माझ्याच ब्लॉगवरील पूर्वीच्या एका लेखाची 'रंगदीप २०१५' मध्ये प्रसिद्ध झालेली ही सुधारित आवृत्ती.
कामानिमित्त अनेक ठिकाणी
फिरत असतांना गेल्या वर्ष-दीड वर्षात फिलिपिन्समधील मनिला शहराला चार भेटी झाल्या.
नव्याची नवलाई ओसरल्यानंतर, कामाच्या धावपळीत जे मनिला थोडंसं नजरेत सामावलं, त्याचा
हा (आतापर्यंतच्या) शेवटच्या भेटीतला आढावा.
टोकियो - मनिला फ़्लाइट स्थानिक
वेळेनुसार रात्री साडेनऊला पोचली,
बाहेर पडायला दहा.
घड्याळामधल्या आकड्यांना तर काहीच
अर्थ उरलेला नसतो.
ह्या वेळी हॉटेलची
गाडी मागवून ठेवलेली
असल्यामुळे, रात्रीच्या शांत रस्त्यांवरून
झटपट वीसएक मिनिटात
हॉटेलमध्ये पोचलो सुद्धा. ह्यावेळच
'पेनिन्सुला' हॉटेल पूर्वी पेक्षाही
जास्त ताऱ्यांच असावं;
अत्यंत भारदस्त लॉबीच त्याची
साक्ष देत होती.
नंतर समजल, की
मनिला मधले नेते,
राजकारणी आणि इतर
सगळे "who's who" इथे
वावरताना दिसतात. (माझ्या बाबतीत
ह्याच भाषांतर "कुठला
कोण" असंच फक्त
होऊ शकत.) काही
फिलीपिणी अगदी सिनेमात
असाव इतक्या सुंदर
होत्या खऱ्या; पण मी
काही ही कोणाची
कोण अश्या चौकशा
केल्या नाहीत.
दुसऱ्या दिवशी "सदू उठला
आणि न्याहारी घेऊन
कामावर गेला" सुरुवात. फरक
फक्त असा, की
इथे न्याहारीला अप्रतिम
फळ मिळतात - जवळजवळ
बारा महिने - जी
कित्येक महिने अमेरिकेत गायब
असतात. उदा. आंबे.
फिलिपिनो आंबे अगदी
रत्नागिरी किंवा देवगड हापूस
इतके दिव्य नसले,
तरीही इथल्या मेक्सिकन
आंब्यांपेक्षा खूपच सुंदर,
रसाळ आणि दोरखंड-विरहित असतात. आणि
ही फिलिपिनो आंब्याची
‘फळे रसाळ गोमटी'
असली, तरी काट्या-सुरीनी खाता यावी
इतकी दमदार असतात.
बाकी अननस, शहाळी,
किवी वगैरे असतात,
पण आंब्यांपुढे तशी
सामान्य (!).
ह्या वेळी वेळात
वेळ काढून मुद्दाम
मनिला शहराची रीतसर
'टूर' घेतली. बस
मध्ये फक्त ड्रायव्हर,
गाईड, मी आणि
एक स्विस म्हातारा.
तसे काही भाग
मी आधीच्या भेटींमध्ये
बघितले होते; पण त्यांची
वैशिष्ट्य पहिल्यांदाच समजली. आमच्या
तरण्या-ताठ्या गाईडला लहान
वयातच संधीवात वगैरे
असावा, कारण त्याची
बसल्या जागेवरून बरीच टकळी
चालू असली, तरी
ती जागा सोडून
उठायला किंवा खाली उतरून
चालायला त्याचा विरोध होता.
दुर्दैवानी आम्ही बऱ्याच गोष्टी
बसच्या खिडकीमधूनच बघितल्या, त्यामुळे
बडबडीला भरपूर वेळ होता.
इंग्लंड मध्ये दीर्घ काळ
घालवलेल्या त्या स्विस
म्हाताऱ्याने, फिलिपिनो गाईडला 'लगान'
सिनेमा तू बघच
हा सल्ला दिलेला
मी याची देही
ऐकला आणि बॉलीवूडच्या
आंतरराष्ट्रीय सामर्थ्याने
सद्गदित झालो. क्वचित बस
थांबली तर तो
गाईड आम्हाला, 'जा,
एवढा हट्टच असला
तर बघा फिरून
काय बघायचं ते;
मात्र पंधरा मिनिटात
परत या. उशीर
झाला तर ट्राफिक
खूप वाढेल' अश्या
सुरात दटावणी करायचा. खाली
उतरून आम्ही दोघ
दिशाहीन यात्री इतस्ततः फिरायचो
आणि पाच मिनिटात
कंटाळून परत बस
मध्ये यायचो - गाईड
खुश! 'सांगितलं ना
मी, तसं फार
बघण्यासारख काही नाही
इथे' - हे पुन्हा
वर. प्रेक्षणीय स्थळ
आणि पर्यटन याविषयी
इतकी अध्यात्मिक उदासीनता
- गाईडच्या अंगी - क्वचितच पाहायला
मिळते. त्या गब्बरसिंग
सारखी मनिलाच्या ट्राफिकची
दहशत मात्र मला
गेल्या ट्रीपच्या अनुभवाने खरच
बसली आहे; अठरा
कि.मी. अंतराला
आम्हाला कार मधून
सहा तास लागले
होते हा अविस्मरणीय
अनुभव तसा ताजाच
होता. 'ख्रिसमसच्या खरेदीची झुंबड'
वगैरे सगळ्या सबबी
कबूल केल्या तरी,
हे एक रेकॉर्ड
होत. एकीकडे गरीब
म्हणवणाऱ्या ह्या शहरात
इतक्या असंख्य गाड्या दिसतात,
की त्या कोणी
फुकट वाटत वगैरे
असेल अशी शंका
यावी (मी केली
लगेच चौकशी, पण
तसं नाही अस
सांगण्यात आल).
तर, गाईडनी पुरवलेल्या माहितीमधून
एका कोड्याचा उलगडा
झाला. म्हणजे, एकीकडे
मी ऐकत होतो
फिलिपिन्स खूप गरीब
देश आहे, मनिला
मध्ये खूप झोपडपट्टी
आहे वगैरे; पण
दुसरीकडे माझ्या सभोवार फक्त
समृद्धी आणि ऐश्वर्यच
दिसत होत - ह्याची
सांगड कशी घालायची?
मला आता कळल,
की मी मनिलात
रहात नसून 'मकाटी'
ह्या त्याच्या उपनगरात
होतो. (इथे उपनगरांना
'शहर' म्हणायची पद्धत
आहे - त्यामुळे 'Makati city'. उद्या
गिरगाव-ग्रांट रोड-महालक्ष्मी
नी मिळून स्वतःला
दादर-माटुंगा-माहीम-बांद्रा पेक्षा वेगळ
शहर म्हणायचं ठरवलं,
तर कस वाटेल!
पण ह्यांना स्वतःच्या
नगरपालिका असतात.) मकाटी हे
गेल्या वीस-पंचवीस
वर्षात उभारलेलं उपनगर; मनिला
स्टॉक एक्स्चेंज, बँका,
इतर ऑफीस बिल्डींग,
शॉपिंग मॉल्स आणि पंच
तारांकित हॉटेल्स हे इथले
खरे रहिवासी. ह्या
उपनगराची लोकसंख्या दर सोमवार
ते शुक्रवार दशलक्षांनी
वाढते अस ऐकल.
गरिबी-श्रीमंती मधली
दरी इथे बहुतेक
इतर बऱ्याच देशांपेक्षा
जास्त खोल असावी.
कारण, फिलिपिन्सची ७०%
जनता दारिद्र्य रेषेच्या
जवळ, किंवा खाली
राहते - ही आकडेवारी
त्यांच्या सरकारची म्हणे, म्हणजे
सत्य परिस्थिती आणखीच
वाईट असण शक्य!
मला खूप कुतूहल
होत की ह्या
देशाच उत्पन्नाच प्रमुख
साधन काय - उत्तराने
मी खरच थक्क
झालो… अ-रहिवासी
(ex-pat) फिलिपिनो लोकांनी पाठवलेला पैसा
आणि कॉल-सेन्टर्स
हे दोनच उत्पन्नाचे
मुख्य घटक असण
ही काही फार
आशादायक गोष्ट नव्हे.
शेवटी एकदाच खर मनिला
शहर बघितलं; खरच
मुंबईच्या गजबजाटाची आठवण करून
देणार आहे - रस्ते
मात्र बरेच मोठे
आणि बहुतांश स्वच्छ!
समुद्रकिनारा सुद्धा एकदम मरीन
ड्राइव्ह – Queen’s necklace वगैरे भागाची आठवण
करून देणारा ... पण
स्वच्छ… त्यामुळे साधारण शिवाजी
पार्कच्या आकाराचं, फिलिपिनो राष्ट्रपित्याच्या
नावाचं 'रीजाल पार्क' खूप
मोठ आणि सुंदर
वाटत... इथेही जुन्या भागात
गल्ली-बोळ आहेत,
cobble-stoned रस्ते आहेत - पण नुसत्या
स्वछ असण्याने केवढा
फरक पडतो हे
महत्वाच. मुंबईसारख दिसणार शहर,
पण गोंगाट नाही,
अंगावर येणारी गर्दी, फेरीवाले
नाहीत, नाक्या-नाक्यावर नुसते
उभे असलेले घोळके
नाहीत आणि भिकारी
तर नाहीच नाही
- हा भाग नजरेला
थोडा विचित्र वाटतो.
भारताप्रमाणे ह्या देशावरही
अनेकांनी राज्य केल - अगदी
मुस्लिम राजे, चिनी साम्राज्य,
बराच काळ स्पॅनिश
साम्राज्यात आणि शेवटी
थोडा काळ अमेरिकन
प्रभावाखाली राहिल्यामुळे, निरनिराळ्या संस्कृतींच्या खुणा
इथे जागोजाग दिसतात.
भाषेत बरेच अपभ्रंशीत
स्पॅनिश शब्द. बहुतांश (९०%)
जनता रोमन कॅथलिक
(आधीच्या आठवड्यात पोप भेटीनिमित्त
तीन दिवस सुट्टी
होती, आणि माझी
भेट कामासाठी असल्यामुळे
पुढे ढकलावी लागली
होती!) बरीच जुनी-पुराणी स्पॅनिश मिशन
चर्च वगैरे.
इथे भेटलेले, नुसते दिसलेले
सुद्धा, लोक खूप
मोकळे वाटले... एकंदरीत
'खाओ, पिओ, मजा
करो' टाईप... चेहरे
बरेचसे कायम हसरे...
एक 'हाडाची गरिबी'
आणि मवाळपणा स्वभावातच
असल्यासारखे... नम्र, पण अतिरेकी
लीन-लाचार टाईप
नाही. ह्या शहरातल्या
अनेक गोष्टी - विशेषतः
लोकांचा मनमोकळा स्वभाव - खूप
आवडल्या. तरीही एका गोष्टीशी
जमवून घेणं कठीण
गेलं - ती म्हणजे
फिलिपिनो पाककला. एकतर बऱ्याचश्या
पदार्थांमध्ये पोर्क होतं, आणि
त्याबाबतीत मी हिंदू
असण्यापेक्षा जास्त मुसलमान आहे!
आणि दुसरं म्हणजे,
हरप्रकारचे कल्पनेतले आणि कल्पनेबाहेरचे
सामुद्रपदार्थ. माझी मजल
माशापर्यंत जाते, पण त्यापलीकडच्या
ऑक्टोपस, ऑयस्टर, क्लॅम आणि
स्क्विड वगैरे मंडळींना मला
फक्त मत्स्यालयातच भेटायला
आवडतं, जेवणाच्या ताटात नाही.
त्यामुळे बरीच जेवणं
हॅमबर्गरवरच उरकावी लागली. मोगलांना
जसा पाण्यात सुद्धा
संताजी दिसत असे,
तसा मला तिथल्या
प्रत्येक रेस्टॉरन्टच्या पाण्याला फिशी वास
येतच असे (त्यामुळे
इतर पेयपान अपरिहार्यच).
माझ्यापुरतं मी ह्या
देशाचं नांव 'फ़िशिपिन्स' असंच
ठेवलं होतं. फिलिपिनो
'बलक' ह्या शब्दाने
माझ कुतूहल जाग
झालं. मराठी अंड्याच्या
बलकाशी बराच जवळचा,
पण खूप जास्त
भयानक असा हा
पदार्थ तिथे मोठी
'डेलीकसी' म्हणून खाल्ला जातो
हे समजल्यावर मी
आधी अर्थ विचारुन
घेतल्याबद्दल माझेच आभार मानले.
असो.
एक अपरिचित देश, लोक
आणि संस्कृतीची ओळख
म्हणून मला मनिला
भेटी आवडल्या, पण
मनिला काही 'must see' अस
प्रेक्षणीय स्थळ म्हणता
येणार नाही. फिलिपिन्सची
'पलावान' बेटं खूप
सुंदर आहेत, अशी
पांढरी-धोप वाळू
कुठे बघायला मिळणार
नाही वगैरे बराच
प्रचार मी ऐकला...
सौभाग्य असेल तर
तेही होईल, पण
सध्या मात्र मी
आमची करिबिअन बेटंच
मस्त, अस म्हणतो.
मस्त लिहले रे भाई ...बेस्ट म्हणजे ......."तरीही एका गोष्टीशी जमवून घेणं कठीण गेलं - ती म्हणजे फिलिपिनो पाककला. एकतर बऱ्याचश्या पदार्थांमध्ये पोर्क होतं, आणि त्याबाबतीत मी हिंदू असण्यापेक्षा जास्त मुसलमान आहे! "
ReplyDelete