दहाव्या वाढदिवसानिमित्त

मला वाटतं फेसबुकवर माझा अकाऊंट २०१२ पासून आहे; म्हणजे ह्या वर्षी दहावा वाढदिवस. अकाऊंट कधी उघडला ह्याची तारीख नक्की आठवत नसल्यामुळे, काही लोक तारखेऐवजी तिथीने वाढदिवस साजरे करतात, तसा हा वाढदिवस मी वर्षाने साजरा करतो आहे. 

फेसबुक अकाऊंट उघडल्यावर पहिले कित्येक महिने इथे का यायचं आणि येऊन काय करायचं हा मला प्रश्न असे. 'पोस्ट करणे' ह्याचा तेव्हा जो अर्थ माहिती होता, त्यासाठी घरातून बाहेर पडून एका कळकट्ट बिल्डिंगीतील खत्रूड चेहऱ्याच्या माणसांना ष्टाम्प पुरेसे लागले आहेत ना हे विचारावे लागत असे. अकाऊंट तरी का आणि कसा उघडला आता आठवत नाही. त्या काळी अक्षरशः तीन-चार नातेवाईक फक्त माझे 'फ्रेंड्स' होते. त्यातल्याच एकाने माझी हिंदी सिनेसंगीताची आवड पाहून, मला तशा एका ग्रूपवर पोष्टाच्या ष्टाम्पासारखे चिकटवले. हे म्हणजे वेड्या पीराला मक्केला धाडण्यासारखेच होते. अजूनही मी नेटवर पाहिलेल्या बऱ्याच सिनेसंगीताच्या ग्रूप्समध्ये मला हा सर्वाधिक आवडतो, तिथे भेटलेल्या जाणकार आणि रसिक सदस्यांमुळे! त्यानंतर हळूहळू समधर्मी फ्रेंड्स वाढू लागले. फेसबुक च्या वावराची थोडी सवय झाली. इतरांच्या पोस्ट्स पाहू लागलो, आणि आपणही असलं काही पोस्ट करायला हरकत नाही हे जाणवलं.

माझ्या बोलण्याची पट्टी जात्याच खालची असल्यामुळे आवाज चढवून तावातावाने आग्रही मतं मांडणाऱ्या गर्दीमधून मी बाहेर पडतो; अशा ठिकाणी प्रत्यक्ष चर्चा संभवत नसते. 'लिव्ह अँड लेट लिव्ह' पेक्षा जास्त सोपं आणि अमूल्य तत्वज्ञान मला माहिती नाही. बऱ्याच गोष्टीतली माझी मतं, किंवा बऱ्याच गोष्टींच्या माझ्या आवडी सुद्धा अनेक परिचितांना विनोदी वाटतात. पण माझी मतं कोणाला पटवून देण्याची मला काडीमात्र गरज वाटत नाही; कोणी हसल्याचा, वेड्यात काढल्याचा (दीर्घ अनुभावापोटी!) खेदही होत नाही. तशीही, बहुतांश ग्रोनप माणसांची मतं कोणी, लीस्ट ऑफ ऑल मी, बदलू शकेल ह्यावरही माझा विश्वास नाही.

अशा माणसांसाठी फेसबुक हे फारच मोठं वरदान आहे. माझ्या अमेरिकेच्या पहिल्या पॅन ऍम च्या फ्लाईटवर एक वयस्कर पंजाबी बाई होत्या. त्या परदेशी विमानात भाषेअभावी झालेली त्यांची अवस्था, धेडगुजरी पंजाबी-हिंदीमध्ये मी केलेल्या थोड्याशा मदतीने झालेला त्यांच्या डोळ्यातला आनंद मी अजून विसरू शकत नाही. आपलं बोलणं थोडं तरी समजणारं कोणीतरी आहे, हा आनंद मला स्वतःला फेसबुक वर बऱ्याचदा अनुभवायला मिळाला. एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन्स, रस्त्यातले जथे अशा गर्दीतली माणसं निरखायचा माझा खूप जुना छंद आहे. त्यांच्या दिसण्यावरून, हालचाली, देहबोली, त्यांच्या आपसात चाललेल्या ऐकू न येणाऱ्या संवादांमधून त्यांच्याविषयी कल्पना करणे ह्यात मला गंमत वाटते. फेसबुक हा मला त्याचा काऊंटरपार्ट वाटतो. इथे लोक प्रत्यक्ष दिसत नसतात; प्रोफाइल पिक सुद्धा फसवे असू शकतात, पण कान उघडे ठेवले तर लक्ख ऐकू मात्र येतात. त्यांच्या स्वतःच्या पोस्ट्सवरून, इतरांच्या पोस्टवरील कॉमेंट्समधून ती स्पष्ट जाणवतात. आणि ते पहायला मला आवडतं.

फेसबुकवर पहायला बरंच मिळालं. नाना प्रकारचे विचार, मतं, प्रतिक्रिया, आवडीनिवडी पहायला मिळाल्या. जत्रेत टकामका चोहीकडे बघणाऱ्या लहान मुलासारखी अवस्था असते माझी. एकाच घटनेवरच्या लोकांच्या वेगळ्या, पार टोकाच्या (आणि माझी आणखीच तिसरी एक!) प्रतिक्रिया पाहताना गंमत वाटते. कित्येक वेळा ह्यावर प्रतिक्रिया लिहिण्याचे कष्टही कोणाला घ्यावेसे वाटले, ह्याचंच आश्चर्य वाटलं - त्याचं अनेकांनी खंडन करण्याचं त्याहूनही जास्त! फेसबुकवर काही मठाधिपतीही आहेत, आणि ते आपल्या धर्मप्रसाराच्या जोडीला दुसऱ्या शंकराचार्यांना खाली खेचण्याचे बहुमोल कार्यही करत असतात हे पाहून मौज वाटली. लोक संन्यास काय घेतात, किंवा घेणार अशा घोषणा, मग भक्तांच्या 'नको, नको; आमचं काय होईल ह्याचा विचार करा' वगैरे याचना; काही काळाने ह्या मायावी जगाचा मोह न टळून परत काय येतात (तरी त्यांच्या पोस्ट्सना कोणी वाळीत नाही टाकत; विठ्ठलपंतांच्या काळापासून समाज बराच सुधारला आहे आता!) - मजा नाहीतर काय! पण, त्याच वेळी खरंखुरं विचारप्रवर्तक, एखादा वेगळाच पैलू दाखवणारं, व्यासंगी लिखाणही वाचायला मिळालं; कधीकधी पुलंच्या विनोदाच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडू शकलेलं जेन्युईन विनोदी लिखाण वाचायला मिळालं. माझ्या मित्रयादीमधल्याच काही लोकांच्या हेवा वाटावा अशा ह्या लेखनकौशल्याकडे पाहून मी दिवसदिवस काही पोस्ट करायचा थांबतो (संन्यास नाही घेत); 'ह्याच्या जवळपास सुद्धा दर्जेदार लिहिता येत नसतांना कशाला पोस्ट करायचं काही!' ह्या विचाराने. पण शेवटी हाताची खाज असह्य झाली की काहीच्या बाही खरडतोच.

माझ्या पोस्ट्सच्या उल्लेखावरून, दुसरा एक 'आम्ही नाही बाबा फेसबुक वगैरे थिल्लर गोष्टी बघत!' पंथ आठवला. ही 'माथा आळ लागे' भावना मला समजू शकलेली नाही. फेसबुक म्हणजे बऱ्याचदा पार्टीमध्ये चालणाऱ्या गॉसिपपेक्षा फार काही वेगळं नसतं; त्यामुळे एवढं काय लाजायचं त्यासाठी असं वाटतं. थोडा पॉट कॉलिंग द केट्ल ब्लॅक प्रकार! सगळ्यात गंमत वाटते ती एखाद्या पुरेशा गर्दीच्या ठिकाणी, बाजूला कोपऱ्यात घेऊन, चार वेळा कोणी बघत नाही ना खात्री करून, 'ते चांगलं लिहिलंस हां तू त्या ह्याच्याबद्दल' असं पुटपुटणाऱ्यांची! जोरात ओरडून 'लोकहो पहा; हे संभावित वाटणारे सद्गृहस्थ (सदगृहिणी असा शब्द आहे का?) प्रत्यक्षात चोरून फेसबुक चाळत असतात!' अशी घोषणा करावीशी वाटते; पण, नेहमीप्रमाणे मी तो विषय एखाद्या पोस्टसाठी राखून ठेवतो.

तर मुद्दा काय, फेसबुक सूट्स मी जस्ट फाईन! दहा वर्ष आनंदात गेली; संन्यास घेण्याचं काही माझं अजून वय झालं नाहीय त्यामुळे मी इथेच बागडत राहणार आणखी काही काळ तरी!

हॅपी बड्डे टू मी ऑन फेसबुक.

Comments