पुनवेची रात - ५

जहागीरदारसाहेब झोपले नव्हते. शय्येवर पडून ते म्हशींचे आरोग्य व आजार ह्या विषयावरील एक पुस्तक चाळत होते. कर्नलसाहेब खोलीत शिरायच्या क्षणीच त्यांनी ते पुस्तक जरा बाजूला ठेवले होते. लवकरच त्यांच्यावर कोसळणाऱ्या आपत्तीच्या विचाराने ते फार अस्वस्थ होते. आनंदासारखा पोरगा घरी येणार, तो सुद्धा आणखी एका दारुड्या मित्राला सोबत घेऊन ह्या विचारानेच भल्याभल्यांना घाम फुटला असता.

'आह, व्यंकोजी' ते अगदी मरगळल्या आवाजाने म्हणाले.

'न्हाय तसं जास्त काय बोलायचं न्हाईये, एक छोटंसं काम हुतं. म्या म्हटलं ना, आनंदा उद्या हितं येतूय त्या पद्मावारला घ्येवून?'

जहागीरदार आपादमस्तक शहारले.

'आणि वरती तो दारुडा दोस्त सुद्धा?'

जहागीरदारांनी त्यांच्या बहिणींकडून कधी ऐकलं नसेल एवढ्या तुच्छतेने चुकचुकत कर्नल म्हणाले

'आवं, पद्मावार म्हंजीच त्यो दारुडा! तर म्या सांगतुय काय, त्येला अज्याबात सांगायचं न्हाय की परीचं लगीन आनंदाशी येकडाव ठरलं हुतं. ल्हिऊन ठ्येवा, न्हायतर इसरनार तुमी.'

'हो, हो नक्कीच! लिहीन ना मी, पेन्सिल आहे का तुमच्याकडे?'

'घ्या!'

'छान छान!' असं म्हणत जहागीरदारानी म्हशीच्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर लिहिलं, आणि पेन्सिल खिशात टाकली.

त्यांच्या खिशातून पेन्सिल काढून घेत कर्नल म्हणाले 'झोपा आता'.

मग दार ओढून, जहागीरदारांना त्यांच्या क्लेशकारी आणि भेडसावणाऱ्या विचारांमध्ये सोडून कर्नल निघून गेले.

* * * *

मुल्हेर गढी आता झोपायच्या तयारीत होती. कपडे उतरवून ठेवताठेवता कर्नल साहेब श्रीमंत जावयाची स्वप्नं बघत होते. नील महालामध्ये चंद्रभागाबाई डोळा लागण्यापूर्वी पुन्हा एकदा, सकाळी नर्मदेला फोन करून पोरीवर नजर ठेव सांगायला हवं, ह्याची मनाशी उजळणी करत होत्या. लाल महालामध्ये प्रियंका पुन्हा एकदा आढ्याकडे टक लावून पहात होती. आता तिच्या सुंदर ओठांवर एक स्मितहास्य उमलले होते. क्षणभरापूर्वीच तिला जाणवले होते, की प्रशांत पद्मावारसारखा उमदा तरुण तिला हिऱ्यांचा हार देऊ शकेल, कदाचित तिला जडजवाहिराने मढवून सुद्धा ठेवेल. जहागीरदार म्हशीच्या आरोग्यावरचं पुस्तक उचलून शेवटच्या पानावर नुकताच लिहिलेला मजकूर चष्मा लावून निरखत होते 'पद्मावार भेटला की त्याला सांगणे, परीचा विवाह आनंदाशी ठरला होता'. खरं तर ते थोडे गोंधळले होते, एवढंच जर त्या पद्मावारला सांगायचं आहे तर व्यंकोजी स्वतः का नाही सांगत. पण त्यांच्या गोतावळ्यातल्या कुठच्याही सदस्याचे मनोव्यापार समजून घेण्याचे प्रयत्न त्यांनी निष्फळ म्हणून कधीच सोडून दिले होते. त्याऐवजी, त्यांनी पान सत्तेचाळीस उघडून म्हशींच्या आंबोणामध्ये जोंधळा मिसळण्याचे फायदे ह्या सुरस विषयाचा उहापोह वाचायला सुरुवात केली आणि ते लवकरच त्यात आकंठ बुडून गेले.

चंद्राची किरणे गढीच्या बुरुजांवर आणि तटबंदीवर विहरत होती. अजून हा पूर्णचंद्र नव्हता, पण पुढच्या काही दिवसातच होणार होता

Comments