चांगलं लिहायचं असेल, तर आधी खूप सारं वाचावं. त्यातून आपल्याला आपोपाप लिहिण्याची स्फूर्ती आणि समज मिळते, असं आमचे शाळेतील मराठीचे गोलटक्के गुरुजी म्हणत. त्यानुसार, एका फेसबुक ग्रुपवरील 'ओपेनहायमर' सिनेमाचे परीक्षण वाचून मलाही माझे खालील परीक्षण लिहिण्याची स्फूर्ती मिळाली आहे.
मी अमेरिकेत राहतो. अमेरिका खूप मोठा व समृद्ध देश आहे. लेकी-सुनांच्या बाळंतपणासाठी येथे येऊन एखाद्या महिन्यात वीकेंडच्या मिळून साताठ दिवसात बघण्याचा, किंवा टीव्ही वरील बंदूकधाऱ्यांच्या घाऊक खुनांच्या बातम्या पाहून अनुभवण्याचा हा देश नाही. मी येथे खूप वर्षे रहात असल्यामुळे हा देश बराच बघितला आहे. बघून कंटाळा आल्यामुळे, काल पावसामुळे दुसरीकडे कुठे जाता येणार नसल्यामुळे, मंगळवारी जवळच्या थेटरात स्वस्त तिकिटे असल्यामुळे आणि हिने घरी स्वैपाक केला नसल्यामुळे आम्ही सिनेमाला जायचे ठरवले. टीनएज म्युटंट निन्जा टर्टल्स का ओपेनहायमर हा वाद आम्ही छापा काटा करून मिटवला. आमच्या स्वतःच्या गाडीने आम्ही थेटरात गेलो.
हा सिनेमा नोलन नावाच्या एका नावाजलेल्या दिग्दर्शकाचा आहे. नोलनचे ह्या आधीचे सिनेमे बहुतेकांना समजले नाहीत असा एक समज आहे, तो खरा असावा. कारण, मागे एकदा इंटरस्टेलर का असल्याच काही नांवाच्या एका सिनेमाबद्दल 'अच्छा है, लेकिन पब्लिक समझ नही पायेगी' किंवा 'थोडा हेवी आहे, पण भारी आहे' अशी परीक्षणं मी भोवतालच्या वेगवेगळ्या ग्रुप्सकडून ऐकली होती. मला वाटते नोलनला गोष्ट सांगायची एवढी घाई असते, की तो शांतपणे एका जागी बसून, विचार करून एकसूत्री क्रमवार अशी गोष्ट सांगत नाही. थोडं नंतरचा भाग आधी, आधीचा नंतर असला गोंधळ घालतो, त्यामुळे घरी आल्यावर सिनेमा आणखी तीनचार वेळा OTT वर बघून तो गुंता उलगडावा लागतो. म्हणून नोलनचे सिनेमे बघणे महागात पडते. त्या मानाने ओपेनहायमरमध्ये फक्त तीनच गोष्टींचा जांगडगुत्ता केलेला आहे. प्रत्यक्ष घडलेली हकीकत, AEC ची तपासणी आणि स्ट्रॉस ची काँग्रेसमधील सुनावणी. अर्थात तेही उलटसुलट क्रमानेच दाखवले आहे. स्वभावाला औषध नाही हेच खरे!
ओपेनहायमर ह्या अमेरिकन शास्त्रज्ञाला बरेच लोक अणुबॉम्बचा जनक म्हणतात. सिनेमात त्याला प्रोजेक्ट मॅनेजर म्हटलंय. माझा मुलगाही अमेरिकेतील एका आय टी कंपनीमध्ये प्रॉजेक्ट मॅनेजर आहे. ओपेनहायमरने नील्स भोर, आईन्स्टाईन वगैरे फेमस शास्त्रज्ञांबरोबर काम केले असे सिनेमात दाखवले आहे. आईन्स्टाईनचा पार्टी ओळखता येत होता, फक्त त्याने नुकताच हेअरकट करून घेतला असावा. अमेरिकेत हेअर कट फार महाग असतो; म्हणून आईनस्टाइन सुध्दा क्वचितच तो करून घेत असे. भोरला काही मी पाहिलेलं नाही, त्यामुळे सिनेमातही ओळखला नाही. हे सर्व लोक फिजिसिस्ट असल्यामुळे सारखे फळाभरून काहीतरी विक्षिप्त गणिते लिहितात आणि नंतर डोक्याला हात लावून बसतात. त्यांच्या डोक्यात अणुसंशोधन चालू आहे हे दाखवण्यासाठी नोलनने निऑन रंगांच्या, पडदाभर झूमकन जाणाऱ्या रेषांची, किंवा स्पायरोग्राफने काढलेल्या चित्रांची कल्पना छान वापरली आहे. 'निज शैशवास जपणे' असावे तर असे. ह्यापलीकडे जाणवलेली एक गोष्ट म्हणजे हे फिजिसिस्ट लोक फार बोलतात. सगळा वेळ ते नुसते बोलत असतात; तरी बरं सिनेमातील बहुतेक शास्त्रज्ञ पुरुषच होते. लॅबोरेटरीमध्ये एवढं, आणि नंतर सुनावण्यांमध्ये तर काय फक्त बोलतात आणि आणखी बोलतात. ते फार घाईघाईने बोलत असल्यामुळे मला बरेचसे संवाद समजले नाहीत. पण ओपेनहायमरला अणुस्फोटाचा शोध लावल्याबद्दल नंतर पश्चात्ताप झाला एवढं समजलं. तो वाटेल त्या वेळी भगवद्गीता वाचत असे, हेही समजलं.
ओपेनहायमर भला माणूस! सिनेमाही चांगला आहे तसा. नोलनचा असूनही, मुख्य मुद्दा समजतो हे फार छान! मी OTT वर आला की पुन्हा दोन तीनदा बघून संवाद नीट समजून घेणार आहे.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...