गर्ट्रूड असेल एके काळी श्रीमंत, पण तिचे कपडे अगदीच खराब होते. आणि ती डोक्यावरची काळ्या विणीची टोपी तर अगदी लाज आणणारी होती. त्यांच्याकडे पैसे मोजकेच असले, तरी त्यांनी तिच्यासाठी एक छान लाल ड्रेस आणला, डोक्यावर घालायला एक पगडी म्हणावी अशी पांढरी टोपी आणली. मुलाला एक सदरा, अर्धी चड्डी आणि कोट आणला. चार चांगले भक्कम हात रुमाल आणून त्याच्या आईकडे दिले, त्याच नाक पुसायला. आता त्यांच्या खिशात फक्त ते पोस्ट ऑफिस मधले साठवलेले दहा पौंड शिल्लक होते. कुठल्याही सामान्य गृहिणी प्रमाणे त्यांच्या बायकोनी स्टोव्ह घेण्यासाठी साठवलेले. दरमहा आठ पौंडाच्या पगारातून दहा पौंड साठवायला, ते सुद्धा चर्चमधल्या पाद्रीबाबांना, ज्यांना नीट काळे कपडे घालावे लागतात... किती काळ वाट बघावी लागते काय सांगणार. त्यांच्या स्वतःच्या शर्टाच्या कॉलर मळक्या आणि झेजरलेल्या होत्या, पण त्या बदलायला आता थोड थांबावं लागणार. ते दहा पौंड लौकरच मोडावे लागणार दुर्दैवानी; पण ट्रेन तर काही फुकट ने-आण करत नाहीत ना, आणि तिच्या सामानासाठी तर नक्कीच एखाद-दोन पौंड जास्त. लोक म्हणतात तिच्या धंद्यामध्ये एवढे पैसे मिळतात, मग हिनी काहीच साठवले नव्हते म्हणजे कमाल आहे!
गर्ट्रूड लिथबी बाईंना त्यांच्या घर कामामध्ये मदत करत होती; त्यांच्या कानावर तिच्या हलकेच गुणगुणण्याचे स्वरही पडत होते. तो छोटा मुलगा, आवारात एका बिल्डरनी टाकून दिलेल्या दगड विटांबरोबर खेळत होता. लक्ख उन्ह पडल होत, आणि एवढ्या अवाढव्य शहरात सुद्धा छोट्याश्या चिमण्या चिवचिवाट करत इथून तिथे उडत होत्या. त्यांना सिमांगु रस्त्यावरून येताना दिसला. बायकोला लिहायला घेतलेलं पत्र त्यांनी बाजूला ठेवलं - आगगाडीचा प्रवास, एवढ मोठ्ठ जोहानसबर्ग शहर, त्यांचा पौंड चोरणारा तो पोरगा, गर्ट्रूडची चटकन झालेली भेट, तिचा छान गोंडस मुलगा... आणि हो, सगळ्यात मोठ्ठी गोष्ट म्हणजे आज ते त्यांच्या मुलाच्या शोधात निघणार होते. सगळ सगळ लिहील होत त्यांनी.
- काय, झाली का तयारी निघायची?
- हो, मी तयारच आहे; बायकोला पत्र लिहित होतो.
- माझी त्यांची प्रत्यक्ष ओळख नसली, तरी माझा नमस्कार कळवा त्यांना.
ते दोघ चालत चालत निघाले - एका रस्त्यावरून दुसऱ्यावर. म्हणतात ते खरच आहे - आयुष्यभर तुम्ही नुसत ह्या रस्त्यावरून त्या रस्त्यावर चालत राहू शकाल, कुठचाही रस्ता दोनदा न घेता.
- हे आल तुमच्या भावाचं दुकान. दिसलं ना नांव?
- हो.
- मी येऊ तुमच्याबरोबर?
- हो, इथे ठीक आहे तुम्ही आलात तरी.
त्यांचा भाऊ जॉन एका खुर्चीत बसला होता, दुसऱ्या दोन माणसांशी बोलत. चांगला जाडा झाला होता, आणि गावातल्या मुखियासारखा गुडघ्यावर हात रोवून बसला होता ऐटीत. भावाला ओळखल नाही त्याने, कारण उजेड रस्त्यातून आलेल्या पाहुण्यांच्या पाठीमागून येत होता..
- कसा आहेस, भाऊ?
- कसे आहात, साहेब?
- अरे मी तुझा सख्खा भाऊ, तुझ्याच आईचा मुलगा!
जॉन कुमालोनी निरखून त्यांच्याकडे बघितलं, आणि तोंडावर एक विस्तीर्ण हास्य घेऊन उठून उभा राहिला. माझा सख्खा भाऊ! ओ हो हो, विश्वासच बसत नाहीय. काय करताय काय तुम्ही जोहानसबर्ग मध्ये!
कुमालोंनी बसलेल्या लोकांकडे बघितलं आणि म्हणाले कामासाठी आलोय मी.
- ओह, माझे मित्र नक्कीच समजून घेतील... माझा सख्खा भाऊ, माझ्या आईचा मुलगा आलाय.
बसलेले दोघे उठून उभे राहिले, सगळ्यांनी रीतीप्रमाणे जपून जा, जपून रहा केल; आणि ते गेले.
- भाऊ, तू रेव्हरंड सिमांगुंना ओळखतोस का?
- वा वा वा, ह्यांना तर सगळेच ओळखतात. सगळेजण ओळखतात रेव्हरंड सिमांगुंना! बसा बसा! मला वाटत, आपण चहा घेऊ!
त्याने दाराशी जाऊन मागच्या बाजूला चहाचा हुकुम सोडला.
- आणि भाऊ, तुझी बायको, इस्थर कशी आहे?
जॉन कुमालोने त्याच खेळकर आणि धूर्त हास्य केल. दादा, माझ्या बायकोनी, इस्थरनी मला सोडून आता दहा वर्ष होऊन गेली.
- मग, तू परत लग्न केलस?
- अं अम, अगदी चर्च मध्ये जाऊन अस नाही; पण ती फार चांगली आहे हं मात्र.
- भाऊ, तू ह्यातलं काहीच लिहील नाहीस.
- नाही, कसं लिहिणार? इथे जोहानसबर्ग मध्ये आयुष्य कसं आहे, हे तुम्हा लोकांना तिथे इंडॉटशनीमध्ये काय समजणार? म्हटलं, न लिहिणच बर.
- म्हणून मग तू लिहायचाच थांबलास का?
- असेल, तसही असेल. कटकट, उगीचच कटकट.
- पण मला समजल नाही, जोहानसबर्ग मध्ये आयुष्य वेगळ आहे म्हणजे नक्की काय आहे?
- ते ना, कठीण आहे समजावण. मी इंग्लिश मध्ये बोललो तर चालेल का? ह्या गोष्टी ना इंग्लिश मध्ये समजवायला सोप्या वाटतात.
- बोल ना, इंग्लिश मध्ये बोल.
- हे बघ, ही जी जोहानसबर्गची रहाणी आहे ना, ती त्या इंडॉटशनी सारखी नाहीय. ती समजून घ्यायला इथे रहायला हव.
त्याने त्याच्या मोठ्या भावाकडे बघितलं. इथे काही नवीन घडतंय! तो म्हणाला.
तो खाली बसला नाही, पण एका वेगळ्याच अनोख्या आवाजात बोलायला लागला. तो येरझारा घालायला लागला. त्याची नजर खिडकीतून बाहेर रस्त्यावर फिरत होती, आढ्याकडे फिरत होती, खोलीच्या काना-कोपऱ्यात फिरत होती. जणू काही तिथे कोणीतरी असाव, त्यांना बाहेर काढायला.
- तिथे त्या इंडॉटशनी मध्ये मी म्हणजे कोणीच नाही. तू ही कोणीच नाहीस. त्या मूर्ख अडाणी मुखियाच्या हाताखाली रहायचं. त्या अशिक्षित गांवढळाला झुकून नमस्कार करायचा. इथे जोहानसबर्ग मध्ये, मी कोणी आहे, मला महत्व आहे, माझा वचक आहे. माझा स्वतःचा व्यवसाय आहे; बरा चालतो तेव्हा आठवड्याला चांगले दहा बारा पौंड मिळवतो मी.
तो आता झुलायला लागला होता. तो त्यांच्याशी बोलतच नव्हता; तिथे नसलेल्या एखाद्या अदृश्य जमावाशी बोलत होता.
- मी म्हणत नाही की आपण इथे मुक्त आहोत. मी म्हणत नाही, की माणसांनी असायला हव तेवढे आपण इथे मुक्त आहोत. पण, निदान मी त्या मुखियाच जोखड फेकून दिलंय. त्या मूर्ख अडाणी म्हाताऱ्याच, त्या गोऱ्यांच्या कुत्त्याच जोखड मी झुगारून दिलंय. खेळण आहे तो मुखिया म्हणजे, गोऱ्यांच्या हातातलं, त्यांच्या मर्जीप्रमाणे सगळ हव तस सांभाळून ठेवणारं खेळण.
त्याने त्याच धूर्त आणि अर्थपूर्ण हास्य केल, आणि क्षणभर परत त्याच्या समोरच्या पाहुण्यांशी बोलू लागला.
- पण, आता हे सगळ जुळवून धरणं जमणार नाहीय. मोडून पडतेय, तुमची ती जमात व्यवस्था, कोलमडून पडतेय. इथे, ह्या इथे जोहानसबर्ग मध्ये नवीन समाज उभा रहातोय. काहीतरी नवीन घडतंय इथे, दादा.
तो थबकला, आणि म्हणाला, तुम्हा लोकांचा मला अपमान करायचा नाही, पण तुमच ते चर्च... ते सुद्धा त्या मुखियासारखच तर आहे. हे केल पाहिजे आणि ते केल पाहिजे आणि अस वागल पाहिजे. नवीन अनुभव घायला काही मुभाच नाही. माणसानी एकनिष्ठ राहिल पाहिजे, आणि गरीब आणि आज्ञाधारक राहिल पाहिजे. सगळे कायदेकानू पाळले पाहिजेत, मग ते कायदे काहीही असले तरीही. तुमच चर्च मोठ्या गोड भाषेत बोलत खर, आणि तुमचा तो बिशप कायद्यांच्या विरोधात बोलतो... पण हे सगळ गेली पन्नास वर्ष चाललाय आणि परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखीच वाईट होत चालली आहे.
त्याचा आवाज चढायला लागला, आणि पुन्हा तो त्या अदृश्य जमावाशी बोलायला लागला. इथे जोहानसबर्ग मध्ये खाणी आहेत, खाणी म्हणजे सर्वस्व आहे. ह्या उंच बिल्डिंगी, ती म्युनिसिपालिटीची सुंदर इमारत, ती पार्क टाऊन मधली सुंदर घरं. हे सगळ त्या खाणींमधल्या सोन्यावर उभारलेल आहे. ते युरोपिअनांच सुंदर हॉस्पिटल, विषुववृत्ताच्या दक्षिणेकडच सर्वोत्कृष्ट हॉस्पिटल म्हणे, ते त्या खाणींमधल्या सोन्यावरच उभ आहे.
त्याच्या आवाजात एक बदल झाला, तो सिंहगर्जनेसारखा बुलंद झाला होता... जा, आपल्या हॉस्पिटल मध्ये जा, आणि बघा फरशीवर झोपलेले आपले लोक. एवढे दाटीवाटीनी झोपलेले असतात, की त्यांना ओलांडून जाणच शक्य होणार नाही. पण सोनं खणून काढत कोण, ते लोकच; दिवसाला तीन शिलिंगवर. आम्ही ट्रानस्कीहून येतो, बसुटोलँन्डहून, बेचुआनालँन्डहून आणि स्वाझीलँन्डहून, आणि झुलूलँन्डहून येतो. हो आणि इंडॉटशनीहून सुद्धा. आम्ही इथे आवारामध्ये झोपतो, बायका-मुलं आणि संसार मागे सोडून येतो. पण एवढं करून, नवीन सोन्याचा शोध लागला की आमच्या ह्या सगळ्या श्रमांचा मोबदला थोडा सुद्धा वाढत नाही; गोऱ्यांच्या शेअर्सच्या किंमती फक्त वर जातात. वाचा, रोजच्या वर्तमानपत्रांमधून वाचा हे सगळ. नवीन सोनं सापडलं, की पागल होतात हे लोक. मग, त्यांच्या आवारांमध्ये रहायला, रोजी तीन शिलिंगावर कामं करायला आमच्यासारख्या आणखी लोकांना घेऊन येतात हे. असा विचार नाही करत, की आता ह्या लोकांच्या श्रमाचा मोबदला थोडा वाढवून द्यायची ही संधी आहे. ते फक्त एवढाच विचार करतात, की आता आणखी मोठ्ठ घर घ्यायला मिळेल, आणखी मोठ्ठी गाडी घ्यायला मिळेल. सोन शोधण महत्वाच आहे म्हणे, कारण सबंध दक्षिण आफ्रिका ह्या खाणींवरच उभी आहे ना.
घनगर्जनेसारख्या खोल आवाजात तो आता गुरगुरायला लागला होता. नाही, पण दक्षिण आफ्रिका खाणींवर उभी नाहीय; ती उभी आहे आमच्या मजुरांच्या कंबरड्यावर, त्यांच्या घामावर, त्यांच्या श्रमांवर. प्रत्येक फॅक्टरी, प्रत्येक थिएटर, प्रत्येक सुंदर घर कोणी उभारलाय? आम्ही उभारलाय! पण, त्या मुखियाला काय माहिती आहे ह्यातलं, दगड! इथे जोहानसबर्गमध्ये सगळ्यांना माहिती आहे.
तो थांबला, आणि गप्प राहिला. आणि त्याचे पाहुणेही गप्प राहिले. कारण त्या आवाजामधली जरबच गप्प करणारी होती. स्टीफन कुमालो गप्प राहिले, कारण त्यांचा हा नवीनच भाऊ त्यांना दिसला होता.
जॉन कुमालोने त्यांच्याकडे बघितलं. तो बिशप म्हणतो हे सगळ चूक आहे; पण स्वतः मात्र मोठ्ठ्या घरामध्ये रहातो. त्याच्या गोऱ्या प्रिस्टना तुझ्या चार, पाच, सहापट पैसे मिळतात दादा.
आता तो खाली बसला, आणि एका मोठ्ठ्या लाल हात रुमालाने त्याने चेहरा पुसला.
- हा माझा अनुभव आहे, आणि म्हणून मी चर्च मध्ये जात नाही.
- आणि म्हणून तू पत्रही लिहित नाहीस आता.
- असेल, असेल बुवा तस.
- ते, आणि तुझी बायको इस्थर.
- असेल, असेल; दोन्हीही असू शकेल. हे सगळ पत्रामधून लिहिण कठीण आहे. इथल्या आमच्या रितीभाती थोड्या वेगळ्या आहेत.
त्यावर सिमांगु म्हणाला, इथे आहेत काही रितीभाती?
जॉन कुमालोने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. इथे हे जे नवीन घडतंय ना, तुमच्या चर्चपेक्षा आणि मुखियापेक्षा फार प्रभावी असणार आहे, बघाल तुम्ही एक दिवस.
- आणि तुमची बायको, ती का सोडून गेली?
- हे बघा, जॉन कुमालो त्याच ठेवणीतल हास्य हसला, तिला माझ्या ह्या अनुभवातल काही समजत नव्हत.
सिमांगु थंडपणे म्हणाला, म्हणजे तिचा एकनिष्ठेसारख्या गोष्टींवर विश्वास होता?
जॉनने त्यांच्याकडे संशयाने बघितलं, आणि सिमांगुच्या झटकन लक्षात आलं, की एकनिष्ठा शब्द त्यांच्या लक्षात आला नाहीय.
- आपण झुलू मध्ये बोलूया का?
संतापानी त्या मानेवरच्या शिरा तटतटून उभ्या राहिल्या, आणि कोण जाणे रागाच्या भरात काय शब्द ऐकायला मिळाले असते; पण स्टीफन कुमालोंनी पटकन मध्यस्थी केली.
- अरे भाऊ, हा चहा आलाच बघ.
कोणी त्या बाईची ओळख करून दिली नाही, बिचारी खालच्या मानेनी सगळ्यांना चहा देऊन निघून गेली. ती गेल्यावर कुमालो त्यांच्या भावाशी बोलले.
- लक्ष देवून ऐकल तुझ सगळ बोलण मी. बरंचस ऐकून खूप वाईट वाटल, एक तर तुझ्या बोलण्याच्या ढंगामुळे, पण दुसर म्हणजे त्यातला बराच भाग खरा होता. आता मला तुला एक विचारायचय. पण त्याआधी मी तुला सांगतो, गर्ट्रूड इथे माझ्या जवळ आहे; माझ्याबरोबर इंडॉटशनीमध्ये परत येणार आहे ती.
- वा वा! वाईट आहे अस मी बिलकुल नाही म्हणणार. जोहानसबर्ग ही काही एकट्या बाईनी राहण्याची जागा नाही. मी स्वतः केला होता प्रयत्न तिला समजावयाचा, पण पटल नाही तिला. मग आम्ही पुन्हा भेटलोच नाही कधी.
- आता मी तुला विचारतो, माझा मुलगा कुठे आहे?
जॉनच्या डोळ्यांमध्ये अस्वस्थपणाची झाक आहे. त्याने खिशातून परत रुमाल बाहेर काढला.
- तू ऐकलच असशील त्याची आणि माझ्या मुलाची मैत्री होती.
- हो, मी ऐकलय.
- आणि तुला माहिती असेलच आजकालची ही तरुण पोर म्हणजे काय. त्यांनाही दोष नाही देता येणार. काय झाल, माझ्या मुलाच त्याच्या ह्या दुसऱ्या आईबरोबर पटेना. नक्की काय झाल मला कधी समजलच नाही. त्याच तिच्या मुलांबरोबरही पटेना. मी जुळवून द्यायचा केला बऱ्याचदा प्रयत्न, पण मला काही नाही जमल ते. तो म्हणाला मी घर सोडून जातो. चांगली नोकरी होती त्याला, म्हणून मीही थांबवायचा प्रयत्न नाही केला. तुमचा मुलगाही त्याच्याबरोबर गेला.
- कुठे?
- मला नक्की माहिती नाही. पण मी ऐकल होत, की त्यांनी इथे अलेक्झांड्रामध्ये जागा घेतली होती. एक मिनिट हं, ते दोघ इथे एका फॅक्टरीमध्ये काम करत होते. थांब, मी फोन डिरेक्टरीमध्ये त्यांचा नंबर शोधतो.
तो एका टेबलापाशी गेला, तिथे कुमालोंना टेलिफोन दिसला. नाही म्हटलं तरी थोडा अभिमान वाटलाच त्यांना, ह्या असल्या गोष्टी घरात ठेऊ शकणारा मनुष्य आपला भाऊ आहे!
- मिळाला. डूर्नफ़ोण्टिन टेक्स्टाइल कंपनी, १४ क्रॉस स्ट्रीट. थांब, मी लिहूनच देतो तुला.
- आपण त्यांना फोन करायचा का, कुमालोंनी थोड चाचरतच विचारलं.
त्यांचा भाऊ हसला. कशासाठी? अब्सलम कुमालो तिथे काम करतो का हे विचारायला? का, त्याला फोनवर बोलावून आणाल का हे विचारायला? का, ते त्याचा पत्ता सांगतील का हे विचारायला? काळ्या माणसासाठी असल्या गोष्टी कोणी करत नाही, दादा.
- जाऊ दे ना; मी तर आहे तुमच्या बरोबर! सिमांगु म्हणाला.
त्यांनी निरोप घेतला आणि ते गल्लीत बाहेर आले.
- बघितलंत?
- हो, बघितलं.
- इथली बडी असामी आहेत ते, तुमचे बंधू! त्यांच्या दुकानात कायमच गर्दी असते लोकांची; ह्या अशाच चर्चा चालू असतात. अस म्हणतात, तुम्ही ह्यांना एखाद्या सभेमेध्ये ऐकायला हव - हे, दुबुला आणि टॉमलिन्सन म्हणून एक निमगोरा आहे. अस म्हणतात, की मोठ्या बुलंद आवाजात ते भाषण देतात, एखाद्या वाघासारखे घशात गुरगुरत असतात. मनात आणलं, तर लोकांना पागल करू शकतील. पण त्यासाठी लागणार धाडस त्यांच्यात नाहीय; कारण तस केल तर ते नक्कीच तुरुंगात जातील. आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला - ते बोलले त्यातल्या बऱ्याच गोष्टी खऱ्या होत्या.
ते रस्त्यात थांबून, शांतपणे मनापासून बोलायला लागले. गोऱ्या माणसाकडे सत्ता आहे म्हणून आपल्याला सत्ता हवी आहे, पण एखाद्या काळ्या माणसाकडे सत्ता आली, किंवा पैसा आला आणि तरीही जर तो भ्रष्ट झाला नाही तर महंतच म्हणायला हव त्याला. मी नेहमी बघितलं आहे. माणसाला सत्ता आणि पैसा हवा असतो, जगातलं जे सगळ चूक आहे ते दुरुस्त करायला. आणि एकदा का हे सगळ त्याला मिळाल की? की मग, तो नुसता त्या पैशाचा आणि सत्तेचा उपभोग घ्यायला लागतो. त्याची सगळी हाव पुरी करतो. त्याला गोऱ्या माणसाची उंची दारू मिळवायचे मार्ग सापडतात. तो हजारोंच्या जमावाला भाषणं देतो; त्यांच्या टाळ्यांच्या गर्जना ऐकतो. काहींना वाटत, आपल्याकडे सत्ता आली की आपण गोऱ्या माणसावर सूड उगवू. आणि ही लालसा भ्रष्ट आहे, म्हणून आपण भ्रष्ट आहोत, म्हणून ह्या सत्तेमध्ये आत्मा नाहीय. पण गोऱ्या माणसाला सत्तेमागच हे सत्य समजत नाही; म्हणून ती आपल्याला मिळेल ह्याची त्यांना भिती वाटते.
जणू आपलेच विचार पडताळून बघत असावेत, असे ते थांबले. हं, सत्तेच ते खरच आहे. पण एकाच गोष्टीमध्ये संपूर्ण शक्ती असते, ती म्हणजे प्रेम. कारण जेव्हा मनुष्य प्रेम करतो, तेव्हा त्याला सत्ता गाजवायची नसते; म्हणूनच त्याच्याकडे शक्ती असते. ह्या आपल्या देशाला आता एकच आशा आहे - की गोरे आणि काळे, पैशाचा आणि सत्तेचा लोभ सोडून, देशाच्या भल्यासाठी काम करायला एकत्र येतील.
ते काही काळ गंभीर आणि स्तब्ध होते. मग खेदानी म्हणाले - माझ्या काळजात एक मोठी भिती आहे, की गोरे जेव्हा प्रेमानी वागायला शिकतील, तोपर्यंत आपण द्वेषाकडे वळलोय हे त्यांना जाणवेल.
- असो. डूर्नफॉन्टीनकडे पोचायचा हा काही मार्ग नव्हे. चला; आपल्याला निघायला हव.
आणि त्यांच्या गंभीर आणि दु:खद शब्दांच वजन खांद्यावर घेऊन कुमालो मूकपणी त्यांच्या मागून चालू लागले.
डूर्नफॉन्टीनमधला गोरा मनुष्य त्यांच्याशी आस्थेनी बोलला, पण त्यांच काम काही झाल नाही. गोऱ्या माणसांशी कस बोलून काम करून घ्यायचं सिमांगुला चांगलंच अवगत होत, आणि त्यांनी बरेच खटाटोप केलेही. पण शेवटी त्यांना कळल, की अब्सलम कुमालो जवळजवळ वर्षापूर्वीच सोडून गेला होता. तिथल्या एकाला आठवल, की अब्सलमची ध्लामिनी नावाच्या एका माणसाबरोबर थोडी घसट होती. मग ध्लामिनीला कामावरून बोलावून घेतलं. तो म्हणाला, त्याच्या शेवटच्या माहितीनुसार अब्सलम सोफियाटाऊन मध्ये एंड स्ट्रीट वरती, दलेला नावाच्या बाईंकडे भाड्यानी रहात होता. म्हणाला, खात्री नाही, पण मला वाटत १०५ नंबर होता घराचा.
ते परत सोफियाटाऊन मध्ये आले, आणि खरच १०५ एंड स्ट्रीटवरती दलेला बाईंच घरही शोधून काढलं. तिनी त्यांच प्रेमानी स्वागत केल. तिची मुलं तिच्या स्कर्टच्याआडून आलेल्या पाहुण्यांकडे टकमक बघत होती. अब्सलम तिथे नसतो, ती म्हणाली. पण थांबा हं; त्याच एक पत्र आलं होत, त्याच्या राहिलेल्या सामानाबद्दल. कुमालो तिच्या मुलांशी खेळत होते, आणि सिमांगु तिच्या नवऱ्याशी बोलत होता; तेवढ्यात ती कागदपत्रांचा मोठा खोका घेऊन आली आणि त्यात ते पत्र शोधत राहिली. ती शोधत असताना सिमान्गुनी तिचा प्रेमळ आणि थकलेला चेहरा टिपला; एक क्षण थांबून कुमालोंच्याकडे कुतूहलानी आणि सहानुभूतिनी तिला बघताना टिपलं. शेवटी एकदा तिला ते पत्र मिळाल; तिनी त्यांना पत्ता दाखवला - मिसेस म्कीझे, ७९ ट्वेंटी थर्ड अव्हेन्यू, अलेक्झांड्रा.
मग त्यांना एक कप चहा प्यायचा आग्रह झाला, आणि निघायला उठेपर्यंत काळोख झाला. तिचा नवरा कुमालोंबरोबर निरोप घ्यायला बाहेर रस्त्यापर्यंत आला.
- तुम्ही माझ्या मित्राकडे एवढ्या सहानुभूतिनी का बघितलंत? सिमान्गुनी त्या बाईला विचारलं.
तिची नजर झुकली, मग पुन्हा नजर वर करून त्याच्याकडे बघत ती म्हणाली, ते उम्फुन्डीस आहेत ना?
तिची नजर झुकली, मग पुन्हा नजर वर करून त्याच्याकडे बघत ती म्हणाली, ते उम्फुन्डीस आहेत ना?
- हो.
- मला त्यांच्या मुलाचे मित्र आवडत नव्हते, माझ्या नवऱ्यालाही. म्हणून तो सोडून गेला.
- आल लक्षात. पण, त्यापेक्षाही जास्त काही वाईट जाणवलं का तुम्हाला?
- नाही, मी प्रत्यक्ष बघितलं नाही काही. पण मला ते मित्र काही चांगले वाटले नाहीत.
तिचा चेहरा प्रामाणिक आणि मोकळा वाटला; ह्यावेळी तिची नजरही झुकली नव्हती.
- गुड नाईट, बाई.
- गुड नाईट उम्फुन्डीस.
बाहेर येउन त्यांनी तिच्या नवऱ्याचा निरोप घेतला, आणि मिशन हाउस मध्ये परत जायला निघाले.
- उद्या आपण अलेक्झांड्राला जायचं.
कुमालोंनी त्यांच्या मित्राच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाले, जोहानसबर्गला मी ज्या कारणांसाठी आलो, ती काही आनंदाची गोष्ट नव्हती. पण इथे येउन, तुमच्या सहवासात मात्र मला खूप आनंदच लाभलाय.
- हुं:! चला चला आपल्याला घाई आहे, नाहीतर जेवण चुकेल.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...