भाषांतर - १३

एझेन्झेलेनी पर्यंतचा प्रवास गप्पगप्पच झाला. स्टेशनपासून अंधाश्रमापर्यंतच्या वाटेवर सिमांगुने त्याच्या मित्राला बोलत करायचा प्रयत्न केला, पण त्यांना फार बोलायची इच्छा दिसली नाही. त्यांच कशातच लक्ष दिसत नव्हत.
-    इथे असताना काय कराल तुम्ही? सिमांगुने विचारलं.
-    तुम्ही मला सांगितलं होत, तशा एखाद्या स्थळी मी निवांत बसून राहीन. तुमच काम झाल, की तुम्हाला हा परिसर दाखवायला जमेल का?
-    तुम्हाला जे आवडेल ते अवश्य करा.
-    मी तुमची निराशा केली असेल ना?
-    मला सगळ समजतंय. परत त्या विषयाची चर्चाही नको.
मग त्याने कुमालोंची युरोपिअन अधिकाऱ्यांशी ओळख करून दिली. ते त्यांना 'मिस्टर कुमालो' म्हणून संबोधत होते - खर तर सहसा अस कोणी करत नाही. सिमांगुने आधी काहीतरी सांगितलेलं असाव, कारण त्यांनी कुमालोंना बरोबर यायचा आग्रह केला नाही. उलट, तो अधिकारी कुमालोंना कड्यावरच्या प्रार्थनामंदिराजवळ घेऊन गेला, आणि म्हणाला जेवायची वेळ झाली की आम्ही बोलावू तुम्हाला.
ते काही काळ तिथे उन्हामध्ये बसले. त्या उन्हाच्या उबेमुळे, का खाली पसरलेल्या, दूर क्षितिजावरच्या निळ्या डोंगरांपर्यंत पोचणाऱ्या विस्तीर्ण माळाच्या सौंदर्यामुळे, निव्वळ काही वेळ गेला म्हणून, का त्या दुखावलेल्या जीवाला काही दैवी आधार सापडला म्हणून कोणास ठाऊक - पण त्यांच्या मनाला थोडी उभारी आली, भिती थोडी कमी झाली.
खरच आहे सिमांगु म्हणाला ते. ह्या एवढ्या अवाढव्य शहरात, लाखो लोक असतांना का म्हणून त्या एका गोष्टीची भिती बाळगायची! लागला होता त्यांचा मुलगा चुकीच्या मार्गाला ह्या प्रचंड शहरात. त्याच्या आधी अनेकजण तसेच चुकीच्या मार्गाला लागले होते, आणि त्याच्यानंतरही अनेकजण तसेच लागणार आहेत - ह्या सगळ्या प्रश्नांवरचा जादुई इलाज माणसाला सापडत नाही तोपर्यंत. पण म्हणून तो एखाद्या माणसाला मारेल! गोऱ्या माणसाला! छे:, त्यांना प्रयत्न करकरून त्याच्याबद्दल अस काहीही आठवेना ज्यामुळे हे शक्य होईल. त्यांचे विचार त्या मुलीकडे, होणाऱ्या नातवंडाकडे वळले. एखाद्या प्रिस्टला अशा परिस्थितीत नातवंड व्हाव, हे खरच दुर्दैव. पण ठीक आहे, त्याच्यावर काही उपाय करता येईल. एकदा त्यांच लग्न झाल, की जे चुकल त्याची थोडी दुरुस्ती करता येईल. कदाचित त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या बरोबर डोत्शेनीला परत येतील. कदाचित, ते आणि त्यांची बायको मिळून जे मुलाला देऊ शकले नाही ते नातवन्डाला देतील. पण कुठे चुकल त्यांच? त्यांनी मुलाला काय दिल, किंवा दिल नाही - म्हणून त्यांचा मुलगा चोऱ्या करायला लागला, निर्वासितासारखा एकीकडून दुसरीकडे भरकटत राहिला, एका पोरसवदा मुलीबरोबर रहायला लागला, एका बेवारशी मुलाचा बाप बनला? त्यांनी स्वतःची समजूत काढायचा प्रयत्न केला - ते सगळ जोहानसबर्गमुळे झाल. पण पुन्हा एकदा, भितीनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. त्यांचा मुलगा त्या मुलीला, आणि तिच्या पोटातल्या बाळाला सोडून गेला, त्या गोऱ्या माणसाने मिळवून दिलेली नोकरी सोडून गेला, पुन्हा निर्वासितासारखा भरकटला. आणि काय करतात हे भटके लोक? सगळे नियम, कायदे आणि बंधन झुगारून रहातात ना? कशावर श्रद्धा नाही, कसलंही उद्दिष्ट नाही! कोणावरही हात उगारायचा! जो कोणी त्यांच्या क्षुद्र लालसेच्या आड येईल त्याला मारायचं!
माणसामधल नेमक काय मोडून पडत असेल, जेव्हा तो दुसऱ्याचा जीव घेऊ शकतो? दुसऱ्या धुगधुगत्या शरीरामध्ये सुरा खुपसू शकतो? जित्याजागत्या डोईवर कुऱ्हाड हाणू शकतो? भेदरलेल्या, उघड्या डोळ्यांच्या मध्ये प्रहार करू शकतो? धडधडत्या छातीमध्ये बंदुकीची गोळी झाडू शकतो?
ह्या भयानक गोष्टींच्या नुसत्या विचारांनी शहारा आला त्यांच्या मनात! पण एकपरीनी ह्याच भयानक विचारांनी त्यांना थोडा दिलासा मिळाला - नाही, डोत्शेनी मधल्या एवढ्या वर्षांमध्ये, त्यांच्या मुलाच्या बालपणामध्ये अस काहीच - काहीच - नव्हत, की तो असलं अघोरी कृत्य करू शकेल. नाही, सिमान्गुचच बरोबर आहे. ह्या शंका, हे अज्ञान, हे रहस्यच फक्त त्यांना सारखी त्या एका गोष्टीची काळजी करायला लावतंय - एवढ्या मोठ्या, लाखो लोकांच्या शहरामध्ये.
ते सुस्कारा सोडून चांगल्या, भविष्याच्या गोष्टींचा विचार करायला लागले. ते आणि त्यांची बायको मिळून, आयुष्याच्या सायंकाळी, त्यांच्या मुलासाठी, सुनेसाठी, नातवंडासाठी, गर्ट्रूड आणि तिच्या मुलासाठी कस घर उभारतील.
जोहानसबर्गमधून डोत्शेनीला परतताना त्यांना आता आयुष्याची जास्त सखोल जाण आलेली आहे. स्वतःच्या मर्त्यपणाची, चुका करण्याच्या क्षमतेची जाणीव आलेली आहे. त्यांच्या स्वतःच्या बहीणचच तर पाऊल एवढं वाकड पडल होत ना? मुलगा चोऱ्या करत होता ना? आणि ते स्वतः? एका बेवारस मुलाचा आजोबा? दुख्ख झालं ह्या सगळ्या विचारांनी, पण त्यांनी कटुता मात्र बाजूला सारली. ज्या चुका झाल्या, जे टाळायला हव होत त्याची पूर्ण समज आली, की त्या टाळण, नवीन काही उभारण जास्त सोप जात. ते परत जातील ते शाळांबद्दल एक नवीन आणि जास्त उत्साह घेऊन. नुसत मुलांना लिहा-वाचायला आणि आकडे मोजायला शिकवणाऱ्या शाळा नव्हेत; पण जिथे त्यांना आयुष्याच, जीवनाचं, कुठल्याही ठिकाणी नीट जगायचं शिक्षण मिळेल. त्यांच्या खेडेगावातल्या शाळांमध्ये अस काही शिकवायचं, की मुलं दूरच्या मोठ्या शहरांमध्ये रहायला तयार झालेली असतील. जुने मोडकळीस आलेले जमातीचे कायदे-कानू सोडून, त्याजागी नवीन, शहरात उपयोगी पडतील असे रिती-रिवाज शिकवायचे. सभोवती धूळदाण झालेल्या, बेचिराख झालेल्या मैदानात बसलेल्या माणसाने स्वप्न बघावी, तसे ते काही काळ ह्या स्वप्नांमध्ये रममाण झाले.
खर आहे ते, त्यांनी मान्य केल स्वतःशी. जमात व्यवस्था तुटून पडली होती. आता परत दुरुस्त नाही होणार ती. त्यांची मान खाली झुकली. हवेच्या झोतांवर उंच उडत असलेल्या माणसाला एकदम ते जादूचे पंख छाटल्याची जाणीव व्हावी, आणि खाली खोलवर दिसणाऱ्या जमिनीकडे बघतांना भितीने त्याच्या पोटात गोळा यावा - तसं कुमालोंना झालं. जमात व्यवस्था मोडून पडली होती - आणि परत दुरुस्त नाही होणार ती. ज्या व्यवस्थेनी त्यांच्या आणि त्यांच्या वाड-वडिलांच्या आयुष्याची घडी बसवली होती - ती मोडून पडली होती. माणस दूर दूर जात होती, मुल आणि मुली दुरावत होती, आणि धन्य जेमतेम पुरुषभर उंचीला पोचत होत.
-    चला, जेवण तयार आहे.
-    एवढ्यात!
-    तुम्ही बराच वेळ बसलाहात इथे.
-    माझ्या लक्षात नाही आलं.
-    काही सापडलं?
-    काही नाही.
-    काहीच नाही?
-    नाही, फक्त आणखी भिती आणि दुख्ख. जगात भिती आणि दुख्खापलीकडे काही नाहीच आहे.
-    बंधू...
-    काय?
-    मला बोलायला कठीण जातंय.
-    बोला ना. हक्क आहे तुम्हाला - इतर कोणापेक्षाही जास्त तुम्हाला हक्क आहे बोलायचा.
-    मग माझ ऐका, आणि हे विचार सोडून द्या. हा वेडेपणा तर आहेच. पण हे पाप आहे - निव्वळ वेडेपणापेक्षा फार जास्त वाईट. मी एक प्रिस्ट म्हणू तुम्हाला सांगतो आहे हे.
कुमालोंची मान झुकली. फादर, बरोबर आहे तुमच, मी इथे एकट्यानी बसून राहणार नाही.
* * *
फार सुंदर जागा आहे ही, एझेन्झेलेनी. अंधांना, जे त्यांच्या दृष्टिहीन जगात कसेबसे दिवस कंठत होते, इथे एक अनोखी दृष्टी मिळाली आहे. इथे ते एवढ्या गोष्टी तयार करतात, जे त्यांना स्वतःला डोळस असूनही उभ्या आयुष्यात जमल नसत. घट्ट विणीच्या, वेताच्या मजबूत टोपल्या. वेगवेगळ्या रंगांचे वेताचे धागे, जादुनी गुंफल्यासारखे, एकमेकातून जाणारे, लालावर लाल आणि निळ्यावर निळी रेखीव रचना करणारे - दृष्टिहीन हातांच्या मदतीनी. ते बऱ्याच लोकांशी बोलले - त्या लोकांचे अंध डोळे आंतरिक प्रकाशाने झळाळत होते. गोऱ्या माणसाच्या - इंग्लिश आणि आफ्रिकान्स भाषिक - धर्मादाय मदतीमुळे उभे राहिलेला हा अंधाश्रम. खरच इथे, इंग्लिश आणि आफ्रिकान्स गोऱ्यांनी एकत्र येउन अंधांना दृष्टी देण्याबाबत काळ्यांचे डोळे उघडले होते.
त्यांचा मित्र सिमांगु दुपारी त्यांनी बघितलेल्या प्रार्थनामंदिरामध्ये प्रवचन देणार होता. जमलेले सगळे लोक एकाच चर्चचे नसल्याने, व्यासपीठावर क्रूस ठेवलेला नव्हता. पण तिथल्या दोन उभ्या-आडव्या भिंतींचाच क्रूस तयार झाला होता. सिमांगु त्याची धर्मोपदेशकाची खास वस्त्रही घालणार नव्हता; ती उद्या सकाळी, सगळे त्याच्याच चर्चचे लोक असतील तेव्हा.
* * *
सिमांगुने पुस्तक उघडले आणि प्रथम त्यातले उतारे वाचून दाखवले. कुमालोंना कल्पना नव्हती त्यांच्या मित्राचा आवाज इतका सुंदर होऊ शकतो. सोनेरी होता हा आवाज. आणि वाचत असलेल्या शब्दांबद्दल त्यात प्रेम दाटलेलं होत. तो आवाज हेलावत होता, आघात करत होता, कापत होता - एखाद्या म्हाताऱ्याच्या आवाजासारखा किंवा वादळातल्या नाजूक पानासारखा नव्हे - गंभीर घंटानादासारखा. तो आवाज नुसता सोनेरी नव्हता, सोन्यासारख्या मनाच्या माणसाचा तो आवाज होता, सोन्याच्या मोलाचे शब्द असलेल पुस्तक वाचणारा तो आवाज होता. एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र कुठे बघायला मिळतात. लोक स्तब्ध होते, कुमालो स्तब्ध होते.
मी, परमेश्वर, तुला साद घालतो आहे.
मी तुझा हात धरेन आणि तुझी सोबत करेन
येशु ख्रिस्ताच्या रूपाने मी तुला वचन देतो,
तो ख्रिश्चन मार्गाचा प्रकाश दाखवेल,
आंधळ्यांना त्यांचे डोळे उघडून,
तुरुंगातल्या कैद्यांना बाहेर मोकळ्यावर आणून,
आणि तुरुंगाच्या बाहेर काळोखात बसलेल्यांना सुद्धा
* * *
आता आवाज चढला. ती झुलू भाषा कायापालट होऊन एका वेगळ्याच उंचीवर पोचली. आणि माणसं एका उंचीवर पोचली, आपल्या सगळ्यांच्यापेक्षा एका महान अस्तित्वाच्या जाणीवेनी. लोक गप्प होते, कारण तेच तर नव्हते का आंधळे? कुमालो गप्प होते, कारण त्यांना माहिती होत कुठच्या एका आंधळ्याबद्दल सिमांगु हे बोलतो आहे.
'मी आंधळ्यांना अशा रस्त्याने घेऊन येईन, ज्याची त्यांना माहिती नव्हती. त्यांना असे मार्ग दाखवेन जे त्यांना पूर्णपणे अपरिचित होते. त्यांच्यासमोरचा अंधार मी प्रकाशात बदलून टाकेन, आणि वेड्या वाकड्या गोष्टी सरळ करून टाकेन. हे सगळ मी त्यांच्यासाठी करेन, त्यांची सोबत कधी सोडणार नाही.’
* * *
होय, ते माझ्याशीच बोलताहेत. तिळमात्रही शंका नाही मला. मी तिथे बसून मारे जेव्हा आपल्या जगण्याच, झगडण्याच आणि मरणाच गूढ उकलायचा प्रयत्न करतो, आपल्या जगण्याच आणि झगडण्याच प्रयोजन शोधतो, तेव्हा इथे माणसं अंधांची सेवा करायला येत असतात, गोरे लोक काळ्या आंधळ्यांसाठी मदत करत असतात. ह्या घटकेला, माझ्या समोरच्या अंधाराच प्रकाशात रुपांतर करणारा हा मित्र कोणी दिला मला? ह्या घटकेला, एका म्हाताऱ्याला दिलासा मिळवून देण्यासाठी हे ज्ञान एवढ्या तरुण वयात कोणी दिल ह्यांना? माझ्या मुलाने सोडून दिलेल्या त्या तरुण मुलीसाठी अनुकंपा कोणी जागी केली माझ्या हृदयात?  
होय, ते माझ्याशीच बोलताहेत. इतक्या साध्या आणि शांत शब्दात. ते म्हणतात, दु:खाच्या प्रसंगी आपल्या मनाला उभारी देणाऱ्या संतांसाठी आपण ऋणी राहायला हव. आणि का नाही राहणार आपण ऋणी? नाही राहिलो, तर दुनियेत संतच शिल्लक राहणार नाहीत. जर येशु स्वर्गाचा सम्राट असेल, मानवजमातीचा सम्राट असेल; तर काय नाही करू शकणार आपण - कितीही मोठी असली आपली दु: तरी?
मी ऐकतोय बंधू! तुमचा एक शब्दही मी कानावेगळा करत नाहीय.
त्यांच प्रवचन संपत आलंय, मला जाणवतंय ते. जे बोललेत ते एवढ ठाम आहे, कोरीव आहे, घोटलेल आहे आणि परिपूर्ण आहे. ते पुस्तक उघडून पुन्हा वाचताहेत - माझ्यासाठी.
'तुला माहिती नाही, तू ऐकल नाहीस
की अजरामर परमेश्वर, जगन्नियंता
स्वर्गाचा आणि पाताळाचा निर्माता
कधीच कास सोडत नाही, कधीच थकत नाही?'
त्यांचा आवाज पुन्हा चढतो, झुलू भाषा पुन्हा एका उंचीवर जाते, माणूस पुन्हा एका उंचीवर पोहोचतो.
'तरणीताठी मुलं चक्कर येउन, थकून खाली कोसळतील,
पण देवाचे भक्त - त्यांच्या शक्तीच मात्र पुनरुज्जीवन होईल
ते गरुडांसारखी भरारी मारू शकतील
ते वेगात पळू शकतील आणि तरीही थकणार नाहीत
ते अमर्याद चालू शकतील आणि तरीही चक्कर येउन पडणार नाहीत.’
* * *
लोक सुस्कारा टाकतात, आणि कुमालो सुस्कारा टाकतात - एखाद्या महान अनुभवानंतर येणारा सुस्कारा. प्रवचनांबद्दल सिमांगु प्रसिद्धच आहेत म्हणे. जोहानसबर्गमध्ये म्हणतातच की सरकारच नशीब की सिमांगु ह्या नश्वर जगताबद्दल प्रवचन देत नाहीत. म्हणूनच ते लोकांना स्वर्गाच्या प्रवेशासाठी मार्गदर्शन करतात, प्रिटोरियावर कूच करून जायला नाही. गोरे लोक सुद्धा चकित होऊन आश्चर्याने म्हणतात 'काय सुंदर भाषा आहे ना. ह्या रानटी लोकांच्या वंशजाकडून? आताआतापर्यंत हे लोक त्यांच्या नराधम मुखियाच्या राज्यात फक्त विध्वंस आणि लाखोंची हत्त्या करत होते.
मात्र काहींना सिमांगुचा रागही येतो. कारण, सबंध देशाला चेतवू शकेल असा हा सोन्यासारखा आवाज फक्त ह्या पारमार्थिक गोष्टींबद्दलच बोलतो. असा एखादा आवाज जर सगळ्यांना एकत्र आणू शकला, तर लोकांना ह्या दैन्य आणि दारिद्र्यातून मुक्त करू शकेल. त्याचं म्हणणं, लोक आजूबाजूला रस्त्यांमध्ये पिचत, झगडत, मरत असतांना हा आवाज कुठच्यातरी पारलौकिक जगाबद्दल बोलत रहातो. ते म्हणतात, हा काय खुळचटपणा आहे, जो भुकेनी व्याकूळ झालेल्या लोकांना, दु:खानी ग्रासलेल्या लोकांना, मरणोन्मुख लोकांना धीर आणि आशा आणि सुख देऊ शकतो. हे वेडपट लोक कसे काय शांतपणे, तंद्री लावून ह्या माणसाचं प्रवचन ऐकत बसतात; त्याच संपलं की सुस्कारे काय सोडतात. त्यांच्या खपाटीला गेलेल्या पोटामध्ये काय ह्याचे रिकामे शब्द भरतात की काय!
कुमालो त्याच्याकडे गेले.
-    बंधू, मला बरंच बर वाटतंय आता.
सिमांगुचा चेहरा एकदम उजळतो. त्याच्या बोलण्यात गर्वही नाही, आणि लटका विनयही नाही.

-    मी तुमच्यापर्यंत हर मार्गांनी पोचायचा खूप प्रयत्न केला, पण मी नाही जवळ येऊ शकलो. ईश्वराचे आभार माना, आणि समाधानात रहा.

Comments