बिझीनेस ट्रीप - ३


दहाअकरा वर्षांपूर्वी चेन्नईला मी एका बिझीनेस ट्रीपसाठी दोन आठवडे गेलो होतो. ही ट्रीप दुसऱ्या एका व्हेंडरच्या ऑफिसला भेट देण्यासाठी होती. एअरपोर्टच्या जत्रेमध्ये मी हरवू नये म्हणून मला रिसीव्ह करायला दोन जुडवा भाईंसारखे दिसणारे, चिंच खूप जास्त झालेल्या सांबाराच्या वर्णाचे हैरू आणि भैरू हे टीमलीड्स आले होते. रात्री नऊ वाजता घरदार सोडून एअरपोर्टवर यायला लागल्यामुळे त्यांच्या मुद्रेवरील भाव त्याच सांबाराच्या चवीचे होते. भैरूच्या खांद्यावर एक झोपेला आलेलं, वर्षाच्या जवळपासचं मूल होतं. त्यांची कंपनी त्यांना किती क्रूर अन्यायाने वागवते, अशा लेकुरवाळ्या बापाला सुद्धा केवळ क्लायंटचा मनुष्य येणार म्हणून एअरपोर्टवर पाठवते ह्याचं मला दुःख झालं. ते बोलून दाखवताच दमलेल्या बाबाने माझं शंकानिरसन आणि दुःखनिवारण केलं - 'नो s सार! ऍक्च्युली माय वाईफं वोनली सॅड कार्तिकं क्राइंग टू s मच नो, टेक हिम समव्हेअर आऊट!' आता मला त्याच्या दुसऱ्या बॉसच्या अन्यायांची चीड आली; पण ह्या वेळी मात्र मी तोंड बंद ठेवलं. मी काही कुक्कुलं बाळ नव्हतो; माझा मी, किंवा किमान एकट्या हैरूचा हात धरून सुखरूप हॉटेलात जाऊ शकलो असतो! नंतरच्या वास्तव्यात जाणवलं, कदाचित हैरू भैरू एकमेकांवर आणि माझ्यावर नजर ठेवायला नेमले असतील; दोघे कायम माझ्याबरोबर असत.

ह्या वेळी मी एकटाच आणि ते सुद्धा प्रॉजेक्टच्या डेडलाईन्स मिस व्हायला लागल्यामुळे 'गेटिंग इंटू द वीड्स', याने की छडी छमछमण्यासाठी गेलो होतो. बहुतेक म्हणून, पहिल्या दिवशीचं दीपप्रज्वलन, आणि टीमची फॅन्सी ड्रेस स्पर्धा ह्यांना फाटा देण्यात आला होता. माझ्या वास्तव्यादरम्यान एक वीकेंड होता. तेव्हा काय करायची माझी इच्छा आहे अशी विचारणा झाली होती. त्या भागात बघण्यासारखं काय आहे, अंतरे, दळणवळणाच्या सोयी ह्या कशाचीच माहिती नसल्यामुळे, मी मनातली धनुष्कोडी, रामेश्वरम वगैरे पाहण्याची इच्छा बोलून गेलो. हैरूभैरू ट्रॅव्हल एजन्सीच्या अंदाजाप्रमाणे त्या ट्रीपसाठी किमान तीन दिवस हवे होते, जे माझ्याकडे नव्हते. मग, अमक्यातमक्या आमदाराच्या ओळखीने वीकेंडच्या दोन दिवसात तिरुपती जमू शकेल ही सूचना आली. मी मुळात फार भाविक नाही. दक्षिणेतली गोपुरे, त्यांची कारागिरी वगैरे बघायला मला आवडते; किंवा धनुष्कोडीच्या भौगोलिक स्थानामुळे मला ते बघण्यात रस होता एवढंच! वशिले, 'पेचान' वगैरे प्रकारांबद्दल तर मला पार तिरस्कार आहे. शेवटी, ते दोघे मला कंपनीच्या गाडीतून चेन्नई दर्शन घडवतील असा तह झाला. ह्या आधीच्या सर्व चर्चेमुळे, मंडळींची कल्पना मी फार उच्च कोटीचा ह.भ.प. आहे अशी झाली. त्यामुळे संपूर्ण शनिवार, आम्ही चेन्नई आसमंतातील खुन्या कार्तिकेय, पासोड्या मुरुगम, छपरी थिरूमुगम, झिपऱ्या म्रिदुमलाई ही किंवा असल्याच काही नावांची असंख्य देवस्थानं पाहिली. सगळ्या देवळांना तोच भयानक गॉडी मोरपिशी निळा रंग, आणि गोपुरांवरचे ते मद्राशी सिनेमांमधील राक्षसांसारखे (ते सुर असतात का असुर हे मला अजून समजलं नाहीय!) दिसणारे, भरघोस झुपकेदार मिशा वाढवून भेदक नजरेने बघत असलेले, आजन्म बैठ्याबैठ्या रबडीची दुकानं चालवून गरगरीत पोट सुटल्यासारखे दिसणारे पुरुष पाहून पाहून मी कंटाळलो होतो. बहुधा भैरू सुद्धा! दोनतीनदा सिगारेट ओढण्याच्या निमित्ताने देवदर्शन स्किप करून बाहेरच्या रस्त्यावर टवाळक्या करतांना मी पकडला त्याला. नशिबाने ह्या देवळांमध्ये हत्तीबित्ती नव्हते. हैरू मात्र खरोखरच सच्छिल, सज्जन, सद्वर्तनी सदू होता. बिचारा आठवून आठवून मला द्राविडी पुराणातल्या कथा ऐकवत होता. एकतर त्या रसभरीत असाव्या, किंवा त्याला बोलतांना मध्येमध्ये मिटक्या मारत असल्यासारखे च्याकच्याक आवाज करण्याची सवय असावी - त्याच्या हार्डकोअर दाक्षिणात्य इंग्रजीमागे धावतांना माझी फरफट होत होती.

दिवसभर देवळं बघितली; संध्याकाळी मरीना बीच (आग्र्यामध्ये जे स्थान ताज महालचं, तेच स्थान चेन्नईमध्ये मरीना बीचचं!) वरून फेरफटका मारला. हा मी पूर्वीही दोनदा पाहिला होता, दुसऱ्या व्हेंडर्सबरोबर! आता जेवायची वेळ झाली होती. मगाशी मी रस्त्यात 'बार्बेक्यू नेशन' ची पाटी बघितली होती; आणि लहान मुलाने आईस्क्रीमचं दुकान बघितल्यावर काढावा तसा अत्यानंदाचा चीत्कार माझ्या तोंडून आपोआप निघाला होता. ह्या हर्षोन्मादामागील रहस्य समजण्यासाठी, तुम्हाला एन आर आय मनःस्थिती समजणे आवश्यक आहे. माझ्यासारखे पाचसात वर्षांनी भारतात जाणारे लोक तिथल्या जागोजागच्या खाण्याच्या आठवणींवर इथे उसासे टाकत असतात. मग तो कनॉट प्लेसमधला काके दा ढाबा असेल, सायन कोळीवाडामधला हजारा सिंग असेल, पार्ल्याचं शबरी किंवा रामकृष्ण असेल, छबिलदासचा श्रीकृष्ण बटाटेवडेवाला असेल, कलकत्त्यातलं अंबर किंवा गोल्डन ड्रॅगन असेल - किंबहुना ह्या आठवणी चाळीसहून अधिक वर्षांपूर्वीच्या असल्यामुळे ह्यातले कित्येक जण आता अस्तित्वातही नसतील. त्यामुळे ओळखीतलं कोणीही भारतभेटीहून परत आलं की ह्या ठिकाणांची आपुलकीने चौकशी होते. त्यावर तोऱ्यात 'अरे ते सगळं विसर! आता, गजाली नाहीतर सायबा नाहीतर अमुकतमुक जाऊनच बघ!' अशी खास शिफारस 'इथे गेला नाहीस, तर तुझं मनुष्यजीवन व्यर्थ आहे' ह्या सुरात होते. बार्बेक्यू नेशन बद्दल २०१०-११ च्या सुमाराला असंच खूप ऐकलं होतं; त्यामुळे आता आयती संधी चालून आल्यावर मी खुश झालो. मी सन्माननीय पाहुणा असल्यामुळे, जेवायला कुठे जायचं हे मला विचारण्यात आलं; पण दोनतीनदा बार्बेक्यू नेशन असं स्पष्ट सांगूनही हैरुभैरूच्या कानात ते शिरत नाहीय हे मला जाणवलं. कंपनी बिल भरणार असल्यामुळे परवडण्याचा प्रश्न असू नये असं मला वाटत होतं. शेवटी, त्या दोघांनी कुठलंतरी थाय रेस्टोरंट निवडलं आणि आम्ही तिथे गेलो. हे फारच उच्च दर्जाचं महागडं होतं; जेवण छान होतं पण बाने नसल्यामुळे माझं आयुष्य मात्र अजूनही व्यर्थच राहिलं म्हणून मी खट्टू होतो. शेवटी हैरुने मला हिंट दिली, की मी 'क्लायंटका आदमी' असल्यामुळे मला एक विशिष्ट दर्जाच्या वरच्याच ठिकाणी नेण्याचे त्यांना आदेश होते!

शनिवार दिवसभराच्या अनुभवानंतर मीच हैरू भैरूच्या हातापाया पडून त्यांनी रविवारचा एक दिवस घरच्यांबरोबर घालवावा असा हट्ट धरला. माझा मी कसंतरी मन रमवेन, एकांतवासात सैरभैर होणार नाही अशी आश्वासनं दिली. नुसत्या पोकळ तोंडी आश्वासनांवर नाही, पण मॉलमध्ये जाईन आणि मल्टीप्लेक्समध्ये काहीतरी सिनेमा बघेन ह्या ठोस आणि त्यांच्या ओळखीच्या टाईमपासच्या वचनावर अखेर माझी सुटका झाली. रविवारी मी हॉटेलात बसून कंटाळल्यामुळे खरंच मॉलमध्ये गेलो. आयत्यावेळी कुठच्याच हिंदी सिनेमाचं तिकीट काही मिळालं नाही, काही तामिळ सिनेमांची मिळाली असती, पण काय उपयोग म्हणून मी ती घेतली नाहीत. त्या मल्टिप्लेक्समधील अत्याधुनिक यंत्रणेने मात्र मी थक्क झालो. तिकिटांच्या खिडक्यांऐवजी असलेले टचस्क्रीन्स, आणि त्यावरील सिनॉप्सिस, रिव्ह्यू, थेटरातील जेवणाची ऑर्डर इत्यादी अनंत 'यूजर फ्रेंडली' सोयी माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळी माझ्या इथल्या घराजवळपासच्या थिएटर्स मध्ये नव्हत्या. होम थिएटर सोडून बाहेर जाऊन सिनेमा बघायची वेळ फारशी येत नाही, म्हणून मला इथल्या थिएटर्समधील सोयींची फार सखोल माहिती नाही; कदाचित इथेही असतील तशा सोयी. दुसऱ्या दिवशी हैरू भैरूनी काल कुठचा सिनेमा बघितला ह्याबद्दल माझी उलटतपासणी घेतली. त्यानंतरच्या चर्चेमध्ये मला 'रजनी' विषयी फार (म्हणजे काहीच!) माहिती नाही, तिथे त्याचे तीन सिनेमे चालले असतांना मी एकही न बघता रिकाम्या हाताने परत यावं ह्याचा त्यांना अतीव खेद झाला आणि खोल धक्का बसला. भैरूने ताबडतोब दुसऱ्या दिवशी प्रायश्चित्त म्हणून मला रजनीच्या टॉप तीन तामिळ सिनेमांच्या, आणि 'अंधा कानून' ह्या हिंदी सिनेमाच्या व्हिसीडी गिफ्ट म्हणून दिल्या. अंधा कानूनचा मेलो मेलो ड्रामा जेमतेम अर्धापाऊण तास सहन केल्यावर उरलेल्या तामिळ सीडीज वेष्टनामधून बाहेर काढायचंही धार्ष्ट्य मला आजतागायत झालं नाहीय.

ऑफिसात कामाचा आनंद होता. आँखों देखा हाल पाहिल्यानंतर, मला डेडलाईन्स मिस होणे, डिफेक्ट्सची संख्या गगनाच्या दिशेने झेपावणे ह्यामागच्या कारणांचा छडा लागला. हा फिक्स्ड कॉस्ट प्रॉजेक्ट असल्यामुळे गरजेप्रमाणे 'बॉडीज' वाढवल्या जातील असं ठरलेलं होतं. पण हा टिपीकल नऊ बायकांनी मिळून एक मूल एका महिन्यात जन्माला घालण्याचा प्रकार होता. शाळा कॉलेजातून (होपफुली) पास होऊन बाहेर पडल्याक्षणी हायर केल्यामुळे ह्या जास्तीच्या बॉड्यांचं धड काहीच नव्हतं; त्यांना बेसिक ट्रबलशूटिंग सुद्धा येत नव्हतं हे प्रत्यक्ष भेटीमध्ये लक्षात आलं. मग ह्या मागास जमातीसाठी वेळप्रसंगी 'प्रोग्रॅमिंग वन-ओ-वन' हे प्राथमिक शिक्षणाचे वर्गही घ्यावे लागले. कितीही तास काम करायची त्यांची तयारी होती; फक्त काय करायचं एवढंच माहिती नसे. ह्याच कंपनीमध्ये वरच्या मॅनेजर्सशी बोलतांना त्यांना आमच्या प्रॉजेक्टची उद्दिष्ट, महत्व, डेडलाईन्स सगळं व्यवस्थित समजलेलं दिसे - पण हे ज्ञान काही कारणाने तळागाळात झिरपत नव्हतं. दोन आठवडे बरीच लेक्चरबाजी कम आरडाओरडी झाल्यावर परिस्थिती थोडी आटोक्यात आली.

परत आल्यानंतर 'त्ये सर लय मारकुटे' अशी किर्ती झाल्याचं समजलं, तेव्हा मी 'अपनेको क्या, काम लाईनपे आनेसे मतलब' असं म्हणून त्या गोपुरांवरच्या राक्षसांसारखा खदाखदा हसलो. पण झुपकेदार मिशा नसल्यामुळे तो इफेक्ट नाही आला.

Comments