(५ मार्च, २०२२)
ही मतमतांतरं बाजूला ठेवून नुसत्या बातम्यांकडे लक्ष केंद्रित करून, माझ्यापुरत्या केलेल्या ह्या नोंदी.
थोडा पुरातन इतिहास: बहुतेक भांडणांची मुळं फारफार पूर्वीच्या जुन्या हेव्यादाव्यांमध्ये गुंतलेली असतात; म्हणून इतिहासाची ती पार्श्वभूमी महत्वाची. ९०च्या दशकाच्या सुरुवातीला सोव्हिएट साम्राज्याची शकलं व्हायला लागली, हे बऱ्याच देशभक्त रशियन नागरिकांना पचवणं जड गेलं होतं. ज्या रीतीने, झपाट्याने आणि जेवढी शकलं झाली, त्यावरून लक्षात यायला हवं, की बाहेरच्या शक्तींनी (म्हणजे 'वसाहतवादी पाश्चात्य देश'!) ही फूट पाडलेली नव्हती. उलट १९२२ पासून सोव्हिएट युनियनच्या लाल कोयत्याच्या दहशतीखाली, घाबरून एकत्र राहिलेली विळ्याभोपळ्याची मोट ती दहशत नष्ट होताच, संधी मिळाल्याक्षणी सुटली होती. १९१७च्या झार विरुद्धच्या रशियन राज्यक्रांतीनंतर निर्माण झालेली ही छोटीछोटी रिपब्लिक्स, कित्येकदा आपसात झगडून, शेवटी १९२२च्या करारानुसार रशियाच्या वर्चस्वाखाली एकत्र आली. ह्या जबरदस्तीने एकत्र आणलेल्या चिल्ल्यापिल्ल्या सोव्हिएट राष्ट्रांपैकी युक्रेन हे सर्वात मोठं, आणि सर्वात समृद्ध राष्ट्र. हे गव्हाचे आणि एकंदरीत शेतीचे भांडार आहे. रशियन क्रांतीपासून १९२२ पर्यंत युक्रेनच्या रिपब्लिकने रशियन रिपब्लिकशी लढा दिला होता. नाईलाजाने सोव्हिएट रशियात विलीन झाल्यानंतर तब्बल वीसपेक्षा जास्त वर्षांनी, दुसऱ्या महायुद्धात युक्रेनने नाझी जर्मनीला केवळ रशियन छळातून (१९३०च्या सुरुवातीच्या युक्रेनियन 'दुष्काळा' बद्दल वाचा!) सुटका व्हावी म्हणून, पाठिंबाही दिला.
थोडा आधुनिक इतिहास: केजीबी च्या तालमीत मोठ्या झालेल्या पुतीनच्या डोक्यातून अखंड सोव्हिएट साम्राज्याचं स्वप्न कधीच गेलेलं नाही. २००० च्या सुमारास सत्तेवर पदार्पण केलेल्या पुतीननी त्याही काळी 'मायभूमी सोव्हिएट रशियाचे' तुकडे झाल्याचं दुःख दर्शवणारी विधानं केलेली होती. युक्रेनवरील आक्रमण हे पुतीनच्या स्वप्नांचे नजरेत भरणारे ताजे उदाहरण असेल, पण त्यादिशेने वाटचाल आधीच सुरु झालेली होती. बेलारुसला गळपट्टा बांधून, आणि जॉर्जिया, क्रायमिया घशात घालून झालेली होती. युक्रेनएवढे समृद्ध आणि महत्वाचे राष्ट्र रशियाला दूर लोटून युरोपच्या नादाला लागल्याचं दुःख सहन करायला कठीण होतंच; त्याशिवाय, युरोपला रशियन तेल पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन्स युक्रेनमधून जातात. तेलनिर्यात हे रशियाचे परकी चलनाचे सर्वात मोठे साधन आहे. स्वतः पुतीन आणि त्यांचे अब्जाधीश रशियन मित्र मुख्यतः ह्या तेलाच्या जोरावर श्रीमंत झालेले आहेत. हा अर्थकारणाचा मुद्दाही महत्वाचा होताच. २०१३-१४ च्या सुमारास, रशियाने गादीवर बसवलेले युक्रेनचे कठपुतली अध्यक्ष निवडणुकीत हरल्यानंतर, रशियाने हद्दीजवळच्या फुटीर संघटनांना लष्करी मदत करून, युक्रेनचे तुकडे करण्याचे प्रयत्न सुरु केले. त्या प्रसंगी, अमेरिका (ओबामा सरकार) आणि युरोपिअन राष्ट्रांनी काणाडोळा केल्यामुळे पुतीनना क्रायमिया घशात घालणे शक्य झाले. ह्या यशामुळे युक्रेनकडील आगेकूच अर्थातच निश्चित झाली. गेल्या आठवड्यातील पुतीनचा अतिशय भरकटलेला, साक्षात लेनिनला दोष देणारा, युक्रेनची एक राष्ट्र म्हणून ओळखच नाकारणारा इंटरव्ह्यू हे रशियन अपप्रचाराचे, इतिहास नव्याने लिहिण्याचा प्रयत्न करण्याचे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.
धूर्त व्यूहरचना: पुतीन गेली कित्येक वर्षे, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये यशाच्या पायऱ्या चढत जात आहेत. सीरिया मध्ये आसाद सारख्या दडपशहाला सत्तेवर सुरक्षित ठेवण्यामधील यश, अमेरिका आणि युरोपच्या नाकावर टिच्चून क्रायमिया गिळंकृत करण्यामधील यश, ब्रेक्झिट सारख्या खुळचट कल्पनांच्या मागे लागून इंग्लंडला युरोपापासून वेगळं करण्यात मिळालेलं यश अशी अनेक उदाहरणं देता येतील. ह्याबाबतीत पुतीनच्या शिद्दतसे बघितलेल्या स्वप्नाला संपूर्ण पाश्चात्य कायनातने मदत करण्याचा जणू विडाच उचलला होता. युरोपिअन राष्ट्रांची स्वसंरक्षणाविषयीची अनास्था, त्यावर पैसे खर्च करण्याची अनिच्छा, त्यावरून आपसातली भांडणे, अमेरिकेने इराक आणि मध्यपूर्वेमध्ये निरुद्देश, अनाठायी आणि खर्चिक लष्करी कारवाया करून स्वतःला निष्कारण जायबंदी करून घेणे, अफगाणिस्तानमधील वीस वर्षे ताणून धरलेल्या युद्धावर अब्जावधी डॉलर्स उधळणे… कित्ती कित्ती म्हणून मदत करावी! आणि त्यात डॉनाल्ड ट्रम्पसारख्या सत्तांध, 'मी आणि माझा वैयक्तिक फायदा' ह्यापलीकडे पाहू न शकणाऱ्या स्वार्थी अमेरिकन अध्यक्षाची देणगी पदरात टाकल्याबद्दल तर नास्तिक पुतीनचाही आता देवावर विश्वास बसला असेल.
कारण: युक्रेनवरील आक्रमणाची पुतीननी दिलेली महत्वाची कारणे अविश्वसनीय वाटतात. तेथील नाझी विचारसरणीचा रशियाला धोका हे हास्यास्पद बुजगावणं (युक्रेनचे निवडून आलेले अध्यक्ष झेलेन्स्की हे स्वतः ज्युईश आहेत!) जगाला फसवू शकतच नाहीय. दुसरे असेच दुबळे, निरर्थक कारण म्हणजे युक्रेनचा नेटो प्रवेश आणि आक्रमक वृत्ती. ह्या क्षणाला युक्रेनने नेटोमध्ये प्रवेश किमान अधिकृतरीत्या मागितलेला नाही, आणि नेटोने तो देऊ केला नाही. प्रत्यक्षात ती घटना घडेल का, आणि कधी, हे अनिश्चित आहे. पण तत्वतः, जर युक्रेन सार्वभौम स्वायत्त राष्ट्र असेल, तर कोणत्याही एका संरक्षक गटाचा सदस्य होण्याचा त्याला अधिकार का असू नये? युक्रेनसारखे जागतिक रंगमंचावर एरवी नगण्य राष्ट्र रशियासारख्या आण्विक महासत्तेला धोका निर्माण करू शकेल, आक्रमक होऊ शकेल हे कल्पनाशक्तीला अतिशय ताण देणारे गृहीतक आहे. ते रशियनांना भेडसावण्यासाठी पुतीन किती दिवस वापरू शकतील ही शंकाच आहे. रशियन सैन्य, केवळ 'आपल्या युक्रेनियन बांधवांची नाझी आणि मूठभर समाजकंटकांकडून सुटका करायला गेले' असेल, तर त्या युक्रेनियन बांधवांच्या निर्वासित झुंडी देश सोडून पळून का जात आहेत किंवा एवढा तीव्र लष्करी प्रतिकार का करत आहेत - हे रशियन नागरिकांना समजावून देणे कठीण असल्यामुळे पुतीननी तूर्तास स्थानिक बातम्या सेन्सॉर करण्याचा, आणि सोशल मीडियावर बंदी आणण्याचा जुना आणि गुणकारी उपाय योजला आहे.
भवितव्य: कदाचित गेल्या कित्येक वर्षांचे पुतीनना साथ देणारे दैव आता संपुष्टात आले असेल. अजूनपर्यंत तरी अमेरिका आणि आश्चर्य म्हणजे युरोपने सुद्धा खंबीरपणे एकमुखाने रशियावर अनेक आर्थिक आणि इतर बंधने लादली आहेत. रशियन रुबल प्रचंड गडगडला आहे, शेअर बाजार स्थगित आहे. स्वीडन, स्वित्झर्लंड सारखे आजपर्यंतचे तटस्थ देश आता नेटोचे सदस्य बनण्याचा विचार करत आहेत. रशियन रणगाड्यांचा पस्तीस मैल लांबीचा काफिला गेला आठवडाभर काही गूढ कारणांपायी राजधानी कीएव्ह पासून काही अंतरावर ठप्प आहे. जेवढ्या झपाट्याने युक्रेन कोसळणे अपेक्षित होते, ते प्रत्यक्षात घडत नाहीय. खुद्द सरकारी वज्रमुष्टीखाली राहणाऱ्या रशियन समाजामध्ये थोडीफार तरी युद्धविरोधी निदर्शने चालू आहेत. पण तरीही, रशियाला आता युक्रेनमधून कुठल्या तरी प्रकारचा विजय घोषित केल्याशिवाय सहजासहजी बाहेर पडणे शक्य दिसत नाही. कालांतराने रशियासारख्या महासत्तेला, युक्रेनला चिरडून टाकणे शक्य आहे - प्रचंड जीवितहानी आणि आंतरराष्ट्रीय मानहानी सहन करून! पुतीनना ह्यामधून काय साध्य करायचं आहे, हे कोडंच आहे. कदाचित, युक्रेनमधील प्रतिकार आणि लढा, त्याशिवाय पाश्चात्य जगाचा जोरदार एकसंध विरोध पुतीननाही अपेक्षित नसेल. युक्रेन अनेक्स करणे क्रायमिया गिळून टाकण्याएवढे सोपे नसणार आहे! हे युक्रेनच्या झुंझार लढवय्या जनतेने आतापर्यंत दाखवलेच आहे. तिथे बळजबरीने आपलं कळसूत्री सरकार स्थापन केलं, किंवा त्याला रशियाचा भाग बनवलं; तरी फुटीर गट तिथे अस्थिरता कायम ठेवतील. रशियाला हे दीर्घकाळाचं अवघड जागेचं दुखणं होण्याची शक्यता जास्त आहे. दुःखात सुख हे, की ह्या अनुभवानंतर, इस्टोनिया आणि लाटविया सारख्या देशांवर डोळा ठेवण्यापूर्वी, अखंड सोव्हिएट साम्राज्याचे स्वप्नरंजन पुढे रेटण्याआधी, पुतीनना दहादा विचार करावासा वाटेल.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...