भाषांतर - ३

ती खेळातल्यासारखी नॅरो गेजची आगगाडी उमझीमकुलूच्या खोऱ्यामधून डोंगरांमध्ये चढते. करिसब्रूक पर्यंत चढते आणि थांबते तिथे थोडा वेळ. तुम्ही बाहेर पडून ते सुंदर खोरं बघू शकता. गाडी तुम्हाला सोडून जाणं जवळ जवळ अशक्यच! कारण थोडेसेच लोकं असतात, आणि बहुतेक सगळे तुम्हाला ओळखतच असतात. आणि समजा गाडी गेली सोडून , तरी फारसा फरक नाही पडत; कारण अगदीच एखादा अपंग किंवा म्हातारा मनुष्य सोडला, तर कोणीही धावत जाऊन ती गाडी पकडू शकत.

खूप धुकं असलं, तर तुम्हाला त्या सुंदर खोऱ्यातल काहीच दिसणार नाही. तुमच्या आजूबाजूला आणि सभोवार नुसत ते धुकं तरळत राहात, आणि ती गाडी आणि त्यातले प्रवासी ह्यांच स्वतःचंच एक विश्व तयार होत. काही लोकांना नाही आवडत ते, थंड आणि निष्प्राण वाटत त्यांना ते. इतर काहींना आवडत... त्यांना गूढ रहस्यमय वाटत, एखाद्या साहसाची सुरुवात वाटते... अज्ञाताची साद वाटते. ती गाडी अश्या ह्या कल्पनारम्य जगातून जात असते... त्या धुकाळलेल्या  कांचेमधून तुम्हाला दोन्ही बाजूला धुसर हिरवट गवत  दिसत राहत. ह्या मोसमात तऱ्हेतऱ्हेची रंगी बेरंगी फुलं दिसतात्त... निळी-जांभळी रानफुलं, कर्दळी सारखी भगवी, गुलाबी आणि तांबडी भडक, आणि सफेद घंटेच्या आकाराची... आणि मागे पार्श्वभूमीवर ती धुक्यातल्या भुताटकी सारखी दिसणारी लहान लहान पिवळी फुलं.

गाडी घाटातून वर चढत असताना करिसब्रूकला तिची वाट बघायला सुद्धा मजा येते. जे अगदी दर्दी असतात, ते गाडीच्या प्रत्येक शिट्टी बरोबर ती गाडी कुठे आहे, कुठच्या रस्त्यावर, कोणाच्या शेताजवळ, कुठच्या नदीवर सगळ अगदी व्यवस्थित सांगू शकतात. पण कुमालो जरी वेळेच्या आधी तासभर तिथे पोचले असले, तरी त्यांच ह्या गोष्टींकडे लक्ष नव्हत. केवढ लांब जायचंय, आणि केवढा खर्च. त्यांची बहीण किती आजारी आहे कोण जाणे, आणि त्याचा खर्च किती असेल... तिला घेऊन यायचं तर पुन्हा त्याचा खर्च... एवढ अगडबंब शहर ते जोहानसबर्ग! एवढ्या गल्ल्या आहेत म्हणे की सगळ्या पालथ्या घालायला आयुष्य सुद्धा पुरणार नाही. बस घ्यायला लागते म्हणे... आणि इथल्या सारख नाही - एकच बस, त्यामुळे ती बरोबरच असते. तिथे म्हणे शेकडो बशी असतात, आणि दहा-पंधरा पैकी एखादी बरोबर हवी ती असते. चुकीची बस घेतलीत की भलतीकडेच जाऊन पोचाल. आणि रस्ते ओलांडण खूप धोक्याच असत म्हणे, पण ओलांडायला तर लागतातच ना! इंडॉटशनीच्या इम्पान्झाची बायको, गेली होती ना तिथे इम्पान्झा अगदी आजारी होता तेव्हा, स्वतःच्या मुलाला रस्त्यात मरतांना बघितलन. बारा वर्षाच कोवळ पोर ते, उत्साहाच्या भरात रस्त्यात गेला, ती घाबरली आणि मागे राहिली आणि डोळ्यादेखत लॉरीनी त्याचे प्राण हिरावून नेल्याच बघितलं.

आणि ती दुसरी भीती. एवढी मोठी, की तिचा उच्चारही क्वचितच केला जातो. त्यांचा मुलगा कुठे आहे? तो लिहित का नाही?

एका लांब लचक शिट्टीबरोबर शेवटी गाडी सुद्धा स्टेशनजवळ आली. पाद्रीबाबा त्यांच्या साथीदाराकडे वळले.
-    दोस्ता, तुझ्या मदती बद्दल धन्यवाद.
-    आजोबा, मला आनंदच होतोय तुम्हाला मदत करायला. तुम्ही एकटे नसता करू शकला हे सगळ. ब्याग खूप जड आहे ती
गाडी जवळ जवळ आलीच स्टेशनात.
-    आजोबा, माझ्यासाठी एक काम कराल? सिबेको माहिती आहे ना तुम्हाला? त्याची मुलगी इथे इकोपो मध्ये त्या स्मिथ नावाच्या गोऱ्याकडे काम करत होती. आणि स्मिथच्या मुलीच लग्न होऊन ती जोहानसबर्गला गेली, तेव्हा सिबेकोची मुलगीही तिच्याबरोबर कामाला गेली. हा तिचा पत्ता, आणि हे स्मिथ च्या मुलीच नवीन नांव. सिबेकोला त्याच्या मुलीची दहा-बारा महिन्यात काहीच खबरबात नाही. त्यांनी विचारलाय तुम्ही चौकशी कराल का.

कुमालोनी त्या हाताळलेल्या मळकट कागदाकडे एक दृष्टीक्षेप टाकला. 'स्प्रिंग्स; हुं. ऐकलय खर नांव . पण जोहानसबर्ग नाही ते, जवळ आहे म्हणतात. अरे, गाडी आलीच; बघतो मला काय जमेल ते.' त्यांनी तो कागद खिशात घातला, आणि दोघे येणाऱ्या गाडीच्या दिशेनी पाहू लागले

दक्षिण आफ्रिके मधल्या इतर गांवठाण आगगाड्यांसारखी ही सुद्धा काळ्या पाशिन्जरांनी ओसंडून वहात होती. ह्या गाडीत तर बाकीच कोणी नव्हतंच. कारण ह्या भागातल्या सगळ्या युरोपिअन लोकांकडे स्वतःच्या गाड्या असतात, त्यामुळे ते क्वचितच आगगाडीने प्रवास करतात.
कुमालो खास काळ्या लोकांसाठी राखीव असलेल्या डब्यामध्ये शिरले. तो आधीच त्यांच्या वर्णाच्या सामान्य जनतेनी ठेच भरलेला होता. चित्र-विचित्र युरोपिअन पद्धतीचे पोशाख केलेले बरेच लोक होते. त्यावरून काहींनी घोंगड्या घेतल्या होत्या. इतर काहींनी त्यांच्या पुरातन प्रथेनुसार घातलेल्या वस्त्रांमधून बहुतांश उघड पडलेलं अंग झाकायला घोंगड्या पांघरल्या होत्या. पुरातन वस्त्रांमध्ये बहुतेक स्त्रियाच होत्या, कारण पुरुष आजकाल तसा पोशाख सहसा करत नाहीत.

उकाड्याचे दिवस होते, आणि एक घामट दर्प सगळ्या डब्यामध्ये पसरला होता. पण कुमालो अतिशय साधे होते आणि त्यांना त्याची फार फिकीर नव्हती. लोकांनी त्यांचे पाद्री बाबाचे कपडे बघितले, आणि त्यांना थोडी जागा करून दिली. कुमालोंनी इकडे तिकडे बघितलं बोलायला कोणी भेटतंय का, पण सगळे अगदीच खालच्या वर्गातले होते. खिडकीमधून डोकावून त्यांनी त्यांच्या मित्राला निरोप दिला.
-    सिबेको स्वतः का नाही आला माझ्याकडे?
-    त्याला भीती वाटली, तो काही आपल्या चर्चमधला नाही ना.
-    अरे, पण आपल्यातलाच आहे ना? अडचण आली तर काय माणसांनी फक्त 'त्यांच्या' चर्च मध्येच मदत मागायची?
-    मी सांगेन त्याला, आजोबा.
कुमालोंचा आवाज थोडा चढला - एखाद्या नाटकी मुलाचा चढतो ना (कधी कधी नाटकी मोठ्यांचा सुद्धा) - दुसऱ्यांना ऐकू जाव म्हणून मुद्दाम - तसा.
-    हे बघ, त्याला म्हणावं मी जोहानसबर्ग मध्ये असेन ना, तेव्हा जाईन मी त्याच्या त्या स्प्रिंग्स गावामध्ये. त्यांनी पत्ता असलेल्या खिशावर हात थोपटला. काय समजलास, करेन मी त्याच्या मुलीची चौकशी. पण म्हणावं, कामात असणारे मी. एवढी कामं असतात ना माझी जोहानसबर्ग मध्ये.

ते खिडकी पासून वळले, लोकांना ऐकू जाईल इतपत मोठ्यानी स्वतःशी  पुटपुटत 'नेहमीचंच आहे हे'.  'त्याच्या वतीनी मी तुमचे आभार मानतो.' आगगाडीनी शेवटची शिट्टी दिली आणि एका धक्क्यानिशी ती हलायला लागली कुमालोंचा तोल जाऊन ते पडणारच होते. आता एका ठिकाणी नीट बसण शहाणपणाच होणार आहे लक्षात आलं त्यांच्या.

गाडी आता वेग घेत होती. डोंगरांच्या कडांवरून सरपटत, खोल दऱ्यांच्यावरून लोंबकळत, गवतांच्या आणि फुलांच्या बाजूने धावत, शेताडांच्या आणि जंगलांच्या मधून काळोखातून स्टेनटन पार करून इकोपोपर्यंत खाली जायला

प्रवास आता सुरु झाला होता. आणि ती भिती परतून माघारी आली होती. अज्ञाताची भिती, लहान मुलांना रस्ता ओलांडताना चिरडून टाकणाऱ्या त्या राक्षसी शहराची भिती, गर्ट्रूड च्या आजाराची भिती. सगळ्याच्या तळाशी दडून बसलेली त्यांच्या मुलाबद्दलची भिती. सगळ्याच्या मुळाशी असलेली, एका परक्या जगात रहाणाऱ्या माणसाची भिती. त्याच स्वतःच जग निसटून जातंय, हरवतंय, उध्वस्त केलं जातंय... आणि परत वसवण शक्य नाही.

काही क्षणापूर्वी बाजूच्या भोळसर लोकांसमोर प्रौढी मिरवणाऱ्या, थोडंस खोट बोलणाऱ्या ह्या माणसाच्या पायातलं बळ आत्ताच ओसरायला लागलंय.

गरीब बिचारा कोटाच्या खिशातून बायबल काढून वाचायला लागतो. हे एकच जग काय ते शाश्वत आहे.

Comments