पुनवेची रात - ४

लाल महालामध्ये प्रियंका अजूनही खिन्नपणे चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाचा विचार करत होती. तिला तिथे लखलखते दागिने घालून मिरवायला खूप आवडलं असतं, पण प्रत्यक्षात ते जमण्याची तिला फार आशा वाटत नव्हती. खरं तर तिचा तेविसावा वाढदिवसही लवकरच येत होता, पण त्यानिमित्ताने सुद्धा रत्नहार वगैरे मिळण्याची शक्यता जवळजवळ शून्य, हे तिला अनुभवाने कळून चुकलं होतं. फार तर बाज्यामामाकडून एखादा कानातल्याचा सेट आणि आनंदाकडून एखादी सस्त्यातली अंगठी बिंगठी मिळाली तरी खूप झालं म्हणायची वेळ होती.

खोलीचं दार उघडल्यामुळे तिची तंद्री भंगली. तिच्या दाराखालच्या फटीतून दिसणाऱ्या उजेडाच्या रेषेने व्यंकोजींचे लक्ष वेधले होते. संथपणे, देवगड हापूसला कंठ फुटावा अशा मधुर आवाजात ती म्हणाली

'हलो बा-ब्बा'

'हलो बेटा, कशी आहेस तू?'

'ठी s कै'

कर्नल मुधोळकर तिच्या बेडच्या टोकाला बसले. नेहमीप्रमाणे, आपल्या मुलीकडे पाहून, ते पुन्हा एकदा थक्क झाले होते की एखाद्या ओबडधोबड बटाट्याच्या गोणीप्रमाणे दिसणाऱ्या त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या पदरात हे असले लावण्यसुंदर रत्न कसे काय पडले असेल! प्रियंका मुधोळकर जरी पराकोटीची बुद्दू असली, तरी तिच्या तिलोत्तमेला लाजवेल अशा सौन्दर्याची पंचक्रोशीत ख्याती होती. बुद्धिमत्तेच्या बाबतीत तिची तुलना फक्त एखाद्या जन्मल्याक्षणीच वाढ खुंटलेल्या गोगलगायीबरोबरच करता आली असती; परंतु गावोगावच्या वृत्तपत्रांचे फॅशन फोटोग्राफर्स तिच्या दैदिप्यमान सौन्दर्याचा फुलोरा टिपण्यासाठी उड्या टाकत असत. पेपरात जर तुम्ही बातमी पाहिली 'शहरात दंगल! चांगला अँगल मिळवण्यासाठी फोटोग्राफर्सची हाणामारी'. 'बस एक झलकके लिये हज़ारोंकी बेशुमार भीड.' वगैरे; तर धरून चला, प्रियंका मुधोळकर गावातून फेरफटका मारत असावी.

'बा-ब्बा तुमी केवा परत आलेत?'

'आत्ताच बेटा; गाडी ल्येट हुती.'

'पुन्यात मज्जा केली?'

‘व्हय तर! येक मस्त म्येजवानी हुती. तुजा बाज्यामामा पन हुता तिथं.'

'बज्जुमामा माज्या वाडदिवसाला इथे येणारे.'

'म्हनला माला. आन आनंदा पन येतूय उद्या.'

'हुं हुं'

प्रियंका शांतपणे म्हणाली. आनंदाशी ठरलेला विवाह मोडण्याचं तिला जर कधी काही दुःख झालं असलंच तर ते एव्हांना ती विसरली असावी.

'त्येचा येक दोस्त, प्रशांत पद्मावार पन त्येच्या संग येनारे हितं.'

'खरंच?'

'तुला म्हायती हाये तो?'

'नाही, पण गेल्या वेळी आई आणि मी वैशालीत गेलोतो, तेव्हा ना कोणीतरी आम्हाला त्याच्याबद्दल सांगितलं होतं. सॉल्लिड श्रीमंत ऐ म्हणे तो. आईला मी त्याच्याशी लग्न करायला हवंय?'

ह्या पोरीचे निरागस आणि थेट प्रश्न कधीकधी व्यंकोजींच्या काळजाला हात घालत. आत्ता तसंच झालं.

'हे भगवान! भलतंच काय काहीतरी!! मला न्हाय वाटत तुज्या आईच्या मनात असलं काय आलं आसल.'

प्रियंका काही सेकंदं विचार करत राहिली. ती फारच क्वचित विचार करत असे, आणि ते सुद्धा मोठ्या मुश्किलीने - पण ही वेळच तशी होती.

'माझी काय हरकत नाहीय; बरा ऐ तसा तो.'

तिच्या शब्दांना जोर नव्हता. कृष्णाबद्दल बोलतांना राधेने कदाचित जास्त काव्यात्म शब्द वापरले असते, पण व्यंकोजींचे कान ते शब्द ऐकून पुरेसे तृप्त झाले. भरल्या अंतःकरणाने त्यांनी पोरीला जवळ घेतलं आणि तिच्या डोक्यावर थोपटलं. 'झोप आता' म्हणाले आणि जायला निघाले. दरवाजाशी पोचल्यावर त्यांना आठवलं हिला आणखी काहीतरी विचारायचं त्यांच्या डोक्यात होतं. मागे वळून ते म्हणाले

'परी, तुला कधी कोणी ‘ससूला’ म्हटलंय का ग?'

'नाही!'

'न्हाय पन म्हंजी म्हटलं, तर तुला त्यात खास वाटंल? आजकाल लोक एकदुसऱ्याला कायपन बोलतात - प्रिये काय, आन डार्लिन काय!'

'अय्या! पण ससूला लै भारी ऐ हं!'

'हुं, आस्स व्हय!'

ते पुन्हा नील महालाकडे वळले. अंधारातच त्यांनी हलकेच साद घातली

'सरकार'

'काय हो आता? जरा डोळा लागत होता माझा.'

'सोरी हां, पन म्हटलं तुमालाबी आयकून बरं वाटंल. मी आत्ता परीशी बोललो, पद्मावारबद्दल. तिची हरकत न्हाय. ती पन म्हने तुमच्याबरुबर हुती त्या वैशालीमदी. म्हन्ते दिसायला वाईट न्हाय त्यो पोट्टा! ह्ये ब्येस जालं. आन त्ये ससूला बद्दल - परी म्हन्ते ह्ये लय भारी हाये. तुमी नर्मदेला सांगून टाका, त्या सीमावर थोडी नजर ठेवायलाच हवी. बारं, आता चाललो म्या - विश्वनाथाशी बोलतो जरा.'

Comments