काल रात्री टीव्ही
लावला, तर लहान मुलांचा काही कार्यक्रम चालला होता. मुलं छान चुणचुणीत वाटली, म्हणून
एकीकडे फेसबुक बघत एकीकडे ऐकत होतो. थोडं तुटक तुटक मनोरंजक संभाषण कानावर पडलं ते
असं. (मुलांचे अजाण वय लक्षात घेऊन त्यांची नांवे बदलली आहेत.)
'माझ्या डाव्या बाजूचा
विदुषक आहे आणि उजव्या बाजूचा खोटारडा आहे!' इरसाल म्हणाला. त्यामुळे डाव्या बाजूचा
छोट्या बिचकला, कारण चाळीत तर सगळेजण इरसालला विदुषक म्हणायचे, उर्मट्ट मात्र जराही
बावचळला नाही, तो उलट इरसालला म्हणाला 'तू जास्त मोठा खोटारडा आहेस'. मधल्या काळात
छोट्या सावरला आणि घामानी निथळत्या चेहऱ्यानी ओरडला 'ए! मला बोलू नकोस! तुला सगळे लोक
हसतात, हसं करून घेतलयस तू स्वतःचं आणि चाळीचं!’ इरसालच्या नारिंगी रंगाच्या केसांची
एक बट विस्कटली नाही. तो थंडपणे म्हणाला 'तू गप रे. आपुन सगळ्यात जास्त पाप्युलर हाय,
समजलं ना? तुम्ही सगळे नुसते बोलता, तेवढी एकच गोष्ट येते तुम्हाला, पण सगळ्यात जास्त
लाईक मलाच मिळतात!’
इरसाल म्हणाला 'सगळे
लोक मला घाबरतात. त्या पलीकडच्या चाळीतला टग्या, त्याच्या चाळीत वट करतो, पण मला घाबरतो.
का माहित्येय, आवळा देऊन कोहळा कसा काढायचा हे माझ्याइतकं कोणालाच समजत नाही. हा आपला
काळ्या, एक नंबरचा मूर्ख आहे. लोकांना भोपळे देऊन बोरं घेतो, चनियामणिया.' ह्यानंतर
तिथे उभा असलेला प्रत्येक मुलगा काळ्या किती ढ, मूर्ख, नालायक, दुष्ट आणि बराच कायकाय
आहे ह्याबद्दल आळीपाळीनी बोलला. पण तेवढ्यात उर्मट्ट पचकलाच, 'काळ्या मूर्ख आहे हे
तर खरच; त्याची ती गोरटेली मैत्रीण, ती तर सात मूर्ख आहे! पण हा इरसाल, अखंड त्यांचीच
तर री ओढत होता कालपर्यंत.' पुन्हा झाली सुरुवात. इरसाल थंडपणे म्हणाला 'आपलं काय आहे,
आपुन सगळ्यांशी फ्रेंडशिप ठेवतो, काय! साल्या, तुला पण पैशे दिले होते ना एकदा; आता
बोल, दिले होते का नाय?' उर्मट्ट क्षणमात्र चपापला, मग पुटपुटला 'ते फडतूस पाच रुपडे
किती दिवस सांगशील'.
मग संभाषण नाक्यावरच्या
चाळीत गुंड मुलांनी जो दंगा चालवलाय त्यावर आलं. इरसाल म्हणाला 'ह्या काळ्याला अक्कल
नाही, मी ना एक बुक्की मारून ती चाळच पाडून टाकीन. कदाचित नुसत्या फुन्करीनेच होईलही
काम, मनात आणलं तर; मला थोडा विचार करायला हवा.' इरसाल आणि विचार ह्याच्या कल्पनेनी
सगळे खूप हसले. उर्मट्ट कसला मागे राहतो अशा वेळी, तो म्हणाला 'मी तर साला एक आगपेटीची
काडीच टाकेन त्यांच्यावर' एकंदरीत त्या चाळीला बुक्के मारून, आग लावून, कदाचित नुसत्या
फुंकरीने सुद्धा ती उध्वस्त करायलाच हवी ह्याबद्दल इथे वाद नव्हताच, काळ्याच्या अंगात
दम नाही ह्याबद्दल ही नव्हता, फक्त जास्त मोठा बॉडीबिल्डर कोण एवढाच वाद होता - गर्जनांच्या
लढाईत इरसाल आणि उर्मट्ट सगळ्यात पुढे होते.
स्कॉलर पण होता त्या
घोळक्यात! त्याला दोन मेंदू आहेत अशी चाळीत एक अफवा होती, ती खरी नसावी; पण तो इतका
विचारमग्न दिसे आणि हळूहळू काहीतरी पुटपुटे, की कोणाला नक्की माहिती नव्हतं तो काय
म्हणत असे. स्कॉलरला कोणी फारसं विचारतच नव्हतं ह्या भांडणांमध्ये; तो जोक मारायला
बघायचा, पण तेही कोणाला कळायचे नाहीत.
बाजूच्या गड्यांच्या
वस्तीतली पोरं (आणि त्यांच्याबरोबर हातभट्टीची) चाळीत घुसून उच्छाद घालतात त्यावरही
चर्चा झाली. इरसाल म्हणाला 'मी हाय ना, ही येवढी मोठी भिंत बांधणार चाळीभोवती. आणि
ह्या गड्यांचेच पैसे चोरणार ती बांधायला, मग बघू कसे येतात इथे!' छोट्या आणि उर्मट्ट
दोघांनीही इरसालच्या शिव्यागाळीमुळे आता गडीही कशी घाणेरडी भाषा वापरायला लागले आहेत
हा मुद्दा काढला. इरसाल आता मात्र खरच दुखावून म्हणाला 'च्यायला, आपुन तर साला फक्त
ह आणि भ पर्यंतच बोलतो; हा भो... तर पुढे मा... पर्यंत गेला! काय साला जंटलमनगिरीच
-हायली नाय दुनियेत!'
ह्यानंतर बरचसं संभाषण
मला कळलं नाही. फक्त 'वेडा! मूर्ख! सात मूर्ख! मूर्खशिरोमणी! चोर! डाकू! मोठा डाकू!
' वगैरे असंबद्ध आरडेओरडे ऐकू यायला लागल्यावर मी टीव्ही बंद केला.
आज सकाळी पेपरात वाचलं,
डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन डिबेट जिंकला म्हणे!
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...