सगळे रस्ते जोहानसबर्गलाच जाऊन मिळतात. तुम्ही गोरे असा का काळे; जोहानसबर्गलाच जाऊन पोचाल. पीक आलं नाही? कामं आहेत ना जोहानसबर्गमध्ये. कर चुकते करायचेत? कामं आहेत ना जोहानसबर्गमध्ये. आता उरलेल्या एवढ्याश्या शेताचे आणखी वाटे करणं शक्य नाही? मग काही जणांना जायला हवं जोहानसबर्गला. मुल होणारेय, आणि कोणाला समजायला नकोय? तेही होईल की जोहानसबर्गमध्ये.
काळे लोक जोहानसबर्गला, नाहीतर सोफियाटाऊन ला, नाहीतर ओर्लँडोला जातात; आणि रहायला एखादी खोली किंवा घराचा एखादा हिस्सा शोधतात.
- तुमच्याकडे भाड्याने द्यायला खोली आहे का हो?
- नाही, माझ्याकडे खोली नाही.

- ती गेली केव्हाच.

हो, आहे माझ्याकडे एक खोली; देऊ शकेन मी ती भाड्यानी, पण मला द्यायची नाहीय. माझ्याकडे दोनच खोल्या आहेत. आणि आम्ही आधीच सहाजण आहोत. माझी मुलं आणि मुली आता वाढत्या वयात आहेत. पण शाळेच्या पुस्तकांना पैसे लागतात, आणि माझा नवरा आजारी असतो. जेव्हा तो जरा बरा असतो, तेव्हासुद्धा त्याला फक्त पस्तीसच शिलिंग मिळतात आठवड्याला. सहा शिलिंग आमचं भाडं आहे, तीन शिलिंग रोजच्या बसच्या प्रवासाला लागतात. एक शिलिंग आमची क्रियाकर्म करण्यासाठी, मेल्यानंतर पुरायला तर पाहिजे ना! एक शिलिंग पुस्तकांना, जेमतेम तीन शिलिंग मध्ये कपड्यांचं भागवायचं. एक शिलिंग माझ्या नवऱ्याच्या दारूला, आणि एक विडीकाडीला; त्याबद्दल माझी काही तक्रार नाही, कारण एरवी तसा चांगला आहे तो. कुठे जुगार, नाहीतर बायकांवर तर नाही न उडवत पैसे मी म्हणते. एक शिलिंग चर्चला. आणि एक शिलिंग आजारपणासाठी लागला तर म्हणून. शिल्लक उरतात सतरा शिलिंग, सहा जणांचं जेवणखाण भागवायचं त्यात. आम्हाला नेहमी भूकच लागलेली असते. हो आहे एक खोली, पण मला द्यायची नाहीय… किती भाडं देऊ शकाल म्हणालात तुम्ही?
- आठवड्याला तीन शिलिंग देऊ शकेन मी.
- छे! शक्यच नाही!
- साडे-तीन.
- साडे-तीन, हं? आता असं आहे, प्रायव्हसीने काही पोट भरत नाही. वाढीच्या वयाची मुलं असताना थोड्या प्रायव्हसीची गरज असते; पण पोट तर भरत नाही ना त्यावर... बरं ठीक आहे, चालेल साडे-तीन शिलिंग.
घर मोडलं नाहीय, पण फुटेपर्यंत भरून गेलंय. दोन खोल्यात दहा लोक, आणि घरात यायचं जायचं दार एकच. झोपला असलात, तर तुमच्या अंगावरून ओलांडून लोकांनी ये-जा करायची. पण मुलांना थोडं जास्त खायला देता येईल ना! कदाचित महिन्याभरातून एखादा सिनेमा?
मला ही बया आवडत नाही. माझ्या नवऱ्याकडे ती ज्या नजरेने बघते, ते मला आवडत नाही. मला हा पोरगा आवडत नाही, तो माझ्या मुलीकडे जसं बघतो ते मला आवडत नाही. मला हा माणूस आवडत नाही, तो माझ्याकडे ज्या नजरेने बघतो ते मला आवडत नाही. तो माझ्या मुलीकडे ज्या नजरेने बघतो ते मला आवडत नाही.
- सॉरी, पण तुम्ही ही जागा खाली करा.
- पण मला रहायला कुठे जागा नाहीय हो.
- सॉरी, पण हे घर पार भरून गेलंय. एवढ्या लोकांना जागा नाहीय इथे.
- आम्ही नाव नोंदवलय जागेसाठी; ती मिळेपर्यंत थोडी सवड द्या ना.
- हुं:, इथे ओर्लँडोमध्ये लोक पाच पाच वर्ष थांबले आहेत जागेसाठी.
- पण माझ्या एका मित्राला महिन्याभरातच मिळाली जागा म्हणे.
- ऐकलंय मी; लाच दिली की होतात म्हणे असल्या गोष्टी.
- पण लाच द्यायला पैसे नाहीत हो माझ्याकडे.
- सॉरी, पण हे घर पार भरलंय आता.
खरं आहे ते, हे घर भरलंय, आणि ते घरही भरलंय. कारण प्रत्येकजण जोहानसबर्गमध्येच येतो आहे. ट्रांन्स्की, आणि फ्री स्टेट आणि झुलूलँड आणि सेकुकुनीलँड मधून. झुलू आणि स्वाझी, शंगान आणि बावेंडा, बापेडी आणि बासूटो, कोसा आणि टेंबू, पोन्डो आणि फिन्गो - सगळे सगळे येताहेत जोहानसबर्गला. मला नाही ही बया आवडत, मला नाही तो पोरगा आवडत, हा माणूस मला नाही आवडत. सॉरी, पण तुम्हाला जागा खाली करायलाच हवी.
- आणखी एकच आठवडा, एवढंच म्हणण आहे माझ.
- ठीक आहे, एक आठवडा.
* * *

हो, आहे माझ्याकडे एक खोली; देऊ शकेन मी ती भाड्यानी. पण मला द्यायची नाहीय. कारण मी बघितलंय बायांनी नवऱ्यांना फितवलेलं. आणि नवऱ्यांनी बायांना नादी लावलेलं. मी बघितलंय मुलांनी मुलींना नासवलेलं, आणि मुलींनी मुलांना फूस लावलेली. पण माझ्या नवऱ्याला आठवड्याला पस्तीसच शिलिंग मिळतात...
* * *
- मग करायचं तरी काय आम्ही, घरं नसलेल्यांनी.
- पाच वर्ष वाट बघा... आणि सुरुवातीपेक्षा जराही जवळ नसाल घर मिळवण्याच्या.
- नुसत्या ओर्लँडोमध्ये म्हणे, आमच्यासारखे दुसऱ्याच्या घरात भाड्यानी राहणारे दहा हजार आहेत.
- दुबुला काय म्हणाले ऐकलंत ना, इथे ओर्लँडोमध्ये आपणच आपली घरं उभारली पाहिजेत.
- आणि कुठे उभारणार ती?
- दुबुला म्हणतात, रेल्वेलाईनच्या बाजूला मोकळी जागा आहे ना, तिथे.
- आणि कशाची बांधायची घरं?
- जे हाताला लागेल त्यानी. गोणपाटाच्या पिशव्या, फळकुट, झावळ्या आणि बांबू.
- आणि पाऊस आला म्हणजे?
- हे भगवान, मग आपण मरायचं.
- नाही, पाऊस आला की त्यांना आपल्यासाठी घरं बांधायला लागतील.
- मूर्खपणा आहे हा सगळा. थंडीत काय करणार?
सहा वर्ष घरासाठी थांबायचं. आणि आधीच भरून गेलेली घरं आणखी भरून जाताहेत, कारण लोक तर जोहानसबर्गला येतच रहातात ना. तिकडे युरोपमध्ये आणि उत्तर आफ्रिकेमध्ये म्हणे मोठ्ठ युद्ध चाललंय, त्यामुळे कोणी नवीन घरच बांधत नाहीय.
- माझ्या घराचं काय झाल हो पुढे?
- अजून घर उपलब्ध नाही.
- माझ नाव तरी आहे का यादीमध्ये?
- हो, तुमच नाव आहे यादीमध्ये.
- काय नंबर आहे माझा?
- ते नाही मला सांगता येणार. पण तुमचा नंबर साधारण सहा हजार असेल.
यादीमध्ये सहा हजारावा नंबर. म्हणजे मला घर कधीच मिळणार नाहीय. आणि आत्ता राहतोय तिथे आम्ही काही फार काळ राहू शकणार नाही. आमची स्टोव्ह वरून भांडण झाली आहेत. आमची मुलांवरून भांडण झाली आहेत. आणि तो माणूस सारखा माझ्याकडे बघत असतो ते मला आवडत नाही. रेल्वे लाईनच्या बाजूला आहे खरी ती मोकळी जागा, पण थंडीत आणि पावसात काय करणार? म्हणे आम्ही तिथे जायला पाहिजे, सगळ्यांनी एकदम, आजपासून दोन आठवड्यांनी. फळकुट, गोणपाट, पत्रे आणि बांबू घ्यायचे आणि सगळ्यांनी एकदम जायचं. कमिटीला म्हणे आठवड्याला एक शिलिंग द्यायचा, म्हणजे ते आमचा कचरा साफ करतील आणि संडास बांधतील; म्हणजे घाण आणि रोगराई नको. पण थंडीचं आणि पावसाचं काय?
- माझ घर आहे का तयार?
- नाही, घर तयार नाहीय.
- पण मी तर दोन वर्ष वाट बघतेय.
- म्हणजे, ह्या लाइनीच्या हिशोबात कुक्कुल बाळच आहात तुम्ही.
- थोडे पैसे दिले तर काही होईल का हो काम खरच?
त्या माणसानी माझा प्रश्न ऐकला नाही वाटत, तो आधीच पुढच्या माणसाशी बोलायला लागला आहे. पण दुसराच कोणीतरी कुणास ठाऊक कुठून एकदम उगवतो; आणि तो काय बोलतो त्याने मी तर बुचकळ्यातच पडते.
- किती वाईट ना अजून घर तयार नाही, मिसेस सेमी. आणि हो, माझी बायको म्हणाली तिला त्या कमिटीच्या कामाबद्दल तुमच्याशी चर्चा करायची आहे. आज संध्याकाळी सात वाजता, म्हणाली. आमचा पत्ता माहिती आहेच तुम्हाला. नंबर १७८५२, डच रिफॉर्मड चर्चजवळ. हा बघा, मी पत्ता लिहून सुद्धा ठेवला तुमच्यासाठी. भेटू तर मग आपण, संध्याकाळी.
मी उत्तर द्यायला जाईपर्यंत तो निघून सुद्धा गेला होता.
- ओहो, पण ह्या माणसानी मला चकरावून टाकलाय. कोण कुठची त्याची बायको, मी काही तिला ओळखत नाही. आणि कसली ही कमिटी, मला नाही बाई माहिती कुठली कमिटी!
- ओहो, पण तुम्ही अगदीच साध्या आहात, बाई. तुम्ही घरासाठी जास्त पैसे देण्याबद्दल काही तरी म्हणालात ना, त्यासंबंधी पुढे बोलायचय त्याला.
अरेच्च्या, म्हणजे मी तिथे जाणं बर. फार नको मागू दे पैसे, देवा. आठवड्याच्या सदतीस शिलिंग मधून देणार तरी किती. पण जागा तर हवीच आहे आम्हाला. आता राहतोय तिथे मला तर बाई भितीच वाटते. सगळे सभ्य लोक झोपलेले असतात, तेव्हा कुठच्या भलत्या-सलत्यांची ये-जा चालू असते. तरुण पोरांची सारखी वर्दळ, झोपाच नसतात वाटत ह्यांना, आणि कामही. केवढे कपडे, चांगल्या प्रकारचे कपडे, गोऱ्या लोकांचे कपडे. काही तरी मोठी भानगड होणारे इथे एक दिवस; मी आणि माझा नवरा कधीही असल्या भानगडींमध्ये नव्हतो. छे, घर मिळवायलाच हव आम्हाला.
* * *
- पाच पौंड म्हणजे फार होतात हो. एवढे पैसे नाहीत आमच्याकडे.
- मिसेस सेमी, घराच्या पुढे पाच पौंड म्हणजे काहीच नाहीत.
- काय, नुसत यादीमध्ये माझ नाव वर सरकवायला?
- आहा, पण मोठ जोखमीच काम आहे ते. युरोपिअन मॅनेजरनी स्पष्ट हुकुम दिलाय कि यादीमध्ये फेर-फार करणाऱ्यांची तो अजिबात गय करणार नाही.
- सॉरी, पण एवढे पैसे द्यायला मला नाही जमणार.
मी निघायच्या आतच त्याची बायको दुसऱ्या एका बाईला घेऊन येते.
- अहो, तुम्ही काहीतरी गोंधळ केलात. ह्या बाईंना मी ओळखत सुद्धा नाही, त्या कमिटीवर नाहीयेत.
- अरेरे हो का, सॉरी हां मिसेस सेमी; मला वाटलं होत तुम्ही कमिटीवर आहात. जपून जा, बर का.
पण मी नाही म्हणत जपून रहा. काही पर्वा नाही मला ते जपून रहातात का नाही. आणि मी नाही जपून जाऊ शकत. मी थकलेय, मी एकटी आहे. अहो, कशाला हो आपण आपला तो गाव सोडून आलो? फार नव्हत तिथे, पण जे होत ते इथल्यापेक्षा चांगल होत. खायला खूप नव्हत तिथे, पण जे होत ते सगळीजण वाटून घेत होतो. सगळेच गरीब असले, की गरीब असण्याचही एवढ वाईट वाटत नाही. नदीकाठी कपडे धुतांना काय छान वाटायचं, छोट्याशा दगडांमधून खळाळत पाणी वाहायच, मधूनच वाऱ्याची थंड झुळूक यायची.
बराग्वनाथ हॉस्पिटल जवळ बिल्डर लोकांनी टाकून दिलेली फळकुट आहेत. चला, रात्री जाऊन आणूया ती. सुधारणा गृहाजवळ लोखंडाचे पत्रे पडलेले असतात, विटा झाकायला वापरतात ना, ते. चला, रात्री जाऊन ते आणूया. नॅन्सफील्ड स्टेशन जवळ गोणपाटाच्या पिशव्या असतात, अगदी छान ढिगारे रचून ठेवलेल्या असतात. चला, रात्री जाऊन त्या आणू या. क्राउन खाणींच्या जवळ बरीच झाडी आहे. चला, रात्री जाऊन थोडे बांबू घेऊन येऊ.
* * *
आज रात्री ओर्लँडोमध्ये सगळे कामात आहेत. प्रत्येक घरात दिवे जळताहेत. मी लोखंडाचे पत्रे घेऊन जातो. आणि अग ए, तू बाळाला घेऊन ये. थोरल्या, तू ते दोन बांबू आण आणि लहान्या, तू जमतील तेवढ्या पिशव्या आण. चला चला त्या रेल्वे लाईनच्या बाजूच्या पटांगणामध्ये. बरेचसे लोक गेलेच आहेत एव्हाना तिथे. खोदण्याचे आणि ठाकठोकीचे आवाज येतातच आहेत. बर तर बर, आज रात्री थंडी नाहीय, आणि पाऊस सुद्धा नाही. थँक्यू मिस्टर दुबुला, आवडली आम्हाला ही जागा. थँक्यू मिस्टर दुबुला, हा घ्या आमच्या कमिटीच्या फीचा एक शिलिंग.
रातोरात शांती नगर उभ राहिलंय. लोकांना काय आश्चर्य वाटतंय सकाळी उठल्यावर! काही घरातून धूर येतोय, आणि एक-दोघांनी चिमणी सुद्धा करून घेतलीय. काल तिथे क्लिपटाऊन पोलिसस्टेशन जवळ खर तर काय छान पाईप होता चिमणीसाठी; पण तो घेण्याएवढी मूर्ख नव्हते मी. शांती नगर रातोरात उभ राहिलंय. आणि वर्तमानपत्रं आमच्या बातम्यांनी भरून गेली आहेत. मोठ्ठाले शब्द आणि फोटो. तो बघ, तो बघ माझा नवरा; आमच्या घराच्या बाजूला उभा आहे. शी: बाई! मी नेमकी थोडी उशिरा पोचले फोटो काढून झाल्यावर. घूसखोर म्हणतात आम्हाला. आहोतच आम्ही घूसखोर. पण काय मस्त आहे आमच हे गाव, गोणपाटाच आणि फळकुटांच आणि लोखंडी पत्र्यांच. भाडं-बिड काही नाही, नुसता कमिटीला एक शिलिंग द्यायचा.
रातोरात शांती नगर उभ राहिलंय. ही मुलगी फार ढसाढसा खोकतेय, आणि अंग निखाऱ्यासारख फुलून आलंय तापानी. तिला घेऊन जायची मला भिती वाटतेय, पण आज रात्रीच तर जायला हव. त्या गोणपाटामधून गार वारं येतंय. पाऊस आला की काय करणार आम्ही, आणि थंडी पडली की? उगी उगी हं बाळ माझी, आई आहे ना सोबतीला. उगी उगी बाळ, खोकू नको हं; आई आहे ना सोबतीला.
* * *
ती मुलगी फार खोकते आहे, आणि तिच अंग ज्वाळेसारख धगधगतय. उगी उगी हं बाळ, आई आहे ना. बाहेरून हसण्याचे, चेष्टामस्करीचे, खोदाखोदीचे आणि ठाकठोकीचे आवाज येताहेत. परक्या भाषांमध्ये लोक ओरडून काही तरी बोलताहेत. उगी उगी हं बाळ, तुझ्या आजी-आजोबांचा गाव किनई खूप खूप सुंदर आहे बर का. आणि छोट्याशा दगडांवरून झरा कशी मंजुळ गाणी गातो माहित्येय का. वाऱ्याची मस्तपैकी झुळूक येते. मग गाईगुरं येतात पाण्यासाठी, आणि झाडांच्या सावलीत नुसती उभी रहातात. उगी उगी हं बाळ. देवा, शांत कर रे हिला. देवा, दया कर आमच्यावर. येशु ख्रिस्ता, दया कर आमच्यावर. गोऱ्या माणसा, दया कर आमच्यावर.
* * *
- मिस्टर दुबुला, डॉक्टर कुठे आहे?
- सकाळी आपण आणूच डॉक्टरला. काळजी करू नका, कमिटी बघेल त्याच्या पैशांचं.
- पण ही मुलगी सकाळपर्यंत राहील का नाही, अशी परिस्थिती आहे हो. हे रक्त बघितलंत?
- पहाट काही आता दूर नाही.
- अहो तिच्या ह्या परिस्थितीत फार दूर आहे हो ती. माझ्या धडधडत्या काळजासाठी फार दूर आहे हो ती. आत्ता लगेच नाही का आणू शकणार डॉक्टरला?
- मी बघतो आई. मी आत्ता जाऊन बघतो, जमल तर.
- कशी उतराई होऊ हो मी तुमची!
* * *
बाहेर शेकोटीभोवती गाण चाललंय, आफ्रिकेच राष्ट्रगीत म्हणताहेत 'परमेश्वरा, आफ्रिकेच रक्षण कर'. परमेश्वरा, आफ्रिकेच्या ह्या माझ्या एकुलत्या एका तुकड्याच रक्षण कर. हा माझ्या काळजाचा तुकडा, ज्याला मोठ्या कष्टानी मी जन्म दिला, माझ्या अंगावर पाजलं, माझ्या जिवापलीकडे ज्याच्यावर प्रेम केल, कारण बायकांचा स्वभावच तसा असतो. जो जो रे बाळ, जो जो; शांत झोप हं. अहो डॉक्टरसाहेब, नाही का येऊ शकत तुम्ही पटकन?
* * *
- मी डॉक्टरला आणायला माणसं पाठवली आहेत आई. कमिटीनी खास गाडी पाठवली आहे. आपल्यातलाच काळा डॉक्टर आहे.
- खूप खूप आभारी आहे मी तुमची.
- मी त्यांना बाहेर शांत रहायला सांगू का?
- नाही ठीक आहे, तिला काही कळत नाहीच आहे.
कदाचित गोरा डॉक्टर जास्त बरा ठरला असता; पण कुठचा का होईना, एकदाचा येऊ दे डॉक्टर. काही फरक पडणारेय का, हे बाहेरचे परक्या देशातले अनोळखी आवाज गप्प होऊन? अहो, मला भिती वाटतेय हो. हिच अंग बघा ना कस जळतय नुसत.
* * *
आता डॉक्टरची काही आवश्यकता उरली नाहीय. गोरा काय आणि काळा काय, कुठचाच डॉक्टर आता मदत नाही करू शकणारे. ओरे माझ्या बाळा, माझ्या गर्भातून आलेल्या, माझ्या स्वप्नांच्या फुला. काय सुख होत तुझ्या इवल्याशा गालांचे गालगुच्चे घेताना, काय सुख होतं त्या छोटुश्या बोटांमध्ये माझी बोटं अडकवतांना, काय सुख होतं त्या इवलाल्या ओठांना माझ्या स्तनांमधून पाजतांना. बायकांचं हे असंच असतं. बायकांचं दैवच हे अस, उरात बाळगायचं, ओझ वाहायच, काळजी करायची आणि गमावून बसायचं.
* * *
गोरे लोक आलेत शांती नगरामध्ये. ते आमचे फोटो घेताहेत. आणि हलती चित्र सुद्धा, सिनेमात दाखवायला. ते येतात आणि बुचकळ्यात पडतात, काय करता येईल म्हणून. आम्ही एवढे सगळेजण आहोत ना. पाऊस आला की काय बर करतील बिच्चारे. थंडी पडली की काय बर करतील बिच्चारे. लोकं येतात, मशीन आणतात. आमच्यासाठी कच्ची घरं बांधायला. ते दुबुला म्हणजे ना अतिशय हुशार मनुष्य बघा, हे अस होणार त्यांनी सांगितलंच होत. ही घरं बांधायला सुरुवात झाल्याबरोब्बर आणखी काळे लोक येतात - पिमव्हिल आणि अॅलेक्झांड्रा आणि सोफियाटाऊन मधून. ते त्यांची घरं उभारतात गोणपाटाची आणि झावळ्यांची आणि लोखंडी पत्र्यांची. मग गोरे लोक परत येतात - आता रागावून, दयाबुद्धीनी नव्हे. पोलिस येउन सगळ्यांना हाकलून देतात. हाकलून दिलेल्यापैकी काही इथले ओर्लँडोमधलेच आहेत. ज्या जागा सोडून ते इथे आले होते, तिथे परत जातात. पण आता त्या जागा गेल्या. आता कित्येकांना त्या परत मिळणार नाहीत.
शांती नगरमध्ये रहायची लाज नको वाटायला. सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आहे ना त्याचा उल्लेख, तो काय माझा नवरा, आमच्या घराशेजारी उभा. इथल्या एकानी दर्बनमधल वर्तमानपत्र आणलं होत, त्यात सुद्धा होता माझा नवरा, आमच्या घराशेजारी उभा. कोणालाही तुमचा पत्ता शांती नगर असा द्यायचा, सगळ्यांना माहिती आहे ते. आणि कमिटीनी दिलेला तो नंबर सांगायचा, की झाल.
पाऊस आला की काय करणार? आणि थंडीमध्ये? आत्ताच सगळे जण म्हणताहेत, ती तिथे टेकडीवर घरं आहेत ना, पुरी नाही झालीत बांधून, पण छप्पर तर आहे ना. एखाद रात्री आम्ही सगळीजण तिथे जाऊ, वारा-पाऊस आला, तर छप्पर तरी असेल डोक्यावर.

Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...