सोफियाटाऊनला परत जाणाऱ्या
ट्रेनमध्ये ते बसलेले असतांना सिमांगु म्हणाला,
-
मला वाटतंय,
की तुम्हाला विश्रांतीची गरज आहे.
कुमालोंनी त्याच्याकडे
स्थिर नजरेनी बघितलं.
-
कशी विश्रांती
घेऊ शकेन मी?
-
मला माहित्येय
तुम्हाला काय म्हणायचंय. मला समजतं तुम्ही काळजीत आहात. पण, तुमच्या-माझ्यापेक्षा तो
सुधारणा गृहामधला तरुण तपास लावण्याचं काम जास्त चांगलं करू शकेल. आता आज झाला मंगळवार.
परवा मला आमच्या एझेन्झेलेनीच्या अंधाश्रमामध्ये जायचंय. तिथे त्या लोकांसाठी प्रवचन
आहे, आणि आपल्याच लोकांना मार्गदर्शन करायचंय. त्या रात्री मी तिथेच राहीन, आणि दुसऱ्या
दिवशी परत येईन. मी तिथल्या मुख्याधिकारयांना विचारतो, तुम्ही माझ्याबरोबर आलेलं चालेल
का. मी काम करेन, तुम्ही आराम करा. फार सुंदर ठिकाण आहे ते. एका कड्याच्या टोकाला तिथे
प्रार्थनामंदिर आहे. गोरे लोकं आपल्यातल्या अंधांसाठी काय करताहेत ते बघूनही तुमच्या
मनाला थोडी उभारी येईल. अस थोड मानसिक बळ घेऊन, मग आपण परत येऊ.
-
आणि तुमच्या
कामाचं काय?
-
मी कामाबद्दल
माझ्या वरिष्ठांशी बोललो आहे. ते सहमत आहेत, की तुमचा मुलगा भेटेपर्यंत मी तुम्हाला
मदत करायला हवी.
-
फार सज्जन
लोक आहेत ते! ठीक आहे, जाऊ या आपण.
मिशन हाउस मधली ती
संध्याकाळ मोठी मजेत चालली होती. फादर व्हिन्सेन्ट, ते गोबऱ्या गुलाबी गालांचे प्रिस्ट
तिथे होते. त्यांनी दोघांनी कुमालोंच्या रहाण्याच्या आणि कामाच्या जागेबद्दल गप्पा
मारल्या. मग फादर व्हिन्सेन्ट त्यांच्या देशाबद्दल, तिथल्या कुरणांबद्दल आणि कुंपणांबद्दल,
वेस्टमिन्स्टर अॅबी आणि देशभरातल्या मोठमोठ्या प्रमुख चर्च बद्दल बोलले. पण हे सुखही
फार वेळ टिकायचं नव्हतं. कारण एक गोरा प्रिस्ट शहरामधून संध्याकाळच वृत्तपत्र घेऊन
आला, आणि त्या सगळ्यांना त्यातला ठळक काळा मथळा दाखवू लागला. "पार्कवॉल्डमध्ये
खून! शहरातील सुप्रसिद्ध इंजीनिअरची गोळ्या घालून हत्त्या!! मारेकरी काळे असल्याची
कुणकुण."
-
दक्षिण
आफ्रिकेसाठी ही फार मोठी हानी आहे! एक गोरा प्रिस्ट उद्गारला. कारण हा आर्थर जार्विस
फार झुंजार तरुण होता, न्यायासाठी अथक लढत होता. आणि चर्चसाठी सुद्धा ही फार मोठी हानी
आहे. कारण तो आपल्या तरुण मंडळींमध्ये एक आदर्श तरुण होता.
-
जार्विस?
खरच फार भयानक घटना आहे ही! सिमांगु म्हणाला. इथे क्लेअरमॉन्टमधल्या मुलांच्या क्लबचे
अध्यक्ष होते ते.
-
तुम्ही
कदाचित ओळखत असाल त्यांना. फादर व्हिन्सेन्ट कुमालोंना म्हणाले. हे पहा, इथे म्हटलंय
की हाय प्लेस, करिसब्रुक मधल्या जेम्स जार्विसचे ते एकुलते एक सुपुत्र होते.
-
मला वडील
माहिती आहेत ते, कुमालो म्हणाले. म्हणजे, मी नावानी ओळखतो त्यांना आणि तसं बघितलंय;
पण बोलण्याची कधी वेळ नाही आली. त्यांची शेती आहे तिथे इंडॉटशनीतल्या टेकड्यांच्या
वरती. आमच्या चर्चच्या बाहेरून जातात कधी कधी घोड्यावरून. पण हा मुलगा मला माहिती नव्हता.
ते गप्प झाले, आणि
मग एकदम म्हणाले. हां, आठवलं मला! एक लहानसा चलाख मुलगा!! नीट नाही आठवत, पण आठवला!
आणि ते पुन्हा गप्प
झाले. कोण नाही गप्प होणार, एखादा तरुण मनुष्य, एके काळचा एक लहानसा चलाख मुलगा, गेला
हे कळल्यावर?
-
हे वाचून
दाखवतो हं, फादर व्हिन्सेन्ट म्हणाले.
प्लांटेशन रोड, पार्कवॉल्ड
येथील रहिवासी श्री. आर्थर जार्विस ह्यांची, आज पहाटे दीड वाजता त्यांच्या राहत्या
घरामध्ये गोळ्या घालून हत्त्या करण्यात आली. असे समजते, की सौ. जार्विस त्यांच्या मुलांसमवेत
काही दिवसाच्या सुट्टीवर गेलेल्या होत्या. श्री. जार्विसनी, तब्ब्येत नादुरुस्त असल्याने
आज ते घरी राहतील असे त्यांच्या सहकाऱ्यांना कळविले होते. घरात कोणी नाही ह्या समजुतीनी,
एक काळा दोन सहकारयांबरोबर स्वयंपाकघरातून आत शिरला असावा असा तर्क केला जात आहे. घरातील
काळ्या नोकराला मारून बेशुद्ध करण्यात आले. श्री. जार्विस आरडओरड ऐकून खाली आले असावेत.
खाली येणाऱ्या जिन्याकडून स्वयंपाकघराकडे जाण्याच्या भागात, श्री. जार्विस ह्यांच्यावर
अतिशय जवळच्या अंतरावरून गोळ्या झाडण्यात आल्या असे दिसते. जार्विस ह्यांनी काहीही
प्रतिकार केला असल्याच्या खुणा दिसत नाहीत.
ह्या दुर्घटनेच्या
थोडाच काळ आधी, तीन काळे तरुण प्लांटेशन रोड परिसरात संशयास्पदरित्या वावरतांना आढळले
होते. पोलिस तपासनिसांचे एक मोठे पथक ताबडतोब घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. मोठ्या
प्रमाणावर चौकशी चालू आहे व पार्कवॉल्ड रिज भाग गुन्हेगारांच्या तपासार्थ पिंजून काढण्यात
येत आहे. काळा नोकर, रिचर्ड म्पिरिंग, अ-युरोपीय हॉस्पिटल मध्ये बेशुद्धावस्थेत आहे.
तो शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांना तपासाच्या कामात मोलाची माहिती देऊ शकेल अशी आशा आहे.
परंतु त्याची परिस्थिती गंभीर आहे असे सांगण्यात येत आहे.
गोळ्यांच्या आवाजाने
शेजारी राहणाऱ्या श्री. मायकेल क्लार्क ह्यांनी जाऊन तलास घेतला, तेव्हा त्यांना ही
दुर्दैवी घटना प्रथम समजली. थोड्याच वेळात पोलिस तिथे हजर झाले. मृताच्या शयनगृहातील
टेबलावर 'काळ्या गुन्हेगारीच्या मागील सत्य' ह्या नावाचे अर्धवट लिहिलेले हस्तलिखित
सापडले आहे. मृत्यूकडे चालत जाण्यापूर्वी, श्री. जार्विस हे हस्तलिखित लिहिण्यात मग्न
होते असे दिसते. ते ओढत असलेला पाईप टेबलावर अजूनही गरम होता. श्री. जार्विस ह्यांच्या
मागे, त्यांची विधवा पत्नी, नऊ वर्षाचा मुलगा व पाच वर्षाची मुलगी असा परिवार आहे.
ते हाय प्लेस, करिसब्रुक, नाताळ येथील श्री. जेम्स जार्विस ह्यांचे एकुलते एक सुपुत्र
होते. शहरातील प्रख्यात इंजीनिअरिंग फर्म डेविस, व्हॅन डर वॉल्ट आणि जार्विस ह्यामध्ये
ते भागीदार होते. श्री. जार्विस ह्यांना सामाजिक समस्यांबद्दल असलेली आस्था आणि समाजाच्या
अ-युरोपीय घटकांच्या उन्नतीसाठी चाललेले त्यांचे प्रयत्न ह्या दोन्ही गोष्टींसाठी त्यांची
ख्याती होती.
आता कोणी फार बोलत
नाहीय, सगळे गप्प झालेत. आता ही कुंपणांबद्दल आणि कुरणांबद्दल आणि कुठच्याही देशाच्या
सौंदर्याबद्दल बोलायची वेळ नाहीय. आजकालच्या ह्या प्रलयाच्या दूतांचे संदेश वाचले,
की काळजात फक्त दु:ख आणि भिती आणि तिरस्कार उफाळून येतं. मोडून पडलेल्या जमात व्यवस्थेच्यासाठी , नाहीश्या झालेल्या कायदा आणि रिती-भातींच्यासाठी डोळ्यात अश्रू उभे राहू
देत. त्या मृत मनुष्याच्यासाठी, मागे पोरक्या झालेल्या बायको आणि मुलांच्यासाठी डोळ्यात अश्रू उभे राहू देत. ह्या आपल्या लाडक्या मातृभूमीच्यासाठी डोळ्यात अश्रू
उभे राहू देत. कारण, अजून सगळ संपल नाहीय. सूर्य अजूनही ह्या पृथ्वीतलावरती प्रेमाचा
तसाच वर्षाव करतो आहे. माणसाला फक्त ते प्रेम उपभोगता येत नाहीय, कारण त्याच्या काळजात
फक्त भितीलाच जागा आहे आता.
कुमालो उठले.
-
मी माझ्या
खोलीत जातो, गुड नाईट.
-
मी येतो
तुमच्याबरोबर, दोस्त.
ते लिथबी बाईंच्या
घरापर्यंत चालत आले. कुमालोंनी त्यांच्या मित्राकडे वेदनांनी पिळवटलेल्या चेहऱ्याने
पाहिलं.
-
ही एक
गोष्ट, एकच गोष्ट. माझ्या मनात दुसर काही येउच शकत नाही, ह्या भितीपलीकडे. भिती, भिती,
भिती.
-
मला समजतं.
पण अस बघा, हा निव्वळ वेडेपणा आहे; ह्या एवढ्या मोठ्या शहरात हजारो आणि लाखो लोक असतांना,
ह्या एका गोष्टीची भिती बाळगणं.
-
हा प्रश्न
वेडेपणाचा आणि शहाणपणाचा नाही. हा प्रश्न फक्त भीतीचा आहे.
-
परवा आपण
एझेन्झेलेनीला जाऊ. तिथे कदाचित, तुम्हाला काहीतरी आधार सापडेल.
-
मला खात्री
आहे मला तिथे काहीतरी मिळेल. फक्त मला सगळ्यात तीव्रतेनी हवंय तेवढ सोडून काहीही.
-
चला, आपण
प्रार्थना करू.
-
माझ्यामध्ये
कसली याचना शिल्लकच राहिली नाहीय. अगदी आतपर्यंत पार मूक-बधिर आहे मी. माझ्याकडे काही
शब्दच शिल्लक नाहीत.
-
गुड नाईट,
बंधू.
-
गुड नाईट.
सिमांगुने त्यांना
घरात शिरतांना बघितलं. ते फार म्हातारे दिसत होते. तो वळला आणि मिशनच्या दिशेनी चालू
लागला. काही वेळा अस वाटतं खर, की जगात देव नाहीच आहे.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...