डोळे


भूल सकता है भला कौन ये प्यारी आँखें. साहिरच्या मला आवडणाऱ्या असंख्य गाण्यांपैकी हे एक. महेंद्र कपूरच्या मला आवडणाऱ्या मोजक्याच गाण्यांपैकी सुद्धा हे एक.

एकुणातच, प्रेयसीच्या डोळ्यांचं वर्णन करतांना बरेच हिंदी शायर पाघळतात: आँखें हैं जैसे मयके प्यालें भरे हुए, तेरी आँखोंके सिवा दुनियामें रक्खा क्या है, ये नयन डरे डरे, ये जाम भरे भरे आणि अर्थातच हमने देखी है इन आँखोंकी महकती खुशबू! आणि मला ते समजू शकतं, मलाही डोळ्यांवरचं काव्य आवडतं. कित्येकदा डोळे एवढे बोलके असतात; एकेकाळी चित्रं काढायची हॉबी असण्याच्या वयात मी बऱ्याचदा डोळे काढून झाले की बाकी चित्र सोडून देत असे; आता कशाला आणखी काही काढायचं, असं म्हणून!

शाळा-कॉलेजातील 'त्या' विशिष्ट वयामध्ये अभ्यास, मार्क आणि प्रगती ह्याचा एवढा धोशा होता, की प्रेमात पडणे वगैरे भानगडींसाठी वेळच नसे. कदाचित त्या काळाचा, त्या मराठी मध्यमवर्गीय वातावरणाचा आणि तेव्हाच्या डिफिडन्सचा महिमा असेल तो. आता आठवून हसायला येतं… शाळेतल्या मुली दोन फुटांपलीकडून सुद्धा 'साईड प्लिज' म्हणत अंग चोरून जात असण्याचे दिवस! शिवाय परखड वास्तववादी स्वभावामुळे एखादी सुंदर वाटलीच, तर आपण तिच्या खिजगणतीत देखील असणार नाही, असा ठाम विश्वास मनी वसत असे.

सिनेनट्यांच्या प्रेमात पडणं त्या मानाने सोपं. त्या अस्मानातल्या तारका हाती लागणं सोडा; माझ्या प्रेमाची खबरही त्यांना कधी लागणार नाही हे माहिती असल्यामुळे टर्म्स ऑफ एन्डीअरमेंट क्लिअर होत्या. एकतर्फी प्रेम शक्य होतं. त्याही काळी मला वंगसुंदरींबद्दल जरा जास्त जिव्हाळा असे. शर्मिला आणि मौशुमी ह्या दोघींनी माझ्या हृदयाची वाटणी करून घेऊन दीर्घकाळ सुखाने राज्य केले हा इतिहास गवाह आहे. प्रॉब्लेम एवढाच, की माझं थोडंसं पुलंच्या हरी काळुस्करासारखं आहे. म्हणजे, साक्षात त्रैलोक्यसुंदरी थेट भवानीमातेकडून मेकअप आणि नट्टापट्टा करून माझ्यासमोर उभी राहिली, पण 'मी गेलेली', 'चाय पिली', किंवा 'रेसिपी भेटली' असलं काही बोलायला लागली तर त्या सम्राज्ञीच्या मुकुटाची तात्काळ शंभर शकले होऊन तिच्याच पायाशी लोळू लागतात आणि माझ्या नजरेत ती बेडकी होण्याचा शाप असतो तिला! त्यामुळे शर्मिलाच्या गालांवरील खळ्या कितीही मोहक असल्या, मोठाल्या गोलगोल डोळ्यांच्या कृत्रिम का होईना पापण्यांची पिटपीट भुरळ घालत असली, तरी तिचं ते ओठाला ओठ न लावता उच्चारलेलं 'नॅन्दू! ऑ नॅन्दू बॉब्बू' छाप हिंदी अगदी डोक्यात जातं. मौशुमीचे डोळे टिपीकल बंगाली मोट्ठेमोट्ठे नव्हते; क्वाईट द कॉन्ट्ररी! पण त्यांच्यात एक स्पार्क होता, एक बालिश अवखळपणा होता. हिंदी बेतास बातच असलं, तरी तिच्या त्या रुसक्या बोबड्या उच्चारात तेही चालून जाई! राखी तिच्या हस्की आवाजामुळे आणि फिक्या रंगाच्या डोळ्यांमुळे शर्मिलाकडून सिंहासन बळकावणार की काय अशी शक्यता 'जीवन मृत्यू' च्या दिवसात वाटू लागली होती. पण एकतर तीही हिंदीमध्ये शर्मिलासारखीच काठावर पास; आणि प्रेयसीच्या भूमिकेतही मातृवत्सल रंगच जास्त भरण्याचा तिचा उत्साह - ह्यामुळे ती बाद झाली. ‘शक्ती’ येण्याच्या पूर्वीपासून, पार कस्मे वादे आणि कभी कभी पासून मी तिच्यामध्ये लवकरच अमिताभची आई होण्याचं पोटेन्शिअल ओळखलं होतं (काश मैं कास्टिंग डिरेक्टर बना होता!). आँधी मध्ये सुचित्रा सेन चं हिंदी ऐकून खात्री पटली होती, की सगळ्या हिंदी सिनेमेच्छु स्त्रियांसाठी अक्ख्या बंगालात हिंदीची एकच शाळा असावी. एकीकडे तिचं खोकल्याच्या सीरपसारखं गोग्गोड हिंदी, आणि दुसरीकडे संजीव कुमारचे स्टायलाईझ्ड, अर्ध्या वाक्यावर पॉज घेऊन उत्तरार्ध कड्यावरून खाली ढकलून देणारे ड्वायलाक - हैराण करतात हे लोक! आता हसू येतं, तेव्हा आवडले होते. ह्या सगळ्या वंगसुंदरींच्या हिंदीपेक्षा जया भादुरीच्या तद्दन कृत्रिम 'खळखळत्या' हसण्याची तिडीक होती (कोशिश आवडला, कारण ती हसत नाही त्यात!). तशीही ती बंगालीपेक्षा जास्त दाक्षिणात्य दिसे; त्यामुळे ती कधीच स्पर्धेत नव्हती.

कलकत्त्याला असतांना मी बरेच बंगाली सिनेमे पाहिले (हॉस्टेलमध्ये दुसरं काही दाखवतंच नसत!). त्यामुळे वंगसुंदरींना अजिबात तोटा नव्हता. संध्या रॉय, लिली चक्रवर्ती, देबश्री रॉय, अपर्णा सेन अशी काही नावं अजून लक्षात आहेत. शर्मिला, जया, सुचित्रा ह्या सगळ्याच जणी बंगालीत किती सहज आणि सुंदर काम करतात हे जाणवू लागलं होतं. सुचित्रा सेन ची ऍक्टिंग क्या चीज है ह्याची ओळख पटायला लागली होती. तिची उत्तम कुमार बरोबरची अप्रतिम ऑन-स्क्रीन केमिस्ट्री नजरेत भरत असे; पण तरीही ह्या सगळ्या ग्लॅमरसच होत्या. आणि मग एक दिवस ऋत्विक घटकचा 'सुवर्णरेखा' बघितला. सिनेमा आता बराचसा विसरलो आहे; तरी आजपर्यंत आठवणीत राहिलेल्या दोनच गोष्टी - 'आज धानेर खेते रौद्र छायाय' ह्या रवींद्र संगीताचा केलेला अप्रतिम वापर, आणि माधवी मुखर्जीचा मी बघितलेला हा पहिला सिनेमा! माझ्या आठवणीप्रमाणे तिचा रोल खूप लहान आहे, आणि बहुतेक धानेर खेते गाणं तिच्यावर चित्रीत आहे. माधवी मुखर्जी फिल्म स्टार दर्जाची 'ग्लॅमरस' कधीच वाटली नाही. म्हणूनच, महानगरमध्ये अँग्लो-इंडियन मैत्रिणीकडून लिपस्टिक लावून घेतांनाचा तिचा संकोच अगदी अस्सल खरा वाटतो. पण अतिशय सहज, संपूर्णपणे अकृत्रिम अभिनय कसा असतो; फारसा मेकअप न करताही, नैसर्गिक खानदानी सौन्दर्य कसं स्पष्ट दिसून येतं; आणि अभिनयामध्ये डोळे केवढी महत्वाची भूमिका निभावतात ह्याचा साक्षात्कार तिच्या अभिनयामधून झाला होता.

एकुणातच बंगाली बायकांचे टपोरे हरिणाक्षी डोळे घायाळ करणारे सुंदर! त्यांच्या दुर्गेच्या मूर्ती आणि प्रतिमांमध्ये मध्ये सुद्धा त्याचा प्रत्यय दिसतोच. सत्यजित रेंनी त्यांच्या 'देवी' सिनेमामध्येच नव्हे, तर त्याच्या पोस्टरमध्ये सुद्धा, शर्मिलाच्या डोळ्यांचा खूप सुंदर वापर करून घेतला आहे. त्यातही माधवी मुखर्जी सारखी अभिनेत्री केवळ डोळ्यांच्या भाषेतून अचंबा, कुतूहल, खोडकर खट्याळपणा, प्रेम, उदासी, संताप सगळंच काही एवढ्या सुंदर व्यक्त करतांना पाहून थक्क व्हायला होतं. आँखें भी कमाल करती हैं, खरंच!

सिनेमांच्या जोडीने, कलकत्त्याला असतांना ऐकलेल्या बऱ्याच बंगाली गाण्यांपैकी, लक्षात राहिलेलं हेमंतकुमारचं हे एक भावगीत! हे भावगीत आहे, तेव्हा रागदारी, लगाव वगैरे संगीताचा पंचनामा करणाऱ्या शास्त्रज्ञांना ह्या चालीत खास काही सापडणार नाही. पण एका सुंदर शब्दचित्राचं तेवढंच सुंदर सुरचित्रंही कसं होऊ शकतं ह्याचं एक उदाहरण म्हणून (आणि अर्थातच हेमंतकुमारच्या आवाजासाठी!) हे मला फार आवडतं. 'फुरीये जावा दिनेर आंचल धोरे' (संपत आलेल्या दिवसाचा पदर धरून) ह्या पहिल्या ओळीतील प्रत्येक शब्द एकेक पायरी उतरत असल्यासारखा वाटतो, तो पुढच्या 'हांशलो नेमे शाँझेर अंधःकार' ह्या 'हलकेच हसत उतरणाऱ्या संध्याकाळच्या अंधार' ला सुरांची साथ देण्यासाठी. मग येतो, 'आधे खोला दारेर आडाल थेके' मधल्या अर्ध्या किलकिल्या दाराआडून ह्या पर्युत्सुक भावनेचा सस्पेन्स राखण्यासाठी ठेवलेला प्रत्येक शब्दानंतरच्या पॉज. त्यानंतर क्रेसेंडो ला जाणारे 'भालोबाशार प्रोदीप जॅनू धोरलो तुले केऊ' (प्रेमाची ज्योत कोणी उचलून धरावी तसे), उंच उचलून धरलेले स्वर. आणि शेवटची शांत तृप्त 'दॅखा गॅलो दूटी नोयोन तार' (नजरेस पडले, तिचे दोन डोळे) ही ओळ! मला हे गाणं फार आवडतं.

आणि त्या शेवटच्या शांत स्वरांमध्ये, ऐकल्याक्षणी नेहमीच आठवतात, ते माधवी मुखर्जीचे अप्रतिम सुंदर डोळे!





Comments