'यशवंतराव चव्हाण'

शेवटी एकदाचा 'यशवंतराव चव्हाण' सिनेमा बघण्याचा योग आला. मला तो बघायचा होता सुप्रिया (मतकरी) विनोदच्या इंदिरा गांधींच्या भूमिकेसाठी. ह्या गुणी अभिनेत्रीला मी आतापर्यंत फक्त इथे झालेल्या साट-लोट ह्या नाटकामध्ये आणि काही यु-ट्यूब क्लिप्स मध्येच बघितलं होत. 

प्रथम सिनेमा विषयी थोडस. सिनेमाची मांडणी आकर्षक वाटली. ऐतिहासिक व्यक्तींवरच्या कलाकृतीमध्ये, जुन्या news क्लिप्स आणि प्रत्यक्ष अभिनय ह्यांचं मिश्रण करण्याचा एक फॉर्म्युलाच बनून गेलेला दिसतो; हा सिनेमा त्यात अगदी फिट्ट बसत होता, इथे जुन्या क्लिप्सच प्रमाण फारच जास्त होत. त्यामुळे, कित्येकदा आपण जुनी फिल्म्स डिव्हिजनची डाकूमेंटरी बघत आहोत असा भास होत होता. एकंदरीत, एखाद्याला गोरा-गोरा-पान रंगवायची इर्षा जाणवली तरी; प्रत्यक्षात तो इरादा नसेलही. यशवंतरावांची साहित्य-संगीत-नाट्य कलांची आवड सिद्ध करायला लहानपणापासूनच एवढा ह्या कलांचा भडीमार करण बघताना जरा अती वाटल. आता अगदीच, 'तर असे होते आपले दैदिप्यमान नेते' अशी नॉर्थ कोरिया टाईप निव्वळ डॉक्युमेंटरी होऊ नये, म्हणून सुरुवातीला मराठी, पण अमेरिकेहून आलेल्या राजकारणाच्या विद्यार्थांचा संदर्भ दाखवला आहे. प्रोफेसर देशमुख (नाना पाटेकर) त्याला गाईड करत आहेत, ह्या पार्श्वभूमीवर उरलेला सिनेमा घडतो. विद्यार्थी अमेरिकेतून आला असल्याने तो थोडा येडपट आणि बराच आगाऊ दाखवण अपरिहार्य असाव, कारण त्या देशवासियांसाठी एकच साचा उपलब्ध असावा. त्याच अमेरिकन उच्चारामधल मराठी ऐकायला योग्य वाटल, पण तशा मराठीत त्याला दिलेले काही जडजम्बाळ शब्द मात्र खटकले. एवढी उच्च मराठी नाही हो बोलत इथली, अशा उच्चारांमध्ये बोलणारी मुल. 

नाना पाटेकरांच्या वक्तव्याने आणि संवादाच्या धाटणीने मात्र कहर केला अस वाटल. साधारणपणे, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवदगीता सांगत असावेत. आणि शेजारच्या रथातून चोरून ऐकणाऱ्या एखाद्या थोड्या मंदबुद्धी, डोक्यावर नुकताच आघात झालेल्या अतिरथ्याने, तो जरा 'वासांसि जीर्णानी' भाग परत समजावून सांगा हो अस म्हटल्यावर भगवान ज्या सुप्रसन्नपणे, त्याच्यावर दया म्हणून पुन्हा ज्या खास वात्सल्यपूर्ण सुरात ते समजावून सांगतील, त्या सुरात आणि ती कणव चेहऱ्यावर घेऊन नाना पाटेकर त्यांचे सगळे संवाद का म्हणत होते नक्की समजल नाही. ('वा, गुरु' मध्ये दिलीप प्रभावळकरांबद्दल असच वाटल होत.) ते एक असो. तत्कालीन बातम्यांचे मराठा टाईप वृत्तपत्रातले ठसठशीत मथळे पार्श्वभूमीवर दाखवत, त्यावेळची अत्र्यांची जळजळीत भाषणे एका नटाकडून अभिनित करायची कल्पना आवडली. काही गोष्टींचे संदर्भ देऊन त्या मध्येच वाऱ्यावर सोडून दिल्यासारख्या वाटल्या - उदा. सावरकरांची 'हिंदुत्वा'ची व्याख्या. तुरुंगातले चव्हाणांचे मार्गदर्शक दोन-तीनदा त्याचा उल्लेख करतात, पण त्याचा चव्हाणांच्या विचारांवर काय परिणाम झाला किंवा चव्हाणांच त्याबद्दल काय मत झाल ह्याचा उल्लेख दाखवण जास्त उद्बोधकारक ठरलं असत. त्यामुळे, ब्राह्मण्य किंवा हिंदुत्व ह्या गोष्टी केवळ सध्याच्या राजकारणाच्या चष्म्यातून बघण्यासाठी उगीचच घुसडल्या आहेत की काय अशी दुष्ट शंका येते. तरुण आणि वयस्कर चव्हाणांचे काम करणाऱ्या दोन्ही नटांनी कामं सुंदर केली - विशेषतः पहिल्याने.

सुप्रिया विनोदला फारच थोडे सीन होते. तिचा अभिनय चांगला वाटला - मला मात्र तिचा बोलण्याचा ढंग जास्त आर्जवी, जास्त नम्र वाटला. इंदिराजींच्या आवाजात जास्त तडफ, जास्त हुकुमत असेल अशी माझी अपेक्षा होती. तिचा विग मात्र बदलायलाच हवा अस वाटल - विशेषतः राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या चर्चेच्या सीन मध्ये. एरवी तिचं दिसण - मेकपमुळे - 'बाईंसारखं' आणि अतिशय प्रभावी होत. 

एकंदरीत चित्रपट नक्कीच कोणाच्या तरी जोरदार पाठबळाने उभा केलेला आणि प्रचारकी वाटला. यशवंतरावांची किती राजकारणी गणितं चुकली - व्ही व्ही गिरी विरुद्ध संजीव रेड्डी काय, आणीबाणीच्या प्रसंगात वेळीच बाहेर न पडण काय आणि नंतर चुकीच्या वेळी बाहेर पडण काय, इंदिराजी परत सत्तेवर आल्यानंतर त्यांच्याकडे अतिशय अपमानित अवस्थेत परत जाण काय - फारच मोठा पाढा होतो हा. एवढं दाखवूनही नाना पाटेकर त्या खास भगवान कृष्ण सुरात यशवंतरावांच गुणगानच करताहेत! असो, थोडक्या शब्दात म्हणजे जब्बार पटेलांकडून माझी अपेक्षा ह्यापेक्षा बरीच जास्त होती.

Comments