरलेली इतर गाणी! संगीतकार म्हणून ही जोडी नंतर कितीही प्रसिद्ध झाली, तरी त्यांच्या सुरुवातीच्या ऐतिहासिक / पौराणिक बी ग्रेड सिनेमांमधील चालीच मला त्यांच्या सर्वात मधुर वाटतात. दीदींची दहाच सर्वोत्कृष्ट सोलो हिंदी गाणी निवडायची म्हटली (असा दुर्धर प्रसंग कधी कोणावर येऊ नये!) तर माझ्या यादीत 'जीवनडोर तुम्ही संग बांधी' असेल. एवढा नितळ, समर्पित आणि प्रासादिक भाव असलेली गाणी विरळा! शब्द, सूर आणि आवाज ह्यांचा खरोखरच दुर्मिळ मेळ. तशीच 'मैं एक छोटासा, नन्हासा बच्चा हूँ' मधली निरागसता आणि आर्तता! ह्याच पौराणिक काळातील 'खबर मोरी ना ली' ह्या गाण्यामध्ये भविष्यातील जास्त चांगल्या ऑर्केस्ट्रेशनच्या 'सत्यम शिवम सुंदरम' चा भास होतो. 'सत्यम..' सारख्या एवढ्या अवघड चालीच्या गाण्याचं रेकॉर्डिंग एका टेक मध्ये पुरं करून दीदी स्टुडिओबाहेर पडल्याची हकीकत नुकतीच ऐकली. कमालीचे दिव्य सूर! सुरुवातीच्या काळात एल पी नी काही सुंदर कव्वाली आणि मुजरा टाईपची गाणी दिली. दीदींनी चार चाँद जडवलेले 'अगर दिलवर की रुसवाई' हे त्यापैकी एक. 'इन्तक़ाम' मध्ये एल पी च्या खास आग्रहाखातर दीदींनी 'आ जाने जाँ' हे कॅबरे टाईप गाणं म्हटलं; अतिशय सुंदर म्हटलं... मला मात्र त्यात मादकतेपेक्षा गूढ, विरही आर्त भाव जास्त जाणवतो. एल पींच्या बऱ्याचशा गाण्यांमध्ये कुठेही ओळखता येणारा खास असा एक ठेका असतो; दीदींनी ह्या ठेक्यावरची असंख्य गाणी त्यांच्याकडे गायली - त्यातलं प्रातिनिधिक म्हणून 'हाय शरमाऊँ' हे एक ह्या यादीत आहे. शेवटचं 'एक प्यार का नग़मा' माझं फार आवडतं - विशेषतः ह्यातलं व्हायोलिन आणि लतादीदी - अप्रतिम कॉम्बिनेशन! म्हणून फक्त ड्यूएटचीच क्लिप मिळाली तरी घेतलं आहे. एल पी - लता ह्यांच्या एकत्र गाण्यांची यादी फारच मोठी आहे; त्यामुळे काही इतर चांगली गाणी राहून गेली असण्याची शक्यता दाट आहे! नेहमीप्रमाणे, तुमच्या आवडीच्या गाण्यांची अवश्य भर घाला. 
११.१: जीवनडोर तुम्ही संग बांधी - https://youtu.be/cI-N8FN3mi0 
११.२: अगर दिलवरकी रुसवाई - https://youtu.be/ciTVzcGKLXo 
११.३: सत्यम शिवम सुंदरम - https://youtu.be/6t8Z8UP1KK8 
११.४: आ जाने जाँ - https://youtu.be/XMueQRVqFBE 
११.५: हाय शरमाऊँ - https://youtu.be/za3woSwozUE 
११.६: एक प्यार का नग़मा है - https://youtu.be/zTUjZ7d0mf0

* * * *
संगीतकार राहुल देव बर्मन:
सांगीतिक दृष्ट्या बोलायचं, तर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येण्याचं, पंचमदांच्या एवढं उत्तम उदाहरण हिंदी सिनेसंगीतात कदाचित दुसरं मिळणार नाही. बाबा तर एक अतिशय चतुरस्र संगीतकार होतेच, पण आई सुद्धा कवियत्री / संगीतकार! हिंदी सिनेसंगीतामध्ये नवीन वाटा शोधणाऱ्या, स्वतःची अशी एक खास परंपरा सुरु करणाऱ्या मोजक्या संगीतकारांपैकी पंचमदा एक होते. पंचमदांच्या संगीताच्या उल्लेखाबरोबर सहसा आशाबाईंचेच नांव आपोआप डोळ्यासमोर उभे राहते. पण त्यांनी कित्येक अविस्मरणीय गाणी लतादीदींकडूनही गाऊन घेतली आहेत. त्यांच्या कारकिर्दीमधील सर्वात पहिलं - अप्रतिम सुंदर - गाणं 'घर आ जा घिर आये' लतादीदींनीच गायलेलं आहे. त्या बाबतीत, अमुक मूडसाठी अमुक आवाज वापरण्याच्या अचूक अंदाजाचा वारसा त्यांनी वडिलांकडून पुढे चालवला म्हणायला हवं. पंचमदांच्या प्रयोगशील संगीतामध्ये दीदींच्या आवाजाचे अनेक नवे पैलू ऐकायला मिळतात. रैना बिती जाय सारखे उपशास्त्रीय गाणे तर दीदींचा हातखंडाच होता; आणि तरीही ह्या गाण्यात त्यांनी पर्फेक्शनचं आणखी एक नवीन शिखर काबीज केलेलं जाणवतं. भाई बत्तूर च्या सुरुवातीचे किंवा मधले पाश्चात्य ढंगाचे आलाप दीदींकडून ह्यापूर्वी ऐकायला मिळाले नव्हते. ह्या जोडीची बहुतांश गाणी एवढी लोकप्रिय आहेत, की त्यावर नव्याने लिहिण्यासारखं काहीच नाही. एवढंच म्हणेन, खालील सहा गाणी मला पंचमदांच्या खास वैशिष्ट्यपूर्ण संगीतामधील लतादीदींचा आवाज ऐकण्यासाठी म्हणून फार आवडतात. ह्याशिवाय, 'मैं चली, मैं चली', 'आपकी आँखोंमे कुछ', 'बिती ना बिताई रैना', 'इस मोडसे जाते हैं' अशी अनेक ड्यूएट्स कायमची मनात घर करून बसलेली.
नेहमीप्रमाणे, तुमच्या आवडीच्या गाण्यांची अवश्य भर घाला.
१२.१: रैना बिती जाय, श्याम ना आये - https://youtu.be/x1pBmSRJpXI
१२.२: भाई बत्तूर - https://youtu.be/iRIXVQrS5s8
१२.३: क्या जानूँ सजन - https://youtu.be/ykCgasz4ScU?list=RDykCgasz4ScU
१२.४: वादियाँ मेरा दामन, रास्तें मेरी बाहें - https://youtu.be/Z6mTQmspvL4
१२.५: बाहोंमे चले आओ - https://youtu.be/ETyzbcajHUI
१२.६: ओ गंगा मैय्या, पार लगा दे मेरे - https://youtu.be/grskqMTX_eM

* * * *
काळाला कशाचंच काहीच नसतं; त्याला फक्त खुळ्यासारखं एका रेषेत पुढेपुढे जात राहणंच माहिती असतं. लोक एखाद्या आवाजात अडकून रेंगाळत राहिले, तर ते... त्यांचं सौभाग्य.
तेरा दिवस होऊन गेले! ह्यानंतर आत्मा, नश्वर शरीराचा निरोप घेऊन पंचतत्वात, अनंतात विलीन होतो असं म्हणतात. असेलही; कुठूनतरी गूढ अनोळखी स्थानाहून, पाठवणाऱ्याचा थांगपत्ता न लावू देता मिळालेल्या ह्या अनमोल भेटी... न सांगता एक दिवस परत निघून जातात; ऍड्रेस अननोन! शंभर टक्के परिपूर्णता, 'परफेक्शन' ह्या कल्पनेलाच आपण देव म्हणतो; कारण हे सगळं मानवाला दुर्लभ असं आपण मानतो. पण मर्त्य माणसं त्याच्या किती जवळ जाऊ शकतात, देवत्वाला स्पर्श करू शकतात ह्याची साक्ष आहे हा आवाज! असा हा आवाज मात्र कुठेच गेला नाही. जोपर्यंत भारतीय संगीत आहे, भारतीय भाषा आहेत, तोपर्यंत हा आवाज कायम राहणार आपल्यासोबतीला.
थोडंसं ह्या सिरीज बद्दल. लतादीदी गेल्या, हे ऐकल्याबरोबर त्यांची माझ्या मनामध्ये अखंड वाजत राहणारी असंख्य गाणी उफाळून वर आली, एकमेकाला मागेपुढे ढकलत , लहान मुलांसारखी 'माझ्याकडे बघ ना', 'मी जास्त छान आहे' असं म्हणत. ह्या आवाजावर आपलं किती प्रेम आहे, तो मनात किती खोलवर रुजलेला आहे ह्याची खूप तीव्रतेने जाणीव झाली. लिखाणाच्या शिस्तीसाठी संगीतकार, त्यांचा क्रम, प्रत्येकी सहाच गाणी, ड्यूएट्स टाळायची वगैरे नियम मीच स्वतःवर घालून घेतले होते. गाणी शोधण्यासाठी गुगल आणि यु ट्यूब वापरायचं नाही हे ठरवलेलंच होतं (गरजही नव्हती; ह्या ७८ पैकी बऱ्याच गाण्यांचे सगळे शब्दच पाठ आहेत मला). सहामध्ये निवडावी अशी कित्येक निःसंशय उत्तम गाणी राहून गेलीच असणार; पण ही काही स्पर्धा नाही. ही फक्त 'तेरा तुझको अर्पण' ह्या अतिशय विनम्र भावनेने वाहिलेली श्रद्धांजली आहे; व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. देवाला त्यानेच निर्मिलेल्या फुलांची ओंजळ वहावी अशी. पोस्ट करण्यापूर्वी ह्यातलं प्रत्येक गाणं पुन्हा ऐकून घेतलं; ह्या आवाजावर एवढं वेड्यासारखं प्रेम कसं आणि का, ह्याची पुन्हा एकदा छाननी झाली. 'नेती नेती' पलीकडे हाती जे लागलं ते शब्दात व्यक्त करण्यासाठी लागणारी संगीताची भाषा आणि तिचं व्याकरण माझं फार कच्चं. त्यापेक्षा, त्या आवाजाच्या आणि माझ्या कानांच्या थेट संवादाचा निखळ आनंददायी अनुभव घेणं किती सोप्पं.
गेले तेरा दिवस माझ्या मनात चाललेल्या लतादीदींच्या सुरांच्या सोहळ्याची आज ही सांगता. त्यासाठी, त्यांचे सूर माहेरी - मराठी भाषेच्या माहेरघरी, सख्ख्या भावाच्या संगीत सदनामध्ये - यावे हे योग्यच नाही का! दीदींच्या हिरेमाणकांसारख्या सुरांना एक डोळे दिपवणारं, लखलखतं कोंदण मिळालं ते हृदयनाथ सारख्या प्रतिभावान संगीतकाराच्या चालींचं. हे कोंदण एखाद्या कलायडोस्कोपसारखं - त्यातल्या आवाजाच्या वेगवेगळ्या पैलूंना प्रकाशझोतात आणून झळाळून टाकणारं! ह्या चालींमधल्या महामुष्कील जागांच्या पैलूंनी, आवाजाच्या स्वच्छ शुद्ध झळाळीने दिपून जाणं - एवढंच आपल्या हातात.
सूर्य पाहिलेली माणसं झालो आपण!
संगीतकार हृदयनाथ मंगेशकर:
१३.१: मावळत्या दिनकरा - https://youtu.be/XvZYnUbvkPU?list=RDXvZYnUbvkPU
१३.२: मोगरा फुलला - https://youtu.be/4thXvviBQnk
१३.३: सुनियों जी अर्ज म्हारियो - https://youtu.be/B6fgzi2GBWM
१३.४: आनंदी आनंद गडे - https://youtu.be/58tUIUOyeso
१३.५: मालवून टाक दीप - https://youtu.be/3PUWLblhqGY
१३.६: घनतमी शुक्र बघ राज्य करी - https://youtu.be/8JrFOzpwjO0

Comments