भाषांतर - १०

शांती नगर मध्ये घेऊन जायला सिमान्गु येणार होता. त्याची वाट बघत असतांना, कुमालो गर्ट्रूड आणि तिच्या मुलाबरोबर वेळ घालवत होते. खर म्हणजे त्या छोट्या गप्पगप्प शांत मुलाबरोबर. कारण, त्यांच्या ह्या बहिणीचा जन्म झाला तेव्हा ते चांगले विशीत होते, त्यामुळे त्या दोघांच्यात फारशी जवळीक नव्हती. आणि शेवटी काही झाल तरी ते, केस पिकत आलेले पाद्रीबाबा होते, शांत, गंभीर आणि बहुतेक कंटाळवाणे; आणि ती मात्र चांगलीच तरुण होती अजूनही. पुन्हा, इथे जोहानसबर्गमधल्या गोष्टींची सखोल चर्चा वगैरे काही त्या दोघात शक्यच नव्हती. कारण, त्यांना चकरावून टाकणाऱ्या आणि दु:खदायक गोष्टींमध्ये तर तिच इथल आयुष्य आणि व्यवसाय गेला होता.
ह्या गोष्टी समजायला कठीण होत्या खऱ्या, विशेषतः गावातल्या पाचव्या यत्तेच्या पलीकडे गेलेल्या बाईच्या दृष्टीनी. ती त्यांचा मान राखायची, एक मोठा भाऊ आणि पाद्रीबाबा म्हणून ते अपेक्षितच होत. त्यांच्या मध्ये ठराविक जुजबी संभाषण होत, पण ज्या कारणांनी ती जमिनीवर कोसळून ढसाढसा रडली-ओरडली होती, त्या गोष्टींचा त्या दोघांमध्ये परत चुकूनही उल्लेख सुद्धा झाला नाही.
आणि लिथबी बाई होत्या ते चांगलंच झालं. त्या आणि गर्ट्रूड तासन तास एकमेकींशी बायकांच्या मनातल्या साध्या साध्या गोष्टी बोलत बसत. घरातली कामं करतांना छान पैकी गाणी म्हणत, एकदुसरीला मदत करत. हो! त्या लहान गंभीरश्या मुलाशी खेळण्यातच ते रममाण व्हायचे. त्यांनी त्याला सस्त्यातले लाकडी ठोकळे आणले होते खेळायला. तोही त्यांच्याशी कितीही वेळ अगदी एकाग्रतेनी खेळत बसायचा. त्याला त्यात काय एवढ आवडायचं ते मोठ्या माणसांना कधीच समजणार नाही. कुमालो त्याला उचलून घ्यायचे आणि त्याच्या सदऱ्याच्या आतून त्याच्या छोट्याश्या पाठीवर बोटं फिरवायचे, त्याला गुदगुल्या करायचे. मग त्याच्या त्या शांत चेहऱ्यावर हसू फुटायचं, आणि हळूहळू तो खदखदुन हसायला लागायचा. किंवा कधीकधी ते त्याचा जन्म झाला त्या सुंदर खोऱ्याच्या, तिथल्या डोंगर आणि नद्यांच्या गोष्टी सांगायचे, तो कुठच्या शाळेत जाणार आहे ते सांगायचे. इंडॉटशनीतल्या डोंगर माथ्यावर कस धुकं तरळत असत त्याच्या गोष्टी सांगायचे. त्या मुलाला ह्यातलं काही समजत नसे. आणि तरीही काहीतरी समजत असावं, कारण तो ती मोठमोठाली गोड नावं कान देऊन ऐकत राहायचा, आणि मोठ्ठाले डोळे विस्फारून मामाकडे बघत बसायचा. आणि मामांना ह्यांनी भारी आनंद व्हायचा. कारण ह्या अजस्त्र शहरामध्ये त्यांना घराची फार आठवण येत असे, आणि ह्या गप्पा गोष्टींमधून त्यांचा जीव अगदी आतून सुखावत असे. कधी कधी गर्ट्रूड त्यांचा आवाज ऐकून दाराशी येउन गप्पपणे ऐकत रहायची - तिचा जन्म झाला होता त्या गावातल्या सुंदर सुंदर गोष्टी. त्यांना आणखीच आनंद व्हायचा, मग ते तिला विचारत, 'तुला आठवत?' आणि ती म्हणे 'हो, आठवत' - त्यांनी तिला विचारलं ह्याच आनंदात!
पण कधी कधी, ह्या सगळ्या आनंदाच्या मध्येच, त्यांच्या मुलाचे विचार त्यांच्या डोक्यात येत. आणि क्षणार्धात, त्या लांब लांब गोड नावांच्या टेकड्या निर्दयी सूर्याच्या तळपत्या उन्हात, एकाकी आणि निष्पर्ण वाटायला लागायच्या. झरे वाहायचे थांबायचे. गाई-गुरं रोडावायची आणि मूकपणे तांबड्या भडक वांझ जमिनीवर इतस्ततः फिरायची. गाव म्हाताऱ्या-कोताऱ्यांचा, बाया-बापड्यांचा आणि लहान मुलांचा व्हायचा - जणू प्रत्येक घरातून काही तरी नष्ट झाल असावं. त्यांचा आवाज विरत जात असे, आणि खाली होत होत बंद पडे. ते गप्प होऊन विचारात बुडून जात. कदाचित त्यांच्या गप्प होण्याने, किंवा कदाचित त्यांची मुलाच्या हातावरची पकड फार गच्च झाल्याने, तो मुलगा त्याच्या तंद्रीमधून बाहेर यायचा आणि त्यांच्या कडेवरून सोडवून घेऊन खाली जमिनीवर ठोकळ्यांशी परत खेळायला लागे. जणू काही ह्या अनाहूत आलेल्या दु:खावर उतारा म्हणून त्यांना बायकोची आठवण यायची, गावामधल्या त्यांच्या अनेक मित्रांची आठवण यायची. टेकडी वरून खाली धावत येणारी, शाळेला निघालेली, दाट धुक्यामधूनच अचानक साकार झाल्यासारखी भासणारी लहान मुलं आठवायची. ह्या आठवणी एवढ्या प्रिय होत्या त्यांना, की त्यांना त्या दु:खाचा विसर पडे, आणि जीवाला थोडीतरी शांती मिळे.
खरच, कोणाला समजलंय ह्या जीवनाच्या प्रवासाचं गूढ? खरच, कोणाला समजलंय ह्या एकाकी जगामध्ये सुद्धा थोड तरी सुख मिळू शकण्याच प्रयोजन? ईश्वराची कृपाच म्हणायची, की एखाद्या प्रेमळ साथीदाराच्या नुसत्या आठवणींनी मनाला उभारी येते, एवढ्या दु:खात सुद्धा एखाद्या लहानग्याशी खेळून मन रिझवता येत. ईश्वराची कृपाच म्हणायची, की एखाद्या टेकडीच्या नावातूनच गाणं गुणगुणत असत, एखाद्या नदीच्या नामोल्लेखानीच सगळे आजार पळून जातात.  हो, त्या नदीला आता खळखळाट नसला तरीही.
खरच, कोणाला समजलंय ह्या जीवनाच्या प्रवासाचं गूढ? कोणाला समजलंय आपल्या जगण्याच, झगडण्याच आणि मरण्याच प्रयोजन? कोणाला समजलंय, आजूबाजूला सगळ विश्व मोडून पडत असतांनाही आपण कसे जगत आणि झगडत राहू शकतो? कोणाला समजलंय, एखाद्या लहान मुलाच्या उबदार स्पर्शामध्ये एवढी जादू का वाटते, जेव्हा स्वतःच मुल हरवलंय आणि भेटत नाहीय? विद्वान लोक एवढी मोठाली पुस्तक लिहितात, बुद्धीच्या आवाक्या बाहेरचे शब्द वापरून. पण हे, आपल्या जगण्याच प्रयोजन, आपल्या झगडण्याचा अंत, हे सगळ मानवी बुद्धिमत्तेच्या पलीकडचच आहे ना. देवा, भगवंता, मला सोडून जाऊ नको रे. होय, मृत्युच्या खोल खाईतून चालतांना सुद्धा, तू जर माझ्या सोबत असशील तर मला कळीकाळाचही भय नसेल.
पण ते उठून उभे राहिले. सिमांगु चा दाराशी बोलण्याचा आवाज आला. शोधाला परत सुरुवात करायला हवी.
*  *  *
- आणि हे आलं शांती नगर, दोस्त!
इथे ह्या दुर्दैवी वस्ती मधल्या बारक्याशा गल्ल्यांमधून सैरावैरा धावणारी पोर सुद्धा हसतच होती. काही लोखंडी पत्रे, फळकुट, झावळ्या आणि एखाद्या मोडीत काढलेल्या, टाकून दिलेल्या घराचं मोडकं दार. कुशलपणे निर्माण केलेल्या झरोक्यांमधून धुराची वेटोळी येत होती, स्वैपाक रांधत असल्याचे वास होते. माणसांचे आवाज - रागानी चढलेले किंवा दु:खानी रडणारे नव्हेत, नेहमीचे, दैनंदिन. इथे काय ह्याला पोरगा झाला, तिथे काय तो खपला, ह्या पोराच शाळेल बर नाही चाललंय, तो पोरगा म्हणे तुरुंगात गेला. आत्ता दुष्काळच आहे, आणि निरभ्र आकाशामध्ये सूर्य तळपतोय. पण पाऊस कोसळला तर ही लोक काय करतील, आणि थंडी पडली की?
-    बघताना सुद्धा वाईट वाटत ना?
-    पण त्या तिकडच्या बिल्डिंगी बघा. हे अस गेल्या कित्येक वर्षात झाल नव्हत. ह्यातनंही काही चांगलं निष्पन्न होऊ शकेल. आणि ही सुद्धा दुबुलाची कामगिरी, बर का!
-    ते इथे सगळीकडेच असतात अस दिसतंय.
-    बघा, ती बघा आपल्यापैकी एक नर्स. लाल आणि पांढऱ्या पोशाखात, डोक्यावर टोपी घालून एकदम दिमाखदार दिसते ना?
-    हो, दिसते खरी.
-    गोरे लोक जास्त जास्त बायकांना नर्सच ट्रेनिंग देताहेत. गमतीशीर आहे, कित्येक गोष्टीत आपली चांगली प्रगती होते आहे, काही बाबतीत अगदी जैसे थे आणि आणखी काही बाबतीत आपण दुर्दैवानी उलट्या दिशेला जातो आहोत. पण ह्या नर्सच्या ट्रेनिंगच्या बाबतीत मात्र गोऱ्या लोकांमध्ये आपल्याला बरेच चांगले मित्र आहेत. आपल्यातल्या काळ्या तरुणांना, विटवॉटर्सरँड मधल्या युरोपिअनांच्या युनिवर्सिटी मध्ये डॉक्टरकीच शिक्षण द्यायचं अस म्हटलं तर केवढा मोठा गहजब झाला होता. पण आपले मित्र खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहिले आणि आता त्या तरुणांना तिथे डॉक्टरकीचं शिक्षण मिळतं आहे, आपली युनिवर्सिटी नाही तोपर्यंत.
-    गुड मॉर्निंग, नर्स.
-    गुड मॉर्निंग, उम्फुन्डीस.
-    नर्स, कधीपासून काम करताय तुम्ही इथे?
-    ही जागा असल्यापासून.
-    मग तुम्हाला एक तरुण मुलगा, अब्सलम कुमालो नावाचा, माहिती असेल?
-    हो, मी ओळखत होते त्याला. पण आता तो इथे रहात नाही. कुठे रहायचा सांगू शकेन मी तुम्हाला. लात्सवेयॉस कुटुंबाबरोबर रहायचा तो. ते बघितलंत, दगडांचा ढिगारा करून ठेवलाय, कोणी नवीन झोपडी उभारू नये म्हणून? तो छोटा मुलगा उभा आहे ना तिथे, दिसला?
-    हो दिसला.
-    आणि त्याच्या पलीकडे एक घर आहे ना, त्याच्या पाइपामधून धूर येतोय?
-    हो दिसलं.
-    त्या गल्लीत खाली जा. लात्सवेयॉस तिथे तिसऱ्या किंवा चौथ्या घरात रहातात. खायचा हात असतो ना, त्या बाजूला रस्त्याच्या.
-    थँक्यू नर्स, येतो आम्ही.
तिच्या सूचना एवढ्या बिनचूक होत्या, की त्यांना ते घर सापडायला काहीच त्रास झाला नाही.
-    गुड मॉर्निंग, बाई.
बाई स्वच्छ आणि दिसायला बरी वाटत होती. ती प्रेमळपणे त्यांच्याकडे बघून हसली आणि म्हणाली
-    गुड मॉर्निंग उम्फुन्डीस.
-    बाई, आम्ही एका मुलाला - अब्सलम कुमालोला - शोधतो आहोत.
-    उम्फुन्डीस, तो आमच्या बरोबर रहात असे. त्याला राहायला जागा नव्हती, म्हणून आम्हाला दया आली त्याची. पण दुर्दैवानी ते त्याला पकडून घेऊन गेले. आणि मी ऐकल की मॅजिस्ट्रेटनी त्याला सुधारणा गृहामध्ये पाठवायचा हुकुम दिला.
-    सुधारणा गृह?
-    हां, ती शाळा नाही का तिकडे पलीकडे? शिपायांच्या हॉस्पिटलच्या पल्याड. चालत जायला फार लांब नाहीय इथून.
-    थँक्यू बाई, जपून राहा. चला दोस्त.
ते दोघ चूपचाप चालायला लागले, कारण दोघांकडेही बोलायला काही शब्दच नव्हते. रस्ता सरळ आणि पक्क्या बांधणीचा होता, तरीही कुमालोंचा तोल जातोयसं वाटायला लागल. सिमान्गुनी त्यांचा हात पकडला.
-    धीर बाळगा, दोस्त.
त्याने दोस्ताकडे एक नजर टाकली. पण कुमालोंची नजर जमिनीला खिळलेली होती. सिमांगुला त्यांचा चेहरा दिसत नसला, तरी रस्त्यावर पडत असलेला एक थेंब मात्र दिसला आणि त्याने हाताची पकड जास्तच घट्ट केली.
-    धीर बाळगा, दोस्त.
-    कधी कधी वाटत, माझ्यामध्ये काही धैर्य उरलंच नाहीय आता.
-    मी ऐकलय ह्या सुधारणा गृहाबद्दल. तुम्हाला भेटलेले ते इंग्लंडचे गोरे प्रिस्ट होते ना, ते खूप चांगल बोलतात ह्याच्याबद्दल. मी त्यांना बोलतांना ऐकलय, की एखाद्या मुलाला सुधारायची इच्छा असली, तर त्याला इथे नक्की मदत मिळू शकेल. तेव्हा, धीर धरा.
-    ह्याचीच भिती होती मला.
-    मला सुद्धा.
-    मला आठवतंय, तुम्हाला प्रथम भिती कधी वाटली होती. त्या दिवशी अॅलेक्झांड्रामध्ये, तुम्ही मला पुढे पाठवलंत आणि त्या बाईंशी बोलायला परत गेला होतात.
-    तुमच्या पासून काही लपवणं अशक्य आहे, लक्षात आलं माझ्या.
-    मी फार हुशार आहे म्हणून नव्हे, हा माझ्या मुलाचा प्रश्न आहे, म्हणून.
ते शांती नगरमधून बाहेर ओर्लँडोकडे आले. आणि जोहानसबर्ग कडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावरून चालू लागले. ओर्लँडोच्या हद्दीवरच गोऱ्या लोकांच पेट्रोल स्टेशन होत, कारण काळ्या लोकांना ओर्लँडो मध्ये पेट्रोल स्टेशन उघडायला परवानगी नाही.
-    त्या बाई काय म्हणाल्या होत्या तुम्हाला?
-    त्या म्हणाल्या, ह्या दोघा पोरांच्या काहीतरी भानगडी चालू होत्या, बऱ्याच गोष्टी, गोऱ्या लोकांच्या वापराच्या गोष्टी ते घरात आणत असत.
-    हे सुधारणा गृह, इथे खरच काही सुधारणा होऊ शकते?
-    मला स्वतःला तेवढीशी माहिती नाही. काही लोक एक म्हणतात, काही लोक दुसरच. पण तुमचा मित्र मात्र फार चांगल बोलतो.
बऱ्याच वेळानी, सिमांगुचे विचार दुसरीकडेच भरकटत असतांना, कुमालो पुन्हा म्हणाले
-    मला खरच आशा आहे, की इथे काही सुधारणा घडू शकत असेल.
-    मलाही.
सुमारे तासभर चालल्यानंतर, ते सुधारणा गृहाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागले. तिथे पोचेपर्यंत मध्यान्ह होऊन गेली होती. त्यांनी येतानाच सगळ्या दिशांनी कवायत करत येत असलेली मुलं पाहिली. वेगवेगळ्या दिशांनी ती मुलं येत होती, जणू काही ह्या कवायतीला अंतच नसावा.
-    बरीच मुलं आहेत इथे.
-    हो, मलाही कल्पना नव्हती एवढी मुलं असतील.
त्यांच्यासारख्याच एका काळ्या, हसऱ्या चेहऱ्याच्या माणसाने जवळ येउन त्यांना विचारलं, काय पाहिजे. त्यांनी जेव्हा सांगितलं की ते अब्सलम कुमालो नावाच्या एका मुलाचा तलास करताहेत, तेव्हा तो त्यांना घेऊन एका ऑफिसमध्ये गेला. तिथे एका गोऱ्या तरुणाने त्यांना आफ्रिकान्स मध्ये विचारलं, काय काम आहे.
-    साहेब, आम्ही माझ्या ह्या मित्राच्या मुलाला, अब्सलम कुमालोला शोधतो आहोत, सिमांगुने त्याच भाषेत उत्तर दिल.
-    अब्सलम कुमालो, हो मी चांगलाच ओळखतो त्याला. पण कमाल आहे, त्याने तर मला सांगितलं होत त्याचे कोणी नातेवाईक नाहीत म्हणून?
-    दोस्त, तुमच्या मुलांनी ह्यांना सांगितलं त्याचे कोणी नातेवाईक नाहीत, सिमांगुने झुलूमध्ये कुमालोंना सांगितलं.
-    त्याला नक्कीच लाज वाटली असणार, कुमालो सिमांगुशी झुलूमध्ये बोलू लागले. सॉरी हं, मला काही आफ्रिकान्समध्ये बोलता येत नाही. कारण त्यांनी ऐकल होत, की काही गोऱ्यांना आफ्रिकान्स भाषा न येणाऱ्या काळ्यांचा राग येतो.
-    तुम्हाला हव्या त्या भाषेत तुम्ही बोला. तो तरुण म्हणाला. तुमच्या मुलाचं चांगल चाललं होत इथे, तो इथल्या मुलांमध्ये पुढे होता आणि मला त्याच्या प्रगतीची खूप आशा आहे.
-    साहेब, म्हणजे तो इथून गेला?
-    गेला? हो, आत्ता एक महिन्यापूर्वीच. त्याच्या बाबतीत आम्ही थोडा अपवाद केला. एक तर त्याच लहान वय आणि त्याची चांगली वागणूक; पण महत्वाच म्हणजे त्याच्यापासून एक मुलगी गरोदर होती. ती येत असे त्याला भेटायला इथे, आणि तोही तिच्या प्रेमात असावा अस दिसत होत. त्यांच्या होणाऱ्या मुलाची आतुरतेनी वाट बघत होते ते. त्या मुलीच त्याच्यावर प्रेम दिसत होत. त्याने शपथही घेतली, की त्या मुलीसाठी आणि होणाऱ्या बाळासाठी तो धड काम शोधून ती नोकरी टिकवून धरेल. तेव्हा, हे सगळ लक्षात घेऊन आम्ही त्याला लवकर सोडून द्याव अशी शिफारस केली होती. आता, दर वेळी आम्हाला ह्या असल्या गोष्टीत यश मिळतच अस नाही. पण, जेव्हा दोघंही एकमेकांवर एवढ प्रेम करत असतात, तेव्हा काही बरं निष्पन्न होईल म्हणून मग आम्हीही थोडा संधीचा फायदा घेऊन बघतो. ह्यातन जर यश मिळाल नाही, तर मात्र कशानीच ते मिळणार नाही!
-    साहेब, आणि त्यांच लग्न झाल?
-    नाही उम्फुन्डीस; लग्न झाल नाहीय. पण लग्नाची तयारी सगळी पक्की आहे. त्या मुलीला घरचं कोणी नाही, आणि तुमच्या मुलानेही आम्हाला सांगितलं होत त्यालाही कोणी नातेवाईक नाहीत. म्हणून मी आणि माझ्या एका नेटिव मदतनीसानीच सगळ ठरवलं.
-    साहेब, फार चांगल केलंत हे; फार मोठे उपकार आहेत तुमचे!
-    हे कामच आहे आमचं. त्याची तुम्ही काळजी करू नका. किंबहुना, त्यांच लग्न झाल नाहीय ह्याचीही काळजी करू नका. तो तरुण आपुलकीनी म्हणाला. खरा प्रश्न आहे, तो बायको-मुलाची काळजी घेईल का. सभ्य माणसासारख आयुष्य जगेल का.
-    ते मी बघेन; अर्थात मला हा केवढा तरी मोठा धक्का आहे.
-    ते समजत मला. मी मदत करतो तुम्हाला. माझ काम संपेपर्यंत जरा बाहेर बसलात, तर मी घेऊन जाईन तुम्हाला पिमव्हिलमध्ये, अब्सलम आणि ती मुलगी राहतात तिथे. तो नसेल तिथे, कारण मी त्याला शहरात एका ठिकाणी नोकरीला लावलंय. आतापर्यंत त्याचे रिपोर्ट चांगले मिळालेत मला. त्याला मी पोस्टात अकाउंट उघडायलाही तयार केल, चार-पाच पौंड साठले आहेत त्याचे एव्हाना.
-    खरच, तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच साहेब.
-    कामच आहे हे आमचं, तो तरुण म्हणाला. आता तुम्ही जरा बाहेर थांबा. मी माझी कामं संपवतो आणि मग तुम्हाला पिमव्हिलला घेऊन जाईन.
बाहेर पुन्हा तो प्रसन्न चेहऱ्याचा मनुष्य दिसला आणि येउन त्यांच्याशी बोलू लागला. त्यांची कहाणी ऐकल्यावर त्याने ह्यांना त्याच्या घरी बोलावलं. तो आणि त्याची बायको मिळून कित्येक मुलांची देखरेख बघत होती. ही मुलं सुधारणा गृहामधून बाहेर पडली होती, आणि जवळपासच निःशुल्क घरांमध्ये रहात होती. त्याने पाव्हण्यांना चहा आणि खाणं दिल. तोही अब्सलमच्या वागण्याची स्तुती करत होता. मग ते सुधारणा गृहाबद्दल, आणि जोहानसबर्ग मध्ये घर-दार-शाळा आणि कसल्याही रिती-भाती न जुमानता रहाणाऱ्या मुलांबद्दल बोलले. मोडून पडलेल्या जमात व्यवस्थेबद्दल बोलले. सबंध देशालाच लागलेल्या किडीबद्दल बोलले. त्या तरुणाचा शिपाई साहेब तयार आहेत म्हणून निरोप घेऊन आला, तेव्हा ते उठले.
पिमव्हिल ला पोचायला त्यांना फार वेळ नाही लागला. पिमव्हिल मधली घरं म्हणजे अर्ध्या उघड्या खोक्यांसारखी होती. फार पूर्वी, आपत्कालासाठी म्हणून उभारलेली. जोहानसबर्ग मध्ये येणाऱ्या सगळ्या लोकांसाठी घरांचा पुरवठा कधीच पुरेसा नव्हता; त्यामुळे ही घर वापरली जात होती. प्रवेशद्वाराशी त्यांनी रीतसर परवानगी घेतली, कारण गोऱ्या लोकांना अशा ठिकाणी मज्जाव असतो.
तिथल्या एका अर्ध्या उघड्या खोक्याजवळ थांबून, तो गोरा माणूस त्यांना आत घेऊन गेला. त्यांच्या स्वागताला एक तरुण मुलगी आली, तरुण म्हणायचं, पण खर तर ती अगदीच पोरसवदा होती.
-    आम्ही अब्सलम ची चौकशी करायला आलो आहोत, तो गोरा तरुण म्हणाला. हे उम्फुन्डीस त्याचे वडील आहेत.
-    तो शनिवारी स्प्रिंग्सला गेला, आणि अजून परतला नाहीय, ती म्हणाली.
तो तरुण गप्प झाला. त्याच्या कपाळावर आठ्या होत्या, गोंधळून... किंवा रागानी.
-    पण आज तर मंगळवार आहे, तो म्हणाला. त्याचा काही थांगपत्ता नाही?
-    काहीही नाही, ती म्हणाली.
-    कधी परत येणारे तो?
-    मला माहिती नाही.
-    परत येणार तरी आहे का? त्याने तुच्छतेनी, बेदरकारपणी विचारलं.
-    मला माहिती नाही, ती म्हणाली.
तिचा आवाज निष्प्राण, हताश होता - जणू तिला वाट बघायची, वाऱ्यावर सोडून दिल जाण्याची सवय असावी. जणू ह्या पृथ्वीतलावर घालवायला लागणाऱ्या सत्तरेक वर्षांकडून तिची अपेक्षा शून्य होती. तिच्या आतमधून कसलाही प्रतिकार, कसल्याही मागण्या, कसलीही झुंज येणार नव्हती. तिच्या आतमधून काहीही येणार नव्हत - तिला वापरणाऱ्या, सोडून जाणाऱ्या, विसरून जाणाऱ्या पुरुषांच्या मुलांशिवाय. तिची ती हडकुळी शरीरयष्टी, एवढंसं लहान वय बघून स्वतःच सगळ दुःख विसरून, कुमालोंना तिची कणव आली.
-    तू काय करणारेस? ते म्हणाले.
-    मला माहिती नाही.
-    कदाचित दुसरा बाप्या शोधशील, सिमांगु कडवटपणे म्हणाला. तो कडवटपणा घालवायला, तिच्यापासून लपवायला, कुमालो काही बोलणार तेवढ्यात ती म्हणाली - मला माहिती नाही. पुन्हा कुमालो काही बोलायच्या आतच, सिमांगु तिच्याकडे पाठ फिरवून वळला आणि त्यांच्याशी कुजबुजला
-    आणखी काही करता येणार नाही इथे, चला निघू या.
-    दोस्त...
-    मी सांगतो तुम्हाला, काही करता येणार नाही. तुम्हाला स्वतःचे त्रास पुरेसे नाहीत का? तुम्हाला सांगतो, जोहानसबर्गमध्ये असल्या हजारो पडल्या आहेत. तुमची छाती आकाशाएवढी मोठी असती, आणि कुबेराचा खजिना तुमच्याकडे असता आणि तुमची कणव पाताळापर्यंत खोल असती तरीही - तुम्ही काही करू शकणार नाही ह्याबाबत.
नि:शब्दपणे ते निघाले. तिघंही गप्प होते. तो तरुण त्याच्या अपयशाचा विचार करत होता, कुमालो त्यांच्या दु:खामध्ये मग्न आणि सिमांगुच्या तोंडावर अजूनही त्या कडवट शब्दांचीच चव होती. बाकी दोघ गाडीत बसले, तरी कुमालो तसेच गाडीजवळ उभे होते.
-    तुम्हाला समजत नाहीय, ते मूल माझ नातवंड असणारे.
-    त्याचीही तुम्हाला खात्री नाहीय, सिमांगु संतापाने बोलला, तो पूर्णपणे त्या कडू जहराच्या आधीन होता. आणि समजा ते असलं, कोणास ठाऊक अशी अजून किती आहेत. त्या सगळ्यांना शोधायचं आपण? दिवसरात्र? तासन तास? कधी संपणार हे?
एक जबरदस्त चपराक खाल्ल्यासारखे कुमालो रस्त्यामधल्या त्या धुळीत उभे राहिले. आणि एक चकार शब्द न बोलता ते गाडीत आपल्या जागेवर बसले.
पुन्हा जेव्हा ते गावाच्या प्रवेश द्वाराशी थांबले, तेव्हा तो गोरा तरुण उतरून युरोपिअन अधिकाऱ्याच्या खोलीत गेला. बाहेर आला तेव्हा त्याचा चेहरा ओढलेला आणि दुख्खी होता.
-    मी फॅक्टरीत फोन केला, तो म्हणाला. खरय ते. हा आठवडा तो कामावर गेला नव्हता.
ओर्लँडोच्या प्रवेशद्वाराशी, मोठ्या पेट्रोल स्टेशन जवळ ते पुन्हा थांबले.
-    इथे उतराल ना तुम्ही? त्या तरुणाने प्रश्न केला.
ते गाडीमधून उतरले, तो तरुण कुमालोंशी बोलू लागला.
-    ह्या प्रकाराच फार वाईट वाटतंय मला, तो म्हणाला.
-    हो सोसायला अती जड आहे हे, ते सिमांगुला झुलूमध्ये म्हणाले, जणू त्यांना इंग्रजी येतंच नसावं. त्या बिचाऱ्याच्या कष्टांच शेवटी हेच फळ त्याला मिळाल ह्याचही फार वाईट वाटत मला.
-    तुमच्या कामाचं हेच फळ मिळालं, ह्याच त्यांना फार वाईट वाटतंय, सिमांगु आफ्रिकान्स मध्ये त्या तरुणाला म्हणाला.
-    माझ कामच आहे हो हे, पण त्यांचा मुलगा आहे तो किती झाल तरी. तो कुमालोंकडे वळून इंग्रजीत बोलू लागला. हे बघा, अजूनही आशा सोडू नका. काय होत कधी कधी, की त्याला अटक केली असेल, किंवा त्याला दुखापत झाली असेल, तो हॉस्पिटल मध्ये असू शकेल. आपल्याला माहिती नाही ना. तुम्ही अजिबात आशा सोडू नका, आणि मी त्याचा शोध घेण थांबवणार नाहीय.
त्याची गाडी निघून जाईपर्यंत ते थांबले. फार चांगला मनुष्य आहे हा, कुमालो म्हणाले; चला निघू या. पण सिमांगु जागचा हलेना. मला तुमच्याबरोबर चालायची सुद्धा लाज वाटते आहे, तो म्हणाला. त्याचा चेहरा पार पिळवटून गेला होता, अतोनात वेदना होत असल्यासारखा.
कुमालोंनी त्याच्याकडे आश्चर्यानी बघितलं.
-    माझ्या भयानक शब्दांबद्दल मला क्षमा करा.
-    म्हणजे, ह्या शोधाबद्दल?
-    तुमच्या लक्षात आल तर?
-    हो, आलं.
-    फार पटकन सगळ समजत तुम्हाला.
-    म्हातारा आहे ना मी, काहीतरी शिकलो असेनच आयुष्यात. चला, केली तुम्हाला क्षमा.
-    कधी कधी मला वाटत प्रिस्ट व्हायची लायकी नाही माझी. मी सांगतो तुम्हाला...
-    जाऊ दे ना. तुम्ही म्हणाला होतात ना, तुम्ही सामान्य आणि स्वार्थी आहात, पण देवानी तुमचा हात त्याच्या हातात घेतलाय, खर असेल ते.
-    आह, केवढा दिलासा दिलात मला.
-    आता मला तुम्हाला काही विचारायचय.
सिमांगुने त्यांच्याकडे पाहिलं, त्यांचा चेहरा न्याहाळला आणि म्हणाला मान्य!
-    काय मान्य?
-    मी तुम्हाला त्या मुलीकडे परत घेऊन जायचं.
-    तुम्ही सुद्धा खूप हुशार दिसताय.
-    हुं:, नेहमी नेहमी एकट्यानीच हुशार असणं बर नाही, नाही का?
तरीही खर तर ते दोघ ह्या थट्टेच्या मनस्थितीत नव्हते. त्या तापलेल्या डांबरी रस्त्यावरून ते दोघ ओर्लँडोकडे निघाले. दोघंही गप्प, निस्संशय लाख-लाख विचारांचा भार मनात घेऊन.

Comments