माझी स्वप्नसृष्टी ही पब्लिक प्रॉपर्टी समजून औरंगझेबापासून आलिया भटपर्यंत कोणीही तिथे हक्काने येरझारा घालत असतात. मीही, आलिया भोगासी असावे सादर म्हणून त्यांची यथाशक्ती खातीरदारी करतो. परवाच रात्री, अत्यंत अस्वस्थ मनोवस्थेतील इयान फ्लेमिंग माझ्या स्वप्नात आला. सध्या जागतिक रंगमंचावरील भारताचे वाढलेले महात्म्य बघता, आगामी जेम्स बॉन्डकथा भारताच्या पार्श्वभूमीवरच घडावी हे त्याचे अपुरे स्वप्न घेऊन तो माझ्या स्वप्नात आला होता. कथा मी लिहावी अशी त्याची विनंती असली, तरी ती नेहमीच्या बॉन्डपरंपरेला साजेशीच असावी, म्हणून घोस्ट रायटर ह्या नात्याने तो देखरेख ठेवणार होता. मात्र, मीही 'आपुन पन एकदमच झाडपाला नाय' हे दाखवण्यासाठी काही हक्क माझ्या स्वाधीन ठेवले. उदा. कथा पुण्यामध्येच घडली पाहिजे. त्यासाठी, 'फ्रॉम पुणे, विथ सर्काझम' (फ्रॉम पुणे म्हटलं, की पुढे विथ लव्ह फारच अतिरंजित वाटतं!) हे शीर्षकही मी सुचवलं. त्याला इयानचा आक्षेप नव्हता, फक्त बॉंडकथेचे आत्यंतिक महत्वाचे दोन घटक ह्यात आले पाहिजेत ही त्याची अट होती. 'ते कोणते?' असे मी विचारताच तो उत्तरला 'सुंदर कमनीय स्त्रिया' आणि 'तंत्रज्ञानामधील अतीप्रगत खेळणी'. ह्यावरील माझ्या उत्तराच्या, 'ऑफ कोर्स, पुणे देअर व्हॉट मायनस!' ह्या गूगल भाषांतराने गोंधळून तो विचारात पडला. मध्यंतरी मला बायको जागी व्हायच्या आत ही पीडा टाळायची असल्याने, मी घाईघाईने खालील सीन्स त्याला खरडून दिले.
सीन १:
ह्या चित्रपटामध्ये बॉन्डचे प्रमुख उद्दिष्ट भारतावर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांचा नायनाट करणे हे असते. ह्या दहशतवाद्यांची एक महत्वाची स्लीपर सेल (झोपाळू तुकडी) पुण्यामध्ये आहे ह्याचा सुगावा MI-6 ला लागलेला असतो. 'पुणेच का?' ह्या बॉण्डच्या शंकेला वरिष्ठ अधिकारी मि. होम्स त्याला तत्काळ 'दुपारी १ ते ५ वामकुक्षीसाठी संपूर्ण बंद राहणाऱ्या शहरात झोपाळू तुकडी नसेल, तर काय कधीच न झोपणाऱ्या मुंबईत का असणारे? काहीतरी खुळ्यासारखे प्रश्न विचारू नका ह्यापुढे!' अशी समज देतात. बॉण्डपटाच्या साच्याला अनुसरून, पुण्यामध्येही आल्याआल्या बॉण्डच्या जीवावर घातकी हल्ले होतात. उदा. पहिल्याच दिवशीच्या जे डब्ल्यू मॅरीयॉट मधील 'पेशवाई थाट' ह्या खास बँक्वेटमध्ये स्थानिक जगद्विख्यात ब्रॅन्डचे दोन चमचे श्रीखंड खाल्ल्याने त्याला रातोरात मधुमेह होतो आणि दुसऱ्या दिवसापासून साखर वर्ज्य करावी लागते.
सीन २:
बँक्वेटप्रसंगी बॉन्डचे भारतीय हाताळक ('हॅन्डलर' चे गूगल मराठी भाषांतर) श्री बन्याबापू लेले मॅरीयॉटमधील एका खोलीचा एका रात्रीच्या भाड्याचा दर ऐकल्यावर चक्कर येऊन कोसळतात. शुद्धीवर आल्याक्षणी 'अहो खुळें की काय तुम्ही!' असे उद्गार काढून लगेच लक्ष्मी रोडवरील पूना गेस्ट हाऊसमध्ये बॉंडची उचलबांगडी करतात.
सीन ३:
पहाटे सहा वाजता रस्त्यावरील वाहनांच्या आणि गॅलरीमधील इतर भाडेकरूंच्या रहदारीच्या गजबजाटाने त्रस्त झालेला बॉण्ड उठून गॅलरीत येऊन उभा राहतो. पहातो तर काय, रस्त्यावरून असंख्य दहशतवादी डोळ्याला काळे चष्मे आणि डोक्यावरून तसेच नाकातोंडावरून गच्च बुरखे बांधून लुना, स्कुटी, ऍक्टिवा, होन्डा, रॉयल एन्फिल्ड अशा अनंत प्रकारच्या दुचाकी वाहनांवरून जीवघेण्या वेगाने कोठेतरी मोहिमेवर निघालेले त्याला दिसतात. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आपण योग्य स्थळी आलो ह्याबद्दल त्याची खात्री पटते.
सीन ४:
आठ वाजता तयार होऊन बॉण्ड कोरेगांव पार्कमधील त्याच्या ऑफिसात जायला निघतो. बन्याबापूंनी धूर्तपणे त्याची लाडकी ऍस्टन मार्टिन गेस्टहाऊसाच्या शेजारच्या बोळात अनेक सायकलींच्या तटबंदीमागे दडवून पार्क केलेली असते. ह्या सायकली बाजूला करून, ती गाडी बाहेर काढण्यात बॉण्डचा अर्धा तास सहज जातो. रस्त्याला लागल्यावर त्याच्यावर ह्याहूनही भयानक अशी अनेक संकटे कोसळतात. उदा. त्याच्या गाडीवर शब्दशः आठही दिशांनी, आणि असंख्य उपदिशांनी वाहनांचा हल्ला होतो. मुंग्यांच्या वारुळामध्ये घातलेल्या लॉलीपॉपच्या कांडीला दुरदुरून येऊन मुंग्या चिकटाव्या, तशा अनंत अकल्पनीय दिशांनी दुचाक्या त्या ऍस्टन मार्टिनला येऊन भिडतात. ह्या गोंधळामध्ये बॉण्डचा बावळटपणा अर्थात आणखी भर घालतो; उदा. रस्त्यावरचा ट्रॅफिक सिग्नल पिवळा झाला की तो स्पीड कमी करतो; किंवा ह्यापलीकडे कहर म्हणजे सिग्नल लाल रंगाचा झाल्यास, तो चक्क वाहत्या रहदारीमध्ये गाडी पूर्ण थांबवून उभी करतो! त्याच्या ह्या अनाकलनीय चमत्कारिक ड्रायव्हिंगने चहुबाजूचे सर्व वाहनचालक बुचकळ्यात पडतात आणि दरवेळी दहा सेकंदे हॉर्न वाजवून आपला निषेध व्यक्त करतात. भराभर येणाऱ्या बोळा-चौकांमुळे गुगल मॅपने सांगितलेली वळणे तो घेऊ शकेपर्यंत निसटलेली असतात, त्यामुळे ते ऍप कायम री-राऊंटिंग मोडमध्येच गरगरा फिरत रहाते.
सीन ५:
थकलाभागला चुकलामाकला उपाशीतापाशी बॉण्ड शेवटी दुपारी दोन वाजता कोरेगांव पार्कातल्या ऑफिसात पोचतो. वाटेल तेव्हा ऑफिसला पोचण्याबद्दल त्याची ख्यातीच असल्याने तेथील स्थानिक वैयक्तिक मदतनीस कु. नर्मदा तांबे त्याला डोळा मारून खिककन सूचक हसते. बॉण्ड कपाळावर हात मारून घेत त्याच्या स्थानिक निरीक्षक 'ज्ञ' ह्यांच्या (बॉण्डच्या एकाक्षरी नांवांच्या आणि पुण्याच्या ज्ञानसाधनेच्या परंपरांचा हा मुळा-मुठा संगम!) केबिनमध्ये जातो. 'ज्ञ' आणि लेले ह्यांचा इंग्लंडमधील ‘एम’ बरोबर कॉन्फरन्स कॉल सुरु असतो. 'ज्ञ' कपाळाला भरमसाट आठ्या घालून, म्हणजे पुणेरी पाहुणचाराला सुयोग्य अशा थाटात, बॉन्डचे स्वागत करतात. 'ज्ञ' आणि ‘एम’ बॉन्डला त्याच्या येथील कामाचे स्वरूप समजावून देतात. सुगंधा येडबाळगी ह्या भारतीय हेराची (हेरणीची?) सहकर्मचारी म्हणून बॉण्डशी स्काईपवर ओळख करून दिली जाते. 'क्यू' त्याच्याबरोबर पाठवलेल्या लॅपटॉपचे महात्म्य (ह्यावरील एका खास हॅकिंग सॉफ्टवेअरमुळे, तो कोणत्याही उपग्रहाशी संधान साधू शकतो) त्याला उलगडून सांगतात.
ऑफिसातून बाहेर पडण्याआधी, लेले बॉन्डला 'दुष्ट राष्ट्रशत्रूंच्या काळ्या कृत्यांना आळा घालण्याच्या कार्यक्रमाला आशीर्वाद मागण्यासाठी तळ्यातल्या गणपतीचे दर्शन घ्याच' असा सल्ला-कम-आग्रह करतात. ह्या रस्त्यांवरून पुन्हा एकदा गाडी चालवायची ह्या कल्पनेने बॉण्डचा थरकाप उडतो. लेले त्याला ऑटोरिक्षा घेण्याचा सल्ला देतात.
सीन ६:
ऑफिसबाहेरच दहाबारा रिक्षांची रांग पाहून बॉण्ड खुश होतो. बारापैकी सहा रिक्षावाले बहुधा बहिरे असल्याने बॉण्डच्या नम्र विनंत्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष करतात. उरलेल्यातले तिघे 'या टायमाला कोन जाईल तिकडं?' हा उलटा सवाल करतात. उरलेले दोघे 'नायबा, आपुन घरला निगालोय.' ही अनावश्यक माहिती पुरवतात; तर शेवटचा बॉन्डला त्याच्या दिशेने येताना पाहूनच ताबडतोब रिक्षा सुरु करून वाहत्या ट्रॅफिकमध्ये सुसाट वाहायला लागतो. कंटाळून बॉण्ड मंदिराच्या दिशेने चालू लागतो.
सुमारे चार किमी, म्हणजे अर्धे अंतर चालल्यावर 'मस्तानी रसपान गृह' अशी आकर्षक पाटी वाचून तहानलेला बॉण्ड तेथे थांबतो. तेथील 'रिकामा ग्लास मागून रस ओतून दोघांनी प्यायल्यास दुप्पट आकार घेतला जाईल.', 'लिंबे आम्ही बनवत नाही. रस पुरेसा आंबट नसल्यास ज्यादा आकार देऊन ज्यादा लिंबू मागवावे.' इत्यादी सुरस आणि तपशीलवार पाट्या वाचण्यात तो तल्लीन होतो. शेवटी पोऱ्याने त्याच्या शर्टाची बाही तिसऱ्यांदा खेचल्यावर तो सवयीने 'डबल मार्टिनी, शेकन' हे उत्तर देतो. पोऱ्या ताबडतोब त्याचे 'डबल मार तिन्ही (मीठ, लिंबू आणि आले); आन ज्यादा बरप टाक' असे भाषांतर चरकचालकापर्यंत पोचवतो. ग्लास हलवत, त्यातला बर्फ हिंदकळत आणि रस सांडवत, तो बॉन्डला आणून देतो.
सीन ७:
बॉण्ड तळ्यातल्या गणपतीचे दर्शन घेऊन आशीर्वाद मागतो. दर्शनानंतर मिळालेल्या लाह्या-खडीसाखेरच्या प्रसादापैकी साखरेचे खडे बाजूच्या भाविक कबुतरांना टाकत तो लाह्या निवडून खात असतो. ह्या प्रसंगी तळ्यामधून 'कुडियोंको डाले दाना' हे गीत गात, अष्टोदशवर्षा असीम लावण्यवती सुगंधा येडबाळगी, नृत्यसम पदन्यास करत बाहेर येते. तिची कमनीय कुडी अंगाला लिपटलेल्या ओल्या साडीमध्ये जास्तच मोहक दिसत असते. ह्या अवस्थेत ती बेतासबात वेगाने धावत (ह्याला स्लोमो ऐसे नांव) बॉण्डकडे येते. शाम्पू लावूनच तलावात डुंबलेली असल्याने, धावतांना तिचे सुगंधी केस जमिनीला समांतर तीन फूट मागे लहरत असतात. 'कमनीय' आणि 'स्त्री' ह्या दोन माफक अटी पूर्ण झाल्यामुळे बॉण्ड तत्क्षणी तिच्या प्रेमात पडतो. दोघे हातात हात घालून सारस बागेबाहेरील भेळवाल्याकडे भेळ खायला जातात. सुगंधा आग्रह करकरून बॉन्डला भरमसाट पाणीपुऱ्या खायला लावते. लालबुंद नाक आणि पांढरेशुभ्र डोळे झालेला बॉण्ड सुगंधाच्या प्रेमापोटी त्या पोटात ढकलतो.
बॉण्ड बिल भरतो.
सीन ८:
आता हा रात्रीचा सीन आहे. म्हणजे, गेस्टहाउसाच्या खोलीत बॉण्ड बेडवर तळमळत आहे. त्याला कल्पना आलेली आहे, की सुगंधा पाकिस्तानच्या वतीने डबल एजंट म्हणून काम करत असावी. तिच्या आवडत्या भेळपुरी ष्टॅालवरच्या रहीमचाचाने पाणीपुरीमधल्या पाण्यात पोटदुखीचे औषध मिसळले होते, ज्यायोगे बॉण्ड आता अस्वस्थ आहे. ह्या मनोवस्थेत तो भर रात्रीच रहीमचाचाच्या घरी जाऊन त्याला बदडबदड बदडतो. शेवटी बॉण्ड थकून दोन मिनिटे टाईम प्लीज म्हणून थांबला असतांना चाचाची कमनीय बेटी झेबुन्निसा कॉल सेंटरच्या नोकरीवरून घरी येते आणि ताबडतोब बॉण्डच्या गळ्यात पडून त्याला पटवून देते की अब्बूजान कसे बेकसूर आहेत, त्यांनी पाणीपुरीत काही खास औषध मिसळले नव्हते; नेहमीप्रमाणे मुन्शिपाल्टीचेच पाणी तर वापरले होते. ह्यापुढे जाऊन झेबुन्निसा सुगंधाच्या काळ्या कारवायांच्या कागाळ्या बॉण्डच्या कानी घालते. नेहमीच्या दोन आवश्यक अटींची पूर्ती झाल्यामुळे बॉण्ड आता झेबुन्निसाच्या प्रेमात पडतो.
सीन ९:
'क्यू' ने दिलेला खास लॅपटॉप वापरून बॉण्ड भारतीय चांद्रयान ऑपरेट करू लागतो. झेबुन्निसाचे कॉल सेंटरच सॉफ्टवेअर अडचणी सोडवत असल्याने बॉन्डला आता काहीच अडचण नसते. 'क्यू' च्या लॅपटॉपवरून तो भारतीय चांद्रयानामार्फत एका चिनी उपग्रहाला धक्का देऊन ऑर्बिटमधून बाहेर ढकलतो. तो चिनी उपग्रह अचूकपणे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या छावणीवर, जेथे सर्व दहशतवादी इफ्तारच्या पार्टीमध्ये 'कुर्बानी कुर्बानी' हे गीत गात रंगलेले असतात, कोसळतो. प्रचंड नुकसान होते आणि छावणी - दहशतवाद्यांसह - उध्वस्त होते. चिनी उपग्रह असल्याने पाकिस्तानला काही करताही येत नाही. चिन्यांना आपली प्रॉडक्ट्स फार दीर्घायुषी नसतातच, हे माहिती असल्याने तो पडल्याचे काही आश्चर्य वाटत नाही. भारतीय उपग्रह बेपत्ता असल्यामुळे त्याच्यावर कोणाचाच संशय येत नाही.
सीन १०:
बॉण्ड आणि झेबुन्निसा अंदमान निकोबार बेटांवर एका आत्यंतिक निर्जन स्थळी गळ्यात गळा घालून बसलेले आहेत. बॉण्ड झेबूला त्याची कित्येक वर्षांची सुप्त महत्वाकांक्षा सांगतो 'च्यामायला, फार झालं आता हे धकाधकीचं जिणं! शांत रिटायर होईन म्हंतो आता. चांगलं पर्वतीच्या पायथ्याशी 'श्रमसाफल्य' वगैरे कायतरी बंगला बांधू आन ऱ्हाऊ आपन चौघेजन सुकात!'.
झेबू चमकून दूर होते आणि म्हणते 'चौघेजन?' मग तात्काळ लक्षात येऊन झक्कपैकी लाजते. बॉण्ड मिश्किल हसून झेबुन्निसाला मिठीत घेतो.
दुर्दैवाने ह्याच क्षणी माझ्या स्वप्नात भारतीय सेन्सॉर बोर्ड आल्यामुळे, मला फक्त मावळता सूर्य समुद्राचे चुंबन घेताना दिसतो.
ही आणि या ब्लॉगवरच्या इतरही काही पोस्ट्स वाचल्या. सुंदर शब्दांकन.
ReplyDeleteही आणि या ब्लॉगवरच्या इतरही काही पोस्ट्स वाचल्या. सुंदर शब्दांकन.
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteपडले हसुन हसुन. imagine karun !!
ReplyDeleteधन्यवाद! 😁
Deleteखल्लास! शिवाय या सिनेमात बाँडला वैशालीच्या दारातच पार्किंग मिळणे, बाँडचे काम सुरू असताना दिवे न जाणे, सिग्नलला एखाद्या पजेरो की बोलेरोशी घासाघीस होऊनही आतल्या गुंठामहाराज चमूशी मारामारी न होणे असे अद्भुत प्रसंगही आहेत असे ऐकले. रसिकजन उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteमन प्रसन्न करणारे लिखाण. जनू बांडेची आठवण झाली. पुण्यावर शेरे कमी आणि बॉन्डची अफलातून साहसे अधिक असे प्रमाण ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. बॉन्डच्या करामती हलक्या फुलक्या शब्दांत चांगल्या लिहिल्या आहेत. एकंदर वाचायला मजा आली.
ReplyDeleteधन्यवाद! पुण्यावर शेरे करण्याचा इरादा नव्हता, थोडी थट्टा केली एवढच. 😁
Deleteलिखाण आणि कथा तर सुंदर आहेच..पण मराठी शब्दकोश वाढवते .... बेतासबात वेगाने ..हाहाहा
ReplyDeleteधन्यवाद! बेतासबात म्हणजे माफक, मर्यादित.
Delete