भावना

कित्येकदा एखादा विषय मनामध्ये बरेच दिवस घोळत असतो. त्याबद्दल बोलायचं, लिहायचं असतं. पण स्वतःच्या मनामध्येच तो मूर्त स्वरूपात नसतो. तो शब्दात व्यक्त करणं शक्य नसतं. आणि एक दिवस अचानक, अनपेक्षितरित्या एखादं चित्र डोळ्यासमोर येतं; आणि जे व्यक्त करायला झगडत होतो ते लक्ख, स्पष्ट डोळ्यासमोर उभं करतं. दुसऱ्या सगळ्यांना ते चित्र तसंच दिसेल का? त्याच भावना त्यांच्या मनात जाग्या होतील का? चित्रकाराचा, फोटोग्राफरचा, किंवा ह्या बाबतीत अभिनेते-दिग्दर्शक ह्यांचा तोच दृष्टिकोन असेल का? तर नाही; नसेलही, पार वेगळाही असू शकेल. आणि तरीही, अशा एखाद्या फोटोने माझ्या मनातल्या भावनांना, अंधुकसं तरी का होईना, थोडं मूर्त स्वरूप मिळतं.

गजेंद्र अहिरे ह्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये हा फोटो बघितला; आणि लिहावंसं वाटलं. म्हणजे 'शेवरी' बद्दल नव्हे; मी तो सिनेमा पाहिलेला नाही. त्याची कथा, ह्या प्रसंगामागील पार्श्वभूमी, संदर्भ, पात्रांचे संवाद ह्याविषयी मला काहीही माहिती नाही. पण हे चित्र माझ्या मनातल्या एका कथेला मात्र फार पूरक वाटलं. साहित्यिक रचना ह्या अर्थाने कथा नव्हे; एखादी गोष्ट, घटना अशा साध्या अर्थाने कथा.

साठ, सत्तरच्या दशकातील, मध्यमवर्गीय (कनिष्ठ हे विशेषण टाळलं आहे, मध्यमवर्गीय संकोचामुळे), तारुण्य ओसरायला लागलेलं, एक जोडपं. नवऱ्याची नोकरी बेताबाताची. आई-वडिलांचा, एखाद्या मुलाचा, कदाचित एखाद्या धाकट्या बहीण-भावाचाही भार डोक्यावर. बायकोला नवऱ्याचं कौतुक. त्याला मदत करायची, स्वतः थोडी कमाई करून संसाराला हातभार लावायची इच्छा. शेजाऱ्यांसारखा एक फ्रीज घ्यावा असलं डोक्यातलं काहीतरी स्वप्न; बरीच वर्ष दैनंदिन अडचणींच्या ढिगाऱ्यामागे धूळ खात पडलंय. आज तो ऑफिसातून घरी येतो; नेहमीसारखाच दमलेला, पण नेहमीपेक्षा खुशीत. पुढच्या महिन्यापासून दरमहा चक्क पस्तीस रुपये पगारवाढ मिळणार आहे! झाले ना जवळजवळ सहा सात टक्के, आहेस कुठे! ती त्याच्याकडे अभिमानाने आणि कौतुकाने बघते. मनातला फ्रीज अंगावरची धूळ झटकत पुढे येतो. 'छे ग, पस्तीस रुपयांनी काय होणारे!' 'होईल हो. मी ऐकलंय, आजकाल म्हणे दरमहा लहानलहान हप्ते भरून सुद्धा घेता येतो फ्रीज. दोन-चार वर्षात फिटेल ना.' तिची दुर्दम्य, भाबडी आशा, त्याच्या पांढऱ्या व्हायला लागलेल्या केसातली सुरकुतलेली काळजी. 'त्या बोरकरांकडचा तो फ्रीज केवढा महाग आहे कल्पना तरी आहे का तुला?' 'तेवढा मोठा नको; अर्ध्या साईजचे पण मिळतात. छोटासा असेल, पण आपला असेल हो.' तिचं भीतभीत घोडं दामटणं. तो विचारात पडतो; गेले किती महिने ह्या ना त्या कारणाने तिला डावलत राहिलो होतो ह्याच्या आठवणींमध्ये हरवतो. तिच्या चेहऱ्यावरचा लहान मुलासारखा उत्साह, ती अधीरता बघतो. त्या चमकणाऱ्या डोळ्यांमधली आशा त्याच्या काळोख्या सुरकुत्यांवर एक सोनेरी कवडसा पाडते. त्यालाही पुन्हा लहान मूल बनवते. तो पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडतो; हो म्हणतो. त्याला तिची हौस पुरवल्याचं समाधान; तिला तिच्या हक्काच्या माणसाच्या आधाराचं कौतुक. त्या संध्याकाळचा चहा जास्तच गोड लागतो.

हा फ्रीजच असायला हवा असं नाही, रेडिओ, टीव्ही, स्कुटर... काही असू शकतं. शेजाऱ्यांच्या, इतर जगाच्या नजरेत ते नगण्य असतं. पण त्यांच्या घरातलं ते पहिलंच असतं. त्यासाठी केलेली धडपड, मेहनत, बघितलेली वाट, ठिकठिकाणी केलेली काटकसर - फक्त त्या दोघांची असते. जवळ बाकी फारसं काही नसलं, तरी हाती फक्त हात असतात. तेवढे पुरेसे असतात.

हा आपलेपणाचा, एकदुसऱ्यावरच्या दृढ, अढळ, निरागस विश्वासाचा भाव माझ्या डोळ्यात पाणी आणतो.

हा मी न्यू यॉर्कच्या महागड्या भव्य रस्त्यांवरून हातात हात घालून, संपूर्ण जगाला विसरून फिरत असलेल्या मेक्सिकन जोडप्याच्या डोळ्यात बघितला आहे. तो तिला ह्या महानगराच्या मोठमोठ्या कहाण्या सांगत असतो, आणि ती डोळ्यातून अपरंपार ओसंडून वाहणारं कौतुक आवरत ह्या परक्या देशात स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या त्याच्या हिमतीला सलाम करत असते. 'आता तू एकटा नाहीस' ह्याचं आश्वासन देत असते. त्या नजरेत 'नसेलही खूप काही आपल्याकडे, पण सगळं जग आपलं आहे, कारण आपण एकत्र आहोत' हा वेडा आत्मविश्वास असतो. त्या निरागस स्वप्नांचा, त्या विश्वासाचा मला हेवा वाटतो.

एखादं एक-दोन वर्षाचं, बुजरं मूल असतं. त्याच्याच वयाच्या कोणाच्या बड्डे पार्टीला आलेलं. थोडा वेळ खेळण्यात दंगामस्ती करण्यात रमून गेलेलं असतं. अचानक त्याला आई-बाबा कोणीच जवळ दिसत नाही. खाऊ-खेळणी आणि बलून्सच्या पसाऱ्यातून वाट काढत ते दुडदुडत बाहेर पळत येतं. बाबा दिसल्याबरोबर त्याच्या गळ्यात लहानशा हातांची मिठी टाकून त्याच्या खांद्यावर मान टेकतं. त्या घट्ट मिठीमध्ये जो विश्वास असतो, 'माझं' माणूस इथेच आहे, माझी वाट बघत असणारच आहे ही जी खात्री असते, तिच्याएवढं दुसरं काहीच मला मोहक वाटत नाही.

हा भाव मला एअरपोर्टवर, नव्हे अगदी लहानशा रेल्वे स्टेशनांवर सुद्धा, दिसला आहे. धाकटा मुलगा अभ्यासात डोकं बुडवून, चांगले मार्क मिळवून, शहरातल्या, परदेशातल्या मोठ्या युनिव्हर्सिटीत पुढचं शिक्षण घ्यायला निघालेला. निरोप द्यायला आलेले म्हातारे, थकलेले आईवडील. त्यांच्या डोळ्यातले अश्रू चमकत असतात, मुलाच्या कौतुकाने. कधी मोठी भावंडं असतात. घरातले इतर खर्च बाजूला ढकलून, क्वचित कर्ज काढूनही धाकट्याच्या प्रवासाचं तिकीट काढलेलं असतं. आयत्या वेळी उपटणारे शंभर अनपेक्षित खर्च भागवलेले असतात. धाकट्याच्या भावी उत्कर्षाची स्वप्नं बघतांना इतरांचे डोळे चमकत असतात. ते निर्व्याज प्रेम, ती माया माझा आवंढा गळ्यात अडकवते.

बरेच लोक 'पाप, पाप' जे म्हणतात ते, ह्या अशा निःशब्द अनुच्चारित भावनांचा अव्हेर करणं, ह्या विश्वासाचा घात करणं, ह्यापेक्षा वेगळं काही नसेल असं मला वाटतं.

37 Comments

Comments