नटसम्राट - असे नाटक होणे नाही:

प्रत्येक कथा-कादंबरीचं स्वप्न असतं, मोठं झालं की आपलं नाटक व्हावं. प्रत्येक नाटकाचं स्वप्न असतं, मोठं झालं की आपला सिनेमा व्हावा. किंबहुना, मोठं होण्याची ती लक्षणं मानली जातात. कारण साहित्यापेक्षा रंगमंच आणि नाटकापेक्षा सिनेमा ही जास्त परिपूर्ण माध्यमं आहेत, त्यांच्यामध्ये अभिव्यक्तीला आणि आविष्काराला जास्त वाव आहे.

'नटसम्राट' नाटकाचा प्रॉब्लेम असा, की हे नाटक मुळातच मोठं होतं, खूप मोठं! शेक्सपिअरच्या किंग लिअर वरून स्फुरलेलं, कुसुमाग्रजांच्या सिद्धहस्त लेखणीमधून उतरलेलं ते एक तरल काव्यच होतं. त्याला आणखी मोठं करणं काम कठीण होतं. शेवटी मोठं करणं म्हणजे काय; सिनेमा हे वेगळ माध्यम आहे. त्याचा आवाका खूप मोठा होऊ शकतो. नाटकात - विशेषतः मराठी नाटकात - दाखवता येणं कठीण असे प्रसंग सिनेमात दाखवता येऊ शकतात. त्याचं बजेट मोठं असतं, त्यामुळे खोट्याखोट्या तुटपुंज्या सेट्सवर काम चालवून नेण्यापेक्षा, प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून राहण्यापेक्षा, गोष्टी आणि स्थळं प्रेक्षकांच्या नजरेसमोर प्रत्यक्ष उभी करता येतात. कमीत कमी पात्रांमध्ये काम चालवून नेण्यापेक्षा, खरे कलाकार उभे करून ती पात्रं सजीव करता येतात. स्टेशनवरचा प्रसंग दाखवतांना, नुसतं आगगाडीच्या आवाजावर अवलंबून न राहता, प्रत्यक्ष आगगाडीचं चित्रीकरण करता येतं. कथानकाच चित्रण जास्त श्रीमंत आणि संपृक्त करता येतं.

पण कधीकधी, ह्या जडजवाहीरांनी मढवण्यामध्ये, रेशमी जरतारी वस्त्रांनी लपेटण्यामध्ये, छोट्याशा कथानकाचा आत्मा गुदमरु शकतो. 'नटसम्राट' सिनेमाची तशी गत झाली असं मला वाटतं. स्तुत्य, कौतुकास्पद, प्रामाणिक प्रयत्न - पण अंती मूळ नाटकाचीच जास्त ओढ लावणारा, असं मला वाटलं.

सुरुवातीच्या श्रेयनामावलीमध्ये 'कुसूमाग्रज' असं वाचलं (‘सु’ -हस्व हवा), तेव्हाच पाल चुकचुकली होती, असाच ढिसाळपणा पुढेही असणार की काय म्हणून. दुर्दैवानी ती भिती खरी ठरली. पात्रं वाढवून कथा फुलवता येते हे खरं असलं, तरी पात्रांची भाऊगर्दी करून कोणालाच न्याय मिळत नाही - पात्रांना काय आणि कथेला काय. पहिल्याच सीनमध्ये दिसणारा 'अमेरिकेहून' परतलेला (हिंदी सिनेमात 'आयटेम सॉंग'ची मागणी असते म्हणे, तशी मराठी सिनेमात हे अमेरिका सोडून आलेलं पात्र हवंच अशी मागणी असावी) तरुण का आणला होता - हे माझ्या बालबुद्धीच्या आवाक्यापलीकडे होतं. आणखी काही दृश्यांमध्ये तो होता एवढं सोडलं, तर त्याच्या असण्याने काय साधलं ह्याचा छडा लागला नाही. झोपडपट्टीतल्या दारुड्याचं काम करणाऱ्या संदीप पाठकची तीच कथा - एवढ्या गुणी नटाला इतक्या क्षुल्लक पात्रामध्ये फुकट घालवल्याचं दुःख तर होतच, पण मुळात ह्या पात्रांचं प्रयोजनच स्पष्ट झालं नव्हतं. हा व्यक्तीरेखांचा अनिश्चितपणा, ह्यातून आपल्याला नक्की काय साधायचं आहे ह्याचा गोंधळ, ह्यामुळे मूळ कथानक जास्त सबळ होण्याऐवजी फापटपसाराच अती होतो. विक्रम गोखलेंचं पात्र बरंच ठसठशीत आणि चांगलं रेखाटलं होतं. गणपतरावांच्या आयुष्याचा एक वेगळा पैलू त्यात उलगडता आला असता. नट 'सम्राटाचे' विजयी क्षण, लोकांच्या हृदयावर त्यांनी कसा कबजा मिळवला दाखवता आलं असतं. गोखल्यांचा अभिनयही अतिशय सुंदर! मुलबाळ नसलेल्या, एका प्रतिस्पर्धी, किंवा किमान समकालीन नटाचा समावेश juxtaposition म्हणून खूप कल्पक होऊ शकला असता. पण ह्या उलट, ही व्यक्तिरेखा प्रामुख्याने फक्त गणपतरावांचं तेजोवलय खच्ची करण्यातच यशस्वी ठरली, हे दुर्दैव. मृत्युशय्येवरील (कौन्तेय आणि श्रीकृष्ण) प्रसंग सुंदर चितारला आणि रंगवला असला, तरी तिथेही 'तू खरा श्रेष्ठ, का मी' ह्या चर्चेमधून पुन्हा नट ’सम्राटाच्या' सार्वभौमत्वाला फक्त तडेच जातात.

साउंड इफेक्ट्स सांभाळण्याच काम एखाद्या अत्यंत निष्पाप उत्साही तरुणाकडे असावं, ज्यांनी कधी थोबाडीत मारणं प्रकार बघितला किंवा अनुभवला नसावा. थोबाडीत मारल्याच्या आवाजावरून माझी खात्री होती, की खाणाऱ्याच्या जबड्याची शंभर शकलं होऊन ती त्याच्याच पायाशी लोळत असावीत! पण नाही, निदान दहा-बारा दात तरी हातात आले असतील? छे! गालावर निशाणी सुद्धा नव्हती मारल्याची.

शेवटी अर्थातच नाना पाटेकरांचा अभिनय! खूप निःपक्षपातीपणाने बघता सुद्धा, मला पाटेकरांचा अभिनय उंचसखल वाटला. काही प्रसंग ते अप्रतिम वठवत होते, पण महत्वाच्या ("घर देता का ..") कित्येक प्रसंगात ते कमी पडले. इथे लागुंशी तुलना होणं अटळच! लागू सबंध नाटकभर साक्षात गणपतराव होते, नटसम्राट होते; पाटेकर गणपतरावांचा अभिनय करत होते, नटसम्राट उभा करायची पराकाष्ठा करत होते. पराकाष्ठेची गंमत ही असते, की ती लोकांना दिसून चालत नाही. पाटेकरांना अप्रतिम आवाजाची देणगी आहे. फार मोठी पल्लेदार वाक्यं ते आवाजातल्या चढउतारांसह प्रभावीपणे बोलू शकतात. पण त्यांचा एकच एक, आठव्या स्वर्गातून पृथ्वीवरच्या मर्त्य अजाण बालकांशी बोलण्याचा ढंग खटकत होता. हा ढंग कायम नव्हता. उदा. ऑथेल्लोचं भ्रष्ट रुपांतर (ही 'ओमकारा' ला टपली असेल का, असं आपलं माझ्या पुणेरी मनात आलं) करणाऱ्या कलाकारांशी बोलतांना. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, किती अगतिक दुर्दैवी असला तरी तो नट 'सम्राट' आहे ही गोष्ट लागू अजिबात विसरू देत नव्हते. पाटेकर कित्येक वेळा प्रसंगवश लाचार वाटत होते, दुबळे वाटत होते. मग, सीझरचे आणि लिअरचे संवाद सुद्धा निव्वळ आरडाओरडी वाटायला लागते.

अभिनयाबद्दल बोलतांना, मेधा मांजरेकरच्या कामाचा उल्लेख करायलाच हवा. थोडीशी दुय्यम का होईना, पण 'सरकारांची' व्यक्तीरेखा तिने अतिशय समर्थपणे निभावली.

कोट्यावधी रुपयांचा धंदा करणाऱ्या - मराठी सिने इतिहासातला कदाचित पहिलाच असा सिनेमा असेल - ह्या सिनेमाबद्दल थोडं डावं मत मांडायला धाडसच लागतं; पण एवीतेवी फेसबुकावरचं लिखाण - ते सुद्धा पाच वाक्यांपेक्षा मोठं - कोण वाचतं; म्हणून निधड्या छातीने लिहू शकलो.

Jokes apart, खर तर, नटसम्राटवरच्या निखळ प्रेमापोटी एवढं सविस्तर लिहिण्याचा प्रपंच!

Comments