मी?

काय शोधत होतो आठवत नाही; पण तोच समोर आला. त्याला बघितलं, आणि मी थबकलोच!

मीच तो! तेच दाट, अशक्य कुरळे केस; तोच चष्मा; त्याच कपाळावरच्या आठ्या... तोच त्रासिक आवाज. नक्की मीच तो.
पण कसं शक्य आहे? असं कसं होईल. तो जर मी असेल, तर मग त्याच्याकडे बघणाऱ्या माझं काय? तो मी कुठे जाणार?

मग मी कान देऊन ऐकायला लागलो. कोण आहे हा ते तरी कळेल... खरंच जुना मी? का हा माझ्यासारखाच, पण वेगळा?

काळजीत होता. एवढे खर्च, त्यात नवीन घर घ्यायचं मनावर घेतलंय. सगळ्या मित्रांनी घेतलं, आपलंच अजून होत नाहीय. किंमती काय रोज वरच जाताहेत. कधी होणार?

चिडचिडत होता. मग, करतो मुद्दाम तासतास थांबून ओव्हरटाईम; तेवढेच जास्त पैसे मिळतील ना? आपल्याच संसाराला ना? मुलाने पहिलं पाऊल टाकलं? बघेन ना मी वीकेंडला. फोटो काढून ठेव तू.

खूप वाटलं; कोणीकनी असेना. त्याला जाऊन सांगावं. काळजी नको रे करू. होईल सगळं चांगलं. गंमत माहित्ये का, चोपडीची पानं संपत आली ना, की सगळे ताळे आपोआप जुळलेले असतील. एवढा त्रागा नको करून घेऊ.

तेवढ्यात त्याचा चढलेला आवाज ऐकला. 'हो गं. शांत रहा, एवढी धावपळ करू नको, चीडचीड करू नको म्हणणं सोपं आहे. पण असं होत नाही. मुलं आहेत, घर आहे, खर्च आहेत, ऑफिसचं टेन्शन आहे...' त्याला समजावणारी कोण ती म्हातारी बाई गप्पच झाली एकदम.

म्हटलं, ठीक आहे. त्याचं त्यालाच उमगेल.

तेव्हा शोधायला जाईल तो. जुना तो सापडतोय का बघायला, वेळीच त्याला थोडा शांत करायला.

त्याला कदाचित सापडेलही तो.

सापडू दे.



Comments