भाषांतर - २

ती छोटीशी मुलगी, रुबाबात एक पत्र घेऊन, धावत धावत त्या लाकडी चर्चच्या लोखंडी दरवाज्यापर्यंत आली. चर्चला लागुनच एक घर होत. तिनी थोडस बिचकतच त्याचा दरवाजा ठोठावला. आतमध्ये रेव्हरंड स्टीफन कुमालो टेबलाशी बसून काहीतरी लिहित होते. त्यांनी नुसत डोक वर करून बघितलं आणि म्हणाले, कोण आहे?
त्या छोट्या मुलीनी दरवाजा हळूच उघडला... जपूनएवढ्या मोठ्या  माणसाच्या घराचा दरवाजा उघडताना चुकायला नको ना.. आणि थोडीशी बावरूनच ती आत आली.
-    आजोबा, मी एक पत्र आणलय.
-    पत्र? अरे वा! कुठे मिळाल बाळ हे तुला?
-    दुकानामध्ये, आजोबा. त्या गोऱ्या बाबांनी सांगितलं तुम्हाला नेउन द्यायला.
-    वा, छान काम केलसठीक आहे, आता ये हं बाळ.
पण ती काही लगेच निघत नाही. एक अनवाणी पाय दुसऱ्यावर घासत, एक बोट आजोबांच्या टेबलाच्या कडेला धरून गिरवत, ती तिथे उभीच रहाते.
-    भूक लागल्येय का बाळ तुला?
-    खूप नाही आजोबा.
-    थोडीशी?
-    हं, थोडीशी.
-    जा मग आजीकडेतिच्याकडे काही खायला आहे का विचार.
-    बर, आजोबा.
खूप जपून, चवड्यांवर चालत ती तिथून जाते. एवढ्या मोठ्ठ्या घराला तिच्या चालण्यानी धक्का नको लागायला... काय घर आहे पण! एक टेबल, आणि खुर्च्या आणि घड्याळ आणि कुंडीत ठेवलेलं छोटस झाड ... आणि पुस्तकं... बया बया  बया किती पुस्तकं ती... शाळेतल्यापेक्षा  सुद्धा जास्त!
कुमालोनी हातातल्या पत्राकडे बघितलं. मळलेल होत ते, विशेषतः शिक्क्याजवळ. नक्कीच बऱ्याच हातांनी हाताळून शेवटी इथपर्यंत पोचल होत. जोहानसबर्गहून आल होत ते. आता, जोहानसबर्ग मध्ये म्हटलं तर त्यांच्या नात्याचेच किती लोक होते... त्यांचा भाऊ जॉन, सुतारकाम करायचा पूर्वी. तिथे गेला आणि सोफियाटाऊन मध्ये धंदा उघडलन त्यानेत्यांची बहीण गर्ट्रूड, पंचवीस वर्षांनी लहान त्यांच्यापेक्षा... आई-वडिलांच्या उतार वयात झालेली. स्वतःच्या लहान मुलाला घेऊन तिथे गेली होती... नवऱ्याला शोधायला. खाण कामासाठी म्हणून जो तिथे गेला होता तो, त्याचा काही पत्ताच नव्हता. त्यांचा स्वतःचा एकुलता एक मुलगा - अब्सलम - आत्याला शोधायला म्हणून गेला आणि कधी परतलाच नाही.  आणि आणखीही कित्येक नातेवाईक तिथे गेलेले होते, पण एवढे जवळचे नाहीत. ह्या सगळ्यांपैकी कोणाच हे पत्र असेल सांगण कठीण होत. ह्यातल्या कोणाचही  पत्र आल्याला एवढा काळ लोटला होता, की अक्षरावरून ओळखण शक्यच नव्हत.
त्यांनी पत्र उलट-सुलट फिरवून बघितलं, पण तरीही कुठून आलय समजायला काही मार्ग नव्हता. एकीकडे ते उघडण नकोसं वाटत होत. अशा गोष्टी एकदा उघडल्या, की त्या पुन्हा बंद करता येत नाहीत.
त्यांनी बायकोला बोलावलं, 'गेली का ती मुलगी?'
-    नाही, खाते आहे.
-    खाऊ दे. तिनी हे पत्र आणलंय. तुला काही कल्पना आहे ह्या पत्राबद्दल?
-    मला कस माहिती असणार?
-    ते नाही ठाऊक मला. बघ हे.
तिनी ते पत्र घेतलं, हाताळून बघितलं. पण स्पर्शामधून काहीच बोध होत नव्हता कोणाकडून आल असेल. तिनी त्यावरचा पत्ता प्रयत्नपूर्वक हळू हळू वाचला. “रेव्हरंड स्टीफन कुमालो, सेंट मार्क चर्च, इंडॉटशनी, नाताळ
सगळ धैर्य एकवटून ती म्हणाली 'आपल्या मुलाच नाहीय हे'.
-    नाही, ते म्हणाले. एक दीर्घ निःश्वास. आपल्या मुलाच नाहीय.
-    कदाचित त्याच्याबद्दल असू शकेल.
-    हो, शक्य आहे.
-    गर्ट्रूडचं  वाटत नाही.
-    कदाचित माझ्या भावाचं, जॉनचं असेल
-    जॉनचं नसणार.
दोघ गप्प बसले. मग ती म्हणाली, 'केवढी वाट बघत असतो नाही आपण पत्रांची, आणि ते आल की उघडायचं धाडस नाही होत.’ 
-    धाडसाचा काय प्रश्न आहे! उघड.
तिनी ते हळू आणि थरथरत उघडलं, फारशी पत्र उघडायची सवयच नव्हती ना. उघडून पसरलं, आणि अस्फुट आवाजात वाचलं, त्यामुळे त्यांना ते नीट ऐकू गेल नाही. 'मोठ्यांनी वाच' ते म्हणाले. तिनी मोठ्यांनी वाचलं, एखादा झुलू इंग्रजी वाचेल तसंच...
मिशन हाउस, सोफियाटाऊन, जोहानसबर्ग
२५//४६
प्रिय ख्रिस्त बंधू,
नुकतीच माझी इथे एका गर्ट्रूड कुमालो नावाच्या तरुण स्त्रीशी गाठ पडली. असे समजते, की ह्या बाई इंडॉटशनी, नाताळ मधल्या सेंट मार्क चर्च येथील रेव्हरंड स्टीफन कुमालो ह्यांच्या भगिनी आहेतह्या बाई सध्या अतिशय आजारी आहेतम्हणून मी विनंती करतो, की आपण जोहानसबर्गला  तातडीने निघून यावे. येथे पोचल्यावर, रेव्हरंड थिओफ़िलस  सिमान्गु ह्यांना भेटण्याचे करावे. मी आपणासाठी माफक शुल्काच्या राहायच्या जागेची व्यवस्था करू शकेन आपल्याला थोडे मार्गदर्शनही करू शकेन.
आपला विश्वसनीय ख्रिस्त बंधू,
थिओफ़िलस  सिमान्गु
दोघेही दीर्घ काळ गप्प होते, शेवटी ती म्हणाली
-    अहो
-    काय?
-    काही नाही, हे पत्र. तम्ही ऐकलत.
-    हो, ऐकल. कठीण आहे.
-    आहे खर कठीण. काय करणारात?
-    त्या मुलीचं झाल का खाऊन?
ती स्वयंपाक घरात गेली, आणि मुलीला घेऊन बाहेर आली.
-    झाल खाऊन, बाळ?
-    हो, झाल, आजोबा
-    बर, मग ये हं आता. ते पत्र आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आणि त्या गोऱ्या बाबांना सुद्धा सांगशील ना धन्यवाद?
-    होय आजोबा.
-    बर, मग ये तर.
-    येते मी. काळजी घ्या हं आजी.
-    मजेत रहा, बाळ.
मुलगी हलक्या पावलांनी दरवाज्यापर्यंत गेली. तिनी हळूच दरवाजा ओढून घेतला... धाडकन दार बंद होण्याची भिती असल्यासारखामुलगी गेल्यावर, ती त्यांच्याकडे बघून म्हणाली 'काय करायचं ठरवलंत मग?'
-    कशाबद्दल ?
शांतपणे ती म्हणाली 'ह्या पत्राबद्दल'
एक मोठा श्वास घेऊन ते म्हणाले, 'जा, ते सेंट च्याड साठी जमवलेले पैसे घेऊन ये.' ती बाहेर जाऊन, एक कॉफी किंवा कोको वगैरे ठेवायचा असतो, तसा टिनचा डबा  घेऊन आली. त्यांनी तो डबा हातात धरला आणि त्याच्याकडे निरखून बघत राहिले... त्याच्यामध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधत असल्यासारखे. शेवटी ती म्हणाली 'करायला हवं, स्टीफन'.
-    कसे वापरू मी हे पैसे? ते म्हणाले. हे पैसे अब्सलमला सेंट च्याड मध्ये पाठवण्यासाठी जमवले होते.
-    अब्सलम सेंट च्याड मध्ये कधीच जाणार नाहीय.
-    अस का म्हणतेस? ते एकदम उद्गारले. अस कस बोलू शकतेस तू!
-    तो जोहानसबर्ग मध्ये आहे. ती एकदम थकून म्हणाली. जोहानसबर्गला गेले, की लोकं परत येत नाहीत.
-    खर बोललीस. बोलून गेलीस. हे पैसे ज्या कामासाठी साठवले होते, त्यासाठी ते कधीच वापरले जाणार नाहीत. एकदा का अस दार उघडलं, की पलीकडे जायलाच लागतईश्वरालाच ठाऊक, कुठे जाणारे हा रस्ता.
-    मी नव्हत उघडलं तेती त्यांच्या आरोपानी दुखावून म्हणाली. ते उघडंच होततुम्ही बघत नव्हतात.
-    आपल्याला एक मुलगा होता. ते चढत्या आवाजात म्हणाले. झुलूंना बरीच मुलं असतात, पण आपल्याला एकच होता. तो जोहानसबर्गला गेला. आणि तू म्हणालीस तसं, लोकं जोहानसबर्गला गेले, की परत येत नाहीत. पत्र सुद्धा लिहित नाहीत. ते सेंट च्याडला शिकायला जात नाहीत - ज्या शिक्षणाशिवाय, काळ्या लोकांना जगण अशक्य असायला हवं. ते जोहानसबर्गला जातात, आणि हरवतात. त्यांची काही नामोनिशाणीच रहात नाही. आणि हे पैसे...
पण तिच्याकडे उत्तर नव्हत, तेव्हा ते म्हणाले, '... हे माझ्याच हातात रहातात.' पुन्हा ती काहीच बोलेनाम्हणून ते परत म्हणाले, '... माझ्याच हातात...'
-    तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय. ती म्हणाली.
-    मी?... मी स्वतःला त्रास करून घेतोय? मी नाही... ही माझी माणस मला त्रास देताहेत. माझा स्वतःचा मुलगा, माझी बहीण, माझा भाऊ... लांब लांब जातात, आणि एक पत्र सुद्धा लिहित नाहीत. त्यांना समजत नसेल, आपल्याला त्रास होतोका पर्वाच नसेल आपल्याला त्रास होतो?
-    रागाच्या भरात त्यांचा आवाज चढला. जा... जाऊन विचार त्या गोऱ्या बाबाला. असतील अजून थोडी पत्रं. कदाचित त्यांच्या कपाटाखाली पडली असतील. कदाचित त्यांच्या जेवणा-खाणात हरवली असतील. जा... झाडांमध्ये जाऊन बघ... कदाचित वाऱ्यानी उडून तिथे गेली असतील....
ती रडायला लागली.... आता तुम्ही मलाही दुखावताय. ते भानावर आले, आणि हळुवारपणे म्हणाले. ‘ते… मी कदापी करणार नाही’.
त्यांनी तिच्यासमोर टिन धरला, आणि म्हणाले उघड. थरथरत्या हातांनी तिनी तो डबा उघडला आणि टेबलावर रिकामा केला. जुन्या मळकटलेल्या  थोड्या नोटा आणि चांदीच्या आणि तांब्याच्या पैशांचा खणखणाट.  'मोज' ते म्हणाले. नोटा आणि नाणी फिरवून फिरवून बघत, मोठ्या कष्टानी तिनी ते मोजले.
-    बारा पौंड, पाच शिलिंग आणि सात पेन्स.
-    मी घेतो ते. अस करतो, आठ पौंड, आणि शिलिंग आणि पेन्स घेतो.
-    सगळेच घ्या. डॉक्टर, हॉस्पिटल आणि काय काय खर्च असतील कोणास ठाऊक. सगळे घ्या. आणि हो, पोस्ट ऑफिस बुकात दहा पौंड असतील ना, ते पण घ्या.
-    ते तुझ्या स्टोव्ह साठी मी वाचवत होतो.
-    आता इलाज नाही... आणि ते सेंट च्याड चे पैसे... माझ्या डोक्यात तुमच्या नवीन काळ्या कोटासाठी आणि पांढऱ्या कॉलरीसाठी वापरायचे होते.
-    त्यालाही आता इलाज नाही. पुढे बघू... मला जायला हवं...  
-    उद्याच, क्लरिसब्रुकहून.
-    मी बिशपना आत्ताच लिहून कळवतो, सुट्टी हवी, आणि कधी परत येईन नक्की नाही अस.
जड पावलांनी ते उठले आणि तिच्यासमोर उभे राहिले. मला माफ कर, मी तुला दुखावलं. मी चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करतो.
तिनी त्यांना दारामधून बाहेर जाताना बघितलं, छोट्या खिडकी मधून, चर्चच्या दरवाज्यापर्यंत हळू हळू चालताना बघितलं. मग ती त्यांच्या टेबलापाशी बसली... डोकं त्याच्यावर टेकूनगप्प... एका काळ्या स्त्रीचं, एका ओझ्याच्या बैलाचं, एका मूक जनावराचं दुःख सोसत. मुकाट्यानी. निमुटपणे

सगळे रस्ते जोहानसबर्गलाच  जाऊन मिळतात. प्रदीर्घ रात्रींमधून लांबच्या लांब आगगाड्या जोहानसबर्गलाच धावत असतात. त्यांच्या हिंदकळणाऱ्या डब्यामधला उजेड आसपासच्या झोपलेल्या प्रदेशातल्या गवतावर आणि दगडांवर ठेचकाळतो. ...


धन्य त्या डोळ्यांची, जे शांत झोपू शकतात.


Comments