पुनवेची रात - ३

कर्नलची चाहूल लागताच चंद्रभागाबाई आनंदाने चित्कारल्या ' अग्गो बया, आलात देखील!'
सरदेशमुख घराण्यातील इतर उंच आणि रुबाबदार स्त्री समुदायाशी तुलना करता, चंद्रभागाबाई तशा बुटक्या आणि ठुब्बच होत्या; दिसायला एखाद्या स्वैपाकिणीसारख्या. खुशीत असल्या, तर हातचं पिठलं चांगलं झणझणीत झाल्याच्या तोऱ्यातल्या स्वैपाकिणीसारख्या, नाहीतर नोकरीवर लाथ मारून निघालेल्या स्वैपाकिणीसारख्या - पण एकंदरीत अगदी तडफदार! एवीतेवी प्रेमाच्या नजरेला ह्या बाह्य विकारांचा त्रास होत नसल्याने, त्यांच्या यजमानांनी मोठ्या प्रेमाने त्यांना जवळ घेतलं - चेहऱ्यावरचं क्रीम सफाईने टाळून. ते दोघे एक छान समाधानी जोडपे होते. चंद्रभागाबाईंच्या सान्निध्यात येणारे बहुतेक लोक विश्वनाथरावांप्रमाणेच त्यांच्या करारी बाण्याने चळचळा कापत असले, तरी व्यंकोजीरावांना मात्र त्यांच्या साथीने सात फेरे घातल्याचा क्षणमात्रही पश्चात्ताप झाला नव्हता. इतर लोक ज्या दाहक कटाक्षाने वितळून जात, त्या धारदार नजरेचे व्यंकोजींना भारी कौतुक होते.
'पोचलो बुवा एकदाचा घरी. ट्रेन लय लेट आली, आन आसाच जरा बागेत पाय मोकळे करत हुतो, तवा विश्वनाथ भ्येटला.'
'तो बागेत होता?'
'व्हय तर! कंबर धरून बसला हुता, बोललो मी त्येला उसण भरली आसनार. आन ह्यो काय चावटपना लावलाय नर्मदानं? आज सकाळीच तर मला सीमा भ्येटली हुती, तिच्या कुत्र्यांना फिरवत हुती फर्गसनच्या आवारात. योक शबुद पन नाय बोलली कशाबद्दल. आन विश्वनाथ म्हंतो, तू त्याला सांगितलंस तिला सशांची काळजी लागून ऱ्हायलीय?'
'कहर आहे बाई ह्या विश्वनाथचा! कधी तरी ते शुंभासारखा आ वासून बघत बसायचं सोडून काही नीट ऐकेल तर शपथ! मी त्याला सांगत होते, नर्मदेला काळजी वाटतेय कोणी तरी पोरगा सीमाला ' माझा ससूला' म्हणत फिरतोय ह्याची.'
'आस्स व्हय! कोन हा बाप्या?'
'तिला काहीही कल्पना नाही; म्हणून तर तिला एवढी काळजी वाटतेय. काल म्हणे तिच्या नोकराने तिला विचारलं सीमा कुठे आहे, तिच्यासाठी कोणा पुरुषाचा फोन आला आहे. सीमा घरात नव्हती, म्हणून नर्मदाने घेतला फोन. आणि काय बया, हा कोणीतरी अनोळखी पुरुष एकदम लघळच करायला लागला ना "कसा बरं आहे माझा गोड गोड ससूला!"'
'आसं बोलला का? मंग, तिनं काय क्येलं?
'काय करणार; नर्मदाच ती, वाट लावलीन पार! डोकं म्हणून काही नाहीच हिला. त्याचं आणखी पुढे ऐकून घ्यायच्या आधीच हिने सांगून टाकलं मी सीमाची आई बोलतेय. मग काय, त्या माणसाने एक आचका दिला आणि फोनच बंद केला. सीमा घरी आल्यावर हिने तिला विचारलं कोण हा पराक्रमी कार्टा! त्यावर सीमा म्हणते, कोणीही असू शकेल.'
'त्ये पन ठीक हाय ना? आजकाल कोन पन कोनाला काय पन बोलतो!'
'गोड गोड ससूला?'
'हां ह्ये जरा ज्यादा भारी हाय ना?'
'माझ्या प्रियंकाला जर उद्या कोणी भामटा असलं अगोचर काही म्हणाला ना, तर त्याची जात-कुळी-गोत्र-प्रवर शोधून काढल्याशिवाय रहायची नाही मी. नर्मदाला काळजी वाटते साहजिक आहे. मला म्हणाली आजकाल सीमा बाजीरावाबरोबर फार बोलत असते. हा बाज्या कोणाशी तिचं सूत जुळवून देईल काय सांगावं! अशा तरण्याताठ्या पोरीची रस्त्यातल्या मवाल्याबरोबर, नाहीतर जत्रेतल्या माकडवाल्याबरोबर ओळख करून द्यायला सुद्धा बाज्याला काही वाटणार नाही.'
कोणत्याही विवाहीत पुरुषांचे ठायी त्यांचे आदरस्थान असलेल्या, परंतु त्यांच्या पत्नीला तिरस्करणीय वाटणाऱ्या नावांचा संभाषणात उल्लेख झाला की जी घालमेल उत्पन्न होते, तीच घालमेल व्यंकोजींचे ठायी निर्माण झाली. त्यांना पूर्ण कल्पना होती, की विश्वनाथरावांचा धाकटा भाऊ बाजीराव सरदेशमुख याच्याबद्दल त्यांना जरी कितीही स्नेहादर उफाळत असला, तरी सरदेशमुख घराण्यातील समस्त भगिनीवर्गाच्या मते तो उमदा आणि धाडसी नरपुंगव केवळ घराण्याच्या उच्च परंपरेवरचा काळा धब्बा होता.
'हां बाज्याचे काय काय दोस्त आसतात हां आडवळनी! येकानं तर माजा खिसा कापला व्हता यकदा. आला व्हता थितं म्येजवानीला.'
'तो खिसेकापू?'
'न्हवं, बाज्या.'
'तो असायचाच तिथे!'
'अवो सरकार', व्यंकोजीराव लाडाने म्हणाले 'तुमी मंजी आसं बोलताय जनू काय तिथं अन्नछत्रच उघडलं होतं. आन त्येच्या खान्यापिन्याबद्दल तुमी काय पन म्हना, पण गड्याची तब्ब्येत मात्र येकदम फस्सक्लास हाय बरं का! येवढा फिट्ट गब्रू बघितला न्हाय बगा कुठंबी. येनारे आपल्या परीच्या व्हाडदिवसाला.'
'माहित्येय!' चंद्रभागाबाई थोड्या नाखुशीनेच म्हणाल्या. 'आणि आनंदा! विश्वनाथ बोलला का आनंदा पण त्याच्या एका मित्राला घेऊन येतोय इथे?'
'ऑं! न्हवं, मी त्येला सांगितलं; आनंदा मला भ्येटला ज्यिमखान्यावर. मंजी विश्वनाथाला ह्ये अगुदरच म्हायती होतं म्हंताय? कमाल हाये. मी जेव्हा त्याला सांगितलं आनंदा हितं येनार हाय, तर त्येला एकदम धक्काच बसला! चकित झाला तो!'
'त्याच्या विसराळूपणाची ना खरंच हद्द आहे!'
'ईसराळूपना?' कर्नलच्या पाठीमागे एक घाव दोन तुकडे छाप रोखठोक बोलणाऱ्या अनेक लष्करी पिढ्यांची परंपरा होती. त्यांचा असल्या गुळमुळीत भाषेवर विश्वास नव्हता. 'हा ईसराळूपना न्हवं. शुद्ध स्वच्छ येड लागलंय विश्वनाथाला. सरकार, आता सरळ बोलायची येळ हाये. विश्वनाथाचं डोचकं फिरलंय. चोवीस वर्सापूर्वी आपलं लगीन झालं त्येवा पन फिरल्येलं हुतं आन त्यानंतर जास्त जास्त फिरत चाललंय. आत्ता मला कुठं भेटला असंल तो? म्हशीच्या गोठ्यापाशी. मला वाटलं त्या गोठ्याच्या बांधावर गुराख्याने मुंडासं टांगून ठेवलंय. बघतो तर त्या गठुळ्यातून एक आख्खा मानुसच उभा ऱ्हायला अन म्हनाला 'व्यंकोजी'! दचकलो ना म्या, ईडी गपकन गिळूनच टाकनार व्हतो. म्हटलं काय करतुयास हितं, तशी म्हणतो मी माज्या म्हशीला आयकतो हाय!'
'म्हशीला ऐकतो आहे?'
'मंग! आन सांगा बरं म्हैस काय करत हुती? वेद म्हंतेय? छ्या छ्या छ्या अज्याबात न्हाय, नुसती घोरत हुती. तुमाला सांगतोय, ह्या पुनवेला विश्वनाथ, बाज्या, आनंदा आन त्यो पद्मावार ह्या समद्या खुळचट कंपनीसंगट हितं मुल्हेर गढीत कोंडून पडायचं म्हंजी लय नस्तर काम! ह्यापरीस तमाशातल्या सोंगाड्याबरुबर ओसाडगावात ऱ्हानं परवडलं!'
‘पद्मावार?’
'आनंदाचा दोस्त, त्येच्याबरोबर येनाराय तो!'
'त्याचं नांव पद्मावार आहे?'
‘म्हंजी आसं आनंदा म्हनला. तो पोट्टा तर पार टाईट हुता नांवबिव सांगायला. आमी बोलत हुतो त्यावडा समदा येळ हा रिक्षास्टॅंडला येका हातानं घट्ट पकडून दुसऱ्या हातानं काल्पनिक माशा हाकत चिपचाप उबा हुता. चेयऱ्यावर येकच्या येक येडगळासारकं हसू कायम. येवडा फुलटॉस गडी आपुन कधी नाय पाह्यला.'
चंद्रभागाबाई काहीतरी आठवायचा प्रयत्न करत होत्या, हे त्यांच्या कपाळावर चढलेल्या एका आठीवरून जाणवत होतं.
'कसा होता तो दिसायला?'
'उंच, काटकोळा. साधारण विश्वनाथसारखा. तरुणपणचा विश्वनाथ डोळ्यासमोर आणा; तो पिऊन एकदम टाईट आहे समजा, त्याला पोपटासारखं नाक आणि गोल काचांचा चष्मा लावा - जसा दिसंल ना, तस्साच हा पद्मावार हुता. तुमी काय वळकता की काय त्येला?'
'आठवायचा प्रयत्न करतेय, कुठेतरी नांव ऐकलंय मी ह्याचं! आनंदाने आणखी काही सांगितलं का त्याच्याबद्दल?'
'त्येला येळ कुठं हुता? म्हायत्ये ना आनंदाचं बोलणं कसं आसतं? मला पन घाई हुती निघायची. मी जेमत्येम ऐकलं की आनंदा हिकडं येतोय, आन हा माशा हाकणारा पोट्टा पण त्येच्याबरोबर येनारे, त्या पोराचं नांव हाये प्रशांत पद्मावार.'
'प्रशांत! बरोब्बर, आता आठवलं.'
‘तुमी वळकता त्येला?'
'तशी भेटले नाही मी कधी. पण, गेल्या वेळी पुण्यातल्या एका रेस्टॉरंटमध्ये मी बघितलंय ह्याला. कोणीतरी मला ह्याची बरीच माहिती दिली होती. नागपूरकडचा आहे म्हणे, पुण्यात शिकायला होता; घरचे बरेच श्रीमंत आहेत म्हणे.'
'श्रीमंत?'
'उदंड श्रीमंत!'
'आरं व्वा!'
एक क्षण दोघेही स्तब्ध होते. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, मग दोघांनी एकदमच डाव्या बाजूच्या भिंतीकडे पाहिलं - भिंतीपलीकडच्या लाल महालामध्ये प्रियंका मुधोळकर आढ्याकडे टक लावून बघत पहुडली होती. चंद्रभागाबाईंच्या श्वासाचा वेग एकाएकी दुपटीने वाढला. पत्नीचे पाय चुरत बसलेल्या व्यंकोजींचे डोळे साक्षात्कार झाल्याप्रमाणे चमकले. त्यांनी हलकेच घसा साफ केला.
'तो हितं आला तर, … आपल्या परीला चांगली सोबत हुईल न्हवं?'
'हुं.'
'मंजी, तिलाबी बरं वाटंल.'
'हुं.'
'मंजी कसं, ह्या गावठाण खेड्याच्या जागी, तरून पोरापोरींना आपल्या बरुबरीचं कोनी भ्येटलं का बरं वाटतं ना? खुश व्हतात ती पन.'
'हुं. वागायला कसा वाटला तो?'
'लय झक्कास! आता, एकदम प्यालेला हुता त्येवडं सोडायचं.'
'त्याचं एवढं काही नाही हो! डोक्यानं फार खास नसेलही तो.'
'न्हवं. आन आता आनंदाबरुबर येवडा येळ घालवायचा, तर घ्येतली आसल थोडी त्यानं. दुसरं आसं बगा, आपल्या परीच्या पन येवड्या काय अटी न्हाईत.'
'म्हणजे?'
'आता काय तुमी पन! आठवा, येकडाव आनंदाबरुबर लगीन करायचं म्हनत हुती ती!'
'अगं बया! ते विसरलेच होते मी. तिला सांगून ठेवते मी त्याचा उल्लेखही करू नको म्हणून; तुम्ही पण विश्वनाथला सूचना द्या तशीच.'
'हा आत्ताच जातो आन सांगतो त्येला. झोपा तुमी!'
नील महालातून कर्नल साहेब जवळजवळ तंद्रीतच बाहेर पडले. सहसा ते स्वप्नबिप्न पाहणाऱ्या जमातीतले नव्हते, पण याक्षणी त्यांच्या डोळ्यासमोर एक दृश्य तरळत होतं – जमखेड बुद्रुक येथील गढीच्या दरवाजात एक उंच, किडकिडीत, गोल काचांचा चष्मा लावलेला तरुण म्हणतो आहे 'मला तुम्हाला एक विचारायचं आहे.', आणि ते त्याला सांगताहेत, 'हो हो, तू अवश्य माझ्या मुलीला भेटू शकतोस. पद्मावार, अगदी जरूर, भेटच तू माझ्या मुलीला.'

Comments