मला प्रत्यक्षात ओळखत असलेले बहुतेक लोक मान्य करतील की 'टवाळ' हे विशेषण मला फिट होणार नाही. आणि तरीही, मला विनोद आवडतो (सॉरी, रामदास स्वामी!). भयंकर आवडतो. संपूर्ण साहित्यप्रकारामध्ये तो माझा सर्वात आवडता प्रकार. डोक्याच्या यंत्रणेमध्ये एक माकड घट्ट बसलेले असल्यामुळे, कुठल्याही - अगदी कुठल्याही - प्रसंगाकडे पाहताना मला विसंगती, ढोंग, दुटप्पीपणा हे सगळं प्रथम जाणवतं. शब्दांमधील चमत्कृती प्रथम नजरेत भरते, आणि मनात रहाते. विनोदामध्ये मला कुठलाच विषय निषिद्ध वाटत नाही; आणि तरीही, मी खळखळून मनापासून क्वचितच हसतो, कारण बरेच सो कॉल्ड विनोद मला सामान्य वाटतात.
माझ्या मते विनोदाचे फक्त दोनच प्रकार असतात - चांगला विनोद, आणि वाईट विनोद. शारीरिक व्यंगावरून केलेले, दुसऱ्याची उणी काढून त्यांना शरमिंदा करण्यासाठी, कमीपणा दाखवण्यासाठी, नेम धरून केलेले असे विनोद सहसा वाईट विनोद असतात - केळ्याच्या सालीवरून पाय घसरून पाडण्याच्या विनोदाएवढेच क्षुद्र आणि पोरकट! अर्थातच, न जमलेले, ओढून ताणून केलेले, सगळ्यांच्याच डोक्यावरून जाणारे असे अयशस्वी विनोदही वाईटच.
माझ्या मते विनोदाचे फक्त दोनच प्रकार असतात - चांगला विनोद, आणि वाईट विनोद. शारीरिक व्यंगावरून केलेले, दुसऱ्याची उणी काढून त्यांना शरमिंदा करण्यासाठी, कमीपणा दाखवण्यासाठी, नेम धरून केलेले असे विनोद सहसा वाईट विनोद असतात - केळ्याच्या सालीवरून पाय घसरून पाडण्याच्या विनोदाएवढेच क्षुद्र आणि पोरकट! अर्थातच, न जमलेले, ओढून ताणून केलेले, सगळ्यांच्याच डोक्यावरून जाणारे असे अयशस्वी विनोदही वाईटच.
विनोद हा एक साहित्यिक अलंकार आहे. त्याचं विच्छेदन केलं, तर काय जाणवतं - त्यामध्ये अतिशयोक्ती असते, उपहास असतो, द्व्यर्थ असतो. त्यामध्ये चमत्कृती - एका दिशेने विचार करायला लावून अचानक अनपेक्षित धक्का देणे (पंच लाईन) असते. सर्वमान्य गृहीतकांना धक्का देण्याचा, एक वेगळी बाजू दाखवण्याचा प्रयत्नही असतो. तेव्हा, बहुतेक विनोदांमध्ये कोणाला तरी, काहीतरी खटकण्यासारखं नक्कीच निघू शकतं - विशेषतः आजकालच्या, सात गुबगुबीत गाद्यांच्या खालचा वाटाणा टोचणाऱ्या नाजूक राजकन्येच्या मानसिकतेमध्ये.
नेहमीप्रमाणे, द डेव्हिल इज इन द डिटेल्स. उदा. मला कुठल्याही प्रसंगावरचे विनोद वर्ज्य नसले, तरी थोडं तारतम्य, औचित्य बाळगायला हवं ही मागणीही समजू शकते. पण नेमकं इथेच, लक्ष्मणरेषा फार पुसट व्हायला लागतात. ११ सप्टेंबरचा हल्ला हा निःसंशय अतिशय दुःखद प्रसंग: पण ह्याचा संदर्भ असलेले सगळेच विनोद आपोआप वाईट, किंवा निषेधार्ह म्हणायचे का? केवळ त्या दुर्घटनेची आठवण करून देतो म्हणून? ह्या प्रसंगातील मृत, जखमी, किंवा त्यांची कुटुंबं ह्यातल्या कोणालाही टार्गेट केलं नसेल तरीही? समजा, टेररिस्टना रोखून विनोद असेल तर? तो चालेल? मग, ह्यामध्ये विनोद सुद्धा निखळ न राहता जजमेंटल नाही का होत? मग तो स्वतःचा 'विनोदीपणा' गमावणार नाही का? विनोद समजण्यासाठी थोडी मॅच्युरिटी आवश्यक असते का? माझ्यातल्या माकडाला असे शंभर प्रश्न पडतात.
कित्येक वर्षांपूर्वी एअर फ्रान्स च्या एका दुर्दैवी अपघातामध्ये बहुसंख्य जर्मन टूरिस्ट दगावले. त्याप्रसंगाबद्दल 'डार्क' किंवा 'ग्रेव्हयार्ड' ह्यूमर नांवाने प्रसारित होत असलेले काही विनोद ऐकले होते. तीच गोष्ट लेडी डायना च्या अपघाताची. त्यामधील शब्दांची चमत्कृती, अनपेक्षित धक्कादायक पंचलाईन ह्यामुळे ते अजूनही लक्षात आहेत. पण एरवी ते विनोद सामान्य, प्रासंगिक होते - आणि ते आपल्या मरणाने लवकरच संपुष्टात आलेही. पण त्यांचा सार्वजनिक धिक्कार वगैरे झाला नाही (कदाचित त्याकाळी वणवे पसरवायला समाजमाध्यमे उपलब्ध नसण्याचा तो फायदा असेल). तीच गोष्ट एखाद्या धर्माबद्दलच्या, पौराणिक कथांबद्दलच्या विनोदांची. थोड्या प्रांजळ परिपक्व नजरेने पाहिलं, तर सगळ्यांना मान्य व्हायला काही हरकत नाही, की पौराणिक कथा ह्या कित्येकदा अतिशय मनोरंजक आणि बोधप्रद असल्या तरी 'कथाच' आहेत. त्यातला शब्दनशब्द प्रत्यक्ष सत्य असल्याचा कोणाचाही छातीठोक दावा थोडा पोरकट आहे. उद्या आपण सुपरमॅन श्रेष्ठ, का बॅटमॅन ह्यावरून भावना दुखावून घेऊ का? मग, बॅटमॅनच्या फॅन्सनी सुपरमॅनची क्रिप्टोनाईट वरून टिंगल केली तर चिडायचं कशाला? तेव्हा, विनोदावर प्रतिक्रिया देताना थोडं तारतम्य श्रोत्यांनीही बाळगायला हरकत नसावी.
सेक्स बद्दलच्या, सो कॉल्ड 'नॉन-व्हेज' विनोदांबद्दलही तेच म्हणता येईल. एकीकडे, केवळ तो सर्व समाजांमध्ये 'टॅबू' विषय मानला जातो, म्हणून ते विनोदच नव्हेत, किंवा ते आपोआप गलिच्छ वगैरे म्हणणे, त्याने भावना दुखावणे वगैरे मला विनोदी वाटतं. कित्येक 'नॉन-व्हेज' विनोद खळाळून हसवणारे असतात. पण दुसरीकडे रिचर्ड प्रायर सारख्या केवळ लिंग आणि लैंगिक क्रियेबद्दल नॉन-स्टॉप बोलत राहणाऱ्या एखाद्या 'कॉमेडियन' बद्दल आणि त्याच्या फॅन्सबद्दल मला पौगंडावस्थेतील मुलांच्या ऍनाटॉमीकल संशोधनाच्या ऑब्सेशनची शंका येते, आणि कंटाळा येतो. अर्थातच, प्रायर हे केवळ एक प्रसिद्ध उदाहरण आहे; त्याच्यासारखे अनेक असणार.
थोडं हसा; हसू नाही आलं तर सोडून द्या, लगेच गुद्द्यावर येऊ नका.
सध्याच्या प्रत्येक गोष्टीवरून टोकाला जाण्याच्या मानसिकतेमध्ये विनोद हे एकमेव औषध मानवजातीला तारून नेईल हा बोधप्रद संदेश देऊन मी माझे भाषण ह्याठिकाणी थांबवतो आहे.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...