भाषांतर - १२

शंकाच नको की ह्या देशात नुसती भिती आहे! एवढे लोक जेव्हा बिनदिक्कत कायदा तोडत असतील, तेव्हा काय करेल माणूस! मन जेव्हा कायम भितीच्याच छायेत असेल, तेव्हा कसा ह्या सृष्टीसौंदर्याचा, लक्ख झळाळून पडलेल्या उन्हाचा, उण्या-पुऱ्या सत्तरेक वर्षांच्या आयुष्याचा आस्वाद घ्यायचा कोणी! मोठाल्या वृक्षांच्या सावलीतून शांतपणे रमतगमत कसं चालायचं, जेव्हा त्या झाडांमागे काही धोका दडून बसला असेल. रात्री अंथरुणावर सुखानी कसं झोपायचं, जेव्हा त्या अंधारात कोणीतरी लपून बसलं असेल. चांदण्यात पडून, प्रेमाची कुजबुज कशी करायची, जर त्या एकांताच्या सोबतीला दहशतही वावरत असेल.
* * *
शेकडो हजारो आवाज आरडून-ओरडून सांगताहेत काय करायला पाईजेल आहे. पण एखाद्या बिचाऱ्याला खरच काय करावं प्रश्न असला, तर त्याला ह्याचा काही उपयोग नाही. कारण एकजण हे करा म्हणतो, दुसरा ते करा म्हणतो आणि आणखी एखादा हे पण नाही ते पण नाही, तिसरंच काहीतरी करा म्हणतो.
* * *
बंधू-भगिनींनो, अत्यंत शरमेची बाब आहे ही की आपल्याकडे एवढे कमी पोलिस असावेत. जोहानसबर्गच्या बहुतेक भागांपेक्षा ह्या भागातून सगळ्यात जास्त कर जमा होतो. आणि मिळतं काय आपल्याला त्याच्या बदल्यात? एक फडतूस पोलिस चौकी. गस्त घालायला एक हवालदार, आणि फोन सांभाळायला एक. गेल्या सहा महिन्यातली ही दुसरी अत्यंत संतापजनक घटना आहे. आपल्याला जास्त संरक्षण मिळायलाच हवं!
(टाळ्या)
-    मि. मॅकलॅरेन, तुमचा ठराव वाचून दाखवा.
* * *
मी म्हणेन, जोपर्यंत ह्या देशाच्या भूमिपुत्रांपुढे मोठाली स्वप्न नाहीत, त्यांना झटून कामाला लावणाऱ्या उत्तुंग आशा आकांक्षा नाहीत, तोपर्यंत ही गुन्हेगारी अशीच रहाणार. कारण, काहीही ध्येय, काहीही उद्दिष्ट, काहीही आशा नजरेसमोर नसल्याने ते दारू आणि जुगार आणि वेश्याव्यवसायाकडे वळताहेत. आपल्याला काय हवंय, कायदा पाळणारा, कामसू आणि काहीतरी मिळवायची स्वप्न बघणारा काळा समाज, का कायदे तोडणारा, आळशी आणि निरुद्देश जगत रहाणारा काळा समाज? सत्य परिस्थिती अशी आहे, की आपलंच नक्की ठरत नाहीय - कारण आपल्याला दोघांचीही भिती वाटते. जोपर्यंत आपण हे असे द्विधा मन:स्थितीत रहाणार, तोपर्यंत आपल्याला ह्या अनिश्चितपणाच्या आनंदाची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे. आणखी जास्त पोलिस आणि आणखी जास्त संरक्षण हे केवळ तात्पुरते उपाय आहेत - कायमचे नाही.
(टाळ्या).
* * *
-    आणि तुम्हाला अस वाटत मि. डी विलिअर्स, की शाळांच्या संख्येत भर पडल्याने काळ्या बाल गुन्हेगारांच्या प्रमाणात घट होणार आहे?
-    मला खात्री आहे, सभापती महोदय.
-    तुमच्याकडे शाळेत जाणाऱ्या मुलांची आकडेवारी आहे?
-    सभापती महोदय. जोहानसबर्गमध्ये दहापैकी चार मुलं सुद्धा शाळेत जात नाहीत. आणि त्या चारांपैकी एक मुलही सहाव्या इयत्तेपलीकडे जात नाही. दहापैकी सहा मुलांच शिक्षण गल्ली-बोळामध्ये घडतंय.
-    मला मि. डी विलिअर्सना एक प्रश्न विचारायला अनुमती आहे, सभापती महोदय?
-    जरूर, मि. स्कॉट. विचारा.
-    मि. डी विलिअर्स ह्या शाळांचा खर्च कोणी द्यावा अस तुमच मत आहे?
-    आपण द्यावा. काळ्या आई-बापांना हा खर्च परवडेपर्यंत आपण वाट बघितली, तर आपण इतर अनेक मार्गांनी फार मोठी किंमत मोजू.
-    तुम्हाला अस नाही वाटत मि. डी विलिअर्स, की जास्त शाळांचा अर्थ फक्त जास्त हुशार गुन्हेगार?
-    मला खात्री आहे की हे विधान बरोबर नाही.
-    मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एक पोरगा होता माझ्याकडे, सहावी पास झालेला. एकदम जंटलमन, सूट-बूट-टाय व्यवस्थित! चांगला वागवत होतो मी त्याला, चांगले पैसे देत होतो. आणि तुम्हाला माहित्येय मि. डी विलिअर्स, हा हा हरामखोर...
* * *
-    मी तुम्हाला सांगतो जॅकसन, ओळखपत्रांचा नियम लागू करायलाच हवा.
-    त्या ओळखपत्रांचा फायदा होत नाही हो.
-    नीट अंमलात आणला तर नक्की फायदा होईल.
-    पण माझ म्हणणं आहे, तो अंमलात आणणंच अशक्य आहे. तुम्हाला माहित्येय आपण दरवर्षी एक लाख काळ्यांना तुरुंगात पाठवतो; तिथे ते खऱ्या अट्टल गुन्हेगारांबरोबर मिसळतात.
-    हे तेवढंस खर नाही हं, जॅकसन. मला माहिती आहे, त्यांना रस्ते-दुरुस्ती नाहीतर शेत-मजूर असली कामं सुद्धा देऊन बघण्याचे प्रयत्न चालू आहेत.
-    ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे. पण माझा मूळ मुद्दा बदलत नाही त्याने - की ओळखपत्रांचा नियम अंमलात आणणं कठीण आहे. त्यांना रस्त्यावर पाठवा, नाहीतर शेतात पाठवा नाहीतर आणखी कुठे हव तिथे मसणात पाठवा. एक लाख लोकांना गुन्हेगार ठरवणं मुळात फार चांगली गोष्ट नव्हे.
-    मग काय करायला हव?
-    आता तुम्ही विचारलंत, तर सांगतो मी. मला माहिती नाही काय करायला हव. पण ओळखपत्र उपयोगाची नाहीत एवढ नक्की.
* * *
-    आम्ही ना ग, झू लेक ला गेलो होतो. पण छे बाई, अगदी असह्य होतं! मला खरच कळत नाही बाई, ह्या मेल्या काळ्यांना वेगळे दिवस का नाही राखून ठेवत?
-    मी तर मुळी आजकाल रविवारी तिथे जाणच सोडलंय. जॉन आणि पेनिलोपला घेऊन आम्ही दुसऱ्या कुठच्या तरी दिवशी जातो. पण मी बाई तशी मोकळ्या मनाची आहे. बिचारे जाणार तरी कुठे ना ग?
-    त्यांच्यासाठी वेगळी पार्क का नाही करत?
-    हिलसाइड गोल्फ कोर्सच्या एका भागात त्यांच्यासाठी मनोरंजनाच काहीतरी म्हणून करायचा होता म्हणे बेत. पण त्यावरून एवढा तमाशा झाला, की ते सगळ शेवटी रद्दच करावं लागल.
-    अगबाई, पण ते तर शक्यच नव्हत. एवढा असह्य गोंगाट केला असता ह्या लोकांनी.
-    मग आता ते फुटपाथ वर राहताहेत आणि नाक्यावर घोळके करून उभे असतात तेव्हाही गोंगाट तसाच असह्य असतो. पण तू राहतेस तिथे तुला काही काळजी नाही म्हणा.
-    एवढ मोठ खोचून बोलायला नकोय काही. एखाद मोठ्ठ मनोरंजन केंद्र का नाही बांधत त्यांच्यासाठी कुठेतरी लांब? जाऊ देत फुकटच्या बसनी.
-    उदाहरणार्थ, कुठे बांधायचं?
-    फार प्रश्न विचारत बसतेस हं तू पण. बांधायचं , शहरात.
-    किती वेळ लागेल त्यांना तिथे जायला? आणि परत यायला? आणि किती तास सुट्टी देतेस तू रविवारी तुझ्या नोकरांना?
-    छे बाई, फारच गरम होतंय इथे बोलत बसायला. चल, तुझी रॅकेट आण; त्या बोलावतायत बघ आपल्याला. बघितलस, मिसेस हार्वी आणि थेल्मा. ऐकलस ना, पार कचरा करून टाकायचा हं दोघींचा.
* * *
काही लोक मागणी करताहेत की जराही विलंब करता दक्षिण आफ्रिकेची दोन भागात विभागणी व्हावी - एक भाग फक्त गोरयांसाठी. दुसरा भाग फक्त काळ्या लोकांसाठी - जिथे ते शेती करू शकतील, खाणी चालवू शकतील आणि स्वतःचे कायदे करू शकतील. दुसरे काही मागण्या करताहेत, काळ्या लोकांची आवारं नष्ट करायला हवी म्हणून. ह्या पद्धतीमुळे, काळे पुरुष बायका-मुलांना मागे सोडून शहरात येतात, जमातव्यवस्था आणि घरं आणि माणस मोडून पडतात. त्याऐवजी, खाणींच्या आणि उद्योगधंद्यांच्या मजुरांसाठी लहानशी गावं वसवावीत. चर्चच्या सुद्धा मागण्या आहेत. इंग्लिश भाषिक चर्च मागताहेत जास्त शिक्षण द्या, जास्त संधी उपलब्ध करा, काळ्या मजुरांवरचे आणि उद्योगांवरचे नियम शिथिल करा म्हणून. तर आफ्रिकान्स भाषिक चर्चचं म्हणण आहे, की काळ्या लोकांचा विकास त्यांच्याच मार्गांनी व्हावा. त्यांनीच आपल्या लोकांना समजावून द्याव, की जुन्या घरगुती चाली-रितींचा ऱ्हासच काळ्या लोकांच्या नैतिक अधःपतनाला कारणीभूत आहे. पण समाजात, राजकारणात किंवा चर्चमध्ये मात्र समानता मिळणार नाही.
* * *
शेकडो हजारो आवाज आरडून-ओरडून सांगताहेत काय करायला पाईजेल आहे. एखाद्यानी करायचं तरी काय, जेव्हा एकजण म्हणतो हे करा आणि दुसरा म्हणतो ते करा. जिथे काळे लोक एवढ्या प्रचंड संख्येनी गोरयांपेक्षा जास्त आहेत, अशा ह्या देशात शांततेनी राहण्याचा मार्ग आखायचा कसा? काहीजण म्हणतात, पृथ्वीमातेच्या पोटात अमाप संपत्ती आहे, आणि एकाला जास्त मिळाल, म्हणून दुसऱ्याला लगेच कमी नको मिळायला; एकाची प्रगती काही आपोपाप दुसऱ्याची अधोगती नसते. ते म्हणतात, मजुरांना गरीब ठेवणारा देश स्वतःच गरीब रहातो, आणि मजुरांना चांगला मोबदला मिळाल्याने बाजारपेठांची आणि उद्योगधंद्यांची भरभराटच होते. दुसरे काही म्हणतात, नाही हे धोक्याच आहे. कारण समृद्ध कामगारवर्ग नुसता जास्त खरेदी करणार नाही, तो जास्त वाचेल, विचार करेल, प्रश्न विचारेल आणि कायमचा मूक आणि पददलित रहाणार नाही.
कोणाला माहित ह्या देशाची रचना कशी करावी. कारण, आम्हाला नुसती आमची मालमत्ता गमावण्याची भिती नाहीय, आमच वर्चस्व, आमच गोरेपणच गमावून बसण्याची भिती आहे. काहीजण म्हणतात, गुन्हेगारी वाईट आहे, पण परिस्थिती ह्याहीपेक्षा वाईट असू शकते. त्यापेक्षा, आहे ते कवटाळून बसुया, कायमची भिती ही त्याची किंमत आहे अस समजू. दुसरे काही म्हणतात, किती काळ ही अशी भिती सहन करायची? हे एवढे सगळे विचार ह्या भितीपोटीच तर मनात येतात ना?
* * *
आम्हाला नाही माहिती, आम्हाला नाही समजत! आम्ही आला दिवस कसातरी पार पाडू. दारांना जास्त मोठी कुलुपं लावू. शेजारच्या त्या मस्तवाल कुत्रीला पिल्ल झाली, की त्यातलं एखादं कुत्रं चांगल धिप्पाड असेल त्याला बाळगू. आमच्या हातातल्या पर्स जास्त घट्ट धरून ठेवू. आणि ते चांदण्यातल सौंदर्य, प्रेमिकांची कुजबुज वगैरे सगळं - बंद. रात्रीबेरात्री जरा जास्त घेऊन घरी चालत येण - बंद. चांदण्या रात्री उघड्या माळावर फिरायला जाण - बंद. आम्ही जास्त दक्षता बाळगू, आयुष्यातून हे वजा करून टाकू, आणि त्याला अर्धचंद्र देऊ. स्वतःभोवती काळजीच आणि सुरक्षेच कुंपण उभारू. हो, होतील आमची आयुष्यं संकुचित, पण ती आयुष्य उच्चवर्गियांची असतील. राहू आम्ही भितीच्या छायेत, पण ती भिती अज्ञाताची तरी नसेल. असेल आमचा आत्मा कोंडलेला, पण आयुष्याची ज्योत तर विझणार नाही - परडीखाली हळूहळू तेवत तरी राहील - भविष्यात येणाऱ्या एखाद्या दिवशी, पुढची एखादी पिढी आनंदानी मोकळा श्वास घेऊ शकेल म्हणून.
तो दिवस कसा येईल, कधी येईल - हा विचार मात्र आम्ही मनातून काढूनच टाकू.
* * *
पार्कवॉल्ड मध्ये आज रात्री सभा आहे, काल रात्री टर्फॉन्टेनमध्ये होती तशीच. उद्या रात्री मेफ़ेअरमध्येही असेल. जास्त पोलिसांची मागणी होईल, काळ्या दरोडेखोरांना जास्त कठोर शिक्षा द्यायची मागणी होईल, सशत्र घरफोड्यांना मृत्युदंडाची मागणी होईल. कदाचित ह्या देशात राज्य कोणाच आहे हे काळ्या लोकांना स्पष्ट दाखवून देण्याच्या धोरणाची मागणी होईल. कम्युनिस्टांवर आणि त्यांच्या काफिर साथीदारांवर जास्त नियंत्रण घालण्याची मागणी होईल.
डाव्या साम्यवादी पक्षांनीही सभा बोलावली आहे. युरोपीय आणि अ-युरोपीय वक्त्यांना चर्चेसाठी बोलावलं आहे - 'देशी गुन्हेगारीच्या प्रतिबंधासाठी दूरगामी योजना' ह्या विषयावर चर्चा आहे. चर्च संघटनेनीही सभा बोलावली आहे 'देशी गुन्हेगारीची मूळ कारणं' ह्या विषयावर चर्चा करायला. पण त्या सभेवर बहुतेक शोकाची अवकळा असेल - कारण त्यांच्या प्रमुख वक्त्याचा, श्री आर्थर जार्विस ह्यांचा, पार्कवॉल्डमध्ये नुकताच खून करण्यात आला आहे.
* * *
ह्या आपल्या लाडक्या मातृभूमीच्यासाठी दोन आसव डोळ्यात उभी राहू देत. त्या अजून उदरातच असलेल्या, आमच्या भितीचा वारसा रक्तात बाळगणाऱ्या बाळाच्यासाठी दोन आसव डोळ्यात उभी राहू देत. त्याला सांगा, ह्या मातीवरती फार प्रेम नको करू. त्याला सांगा, तुझ्या बोटांमधून गुदगुल्या करत पाणी जेव्हा झिरपेल तेव्हा फार खुदुखुदू नकोस हसू. त्याला सांगा, मावळतीचा सूर्य जेव्हा सबंध माळाला आग लागल्यासारखा आसमंत लालबुंद करून सोडेल ते फार स्तब्धपणे बघत उभा नको राहू. त्याला सांगा, ह्या देशीच्या पक्षांच्या किलबिलाटानी फार आनंदून नको जाऊ, इथल्या नद्यांवर आणि पर्वतांवर फार जीव नको टाकू. कारण एक दिवस भिती हे सगळ तुझ्यापासून हिरावून घेऊन जाईल.
* * *
-    मि. सिमांगु? 
-    कोण, मिसेस दलेला - एंड स्ट्रीट वर राहणाऱ्या!
-    मि. सिमांगु, माझ्याकडे पोलिस आले होते.
-    पोलिस?
-    होय, त्या म्हाताऱ्या उम्फुन्डीसच्या मुलाची चौकशी करायला. ते त्याला शोधताहेत.
-    कशासाठी?
-    त्यांनी काही सांगितलं नाही.
-    फार गंभीर वाटतंय का?
-    वाटल तर तसं.
-    मग पुढे?
-    मी घाबरले उम्फुन्डीस. मी त्यांना पत्ता सांगून टाकला मिसेस म्कीझे, ७९ ट्वेंटी थर्ड अव्हेन्यू, अलेक्झांड्रा.
-    तुम्ही त्यांना पत्ता सांगून टाकलात?
तो दाराशी गप्प उभा राहिला.
-    उम्फुन्डीस, माझ चुकलं का?
-    नाही, तुमच काही चुकलं नाही.
-    मी घाबरले होते.
-    हे बघा बाई, तो कायदा आहे. कायदा आपल्याला पाळायलाच हवा.
-    म्हणजे मग ठीक आहे, उम्फुन्डीस.
त्याने त्या साध्यासुध्या बाईचे आभार मानले आणि तिला सांगितलं जपून जा. एक क्षण उभा राहिला आणि चटकन त्याच्या खोलीत गेला. त्याने ड्रॉवरमधल्या पाकिटातून नोटा काढल्या, त्यांच्याकडे खेदानी एक दृष्टीक्षेप टाकला, निर्णय घेतला आणि त्या खिशात घातल्या. निर्णय घेतला आणि खुंटीवरून  हॅट घेतली. कपडे बदलून, समोरच्या मिसेस लिथबींच्या घराकडे मात्र निर्णय ठरत नसल्यासारखा बघत राहिला, खेदानी मन हलवत. पण त्याला उशीर झाला आहे. दार उघडताच, कुमालो बाहेर थांबलेले त्याला दिसतात.
-    दोस्त, बाहेर निघालात?
सिमांगु स्तब्ध उभा आहे, थोड्या वेळानी शेवटी म्हणतो, हो, बाहेर निघालो.
-    पण तुम्ही तर म्हणाला होतात आज तुम्ही खोलीतच बसून काम करणार आहात?
सिमांगु म्हणू शकला असता, मला वाटेल तसं मी करेन ना? पण तो गप्प राहिला, आणि म्हणाला या आत या.
-    नाही, तुम्हाला व्यत्यय आणायची माझी इच्छा नाही.
-    या आत, सिमांगु म्हणाला आणि त्याने दरवाजा ओढून घेतला. दोस्त, आत्ताच एंड स्ट्रीट वरच्या मिसेस नदेला आल्या होत्या इथे.
कुमालो जीवाचा कान करून ऐकताहेत - काही कळलं? पण त्यांच्या आवाजात भिती आहे, उत्सुकता नाही.
-    एवढंच, सिमांगु म्हणाला, की पोलिस त्यांच्याकडे तुमच्या मुलाला शोधत आले होते. तिनी त्यांना मिसेस म्कीझेंचा पत्ता दिला.
-    ते माझ्या मुलाला का शोधताहेत? कुमालोंनी अस्पष्ट थरथरत्या आवाजात विचारलं.
-    आपल्याला ते माहिती नाही. मी तिथे जायला निघतच होतो, तेवढ्यात तुम्ही आलात.
कुमालोंनी त्याच्याकडे एवढ्या दु:खानी आणि कृतज्ञतेनी बघितलं, की सिमांगुचा सगळा राग विरघळला.
-    तुम्ही एकटेच जात होतात? म्हाताऱ्यानी विचारलं.
-    एकटाच जात होतो खरा; पण आता तुम्हाला समजलंच आहे, तर तुम्हीही येऊ शकता माझ्या बरोबर.
-    पण तुम्ही जाणार कसे होतात दोस्त, बसेस तर चालू नाहीत.
-    मी टॅक्सीनी जाणार होतो, पैसे आहेत माझ्याकडे.
-    माझ्याकडेही पैसे आहेत, आणि दुसऱ्या कोणाचे पैसे वापरणं मला पटणार नाही.
-    खूप लागतील पैसे.
कुमालोंनी त्यांच्या कोटाच्या खिशातून पाकीट काढलं आणि अधीरपणी दाखवलं. हे बघा माझ्याजवळचे पैसे.
-    ठीक आहे, आपण ते वापरू. चल टॅक्सी शोधू या.
* * *
-    मिसेस म्कीझे!
ती रागानी एक पाऊल मागे घेते. 
-    पोलिस आले होते इथे?
-    हो आले होते, थोड्याच वेळापूर्वी.
-    कशाला आले होते?
-    एका मुलाच्या मागावर होते.
-    मग तुम्ही काय सांगितलं?
-    मी सांगितलं, वर्षभरापूर्वी तो गेला इथून.
-    मग, कुठे गेले ते?
-    शांती नगरात. तिला एकदम आठवतं, परत एक पाऊल मागे घेते.
-    तुम्हाला जो पत्ता माहिती नव्हता तिथे गेले का, तो खोचकपणे विचारतो.
ती त्याच्याकडे नाखुशीनी बघते. मी काय करणार, पोलिसांचे लोक होते ते.
-    ठीक आहे, काय पत्ता दिलात?
-    मला पत्ता नाही माहिती. नुसतं शांती नगर सांगितलं.
आता तिला चेव येतो. सांगितलं ना तुम्हाला, मला पत्ता माहिती नाही म्हणून!
* * *
-    मिसेस लात्सवेयॉस!
ती गोड चेहऱ्याची बाई हसून स्वागत करते आणि दारातून बाजूला होऊन त्यांना आत यायला जागा देते.
-    नाही, आत नाही येत आम्ही. पोलिस आले होते का इथे?
-    होय, उम्फुन्डीस. आले होते.
-    कशासाठी?
-    एका मुलाच्या मागावर होते.
-    कशासाठी, बाई?
-    मला माहिती नाही, उम्फुन्डीस.
-    कुठे गेले ते?
-    शाळेमध्ये, उम्फुन्डीस.
-    मला सांगा, त्याने खाजगी सुरात विचारलं, फार गंभीर प्रकरण वाटलं का?
-    मला सांगता नाही येणार, उम्फुन्डीस.
-    बर, जपून रहा.
-    जपून जा, उम्फुन्डीस.
* * *
-    गुड मॉर्निंग, दोस्त.
-    गुड मॉर्निंग, उम्फुन्डीस; तो काळा अधिकारी म्हणाला.
-    ते तरुण गोरे साहेब होते ते कुठे आहेत?
-    ते शहरात गेले. आत्ता, अगदी आत्ताच गेले.
-    पोलिस आले होते इथे?
-    आले होते; ते ही आत्ता, अगदी आत्ताच गेले.
-    कशाला आले होते?
-    एका मुलाच्या, त्या टॅक्सीत बसलेल्या म्हातारबुवांच्या मुलाच्या, अब्सलम कुमालोच्या मागावर होते.
-    कशाला हवा आहे तो त्यांना?
-    मला माहिती नाही. ते गोऱ्या साहेबांबरोबर आले तेव्हा मला माझ्या कामासाठी बाहेर जावं लागलं.
-    तुम्हाला माहिती नाही त्यांना काय हवं होत?
-    नाही, मला खरच नाही माहिती, उम्फुन्डीस.
सिमांगु गप्प राहिला. शेवटी त्याने विचारलं, फार गंभीर वाटल का प्रकरण?
-    मला माहिती नाही. मला खरच नाही सांगता येणार.
-    आणि ते गोरे साहेब, अं म्हणजे, चिडले होते का?
-    चिडले होते.
-    तुम्हाला कस माहिती?
काळा अधिकारी हसला. मी ओळखतो त्यांना.
-    आणि गेले कुठे ते सगळे?
-    पिमव्हीलला, त्या मुलीच्या घरी.
-    आत्ता, अगदी आत्ताच गेले म्हणालात ना?
-    खरच, अगदी आत्ताच गेले.
-    ठीक आहे, आम्ही निघतो. जपून रहा. आणि गोऱ्या साहेबांना सांगा, आम्ही आलो होतो.
-    जपून जा, उम्फुन्डीस. मी सांगेन त्यांना.
* * *
-    बाळ, कशी आहेस तू?
-    उम्फुन्डीस!
-    पोलिस आले होते का इथे?
-    हो, आले होते. आत्ता, अगदी आत्ताच आले होते.
-    काय पाहिजे होतं त्यांना?
-    ते अब्सलमला शोधत होते.
-    मग तू काय सांगितलस त्यांना?
-    उम्फुन्डीस, मी सांगितलं, की मी शनिवारपासून त्याला बघितलं सुद्धा नाहीय.
-    आणि का शोधत होते ते त्याला? कुमालो वेदनेनी आक्रंदून म्हणाले.
ती घाबरून मागे सरकली.
-    मला माहिती नाही.
-    पण तू विचारलं का नाहीस? ते ओरडून म्हणाले.
तिचे डोळे पाण्यानी भरून आले.
-    मी घाबरले होते.
-    कोणीच विचारलं नाही?
-    शेजारच्या बायका आल्या होत्या, त्यातल्या कोणी विचारलं असेल कदाचित.
-    कुठल्या बायका? दाखव आम्हाला, सिमांगु म्हणाला.
तिनी त्यांना त्या बायका दाखवल्या, पण त्यांनाही माहिती नव्हतं.
-    ते सांगेनात मला, त्यातली एक म्हणाली.
सिमांगुने तिला जरा बाजूला घेतलं. फार गंभीर वाटले का ते? त्याने विचारलं.
-    उम्फुन्डीस, वाटले खरे खूप गंभीर. काय झालंय? तिने विचारलं.
-    आम्हाला माहिती नाही.
-    कटकटी अनंत आहेत ह्या जगात, ती म्हणाली.
तो टॅक्सीकडे गेला, आणि त्याच्या मागोमाग कुमालो. ती मुलगी त्यांच्यामागे आपल पोट सांभाळत कशीबशी धावली.
-    ते मला म्हणाले, तो परत आला तर मी ताबडतोब त्यांना कळवायला हव.
तिच्या डोळ्यात काळजी दाटली होती.
-    काय करू मी?
-    ते म्हणाले तसं तुला करायलाच हव. आणि, आम्हालाही कळव. थांब, एक कर; तू सुपरिंटेन्डन्टच्या ऑफिसात जा, आणि त्यांना मिशन हाउसमध्ये ह्या नंबरावर फोन करायला सांग मी लिहून देतो तुला - ४९-३०४१.
-    उम्फुन्डीस, ते करेन मी.
-    मला सांग, पोलिस काही बोलले इथून पुढे कुठे जाणार ते?
-    उम्फुन्डीस, तसं काही नाही म्हणाले. पण मी त्यांना आफ्रिकान्समध्ये बोलतांना ऐकल 'आता माग काढणं कठीण आहे'.
-    जपून राहा, बाळ.
-    जपून जा, उम्फुन्डीस.
ती म्हातारबाबांना सुद्धा जपून जा सांगायला वळली, पण ते आधीच टॅक्सीत बसले होते. हातातल्या काठीवर डोक टेकवून.
* * *
-    किती झाल भाडं, सिमांगुने विचारलं.
-    दोन पौंड आणि दहा शिलिंग.
कुमालोंनी थरथरत्या हातांनी पाकीट काढलं.
-    मला तुम्हाला थोडी मदत करू दे. मला बरंच वाटेल तुम्हाला मदत केल्यानी.
-    तुम्ही फार सज्जन आहात, कुमालो कापऱ्या सुरात म्हणाले, पण दुसऱ्या कोणाला नाही, मलाच करायला हवा हा खर्च.
त्यांनी थोड्याश्याच उरलेल्या नोटांपैकी काही बाहेर काढल्या.
-    तुम्ही थरथरता आहात.
-    मला थंडी वाजते आहे, खूप थंडी वाजते आहे.

सिमांगुने निरभ्र आकाशातून उन्हाने होरपळून टाकत असलेल्या सूर्याकडे एक नजर टाकली, आणि तो म्हणाला चला, माझ्या घरी या. आपण शेकोटी पेटवू म्हणजे तुम्हाला बरं वाटेल.

Comments