भाषांतर - शेवटचा शब्द

भाषांतर संपलं. गेली कित्येक वर्ष डोक्यात घोळत असलेला हा प्रोजेक्ट पुरा झाला. आनंदही आहे, आणि दुःखही. 

आनंद ह्याचा, की मनापासून ठरवलेली एक गोष्ट पुरी करता आली. एवढ्या प्रगल्भ विचारांच्या, कवी मनाच्या, इंग्रजी भाषेवर अशी सुंदर हुकुमत असलेल्या एका दिव्य लेखकाची कलाकृती एवढ्या जवळून निरखून बघायची, त्यातलं नेमकं काय आवडलं, ह्याच्यावर विचार करायची खूप मोठी संधी मिळाली. पुस्तकवेडे लोक आवडत्या लेखकाचं कौतुक म्हणून काय काय गोष्टी करतात, त्याच्या लिखाणाचे उतारे पाठ करतात (हे सोपं आहे!), ते उतारे टाईप करून इंटरनेटवर पोस्ट करतात (पण त्यात आपलं काय राहिलं?), माझा एक मित्र आवडते उतारे सुंदर अक्षरात लिहून लेखकालाच पाठवून त्याची स्वाक्षरी मागत असे (हे अतिरेकी वाटलं!), त्या लिखाणाचं अभिवाचन करतात, एकपात्री प्रयोग करतात (त्यासाठी अंगी आवाज आणि अभिनय गुण हवेत - एक छोटीशी समस्या!). 

तर मला जाणवलं, मला ह्या लेखकाची भाषेची हाताळणी अतिशय आवडली. इंग्रजी भाषा इतकी साधेपणी, एका परक्या (आफ्रिकन) संस्कृतीच्या संदर्भात वापरता येते - हे थोर वाटलं. साध्याशा, पण नाट्यपूर्ण कथानकाची रचना, अतिशय सहजगत्या आलेले प्रसंग, वरकरणी साध्या वाटणाऱ्या शब्दांमधून समाजातल्या वैगुण्यांवर आणि दांभिकपणावर केलेले दणदणीत प्रहार, काळजाला हात घालणारे प्रसंग जराही शाब्दिक आक्रस्ताळेपणा न करता रंगवणं आणि तटस्थपणे, प्रचारकी न होता आपला मुद्दा मांडणं. ह्या सर्वांच्या पार्श्वभूमीवर असलेला एक अत्यंत समजूतदार, परिपक्व आणि उदार दृष्टीकोन - हे सर्व मला लेखकाचं कौतुकास्पद कौशल्य वाटलं.  

शब्द न्याहाळणं, भाषा निरखून बघणं हा माझा आवडता छंद असल्यामुळे, माझं ह्या पुस्तकावरचं प्रेम व्यक्त करायला, भाषांतर करायचं ठरवलं. आफ्रिकन समाजाबद्दलचं, इंग्रजी भाषेतलं पुस्तक मराठीमध्ये आणणं ही त्रिस्थळी यात्रा होती. हे कमी म्हणून की काय, पण पुस्तकाचा नायक पाद्री आहे. त्यामुळे ख्रिश्चन धर्माचे बरेच संदर्भ पुस्तकात आहेत. कित्येक संकल्पनाच मुळी मराठी तर सोडा, पण भारतीयही नसल्यामुळे मोठी अडचण होती. मराठीमध्ये सुद्धा भाषेचा बाज शक्य तेवढा मूळच्यासारखाच साधा, सोपा, बोली वळणाचा ठेवण्याचा प्रयत्न होता. अपवाद झाला तो ख्रिश्चन धर्माच्या आणि बायबलच्या संदर्भात. म्हणजे, त्या त्या वेळी, दर्जा खाली गेल्याचं मलाच जाणवत होतं - माझ्या समजुतीची पराकाष्ठा करून मी शक्य तेवढे योग्य मराठी प्रतिशब्द वापरायचा प्रयत्न केला, पण काही ठिकाणी ते कृत्रिम वाटू शकेल. आणि शेवटी हे अर्थातच भाषांतरापेक्षा रुपांतर जास्त आहे. मूळ लेखकाने काही संवाद आणि प्रसंग थोडे संदिग्ध ठेवले आहेत, ह्याचा फायदा घेऊन, मराठीमध्ये मी त्याचा मला जाणवलेला अन्वयार्थ वापरला. कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांशी अन्वयार्थाबद्दल बरेच मतभेद झालेलंही आठवत होतं, किंबहुना त्यांची लेक्चरं ऐकूनही मला एवढं आवडलं, म्हणजे पुस्तक किती ग्रेट असेल, ही माझी भावना कायम आहे. 

दुःख एवढंच, की आता हा सहवास संपला. इतक्या सुंदर आणि आजच्या जगातही अतिशय संबद्ध अशा विचारांशी संवाद संपला. फिनिश्ड प्रोडक्ट बद्दल बोलायचं, तर भाषांतर बरंच हप्त्या हप्त्यामध्ये केल्यामुळे काही आफ्रिकन शब्द (ज्यांचे इंग्रजी स्पेलिंगवरून आधारलेले उच्चार कठीण आणि मला अज्ञात आहेत), काही आफ्रिकन संबोधनांच्या मराठीकरणाची (सरकार, साहेब, महाराज), अरे विरुद्ध अहो ची सरमिसळ इ. एकसंध राहिलं नाही, काही वाक्यरचना बदलता येतील, वगैरेची जाणीव आहे. एकदा शेवटचा हात फिरवायला हवा खरा.

पण ताळा मांडायचा, तर गेले नऊ-दहा महिने तासनतास जो आनंद मिळाला तो केवढा तरी जास्त होता. फेसबुकवरच्या काही मित्र-मैत्रिणींनी वेळोवेळी ह्या दीर्घकाळ चाललेल्या स्वान्त सुखाय खेळाला उत्तेजक पाठींबा दाखवला, त्यांचे मनापासून आभार. 

कितीही स्वतःच्या आनंदासाठी लिहिलं, तरी ते कोणी वाचतंय, ह्या अद्भुत आनंदाचं अस्तर केवढंतरी जास्त उबदार असतं!

Comments