भाषांतर - १

इकोपोहून करिसब्रूक कडे जाणारा रस्ता फार सुंदर डोंगराळ भागातून जातो, टेकड्याच म्हणाना. ह्या टेकड्या म्हणजे गवताचे गालीचेच जणू. काय वर्णावं  सौंदर्य त्यांचं. करिसब्रूक पर्यंतच मुळी सात मैल आहेत. तिथून पुढे, तुम्हाला आफ्रिकेमधली सगळ्यात सुंदर दऱ्याखोरी बघायला मिळतात; मात्र धुकं नसेल तेव्हा. तुमच्या अवती भवती नुसतं रानोमाळ पसरलेलं उंच झुपकेदार गवत असतंमधूनच एखाद्या एकांड्या टिटवीचा  टाहोमाळावरचाच पक्षी तोखालच्या अंगाला दिसतं ते ड्राकेन्स्बर्गहून समुद्राला भेटायला निघालेल्या उमझीमकुलूचं  खोरं. आणि नदीच्या मागे, आणि पलीकडे एकामागोमाग एक लहान आणि मोठे डोंगरआणि त्यांच्याही मागे आणि पलीकडे, इंगेली आणि इस्ट ग्रीकालंडचे पर्वत.

इथलं गवत एवढं दाट आणि गुंतागुंतीचं, की खालची जमीन दिसूच नये. पाऊस आणि ओल गच्च धरून ठेवतं. मग ते पाणी जमिनीत झिरपतं. कडेकपारीमधल्या झऱ्यांना पुरवतं. ह्या गवताची छान निगा राखलेली आहे; फार गुरं चरत नाहीत त्यावर, फारसे वणवे पेटत नाहीत त्याच्यात, खालची जमीन उघडी पाडायला. अनवाणी पायांनी त्याच्यावर उभं रहायचं. खालची धरणी मौल्यवान आहे नाविधात्याने स्वतः तर घडवली आहे तिला. ही जमीन जोपासायची, तिच रक्षण करायचं, तिची काळजी घ्यायचीमग तीही  तिच्या  माणसांना जोपासते, त्यांचं रक्षण करते, त्यांची काळजी घेते. तिचा विध्वंस होऊ दिला, की माणसांचाच विनाश होतो.

तुम्ही जिथे उभे असता ना, तिथे गवत दाट आणि गुंतागुंतीच आहे, खालची जमीन दिसत सुद्धा नाही. पण हळूहळू हे गवत विरळ होत जातं, टेकडीच्या उतारांवर. खाली दरीमध्ये उतरता उतरता, त्याचं रूप बदलत जातं. करडं, भुरं, तांबडं होत जातं ते. ओसाडइथे पाणी आणि ओलावा नसतो. कडेकपारीमधले झरे आटून जातातगुरांचे कळपच्या कळप इथे चरत असतात. आणि असंख्य वणवे पेटत असतातइथे वहाणा घालायला हरकत नाही. रुक्ष आणि खडकाळ जमीन आहे हीपायाला बोचते. ह्या जमिनीचं कोणी रक्षण करत नाही की काळजी घेत नाहीतीही माणसांचं रक्षण करत नाही की काळजी घेत नाही. टिटवी सुद्धा इथे हाका घालत नाही.

त्या मोठमोठाल्या निर्मनुष्य टेकड्या एकट्याच बापुडवाण्या उभ्या असतात. लाल बुंदअंगावरची त्वचा ओरबाडून काढल्यासारख्या. कधीतरी मोठाल्या विजा चमकतात, आभाळ फुटल्यासारखा पाऊस पडतोनिर्जीव कोरड्याठाण झऱ्यांमध्ये थोडा जीव येतोमातीचं लाल रक्त वहात असल्यासारखामग, खालच्या दऱ्याखोऱ्यातल्या बायका जमीन थोडी खरवडतात. जेमतेम पुरुषभर उंचीचं गवत वाढतं. ही गावं म्हाताऱ्याकोताऱ्यांची, बायकामुलांची. 

हट्टेकट्टे पुरुष आणि तरुण पोरंपोरी दूर निघून गेले आहेतही गावं त्यांना नाही धरून ठेऊ शकत.

Comments