भाषांतर - ८

दुसऱ्या दिवशी सकाळी, मिशन हाउस मध्ये नाश्ता करून, सिमान्गु आणि कुमालो बस पकडण्यासाठी हमरस्त्याच्या दिशेनी निघाले.
-    इथल्या सगळ्याच बसेस बरोबर असतात, बर का - सिमान्गु म्हणाला.
कुमालोंना हसू आलं, चुकीची बस घेण्याच्या त्यांच्या भीतीच्या ह्या थट्टेबद्दल.
-    ह्या सगळ्या बसेस जोहानसबर्गलाच जातात, सिमान्गु म्हणाला. चुकीची बस घ्यायची काळजी नको तुम्हाला.
त्यांनी आलेली पहिलीच बस घेतली. कुमालोंचा पौंड जिथे चोरला होता, त्याच ठिकाणी त्या बसनी त्यांना नेउन सोडलं. गाड्या, बसेस आणि माणसांनी भरून वहात असलेल्या रस्त्यांवरून चालत चालत, ते अलेक्झाण्ड्राला जायच्या बस स्टॉपला पोचले. इथे एक नवीनच अनपेक्षित अडथळा त्यांच्या मार्गात आला. एक मनुष्य त्यांच्या जवळ येउन सिमान्गुला म्हणाला, उम्फुन्डीस, तुम्हाला अलेक्झाण्ड्राला जायचय का?
-    होय.
-    आम्ही तुम्हाला थांबवणार आहोत. बळजबरीनी नव्हे, बर - त्याने हाताच्या खुणेने दाखवलं - त्याची काळजी घ्यायला पोलिस आहेतच तिथे. तुम्ही जर ही बस घेतलीत, तर काळ्या जनतेचा लढा मात्र थोडा कमकुवत कराल. भाडं पुन्हा चार-पेन्सवर आणेपर्यंत ह्या बसेसवर बहिष्कार घालायचा असा आमचा आग्रह आहे.
-    अरे हो, खरच. मी ऐकल होत त्याबद्दल.
तो कुमालोंकडे वळला.
-    दोस्त, माझा मूर्खपणा. मी साफ विसरून गेलो की बसेस चालू नाहीयेत, म्हणजे, बसेसचा संप आहे.
-    आपल काम फार महत्वाच आहे, कुमालो दीनपणे म्हणाले.
-    हा बहिष्कार सुद्धा महत्वाचा आहे, तो मनुष्य नम्रपणे म्हणाला. त्यांनी भाडं सहा पेन्स केलय, म्हणजे दिवसाला शिलिंग. आठवड्याला सहा शिलिंग. आणि आपल्यातल्या बऱ्याच जणांना मुळात मिळतातच पस्तीस किंवा चाळीस शिलिंग.
-    चालायला फार लांब आहे का, कुमालोंनी विचारलं.
-    लांब तर आहे उम्फुन्डीस, अकरा मैल.
-    एका म्हाताऱ्याच्या दृष्टीनी खूपच लांब आहे ते.
-    तुमच्याच वयाचे पुरुष हे रोज करताहेत, उम्फुन्डीस. आणि बायका, त्यातले काही आजारी आहेत, अपंग आहेत, आणि मुलं सुद्धा. पहाटे चार वाजता चालायला सुरुवात करतात, आणि रात्री आठ आणि नऊपर्यंत परतत नाहीत. एक चतकोर पोटात ढकलतात, अंथरुणावर त्यांचे डोळे जेमतेम मिटतात तोवर पुन्हा उठायची वेळ होते. कित्येकदा, पोटात पाण्याशिवाय काही न भरता पुन्हा चालायला लागतात. मी तुम्हाला बस घ्यायला रोखू शकत नाही, पण हा लढा लढण महत्वाच आहे. इथे जर आपण माघार घेतली, तर उद्या सोफियाटाऊन आणि क्लेअरमॉंट आणि क्लिपटाऊन आणि पिमव्हिल मधल्या लोकांना आणखी जास्त पैसे द्यावे लागतील.
-    आलं लक्षात माझ्या. नाही घेणार आम्ही ही बस.
त्या माणसाने त्यांचे आभार मानले, आणि दुसऱ्या एका भावी प्रवाशाच मन वळवायला गेला.
-    ह्या माणसाच्या बोलण्यात मोठी मिठास आहे, कुमालो म्हणाले.
-    हेच ते सुप्रसिद्ध दुबुला, सिमांगु शांतपणे म्हणाला. तुमच्या बंधूंचे, जॉनचे मित्र. लोक मात्र असं म्हणतात, माफ करा हं; की टॉम्लिन्सनकडे डोक आहे आणि तुमच्या भावाकडे आवाज. पण ह्या माणसाकडे हृदय आहे. सरकारला जर कोणा एका माणसाची भिती असेल तर ती ह्याची आहे; कारण ह्याला कोणाची भिती नाही. त्यांना स्वतःसाठी काहीच नकोय. स्वतःच्या नोकरीवर पाणी सोडून ते हे बसचं पिकेटिंग करतात, त्यांची बायको इथल्या दुसऱ्या स्टॉपवर पिकेटिंग करते.
-    खरच, अगदी अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. हे जोहानसबर्ग म्हणजे एक अद्भुत शहर आहे.
-    हे खरे चर्चमध्ये जाणारे लोक होते, सिमान्गु खेदाने म्हणाला, पण आता नाहीत. तुमच्या भावाप्रमाणे हे देखील म्हणतात, चर्चची वक्तव्य मोठी छान असतात, पण कृती काहीच नसते. असो, दोस्त; आता आपण काय करायचं?
-    माझी तयारी आहे चालायची.
-    अकरा मैल, आणि परतीचे अकरा मैल. चांगली लांबची पायपीट आहे हं.
-    माझी तयारी आहे. तुमच्या लक्षात आलं असेलच, मला काळजी आहे. हे जोहानसबर्ग, माझ्या पोरानी एकट्यानी रहाण्याची जागा नाहीय ही.
-    ठीक आहे, चला तर मग.
आणि ते चालायला लागले. कित्येक मैल. युरोपिअन शहरातून, ट्विस्ट स्ट्रीट वरून क्लारेन्डन सर्कल पर्यंत. लुइस बोथा स्ट्रीट वरून ऑरेंज ग्रोव्ह पर्यंत. रस्त्यांच्या दोन्ही बाजूनी जाणाऱ्या गाड्या आणि ट्रकांना अंतच नव्हता. बऱ्याच वेळानंतर एक गाडी त्यांच्या शेजारी थांबली, आणि एक गोरा त्यांच्याशी बोलू लागला.
-    कुठे निघालाय तुम्ही दोघ, त्याने विचारलं.
-    साहेब, अलेक्झाण्ड्राला; सिमान्गु डोक्यावरची हॅट काढून म्हणाला.
-    वाटलंच मला; बसा गाडीत.
ही त्यांना फारच मोठी मदत होती; आणि अलेक्झाण्ड्रामध्ये शिरताना त्यांनी त्याचे आभार मानले.
-    फार लांबचा प्रवास आहे हा, तो गोरा म्हणाला. आणि मला माहिती आहे तुमच्या लोकांच्या बसेस बंद आहेत.
तो निघून जाईल म्हणून ते थांबून राहिले; पण तो पुढे नाही गेला. त्याने गाडी वळवली आणि पुन्हा जोहानसबर्गच्या रस्त्याला लागला.
-    हुं:, सिमान्गु म्हणाला, थक्क करणारी गोष्ट आहे ही!
अजून ट्वेंटी थर्ड अव्हेन्यू बराच दूर होता. ते एकामागून एक अव्हेन्यू ओलांडून जात असताना, सिमान्गु त्यांना समजावून देत होता. अलेक्झाण्ड्रा तसं जोहानसबर्गच्या हद्दीच्या बाहेर येत. इथे काळ्यांना जमीन किंवा घर घ्यायची परवानगी होती. पण रस्त्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष होत, दिवे नव्हते. राहत्या जागेची टंचाई एवढी प्रचंड होती, की ज्या कुणाला जरा सुद्धा शक्य होत त्यांनी आपल्या आवारात आणखी खोल्या बांधून त्या भाड्यानी दिल्या होत्या. ह्यातल्या बऱ्याच खोल्या म्हणजे चोर लुटारूंचे अड्डे होते. वेश्याव्यवसाय आणि हातभट्टीचे गुत्ते जोरदार चालले होते.
-    हे सगळ एवढ भयानक आहे, की ऑरेंज ग्रोव्ह आणि नॉरवुड आणि हायलँड नॉर्थ च्या गोऱ्या लोकांनी मिळून ही सबंध वस्तीच नष्ट करण्यासाठी अर्ज केला. आपल्यातल्या एका तरुण पोराने इथे एका म्हाताऱ्या गोऱ्या बाईची पर्स हिसकावली. ती बिचारी तिथेच रस्त्यात पडून नुसत्या धक्क्याने आणि भीतीने गेली. आणखी एक भयानक गोष्ट म्हणजे, इथून जवळच एक गोरी बाई घरात एकटी राहत होती. तिनी आपल्यातल्या काही पोरांना थोडा विरोध केला म्हणून त्यांनी तिला मारूनच टाकल. कधी कधी काही गोरे पुरुष आणि बाया, ह्या प्रिटोरिया रोडवर झाडीमध्ये, काळोखात आपल्या गाड्यांमध्ये बसलेले असतात. आपली तरुण पोर त्यांना लुटतात आणि लुबाडतात, अगदी बायकांना सुद्धा. आता खर आहे, की त्या बायाही काही फार चांगल्या चालीच्या नसतात; पण त्याबद्दल तर आपल्याला बोलायचही धाडस नाही.
-    त्यावरून मला जोहानसबर्गच्या पलीकडच्या बाजूला घडलेली एक गोष्ट आठवली. माझा एक मित्र तिथे पोचेफस्ट्रून रोडवर एका स्वतंत्र घरात रहातो. एका थंडीतल्या रात्री, पहाटेच्याही खूप आधीच त्याच दार कोणीतरी ठोठावल. एक बाई होती, गोरी बाई, दार ठोठावत. अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या झालेल्या. कशीबशी ती स्वतःची लाज झाकायचा प्रयत्न करत होती. गारठून पार काळी-निळी पडली होती ती. एका गोऱ्या माणसाने तिची ही अवस्था केली होती. तिला गाडीत घेतलं, आणि स्वतःच समाधान झाल्यावर - का नव्हत झाल कोणास ठाऊक, मी काही तिथे नव्हतो - तिला गाडीतून त्या थंडीत रस्त्यात ढकलून दिल अश्या फाटक्या कपड्यानिशी, आणि गेला निघून जोहानसबर्गला. माझ्या मित्रानी आणि त्याच्या बायकोनी, तिला एक जुना ड्रेस आणि कोट दिला, चहाच आधण ठेवलं आणि तिला ब्लँकेटात गुंडाळल. त्यांची मुलं जागी झाली, प्रश्न विचारायला लागली. माझ्या मित्राने त्यांना गुपचूप झोपायला सांगितलं, आणि बघायला आत येऊ दिल नाही. मग तो काळोखात, थोड्या अंतरावर राहणाऱ्या एका गोऱ्या शेतकऱ्याकडे गेला. तिथले कुत्रे मोठे हिंस्त्र होते, आणि माझ्या मित्राला भिती वाटत होती, पण तसाच दार वाजवत राहिला. तो गोरा शेतकरी बाहेर आल्यावर, ह्याने त्याला सगळी भानगड समजावून सांगितली, ही असली गोष्ट गुपचूप निस्तरली तर बर हे पटवल. गोरा म्हणाला, ठीक आहे, मी येतो. त्याने त्याची गाडी काढली आणि ते दोघ परत माझ्या मित्राच्या घरी आले. त्या गोऱ्या बाईनी आभार म्हणून पैसे दिले असते, पण तिच्याकडे पैसेच नव्हते. माझ्या मित्राने आणि त्याच्या बायकोने सांगितलं, की पैशाचा प्रश्नच नाहीय. गोरा माणूस माझ्या मित्राला आफ्रिकान्समध्ये म्हणाला, अगदी दोन-दोनदा म्हणाला, तू फार चांगला काफिर आहेस. तो हेलावून गेला होता, आणि त्याला सुचले त्या शब्दात त्याने ते व्यक्त केल.
-    मीही हेलावून गेलो आहे.
-    हां तर मी तुम्हाला सांगत होतो त्या अर्जाबद्दल. आपले गोरे मित्र त्या अर्जाविरुद्ध झगडले. कारण त्यांच म्हणण होत, की अलेक्झाण्ड्रामधल्या वाईट गोष्टींपेक्षा चांगल्या गोष्टी एकंदरीत जास्त महत्वाच्या आहेत. प्रत्येकाला, स्वतःची आपली जागा असण, मुलं वाढवायला एक घर असण, आपल्या हक्काची जागा, ज्या मातीत आपला जन्म झालाय तिथे असण महत्वाच असत. प्रोफेसर हर्नल - गेले ते आता, ईश्वर शांती देवो त्यांना - आपल्या बाजूनी लढणारे मोठे झुंजार लढवय्ये होते. हुं:, खरच वाईट वाटत, तुम्हाला आता त्यांच भाषण ऐकायला मिळणार नाही कधी. कारण, टॉम्लिन्सनच डोक, तुमच्या भावाचा आवाज आणि दुबुलाच हृदय - सगळंच त्या एकट्या माणसाकडे होत. ते जेव्हा बोलायचे, एकही गोरा त्यांच्या विरुद्ध बोलू धजत नसे. मला अजून आठवतंय, ते जर म्हणाले, हे अस, ते तसं आणि ते त्या तिकडे पलीकडे - तर एका माणसाची छाती नसे, की त्याची परत उचल-साचल करायची. इंग्लिश काय किंवा आफ्रिकानेर काय, कोणाचीही प्राज्ञा नव्हती त्यांनी घातलेली घडी विस्कटायची.
त्याने रुमालाने त्याच तोंड पुसलं आणि म्हणाला, बरंच बोललो मी; अगदी आपण शोधत असलेल्या घराच्या दाराशी येईपर्यंत बोललो.
एका बाईनी दार उघडल. तिनी त्यांच स्वागत वगैरे काही केल नाही, आणि जेव्हा त्यांनी त्यांच्या येण्याच कारण सांगितलं, तेव्हा तर मोठ्या नाखुषीनीच तिनी त्यांना आत येऊ दिल.
-    तुम्ही म्हणताय तो मुलगा गेला इथून, मिसेस म्कीझे?
-    हो, कुठे गेला मला माहिती नाही.
-    कधी गेला?
-    झाले बरेच महिने. वर्ष उलटल बहुतेक.
-    आणि त्याच्याबरोबर एक मित्र होता?
-    हो, आणखी एक कुमालो. त्याच्या बाबांच्या भावाचा मुलगा. पण ते दोघे एकत्रच गेले.
-    आणि तुम्हाला माहिती नाही कुठे गेले ते?
-    ते बऱ्याच जागांबद्दल बोलायचे. पण तुम्हाला माहिती आहे ना ही तरुण पोर कस बोलतात.
-    एकंदर वागणूक कशी होती ह्या तरुण पोराची, अब्सलमची, कुमालोंनी विचारलं.
शंकाच नको तिच्या डोळ्यात भिती आहे. शंकाच नको त्यांच्या डोळ्यात भिती आहे. ह्या सबंध घरातच भिती आहे.
-    मी काही वेडवाकड बघितलं नाही.
-    पण काहीतरी चुकतंय तुम्हाला शंका आली?
-    काही चुकत नव्हत.
-    मग तुम्ही घाबरलेल्या का?
-    मी नाही घाबरल्येय.
-    मग तुम्ही थरथत कापता का आहात, सिमान्गुने विचारलं.
-    मला थंडी वाजत्येय.
तिनी त्याच्याकडे खत्रूडपणे स्थिर नजरेने बघितलं.
-    आभारी आहोत, सिमान्गु म्हणाला, जपून रहा.
-    जपून जा.
रस्त्यात आल्यावर कुमालो म्हणाले
-    काहीतरी धड नाहीय.
-    मान्य आहे मला दोस्त. आपल्या दोघांना बघून ती घाबरली असेल. अस करा, त्या मोठ्या रस्त्यावर डावीकडे वळा आणि उंचवटा चढून जा. तिथे खाण्याची दुकानं आहेत, तिथे थांबा, मी येतोच.
उरावर मोठा भार घेऊन तो म्हातारा गेला, सिमान्गु त्यांच्या मागे हळू हळू चालत होता, ते वळल्यावर तो मागे आला आणि परत त्या घराकडे गेला.
तिनी पूर्वीच्याच नाखुषीनी दार उघडल. आता थोडा विचार करायला वेळ मिळाल्यावर, तिची भीती कमी झाली होती आणि त्रागा वाढला होता.
-    हे बघा, मी पोलीसातला नाहीय. माझा पोलिसांशी काही संबंध नाही, आणि संबंध ठेवायची इच्छाही नाही. पण तिथे तो म्हातारा दु:खात आहे त्याचा मुलगा भेटत नाहीय म्हणून.
-    खरच, वाईट वाटत ना, ती म्हणाली, पण टाकणं टाकल्यासारख.
-    वाईट तर वाटतच, पण तुम्हाला मला जे सांगायचं नाहीय ते तुम्ही सांगेपर्यंत मी इथून हलणार नाहीय.
-    सांगण्यासारख माझ्याकडे काही नाहीय.
-    काही नाहीय, कारण तुम्हाला भिती वाटतेय. तुम्ही थंडीमुळे नाही थरथरत आहात.
-    हो, मग मी का थरथरतेय?
-    ते नाही मला माहिती, पण ते मी शोधून काढेपर्यंत मी इथून जाणार नाही. तेवढीच वेळ आली तर मी पोलिसात सुद्धा जाईन, कारण नाहीतर काय करणार.
-    एकट्या बाईशी अस वागण बरोबर नाही, ती वैतागून म्हणाली.
-    स्वतःच्या मुलाला शोधत असलेल्या म्हाताऱ्याशी अस वागणही बरोबर नाही.
-    मी घाबरलेय, ती म्हणाली.
-    तेही घाबरलेत, तुम्हाला दिसलं नाही ते घाबरलेत?
-    मी बघितलं, उम्फुन्डीस.
-    मग सांगा मला, काय प्रकारची रहाणी होती ह्या दोन तरुण पोरांची?
ती गप्पच आहे, तिच्या डोळ्यात भिती आहे आणि डोळ्याच्या काठाशी अश्रू. त्याच्या लक्षात आल की तिच मन बदलण कठीण आहे.
-    बघा, मी एक प्रिस्ट आहे. माझ्या शब्दावर विश्वास नाही तुमचा? ती गप्पच.
-    तुमच्याकडे बायबल आहे का?
-    आहे.
-    मग मी बायबलवर हात ठेऊन शपथ घेऊन सांगतो.
तरीही ती गप्प राहिली म्हणून तो पुन्हा म्हणाला, मी बायबल वर हात ठेऊन शपथ घेतो. तो सोडतच नाही बघितल्यावर, ती थोडी डळमळली आणि उठून आतल्या खोलीत गेली. थोड्या वेळानी एक बायबल घेऊन आली.
-    मी एक प्रिस्ट आहे. मी एकदा हो म्हटलं तर ते हो, आणि नाही म्हटलं तर नाही ठाम असत. पण तुमच्या इच्छेखातर, आणि तो म्हातारा घाबरलाय म्हणून, मी ह्या पुस्तकावर हात ठेवून तुम्हाला वचन देतो, की ह्या सगळ्यातून तुम्हाला काही त्रास निष्पन्न होणार नाही. आम्ही फक्त एका मुलाला शोधतो आहोत. देवाची शपथ.
-    तर, कसे काय राहत होते ते दोघ?
-    ते बऱ्याच गोष्टी इथे घेऊन यायचे उम्फुन्डीस, रात्रीच्या वाट्टेल त्या वेळेला. कपडे काय, घड्याळ काय, पैसे, खाण, आणि आणखी बरच काही.
-    ह्या कशावर कधी रक्ताचे डाग दिसले?
-    नाही, रक्त नाही बघितलं कधी.
-    चला, तेवढ तरी. फार नाही, पण तेवढ तरी. आणि सोडून का गेले ते?
-    मला माहिती नाही उम्फुन्डीस. पण मला वाटत ते पकडले जाणार होते.
-    आणि कधी गेले ते?
-    वर्षभरापूर्वी उम्फुन्डीस. मी खरच सांगतेय तुम्हाला!
-    ह्या पुस्तकावर हात ठेऊन तुम्ही शपथ घ्यायला तयार आहात, की तुम्हाला खरच माहिती नाही ते कुठे गेले?
ती पुस्तकासाठी हात पुढे करते, पण तो म्हणतो जाऊ द्या. तिचा निरोप घेतो, आणि त्याच्या मित्राला शोधायला घाईघाईनी निघतो. ती त्याला हाक मारून सांगते
-    इथल्या टॅक्सी ड्रायव्हर ह्लाबेनिशी त्यांची मैत्री होती. इथेच बस स्टॉप जवळ राहतो तो, कोणीही दाखवेल तुम्हाला.
-    आता मात्र तुमचा खरच आभारी आहे मी. जपून रहा, मिसेस म्कीझे.
खाण्याच्या दुकानांजवळ त्याला कुमालो भेटले. अतिशय उत्सुकतेनी त्यांनी विचारल, आणखी काही माहिती मिळाली?
-    त्याच्या एका मित्राबद्दल थोड समजल. पहिल्यांदा माझ खाण होऊ द्या, मग काढू आपण त्याला शोधून.
सिमान्गुच खाण झाल्यावर त्याने रस्त्यातल्या एका माणसाला विचारलं हलाबेनि कुठे भेटेल. तो काय कोपऱ्यावर त्याच्या टॅक्सीत बसलाय, त्या माणसाने सांगितलं. सिमान्गु टॅक्सीकडे गेला, आणि आत बसलेल्या माणसाला म्हणाला
-    काय आहे दोस्त, मला टॅक्सी भाड्याने हवी आहे, जोहानसबर्गला जायला. किती घेशील? मी आणि माझा एक मित्र आहोत.
-    उम्फुन्डीस, तुमाला म्हून... आकरा शिलिंग द्या आता.
-    बाप रे, एवढे पैसे?
-    आता दुसरी टाकशी घेतली तर त्यो न्हाय का घेनार पन्द्रा न्हाई तर इस?
-    माझ्या बरोबर एक थकलेला म्हातारा आहे, बर चल... देतो मी तुला अकरा शिलिंग.
तो इंजिन सुरु करायला लागला, पण सिमान्गुने त्याला थांबवलं. मी ऐकलय की अब्सलम कुमालो म्हणून एका तरुण मुलाला शोधायला तू मला मदत करू शकशील.
शंकाच नको, तो माणूस घाबरलाय. सिमान्गु त्याला पटकन धीर देतो,
-    हे बघ मी काही तुला त्रास देणार नाहीय. शब्द देतो मी तुला, मला स्वतःला झंझट नकोय, आणि तुला झंझट निर्माण करायचीही इच्छा नाहीय माझी. पण माझ्याबरोबर तो जो थकलेला म्हातारा आहे, तो त्या मुलाचा बाप आहे, आणि नाताळपासून त्याच्या शोधात आलाय इथे. जिथे जाऊ तिथे आम्हाला लोक आणखीच दुसरीकडे कुठे तरी पाठवताहेत. आणि तो म्हातारा फार काळजीत आहे.
-    हां, म्हाइति व्हता त्यो पोऱ्या माला.
-    आता कुठे आहे तो?
-    म्या आइकल त्यो तिकड ओर्ल्यान्डोला ग्येला आन झोपडपट्टीत रात व्हता. आता ह्येच्या उप्पर आपल्याला काय म्हाइति नाय बगा.
-    ओर्लँडो तर खूप मोठ आहे.
-    पन ती झोपडपट्टी काय त्येवढी म्होटी नाय. त्या पोऱ्याला शोधायाचा काम येवढा काय कठीन नाय. आन त्ये मुन्शीपालटीच्ये लोक असत्यात ना थित, त्ये समद्यांना वळकतात. त्येनला इचारा ना. 
-    हे बर बोललास. त्या म्युनिसिपालिटीच्या काही लोकांना मी ओळखतो. चल, घेतो आम्ही तुझी टॅक्सी.
त्यानी कुमालोंना बोलावलं, आणि सांगितलं की आपण टॅक्सीनी परत जायचय. दोघ बसले टॅक्सीमध्ये, आणि तो खटारा खाबडखुबड करत एकदाचा अॅलेक्झांड्राच्या बाहेर पडला आणि प्रिटोरिया ते जोहानसबर्गच्या मोठ्या हमरस्त्याला लागला. दिवस सरत आला होता आणि रस्त्यावर प्रचंड ट्राफिक होता. ह्या वेळी जोहानसबर्ग मध्ये येणाऱ्या आणि इथून जाणाऱ्या दोन्ही दिशांनी रहदारीचा महापूर असतो.
-    त्या सायकली बघितल्यात, ते अॅलेक्झांड्राला कामावरून घरी परतणारे हजारो लोक. आणि थोड्याच वेळात आपल्याला बसच्या बहिष्कारामुळे चालत जाणारे हजारो लोक दिसतील.
खरच, थोड्या वेळात त्यांना फुटपाथवरून चालणाऱ्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी दिसल्या. गर्दी एवढी होती, की कित्येक लोक चक्क रस्त्यावरून चालत होते, त्यामुळे वाहनांना जपून जाव लागत होत. त्यांनी ऐकल होत त्याप्रमाणेच त्यांना म्हातारे, थकलेले किंवा अपंग लोक सुद्धा चालताना दिसले – निर्धारानी! गेले काही आठवडे हे असच चालल होत. कित्येक गोरे लोक गाड्या थांबवून काळ्या लोकांना आत घेत होते, एवढ चालायला लागू नये म्हणून. एका सिग्नलपाशी ते थांबलेले असतांना एका पोलिसाला त्यांनी अशा एका गोऱ्या ड्रायव्हरशी बोलताना ऐकल. पोलिस गोऱ्याला विचारत होता, काळ्या लोकांना गाडीतून घेऊन जायला परवाना आहे का तुझ्याकडे. गोरा म्हणाला, पण मी पैसे घेत नाहीय त्याबद्दल. पोलिस म्हणाला, पण तू बसच्या रस्त्यावरून सवारी नेतो आहेस. मग न्या मला कोर्टात, तो गोरा म्हणाला. ह्यापुढच त्यांना ऐकता नाही आल, कारण दिवा हिरवा झाला आणि त्यांना पुढे जायला लागल.
-    मी ऐकलय हे, सिमान्गु म्हणाला. मी ऐकलय, की ते अस गाडीतून नेण्याची मदत करणाऱ्या गोऱ्यांना थांबवायला बघताहेत. त्यांना कोर्टात खेचायचीही त्यांची तयारी आहे.
आता काळोख पडायला लागला होता, पण रस्त्यावर अजूनही ह्या घरी परतणाऱ्या लोकांची दाटी होतीच. अजूनही गाड्या रस्त्यात थांबून लोकांना आत घेत होत्याच - विशेषतः म्हाताऱ्यांना, किंवा बायकांना किंवा अपंगांना. कुमालोंच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न हास्य होत - दुसऱ्या कुठच्या देशातल्या लोकांना नाही समजणार हे स्मितहास्य. एका काळ्या माणसाच्या चेहऱ्यावर, त्याच्याच वर्णाच्या एखाद्याला, गोऱ्या माणसाने चार-चौघात उघडपणे मदत करताना बघून उमटणारे हास्य. ही गोष्ट इतक्या सहजासहजी होत नसते. हे सगळ बघण्यामध्ये ते एवढे गर्क होते, की सिमान्गुला एकदम ओरडतांना ऐकून ते थक्कच झाले.
-    धन्य आहे! दोस्त, धन्य आहे.
-    काय धन्य आहे, हा गोऱ्यांचा चांगुलपणा?
-    छे छे, खर तर मी त्याचा विचारही करत नव्हतो.
तो टॅक्सी मध्ये नीट सरसावून बसला, आणि त्याने स्वतःची छाती जोरात ठोकली.
-    जा, मला कोर्टात घेऊन जा, तो म्हणाला. त्याने कुमालोंकडे धगधगत्या भेदक नजरेनी पाहिलं, परत छाती ठोकली आणि जोरात म्हणाला जा मला घेऊन कोर्टात.
कुमालो त्याच्याकडे भेदरून बघायला लागले.

-    धन्य आहे, केवळ धन्य! सिमान्गु म्हणाला.

Comments