सध्या अमेरिकेने युक्रेनवर 'नो फ्लाय झोन' घोषित करावा, अशी जोरदार आग्रहाची मागणी सर्वत्र चालू आहे. युक्रेनची स्वतःची तशी विनंती आहे - अमेरिकेला आणि नेटो राष्ट्रांना. युक्रेन सध्या ज्या हालअपेष्टा, जी प्राणहानी सहन करत आहे, त्या परिस्थितीत त्यांनी अशा मदतीची याचना करणे समजू शकते. पण, अमेरिकेला जागतिक गल्लीबोळांमधला पोलिस मानणाऱ्या बऱ्याच अण्णा आणि तात्यांची (हे अमेरिकेत सुद्धा असतात) मागणी समजू शकत नाही. आरामखुर्चीत बसून जगातल्या प्रत्येक प्रश्नावर सल्ले देणाऱ्या ह्या स्वयंभू विद्वानांची कल्पना अशी असते, की परसदारात खेळताना 'स्टॅच्यू!' म्हटल्याक्षणी जसं सगळ्या मुलांनी जागच्या जागी स्तब्ध व्हायचं असतं, तसं नो फ्लाय झोन म्हटल्याक्षणी आकाशातल्या विमानांनी त्या क्षेत्रावरून आपलीआपण यू टर्न घ्यायची असते! झालं ना काम, थांबले ना युक्रेनवरचे बॉम्बहल्ले क्षणार्धात!
तर बरं का अण्णासाहेब, दुर्दैवाने पुतीन आता मोठा झालाय; तो आता असे परसदारातले खेळ खेळत नाही. बॉम्ब टाकू नको सांगितलं तरी टाकतोच. नो फ्लाय झोनवर विमानं येत नाहीत ना ह्यावर किनई पहारा ठेवावा लागतो. विमानं आलीच, तर त्यांना हुसकावून लावण्याची धमकी, आणि ती प्रत्यक्षात आणण्याची, गरज पडल्यास हवाई युद्ध करण्याची तयारी ठेवावी लागते. जेव्हा ती विमानं रशियाची असतात, आणि त्यांना हुसकावणारे अमेरिकन किंवा नेटो पायलट असतात, तेव्हा त्या युद्धाला तिसरं महायुद्ध म्हणतात.
विचित्र वाटतं ना ऐकायला! मी आणि बहुतेक तुम्हीही, पहिल्या दोन महायुद्धांच्या फक्त कहाण्या ऐकल्या आहेत; थोडाफार इतिहास वाचला आहे; हॉलिवूडचे बहुतांश 'बावळट जर्मन आणि शहाणे अमेरिकन' धाटणीचे सुखान्त बोधपट बघितले आहेत, 'सेव्हिंग प्रायव्हेट रायन' म्हणजे आपल्या पॉपकॉर्न खातखात अनुभवलेल्या शौर्याची परिसीमा! रशियाचा न्यूक्लिअर हल्ला प्रत्यक्ष होऊ शकेल, आणि तो झाल्यास काय करायचं ह्याचं बालवाडीपासून प्रशिक्षण घेतलेली शेवटची अमेरिकन पिढी सुद्धा आता रिटायरमेंटच्या मार्गावर आहे. तिसरं महायुद्ध होणारच नाही, किंवा झालंच तर मध्यपूर्व, भारत-पाकिस्तान किंवा कोरियामध्ये वगैरे होईल अशा भ्रमात वाढलेल्या गेल्या काही पिढयांना पैलवान पुतीन ह्यांनी दंड ठोकून धक्का दिला आहे.
'म्युच्युअली अश्युअर्ड डिस्ट्रक्शन' (मॅड) ह्या तत्वावर स्टालिन, ख्रुश्चेव्ह सारख्या रशियन, आणि निक्सन, रेगन सारख्या अमेरिकन राज्यकर्त्यांनासुद्धा विश्वास ठेवावा लागला - केवळ एकाच कारणासाठी, की ते अंतिम सत्य आहे. दोन्ही बाजूंची अमर्याद प्राणहानी झाल्यावर, जे जिवंत राहतील त्यांनासुद्धा बेचिराख, विषाणूग्रस्त पृथ्वीवर राज्य करण्यात काहीच मतलब नसणार - निदान असायला नको. पण सत्य ओळखण्यासाठी डोके आणि मन ताळ्यावर असणे, सर्वसाधारण विवेकबुद्धी शाबूत असणे गृहीत धरलेले आहे. 'आपूनच भगवान है' भासणाऱ्या मेगॅलोमेनियाकची गोष्ट वेगळी असते.
पुतीनची गेल्या काही दिवसातली वर्तणूक, त्यांची वक्तव्ये, त्यांनी घेतलेले निर्णय ह्याबाबतीत फारसे दिलासादायक नाहीत. एका परीने तिसरे महायुद्ध सुरु झालेच आहे; फक्त दोन बाजू वेगवेगळ्या शस्त्रांनी लढत आहेत एवढेच. तिसरे महायुद्ध घडलेच तर ते न्यूक्लिअर असायलाच हवे असे नाही, पण तोंडघशी पडू लागलेला मेगॅलोमेनियाक काही करू शकतो. पाश्चात्य जगाच्या पराकोटीच्या आर्थिक बंधनांमुळे आणि बहिष्कारामुळे युक्रेनमधील निष्कारण साहस सामान्य रशियन नागरिकांपासून लपवून ठेवणे इंटरनेटच्या युगात पुतीनना कठीण जाते आहे. असंख्य रशियन सैनिक तूर्तास बेलारुसमध्ये दफन होत आहेत त्या प्राणहानीचा हिशेब एका मर्यादेनंतर मायदेशीही द्यावा लागणार आहे. युक्रेननेही प्रचंड संहार आणि प्राणहानी सहन करून सुद्धा शरणागती पत्करण्यास ठाम नकार दिला आहे. पुतीनची अवस्था कोंडीत पकडलेल्या, बिथरलेल्या वाघासारखी आहे. माघार घेण्याची, चूक कबूल करण्याची शक्यता शून्यवत असल्यामुळे, आता पडेल त्या किमतीला युक्रेन चिरडून टाकणे हा एकच उपाय त्यांच्याकडे आहे. कितीही घृणास्पद आणि महागडा असला, तरी सध्याच्या परिस्थितीत युक्रेनवर लष्करी विजय मिळवणे, आपले बाहुले सरकार वसवणे, त्या बाहुल्याच्या रक्षणासाठी पुरेसे सैन्य मागे ठेवणे, आणि 'जितं मया' म्हणून आपलीच पाठ थोपटून घरी परत जाणे हा सर्वोत्कृष्ट उपाय आहे. पुढच्या काही वर्षात पाश्चात्य जग कावकाव करून थकल्यावर, इतर जागतिक समस्यांमध्ये रशियाची मदत आवश्यक असल्यामुळे, बंधने आणि बहिष्कार हळूहळू शिथिल करेल अशी आशा ठेवल्यास हा महागडा, पण कमी धोकादायक मार्ग. कारण, पर्याय ह्याहीपेक्षा वाईट आहेत.
सध्या तरी, पुतीननी पोलंड (नेटो सदस्य) च्या सीमेपासून केवळ दहा मैल अंतरावरील एका कॅम्पवर बॉम्ब टाकून, तो उध्वस्त करून काय मिळवले हे समजणे कठीण आहे. विस्तवाशी खेळ ह्याला म्हणतात. पहिली दोन्ही महायुद्धे अशा ठिणग्यांमुळेच सुरु झाली होती - ठिणगी चुकून उडाली काय, किंवा मुद्दाम उडवली काय; परिणाम तोच वणवा पेटण्याचा असतो.
जर तिसरे महायुद्ध प्रत्यक्ष झालेच, तर रणभूमी युरोप-रशिया ही असेल. थेट अमेरिकेपर्यंत न्युक्लिअर हल्ला होण्यापूर्वी रशिया युरोपात जर्मनी-इंग्लंड-फ्रान्स, आणि दुसऱ्या बाजूला जपान सारख्या मित्रराष्ट्रांवर हल्ला करण्याची जास्त शक्यता आहे. रशियाच्या बाजूने, त्यांच्या नेहमीच्या उपग्रहांशिवाय, कोण उभे ठाकेल हे सांगणे कठीण आहे. अर्थातच रशियासकट बऱ्याच नजरा चीनच्या दिशेने वळतील. पण चीनची नजर मात्र ह्या फुकटच्या मारामारीत पडून हात भाजून घेण्यापेक्षा तटस्थ राहून युद्धोत्तर जगामध्ये (आणखी जास्त) वर्चस्व प्रस्थापित करण्याकडे असू शकेल. त्या काळात दोन्ही महासत्ता कमजोर झाल्यावर पुनर्रचनेच्या सहकार्याची दक्षिणा म्हणून सर्वप्रथम तैवानचा दीर्घकाळ ठुसठुसत असलेला काटा काढून टाकता येईल. कदाचित भारताबरोबरच्या सीमाप्रश्नांचाही एकदाचा आपल्या बाजूने सोक्षमोक्ष लावून घेता येईल. पाश्चात्य राष्ट्रांना चीनलाही शिक्षा करण्याची, रोखण्याची इच्छा असली, तरी आणखी एका आण्विक राष्ट्राला युद्धात खेचण्यामध्ये रस नसणार. पुन्हा एकदा इसापनितीमधील 'दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ' कथेचा विजय होणार.
होणार म्हणजे, असंही होऊ शकेल, एवढंच हो!
तळटीपः दरम्यान, अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाची वैचारिक दुर्दशा केविलवाणी आहे. एकेकाळी कट्टर रशियाविरोधी 'हॉक्स' म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्या पक्षातील एक कंपू आता पुतीनच्या प्रतिभेचे आणि विद्वत्तेचे पोवाडे गाण्यामध्ये मग्न आहे. नास्तिक पुतीनची 'ख्रिश्चन धर्म आणि संस्कृतीरक्षक' म्हणून पक्षाच्या वर्णविद्वेषी गटाकडून स्तुती होते आहे - खुद्द रशिया युक्रेनवर नाझी विचारसरणीचा आरोप करत असतांना. तर ते एक असो. वाचक / श्रोत्यांचे डोके गरगरायला लावणे हे ह्या गटाच्या वक्तव्यांचे प्रमुख जीवितकार्यच असते.

Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...