माती, पाणी, उजेड, वारा...

गोविंदाग्रजांनी महाराष्ट्रासाठी वापरलेल्या अनेक संबोधनांपैकी एक होतं 'दगडांच्या देशा'. अमेरिकेमध्ये हे संबोधन चपखल बसेल अशी दोन राज्यं पटकन डोळ्यासमोर येतात; ती म्हणजे यूटा आणि ऍरिझोना. एकावर एक सरळ सपाट खोके ठेवावेत तशी ही राज्यं; ऍरिझोनाच्या डोक्यावर यूटा! ह्या दोन राज्यांच्या हद्दीचा हा विविक्षित भाग तसा पहायला अगदी रुक्ष, ओसाड आणि एकंदरीतच खडकाळ. पण ह्याचं एक वेगळंच भूल पडणारं सौन्दर्य आहे. ह्याच भागात तीन प्रसिद्ध नॅशनल पार्क्स (ग्रँड कॅनिअन, झायन आणि ब्राईस) तर आहेतच; पण मॉन्युमेंट व्हॅली (ऍरिझोना), कॅनिअनलॅंड्स, आर्चेस (दोन्ही यूटा) किंवा मेसा व्हर्डे (कोलोराडो) ही पार्क्स सुद्धा फार लांब नाहीत. त्याशिवाय कॉन्झर्वेशन एरियाज आणि नॅशनल मॉन्यूमेन्ट्स वेगळीच. निसर्गप्रेमींना किती बघू आणि किती नको असं होऊन जातं ह्या भागात; आणि हाययकर्सच्या दृष्टीने तर हा सर्व भाग म्हणजे स्वर्गच आहे.

माझ्या दृष्टीने ह्या सर्वाएवढेच मोठे आकर्षण म्हणजे, ह्यापैकी बहुतांश भाग माणसाचा वावर आणि स्पर्श झालेला नसल्यामुळे अनाघ्रात आहे. ह्या दुर्गम भागात मनुष्यवस्ती फारच तुटपुंजी आणि तुरळक आहे. त्यामुळे बहुतेक वेळा, कुठेही थांबल्यावर, सभोवताल ३६० अंशाच्या वर्तुळात केवळ थोडीफार झाडी, डोंगर आणि ओबडधोबड खडक एवढेच दृश्य! हवा कोरडी आणि पारदर्शी स्वच्छ असल्यामुळे दोनदोन मैल दूरपर्यंत दिसू शकते. कोट्यावधी वर्षे पुराण्या खडकांच्या आणि डोंगरदऱ्यांच्या परिसरात फिरत असल्याचा हा आनंद वेगळाच! ह्या सर्व भागात कित्येक कोटी वर्षांपूर्वी समुद्र होता म्हणे. त्यातील क्षार, त्याच्या तळाशी असलेली सिलिका (वाळू) आणि पृथ्वीच्या गर्भातील लोखंड हे तीन इथल्या आसमंताचे मुख्य घटक. नंतरच्या प्रदीर्घ काळात पंचमहाभूतांच्या अविरत खेळामुळे आज आपल्याला दिसत असलेले खडक आणि डोंगरदऱ्या घडले आहेत. इथली बरीच जमीन सँडस्टोन ने बनलेली; त्यात मध्येमध्ये लोखंड मिसळल्यामुळे येणाऱ्या बदामी, गुलाबी पासून पार मातकट, तांबड्या, चॉकोलेटी ते किरमिजी रंगांच्या छटा. माती, पाणी, उजेड, वारा ह्या मिसळणाच्या अद्भुत पसाऱ्याचे कौतुक सांगणाऱ्या गदिमांनी ह्या भागाला कधी भेट दिली होती असा विचार नक्की डोक्यात येतो.

हा भाग फार आवडीचा असल्यामुळे, आणि काही पहायच्या गोष्टी राहून गेल्या असल्यामुळे, नुकतीच आमची इथे तिसरी ट्रीप घडली - पंधरासोळाशे मैलांची. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुद्धा बकेट लिष्टीतल्या अनेक ठिकाणी थंडी असल्यामुळे, हा 'दक्षिणेकडील' भाग निवडला. गेल्या अनेक वर्षांच्या आकडेवारीप्रमाणे, इथे तापमान ६०-६५ च्या (१५-१८ सेंटीग्रेड) दरम्यान अपेक्षित होते. पण क्लायमेट चेंजने चांगलाच हिसका दाखवला आणि आमच्या ट्रीपमध्ये प्रत्यक्ष तापमान २० ते ६० (उणे सात ते अधिक १५ सेंटीग्रेड) च्या आतबाहेर होतं. बऱ्याच भागांमधला चार-सहा इंच बर्फ वितळलेलाही नव्हता; पण रस्ते मात्र स्वच्छ आणि साफ होते.



इथे जाण्यासाठी सगळ्यात सोयीस्कर एअरपोर्ट म्हणजे लास व्हेगास. विमानातून बाहेर पडल्यावर गेटच्या बाहेर तशी छापील पाटी आहेच म्हणा! पण ती नसती, तरी आपल्याला फसवून दुसरीकडे कुठे आणलं नाही, ह्याची झटकन साक्ष पटते. कारण विमानातून - विमानतळातून नव्हे - बाहेर पडल्याक्षणापासून, किंवा विमानात शिरेपर्यंतचा, तुमचा वेळ जुगार खेळण्याच्या सत्कारणी लागू शकेल, वायफळ कामात एक क्षणही फुकट जाणार नाही, ह्याची पूर्ण खबरदारी घेणारा हा एकच एअरपोर्ट! आम्ही मात्र हा एअरपोर्ट फक्त विमानाच्या आणि रेंटल कारच्या सोयीसाठी वापरला. जातायेतांना दोन्ही वेळा व्हेगासची ती प्रसिद्ध स्ट्रीप संपूर्ण टाळून आम्ही थेट रस्त्यालाच लागलो.

लास व्हेगासच्या मायानगरीपासून जेमतेम अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेला हा रेड रॉक कॅनियन्स कॉन्झर्व्हेशन एरिया. अमेरिकेच्या ह्या भागात हजारो एकर जमीन सार्वजनिक जमीन म्हणून जपलेली आहे; त्यातला हा एक भाग. तेरा मैलाच्या छोट्याशा, पण अतिशय वळणदार अशा ह्या घाटातल्या रस्त्यांवर कित्येक लहानमोठे हायकिंग ट्रेल्स आहेत. 


ह्या नेवाडा, यूटा, ऍरिझोना भागातील दगडांचं सौन्दर्य रेड रॉक कॅनिअन पासूनच जाणवायला लागतं. शतकानुशतकं चाललेल्या वाऱ्याच्या कारागिरीने विणलेला हा दगडांचा तलम पोत आणि झिरझिरीत बदामी गुलाबी रंग निरखून घ्यावा! कोट्यवधी वर्षांपूर्वी ह्या भागात प्रचंड मोठा समुद्र होता. तो आटल्यावर तिथल्या वाळूचे जे खडक (सॅण्डस्टोन्स) आणि नंतर डोंगर झाले त्यातून हा सर्व भूभाग निर्माण झाला आहे. त्यामध्ये जागोजाग लोखंडाचे अंश मिसळल्यामुळे तो गुलाबी-लालसर-मातकट रंग चढलेला आहे.

रेड रॉक्स - आणि थंडीवाऱ्याला न जुमानता भक्कम पाय रोवून उभा राहिलेला एक खाकी रॉक!


रेड रॉक - ह्या फोटोत लालच्या वेगळ्या छटा दिसतात.


ह्यावेळी झायन आणि मॉन्युमेंट व्हॅली हे दोन पूर्वी पाहिलेले भाग पुन्हा पाहिले. झायन हे नॅशनल पार्क अमेरिकन स्टँडर्डनी छोटं आहे; पण अतिशय सुंदर आहे. कुंभाराच्या चाकावर गरगरा फिरत मडकी बनावीत, तसे घडलेले इथले अनेक खडक; उत्तुंग पर्वत शिखरं आणि त्यामधून एखाद्या घळीतून जावं तसा तो व्हर्जिन रिव्हरच्या बाजूचा ट्रेक. ह्या सगळ्यामुळे झायन फार लाडकं आहे. 'चेकरबोर्ड मेसा' हा प्रचंड खडक झायन नॅशनल पार्कच्या सुरुवातीलाच लागतो. झायनमधील इतर सुप्रसिद्ध लालगुलाबी खडकांपेक्षा हा मूळ सॅन्डस्टोन रंगाशीच जास्त नातं राखून आहे. केवळ लाखो वर्षाच्या उन्ह, वारा आणि पाणी ह्यांच्या किमयेने त्याच्या अंगावर, उभ्याआडव्या रेषा कोरल्या जाऊन सोंगट्यांच्या खेळाचा पट तयार झालेला आहे. मार्चअखेर त्याच्यावर एवढं बर्फ अपेक्षित नव्हतं; त्या बर्फामुळे पटाच्या सगळ्या रेषा स्पष्ट दिसत नाहीयेत. शेजारच्या व्हॅनमुळे त्याची भव्यता मात्र जाणवते आहे.


झायन मधील बरीच नांवे बायबल (ओल्ड टेस्टामेन्ट) मधून घेतलेली आहेत. हा फोटो आहे 'कोर्ट ऑफ पेट्रीआर्कस' चा. ज्युडाइझम, ख्रिश्चनिटी आणि मुस्लीम ह्या तिन्ही धर्मांमध्ये सर्वात आद्य मानले जाणारे अब्राहम, त्याचा मुलगा आयझॅक आणि त्याचा मुलगा जेकब ह्यांना तीन पेट्रीआर्कस म्हणतात. ह्या तीन पर्वतांना त्यांचीच नांवे दिली आहेत. ह्यांचा सपाट मुखवटा योसेमिटी पार्कमधल्या एल कापितान ची आठवण करून देतो; पण हे डोंगर सॅन्डस्टोनचे आहेत, तर कापितान कातळासारखा खडक आहे.


झायनचे रंगीबेरंगी नक्षीदार लँडस्केप; आणि तेथील रुक्ष कोरडी वनस्पती खाऊन जगणारे रुक्ष मेंढे (बिगहॉर्न शीप)!


झायन नॅशनल पार्क, यूटा - दुपारी चार-पाच वाजता तापमान शून्याखाली काही डिग्रीज सेंटीग्रेड असल्यामुळे, धबधबा जमिनीला टेकताच त्याचे बर्फ होत होते.


झायनच्या शेजारचंच, थोडं कमी प्रसिद्ध, ब्राईस कॅनिअन पार्क ही अप्रतिम सुंदर; पण सध्या तिथे फार थंडी होती (ब्राईस आठएक हजार फूट उंचीवर आहे!) आणि काही रस्ते बंद असण्याची शक्यता. त्यामुळे ते वगळलं. त्याच्या बदल्यात व्हाईट पॉकेट ह्या नवीन भागाचा शोध लागला. तो पाहिल्यावर आता मंगळ मिशनची वेगळी वाट पाहण्याची गरज नाही हे लक्षात आलं. अतिशय विक्षिप्त अशा रंगांचे आणि आकाराचे खडक इथे पहायला मिळतात. ऍरिझोनामध्ये 'वेव्ह' म्हणून एक भाग आहे (Google Earth वर, किंवा नेटवर त्याचे फोटो अवश्य पहा); तो एकच भाग व्हाईट पॉकेट पेक्षा जास्त विक्षिप्त म्हणता येईल. दोन्हीमध्ये नीट आखलेले, मार्गदर्शक असे हायकिंग ट्रेल्स नाहीत; ही सगळी पब्लिक लँड असल्यामुळे, 'सबै भूमी गोपालकी' न्यायाने कुठेही फिरू शकता; आणि त्यामुळे अर्थातच अगदी सहजपणे हरवूही शकता. उन्हाळ्यातील दर आठवड्यात एखाददोनदा हरवलेल्या हायकर्सना शोधायला हेलिकॉप्टर्स धाडावी लागतात असं आमची गाईड सांगत होती. व्हाईट पॉकेटला जाण्याचा रस्ता शेवटच्या बारातेरा मैलामध्ये एवढा कच्चा आणि खाचखळग्यांचा आहे, की अतिशय तगडे 4 X 4 ट्रक्सच त्या रस्त्यावरून जाऊ शकतात; इतर गाड्यांचे कर्णरथच होतात त्या रस्त्यावर पदोपदी.




मंगळावरील राखणदार:


It is a very bizarre feeling walking on such surrealistic landscape!


लाल पांढऱ्या दगडी गालिचाच्या कड्यावरून डोकावून पाहतांना मी!


व्हाईट पॉकेट्ला जाण्याच्या रस्त्यावरून दिसलेले व्हर्मिलीअन क्लिफ्स. हा भाग एवढा दुर्गम आहे, की तिथे फक्त हायकिंग करूनच जाता येते.


दुसरे असेच दोन अद्भुत नवीन भाग पाहिले ते अँटिलोप कॅनिअन्स! लोहमिश्रीत सॅण्डस्टोन्स मधून वाहत्या पाण्याने मार्ग शोधल्यामुळे तयार झालेले खडकांचे चित्रविचित्र आकार आणि नजरबंदी करणारे रंग - हे मुख्य आकर्षण. ह्यापैकी अप्पर कॅनिअन्समध्ये जमिनीच्या वर अशा गुहा तयार झाल्या आहेत; तर लोअर कॅनिअन्समध्ये त्या जमिनीच्या खाली भुयारी गुहा आहेत. दोन्ही आवर्जून बघाव्या एवढ्या सुंदर!

अप्पर अँटिलोप कॅनिअन्स:











लोअर अँटिलोप कॅनिअन्स:







ह्या सॅन्डस्टोन्सच्या पर्वतांमध्ये ग्रँड कॅनिअन नांवाची अठरा मैल रुंदीची चिर पाडणारी बलाढ्य कोलोराडो नदी ह्या लीज फेरी भागात खूपच साधीसुधी साळसूद वाटते. जवळचा गढूळ वाटणारा भाग अतिशय उथळ आहे, त्यामुळे तळाची वाळू दिसते आहे.


ह्या लीज फेरी किंवा मार्बल कॅनिअन भागातले महाप्रचंड खडक आणि अजस्त्र हत्तींच्या पायांसारखे दिसणारे डोंगरांचे पायथे हा एक विलक्षण प्रकार आहे. तौलनिक आकाराची कल्पना यावी म्हणून खालील फोटोत, अंदाजे पंचवीस कोटी वर्षे वयोमान असलेल्या एक महाकाय मश्रूमरुपी खडकाशेजारी वयाने थोडा लहान एक मश्रूमद्वेष्टा खडा (आदमी) ठेवला आहे.


पन्नास लाख वर्षांपूर्वी, कोलोराडोचे पठार वर उचलले गेल्यामुळे नदीच्या पाण्याचा मार्ग अचानक बदलला. त्यामुळे निर्माण झालेला 'हॉर्स शू बेंड' हा एक चमत्कार! घोड्याच्या नालेप्रमाणे दिसणारा, चारी बाजूनी पाण्याने वेढून टाकलेला एक सँडस्टोनचा हजारेक फूट उंच खडक म्हणता येईल ह्याला.



ग्रँड स्टेअरकेस - यूटा मधील एक दुर्गम रंगीबेरंगी डोंगराळ भाग


मॉन्युमेंट व्हॅली ह्या पार्कमध्ये आम्ही पूर्वीही फिरलेले होतो. ह्यावेळी ते केवळ वाटेवरच आहे, म्हणून पुन्हा एकदा धावती चक्कर मारली. आपल्याला ह्या भागाची ओळख बऱ्याच प्रसिद्ध हॉलिवूडच्या सिनेमांमधून (फॉरेस्ट गम्प, बॅक टू द फ्युचर-३, मिशन इम्पॉसिबल-२ आणि असंख्य जुन्या वेस्टर्न मूव्हीज) आधीच झालेली असते. पण तरीही, प्रत्यक्ष चहुबाजूनी मोकळ्या माळरानामधील हे सँडस्टोनचे सुळके, स्तंभ (ह्यांना ब्यूट्स - Buttes - म्हणतात) आणि टेकड्या पाहताना अंगावर काटा येतो! आम्हाला ह्या वेळी तिथे धुळीचं वादळ अनुभवायला मिळालं - खरंखुरं 'रेड स्टॉर्म रायझिंग'!


अमेरिकन इंडिअन जमातींमध्ये मका, राजमा आणि भोपळा/दुधी/घोसाळी (स्क्वॉश) ह्या प्रकारच्या भाज्या एकत्र लावायची पद्धत होती. त्या एकमेकाला आधार देऊन जास्त चांगल्या वाढतात म्हणून त्यांचा उल्लेख 'थ्री सिस्टर्स' असाही केला जातो. ह्यावरून स्फूर्ती घेऊन, मॉन्युमेंट व्हॅलीमधील एका जागेला थ्री सिस्टर्स हे नांव दिलेलं आहे:


'ओ, धुळीचं वादळ? ऐकलं खरं शेजाऱ्यांच्या घरात काहीतरी झालं म्हणून; आमचा काही संबंध नाही बॉ त्याच्याशी!' असा साळसूद चेहरा केलेलं स्वच्छ निळंभोर आकाश. आणि माझी (!) पांढरीशुभ्र पण धुळीने माखलेली बीमर.


फॉरेस्ट गम्प ने अजरामर केलेला यूटा मधील मॉन्युमेंट व्हॅलीकडे जाणारा सरळसोट निर्जन रस्ता!


ह्या सर्वच भागात एकेकाळी नावाहो, होपी, ऍनासाझी अशा विविध अमेरिकन इंडियन जमातींची वस्ती होती. आजही इथले बरेच भाग त्या त्या जमातींच्या अखत्यारीत येतात. पूर्वीच्या भेटींमध्ये, आणि एवढ्या वर्षानंतर ह्याही वेळी पुन्हा जाणवलेल्या काही गोष्टी! ह्यातली कित्येक प्रवासी आकर्षणे त्या लोकांच्या व्यवस्थापनाखाली आहेत. त्या ठिकाणची बेशिस्ती, प्रवाशांबरोबर वागण्याचा उर्मटपणा, किमान किंवा शून्य सोयींसाठी कमाल पैसे उकळायची वृत्ती हे सगळं अमेरिकेतील इतर प्रेक्षणीय स्थळांच्या तुलनेत फारच खटकतं. ह्या मानसिकतेविषयी पुन्हा कधीतरी! तूर्तास फक्त त्यांच्या खूप रेखीव जिऑमेट्रिक डिझाईन्सच्या पॉटरीचं कौतुक:


ह्या भेटीत आम्हाला महादजी शिंद्यांच्या छत्रीची उचलबांगडी करून तिची अमेरिकेत प्रस्थापना केली गेली आहे शोध लागला. हे स्थलांतराचे रहस्य गुप्त राखण्यासाठी तिला 'मेक्सिकन हॅट' असं तिसऱ्याचंच नांव देऊन नामानिराळे राहण्याचा अमेरिकन डाव ह्या म्हराटी हेरांना फसवू शकला नाही. पण सभोवतालचे रंगीबेरंगी डोंगर मात्र मोहवू शकले.




कॅनिअनलॅंड्स हे आमच्या ट्रीपमधील शेवटचे नॅशनल पार्क. मॅनहॅटन फ्याशनच्या गगनचुंबी इमारतींची निसर्गाला सुद्धा लाखो वर्षांपूर्वीपासून हौस होती, हेच येथील खडकांचे सुळके दाखवून देतात (नीडल्स पार्क)!


अमेरिकेतील डायवर आन फौजदारंच काय, म्हशी सुद्दा आपापल्या लायनीपरमानंच चालतात! एखादं चुकार वासरू सोडून...


परत निघण्यापूर्वी, आमच्या लोकल होस्टसच्या, कॅनिअनलॅंड्स मधील खडकांच्या समवेत:


... हे सगळे फोटो काढायचे आणि बघायचे ते मनामध्ये अखंड वाजत असणाऱ्या त्या बेफाट निसर्गदृश्यांच्या आठवणींना केवळ ताल, ठेका म्हणून! जे प्रत्यक्ष पाहिलं, आणि मनात भरून ठेवलं, त्याला तोडच नाही. नुसत्या त्या मोकळ्या निळ्या आकाशाच्या आठवणींनी छाती भरून स्वच्छ, खोल श्वास घेतल्याचा भास होतो. त्या मोकळ्या श्वासासाठीच तर प्रवास करायचा!








Comments

  1. खूप सुंदर लिहिलं आहे सर. ❤️

    ReplyDelete
  2. उच्च मराठी आणि उंच खडकाळ ऍरिझोना व युटातील पर्वत वर्णन वाचून छान वाटलं ! बर्याच नवीन गोष्टी बादलीतील यादीत टाकण्यात आल्या.
    - निरंजन देव

    ReplyDelete

Post a Comment

I would love to hear from you. Please post your comments here...