मीटिंग कशी होते?
आय टी मध्ये काम करणाऱ्या सगळ्यांना ठेचेवर ठेच लागत असल्यासारख्या मीटिंगामागे मिटींगा 'अटेंड' करायची सवय असते. बऱ्याच वेळा ‘दिवसभर मिटींगा आणि रात्री काम, ह्याला आय टी जीवन ऐसे नाम’असले अभंगही त्यांना म्यूट वर बसले असतांना सुचत असतात. पण, इतर क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांना दिवसाला सहा एकेक तासाच्या मिटींगा असणे, 'सॉरी कान्ट जॉईन! आय ऍम ट्रिपल बुक्ड' हे वाक्य उद्गारण्यामधला तोरा, एका कॉन्फरन्स रुमकडून दुसरीकडे धावतांना (गेले ते दिवस!) हातातल्या सेलफोनवर 'या आय रिमेम्बर; विल गेट इट डन, राईट आफ्टर धिस डार्न मीटिंग!' अशी धावती वचने देऊन स्वतःला विक्रमादित्य किंवा अलेक्झांडर द ग्रेट महसूस करणे, किंवा एका लॅपटॉप ऑडिओ कॉलवर असताना, ईमेल, चॅट आणि सेलफोन तिन्हींवर संभाषणे चालू ठेऊन डोके शिल्लक राहिले नसले तरी आपुनच अष्टभुजा भगवान आहोत असा आभास निर्माण करणे ह्या आनंदांपासून वंचित रहावे लागते ह्याची आम्हास कल्पना आहे. अशा लोकांसाठी मीटिंग ह्या खाशा कॉर्पोरेट पदार्थाची ओळख करून देण्याचा हा नम्र प्रयत्न.
उद्दिष्ट: शेकडा पंचाण्णव मिटिंगांचे उद्दिष्ट गेल्या मीटिंगमध्ये अपुरे राहिलेले संभाषण पुरे करणे हे असते. उद्दिष्ट पेक्षा 'ध्येय' किंवा 'आकांक्षा' हे शब्द जास्त योग्य! कारण ते कधीच सफल होत नसते. सर्व मिटिंगांचे शेवटचे भरतवाक्य 'वी हॅव टू गेट टुगेदर अगेन; आय विल सेट अप समथिंग ऑन युअर कॅलेंडर्स' हे असते. हे ऐकले, की भाग घेणारे सर्व बाजीप्रभू जागे होऊन पुढच्या आठवड्यातल्या एका तासाची सोय झाली ह्या आनंदात ह्या मीटिंगमधला शेवटचा निःश्वास टाकतात. शेकडा पाच मिटींगा पहिलटकरिणी असतात. त्यांचे उद्दिष्ट 'प्रोजेक्ट संपल्यावर शिव्या तर खायच्या आहेतच; त्या तिळात सातच नव्हे, तर जास्तीत जास्त वाटेकरी शोधावेत' ह्या उदार दृष्टिकोनामध्ये दडलेले असते.
कर्ता (ऑर्गनायझर): गुळाचा गणपती म्हणून प्रत्येक मीटिंगला एक कर्ता लागतो. पण तो मीटिंग घडवत नसतो, तो फक्त त्याचा भ्रम असतो. ती आपली आपण घडत असते. मीटिंग घेतली, किंवा अटेंड केली, हे स्टॅटस रिपोर्टमध्ये लिहिण्याचे पराक्रम असतात, प्रत्यक्ष रणांगणावर करण्याचे नव्हे.
पुढच्या मीटिंगमध्ये आपण मीटिंग्सना कोणाला बोलवावे आणि त्यांचे स्वभावविशेष ह्याची ओळख करून घेऊ.
मिटिंगसाठी कोणाला बोलवावे?
आमंत्रित मंडळी: जेवढी जास्त तेवढी चांगली, हे एकच सूत्र मनी बाळगावे! ह्यामध्ये नवऱ्यामुलाकडचा भावी सासूबाईंच्या भावाचा मेव्हणा वगैरे असून अडचण नसून खोळंबा अशी मानापमानाची मंडळीही असतात. काही, केवळ त्यांच्या साहेबवर्गामधील वजनासाठी आमंत्रित असतात. हे लोक चार मीटिंग्समध्ये मिळून धीरगंभीरपणे एखादे वाक्य उच्चारतात. पण त्या अत्यंत बालवर्ग टाईप, समस्त जगतास माहिती असलेल्या सूचनेचा देववाणी म्हणून ताबडतोब स्वीकार होतो. 'एक्सलंट पॉईंट', 'वी कॅन्ट ओवरलूक धिस', 'दॅट्स व्हाय यू गेट द बिग बक्स!' वगैरे सुमनांची चाणाक्ष उपस्थितांकडून खैरात होते.
मिटिंगसाठी कोणाला बोलवावे?
आमंत्रित मंडळी: जेवढी जास्त तेवढी चांगली, हे एकच सूत्र मनी बाळगावे! ह्यामध्ये नवऱ्यामुलाकडचा भावी सासूबाईंच्या भावाचा मेव्हणा वगैरे असून अडचण नसून खोळंबा अशी मानापमानाची मंडळीही असतात. काही, केवळ त्यांच्या साहेबवर्गामधील वजनासाठी आमंत्रित असतात. हे लोक चार मीटिंग्समध्ये मिळून धीरगंभीरपणे एखादे वाक्य उच्चारतात. पण त्या अत्यंत बालवर्ग टाईप, समस्त जगतास माहिती असलेल्या सूचनेचा देववाणी म्हणून ताबडतोब स्वीकार होतो. 'एक्सलंट पॉईंट', 'वी कॅन्ट ओवरलूक धिस', 'दॅट्स व्हाय यू गेट द बिग बक्स!' वगैरे सुमनांची चाणाक्ष उपस्थितांकडून खैरात होते.
तुमची कंपनी ग्लोबल असल्यास प्रत्येक कॉलवर एक ब्रिटिश पुरुष अथवा स्त्री आवश्यक असते. ह्याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत. पहिले, एकापेक्षा जास्त ब्रिटिश व्यक्ती एका कॉलवर कोणालाच परवडत नाही. ती एक व्यक्ती साठपैकी पंचवीस मिनिटे अथक बोलते; आणि त्यानंतर मुद्द्याच्या दिशेने (फक्त) वळून आणखी दहा मिनिटे बोलते. अशात दुसरी आणखी एक ब्रिटिश व्यक्ती कॉलवर असेल तर काय होईल, ह्या भितीने एकालाच बोलवायची प्रथा आहे. दुसरे महत्वाचे कारण माझ्या समजुतीप्रमाणे, कंपनीने इंग्लंडमधील स्टाफ व्यावसायिक मीटिंग अटेंडीज म्हणून नेमलेला असतो. त्यांचा एरवी काय उपयोग करणार? मीटिंगमध्ये विषयाचा (कामाच्या नव्हे, त्याच्या १० मैल परिघात येणाऱ्या कुठल्याही विषयाचा) ऍटॉमिक पातळीचा कीस काढणे ह्या एका कामासाठी त्यांना शब्दागणिक पैसे मिळतात. इंग्रजी भाषेचा शोध त्यांनी लावला असल्यामुळे ती बोलण्यावर (आणि बोलत राहण्यावर) केवळ त्यांचाच हक्क आहे अशी त्यांची ठाम श्रद्धा असते. एवढं बोलून अर्थातच घसा सुकत असल्यामुळे, तो ओला करण्यासाठी त्यांना नाईलाजाने पाचच्या आतच जवळच्या पबमध्ये धाव घ्यावी लागते.
बहुतेक ग्लोबल कंपन्यांमध्ये EMEA (युरोप, मिड-ईस्ट, आफ्रिका) असा एक रीजन असतो; त्यांचे - म्हणजे युरोपचे - म्हणजे इटली, जर्मनी, फ्रान्सपैकी एक - प्रतिनिधी मीटिंगमध्ये असणे अर्थातच आवश्यक. कंपनी अमेरिकन असल्यास ह्या गटाचा कुठल्याही कल्पनेला तात्विक आणि मूलभूत विरोध असतो. हा सर्व अमेरिकन खुळचटपणा ते केवळ उदारमतवादी असल्यामुळे मीटिंगभर सहन करत असतात. बहुतेक वेळा त्यांना फक्त मी काय करायचे आहे आणि ते कधी अपेक्षित आहे एवढे लेखी हवे असते; बाकी सर्व चर्चा त्यांच्या मते फिजूल आणि बाष्कळ असते. ह्याचा अर्थ ते दिलेलं काम करणार, असा नसतो. योग्य त्या लेखी विनंतीनंतर ते त्यांच्या स्थानिक वरिष्ठांची, वर्कर कौन्सिलची, GDPR ची, सत्ताधारी पक्षाची आणि बऱ्याचदा चॅन्सेलर, पंतप्रधान, अध्यक्ष बाईंची/साहेबांची परवानगी मिळवण्याच्या प्रयत्नांना सुरुवात करतात. ह्या परवानग्या मिळाल्यानंतर मात्र काम करण्याचा इरादा असतो. आता, वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी किमान २०० दिवस सुट्या घ्यायलाच हव्या अशी युरोपिअन कायद्यांनुसार सक्तीच असल्यामुळे त्यांचा नाईलाज असतो. दुःखात सुख हे की बहुतेक मीटिंग्सना ते उपस्थित राहू शकत नाहीत कारण ते सुटीवर असतात. (पुण्यातल्या १ ते ५ वामकुक्षीची तेवढी टिंगल होते, युरोपातल्या जून-जुलै-ऑगस्ट सुटीबद्दल बोलायची टाप आहे का?) दुःखात दुःख हे की ते जेव्हा मिटींगमध्ये हजर असतात, तेव्हा पूर्वीच्या चर्चेविषयी मला काहीच कल्पना नाही, म्हणून मी काही मदत करू शकणार नाही ह्याबद्दल ते दुःख व्यक्त करतात.
मीटिंगमध्ये जर जपानी सहकारी असतील, तर संभाषण खूप गोड, मृदू आणि अत्यंत नम्र असते. चर्चेमधील बहुतेक सर्व मुद्दे त्यांना मान्य असतात. अमुक कामाची जबाबदारी त्यांची आहे आणि ते अमुक तारखेच्या आत व्हायला हवं हे समजल्याची ते ग्वाही देतात. ती तारीख उलटून गेल्यावरही ते त्यांना मान्यच असतं; पण पराकोटीचे मितभाषी असल्यामुळे ते फक्त 'व्हायला हवं होतं. नाही झालं' असे झेनची छाती गर्वाने फुलून येईल एवढे गूढ उत्तर देतात. पुन्हा नवी तारीख, नवी ग्वाही - काळ अनंत आहे ह्या श्रद्धेवर हा खेळ पुन्हा सुरु होतो.
आता गॉंवका बच्चाबच्चा जानता है, की आय टी मधली कुठलीही मीटिंग इंडियन व्हेंडर्सचे लोक असल्याशिवाय होऊच शकत नाही. किमान सहासात लोक चेन्नाई, हाय-डरा-बॅड आणि बँगलोरहून कॉलवर असायला हवे, की मीटिंगला खरी शोभा येते. सुपरसॉनिक वेगाने पूर्णविरामविरहित इंग्रजी बोलणाऱ्या ह्या ग्रुपच्या विधानांचे, मधील इल्लल्ला किंवा माने वगैरे खडे पाखडून केलेले भाषांतर इतरांना समजावून देणे हे अमेरिकेतील भारतीयांचे उपजीविकेचे साधन असते. पण मिटींगा संपल्या (तर?) की प्रत्यक्ष काम ह्या ऑफशोअर टीमकडून करून घ्यायचं असल्यामुळे, ह्या रामा-शिवा-गोविंदा-व्यंकटरमणा-लक्ष्मी शिवाय कार्य सिद्धीस जाऊच शकत नाही. म्हणून त्यांना मीटिंगमध्ये बोलावणे आवश्यक असते.
मीटिंगमध्ये काय बोलायचे? आह, ग्रेट क्वेश्चन! तो आपल्या पुढच्या मीटिंगचा अजेंडा आहे.
मीटिंगमध्ये काय बोलावे?
आयुष्य हेच एक नाटक असल्यामुळे (मीटिंगमधील पहिले वाक्य, असंबद्ध किंवा चुकीचे सुद्धा चालेल, पण भारदस्त वाटायला हवे; शास्त्र असतं ते), मीटिंगही नाटक असणार हे उघड आहे. नाटकाप्रमाणे मीटिंगचे देखील अंक आणि प्रवेश असतात. पहिल्या अंकाची तिसरी घंटा वाजल्यानंतर काही नाठाळ प्रेक्षक जसे चहाच्या शेवटच्या कपाची ऑर्डर देणे, बाथरूममध्ये प्रवेश करणे किंवा सिगारेटचा आखरी संथ झुरका घेणे असे उपक्रम हाती घेऊ लागतात तद्वतच मुरब्बी मीटिंगवाले कर्त्याकडून दोन-चार टेक्स्ट मेसेजेस येईपर्यंत नंबर डायल करायचे कष्ट घेत नाहीत. 'अरलीअर मीटिंग रॅन ओव्हर' असे पुटपुटून आपली मीटिंगजगतातील लोकप्रियता सिद्ध करण्याची ही सुवर्णसंधी गमवायची नसते. पुरेसे आणि महत्वाचे पाशिंदर भरल्याशिवाय ही यष्टी सुरु करायची डायवरला पावर नसते. त्यामुळे तो/ती थेंबे थेंबे गोळा होणाऱ्या आमंत्रितांची सरबराई करण्यात स्वतःला गुंतवून घेतात.
मीटिंगमध्ये काय बोलावे?
आयुष्य हेच एक नाटक असल्यामुळे (मीटिंगमधील पहिले वाक्य, असंबद्ध किंवा चुकीचे सुद्धा चालेल, पण भारदस्त वाटायला हवे; शास्त्र असतं ते), मीटिंगही नाटक असणार हे उघड आहे. नाटकाप्रमाणे मीटिंगचे देखील अंक आणि प्रवेश असतात. पहिल्या अंकाची तिसरी घंटा वाजल्यानंतर काही नाठाळ प्रेक्षक जसे चहाच्या शेवटच्या कपाची ऑर्डर देणे, बाथरूममध्ये प्रवेश करणे किंवा सिगारेटचा आखरी संथ झुरका घेणे असे उपक्रम हाती घेऊ लागतात तद्वतच मुरब्बी मीटिंगवाले कर्त्याकडून दोन-चार टेक्स्ट मेसेजेस येईपर्यंत नंबर डायल करायचे कष्ट घेत नाहीत. 'अरलीअर मीटिंग रॅन ओव्हर' असे पुटपुटून आपली मीटिंगजगतातील लोकप्रियता सिद्ध करण्याची ही सुवर्णसंधी गमवायची नसते. पुरेसे आणि महत्वाचे पाशिंदर भरल्याशिवाय ही यष्टी सुरु करायची डायवरला पावर नसते. त्यामुळे तो/ती थेंबे थेंबे गोळा होणाऱ्या आमंत्रितांची सरबराई करण्यात स्वतःला गुंतवून घेतात.
नाटकाची सुरुवात नांदीने होते, तर मीटिंगची सुरुवात स्मॉलटॉकने. 'नमन नटवरा', 'पंचतुंड नररुंड' वगैरे जेवढी पापुलर; तेवढाच हवा-पाऊसपाणी, डिपेंडींग ऑन ऑडियन्स कालची पाककृती किंवा कालची गेम, गेल्या वीकेंडमध्ये केलेली किंवा येत्या वीकेंडमध्ये करायची - खरी अथवा काल्पनिक – धमाल, अशी कडवी असलेला हा स्मॉलटॉक सुद्धा पापुलर. हे वगळून थेट मीटिंगला सुरुवात करणे असभ्यपणाचे लक्षण मानतात; शिवाय मीटिंगमधील खत्रूड देवादिकांना सुप्रसन्न ठेवण्यासाठी ह्या चुचकारणीची आवश्यकता असते.
कुठल्याही मीटिंगचा अंक पहिला - प्रवेश पहिला हा आधीच्या मीटिंगचा आढावा घेणे हा असतो. गेल्या वेळचे ऍक्शन आयटेम्स, सोपवलेले काम, पुरे झाले का, किती झाले ह्याची चर्चा होते. संख्याशास्त्रज्ञांच्या मते, सरासरी तीनपैकी दोन वेळा काम पूर्ण करण्यासाठी दिलेली तारीख उलटल्यानंतर, कामासाठी नेमलेल्या व्यक्तींना साक्षात्कार होतो की ह्या कामासाठी आणखी काही लोकांची गरज आहे. पुढील मीटिंगमध्ये त्या 'आणखी काही लोकांना' बोलवायचा ठराव मंजूर होऊन, ऍक्शन आयटेमचा फुटबॉल तूर्तास पुढे ढकलला जातो.
तुम्हाला पुढच्या मीटिंगमुळे हार्ड स्टॉप असेल हे लक्षात घेऊन, आम्ही ह्या प्रदीर्घ नाटकाचे बरेच अंक आणि प्रवेश (खरं तर मराठी सासूबाई सुनबाई सिरीयलंच ही!) केवळ संक्षिप्तावस्थेत पुढे मांडत आहोत.
अंक पहिला - प्रवेश दुसरा. ह्या ठिकाणी आपल्याला ‘ही मीटिंग नीट पार पडू नये, ही तो श्रींचीच इच्छा’ ह्याचा अंदाज येतो. ह्या अंकामध्ये वेगवेगळी पात्रे आपल्या व्यावसायिक जीवनामधील, अंगावरील कामाच्या बोज्याविषयीच्या हृदयद्रावक दर्दनाक जीवनकहाण्या ऐकवून आपली कैफियत मांडतात. ह्यामध्ये जुन्या संगीत नाटकांना लाजवतील अशी दोनदोन पॅराग्राफची पल्लेबाज भाषणे, मध्ये एकही पूर्णविराम न घेता, यःकश्चित श्वासासाठी कुठेही न थांबता ऐकवणारे कसलेले कलाकार असतात. मात्र संगीत नाटकांप्रमाणे कोणी वन्स मोअर देण्याची वाट न पाहता, ते आपले मुद्दे लूपमध्ये पुन्हापुन्हा मांडत रहातात. त्यामध्ये सुद्धा, कमीतकमी माहिती असलेल्या लोकांना मिळालेली सर्वात भसाड्या आग्रही आवाजाची देणगी किंवा मर्यादित आकलनक्षमतेची कुळे. ज्यांच्यासाठी प्रत्येक मुद्दा तिसऱ्यांदा रिपीट केल्यावरच मीटिंगचा गाडा पुढे सरकू शकतो - अशा दैवी देणग्या आपल्याच मीटिंगला का येतात असा प्रश्न कर्त्यांना बऱ्याच वेळा पडतो.
मीटिंगमध्ये प्रश्न विचारल्यास तत्क्षणी त्याचे उत्तर मिळणे हा कपिलाषष्ठी योग मानला जातो. बहुतांश वेळा, दोन सेकंदांच्या प्रदीर्घ शांततेनंतर ज्याला प्रश्न विचारला होता, त्याच्या नावाने हाकारे सुटतात. चार-पाच वेळा पुकारा करूनही उत्तर न आल्यामुळे आता पुढे सरकावे असे सार्वमत होत असतानाच, 'कॅन यू हिअर मी?' असा एक क्षीण आवाज कानी पडतो. 'सॉरी, आय वॉज ऑन म्यूट!' हे पाठोपाठ. आय वॉज ऑन म्यूट हे वाक्य मिटिंगांमधून हद्दपार केल्यास त्यांची लांबी एक चतुर्थांशाने कमी होईल - पण कशाला उगीच? एवढे करून, त्यांच्याकडे प्रश्नाचे उत्तर नसते. त्यावरून थोडी बाचाबाची होते. नतीजा 'वी विल टेक इट ऑफलाईन' असा होतो - ह्या वाक्याचा मराठी अर्थ 'शाळेबाहेर भेट, मग बघतो तुला!' असा असतो.
दुसऱ्या अंकामध्ये नाटकाला गती येते. टेम्पो वाढत जाऊन, पात्रांमध्ये कश्मकश सुरु होते. इंजिनिअरिंग विरुद्ध क्यूए, इन्फ्रास्ट्रक्चर विरुद्ध इंजिनिअरिंग, क्यूए विरुद्ध बिझनेस ऍनालिस्ट्स, ऑफशोअर विरुद्ध अकाऊंट मॅनेजर, प्रॉजेक्ट मॅनेजर विरुद्ध उरलेले सर्वजण अशा तुंबळ लढायांना ठिकठिकाणी तोंड लागते. प्राचीन इमेल्सच्या पोथ्या उघडल्या जातात. इतिहासकारांच्या बखरींप्रमाणे अटॅचमेंट्सची भेंडोळी निघतात, शब्दांचे कीस पडतात. ह्या धुमश्चक्रीमध्ये पीएमओ चा मनुष्य कुक्कू क्लॉकमधल्या कुक्कूसारखे दर पंधरा मिनिटांनी तोंड उघडून फक्त 'सो, आर वी ऑन ट्रॅक' आणि 'व्हॉट इज द पर्सेंट कम्प्लिट?' ह्या त्या रोलला दिलेल्या दोन वाक्यांपैकी एक म्हणतो आणि पुन्हा म्यूटच्या पडद्याआड अदृश्य होतो. एका मोक्याच्या क्षणी, कहाणीला अचानक वेगळीच कलाटणी मिळून, बीए जमात 'रिक्वायरमेंट डॉक्युमेंट' म्हणून एक पौराणिक अग्न्यस्त्र उगारते. सबंध मीटिंग स्तब्ध होते, सन्नाटा, यकदम पिनड्राप सायलेन! आता रंगमंचावर फक्त प्रॉजेक्ट मॅनेजरचा घायकुतीला आलेला श्वास ऐकू येत असतो. कारण रिक्वायरमेंट मधील हत्तीचे चित्र कोणीच पाहिले नव्हते. आतापर्यंत नाटकातले आंधळे कलाकार आपापल्या हाती आलेल्या हत्तीच्या अवयवानुसार ह्या जनावराची कल्पना रचत होत्या. आता पीएमओ चा इसमही शरणागती पत्करून कुक्कू क्लॉकसारखा ओरडायचा थांबतो.
मग, ह्या शेक्सपिअरीअन ट्रॅजेडीवर ब्रिटिश सहकारी (दुसरे कोण?) एक प्रदीर्घ स्वगत उच्चारतात. त्याचा अगम्य अर्थ कोणालाच कळला नाही, तरी 'हे होणार हे मला माहितीच होतं' हे त्यांचं कॅची ध्रुवपद सगळ्यांना समजतं. त्यानंतर मुंबईच्या लोकल ट्रेनच्या 'जान देव, जान देव' थाटात प्रॉजेक्ट मॅनेजर आणि एखाद दोन वरिष्ठ (डेडलाईन मिस होणार ही दुःखद बातमी साहेबांच्या कानी घालणे टाळण्यासाठी) इंजिनिअरिंगने निर्माण केलेल्या बगळ्याला हत्ती म्हणून खपवता येईल का ह्या चर्चेच्या मागे लागतात. तशी लांब चोच आणि लांब सोंड साधारण सारखीच असते; क्यूए पांढरा विरुद्ध राखाडी रंग हा फुटकळ मुद्दा काढते - त्यावर पांढरे हत्तीही असतात असे सांगून त्यांना दामटवले जाते; चार पाय हवेच असतील, तर वर्कअराऊंड म्हणून दोन काठ्या जोडून देण्याची उदारबुद्धी इंजिनिअरिंग टीम दाखवते. वजन जरा कमी वाटतं खरं, पण पुढच्या रिलीजमध्ये वाढवता येईल अशी वचने दिली जातात, तसाही आता लाईट फूटप्रिंटचा जमाना आहे. सगळं स्थिरस्थावर होणार, तेवढ्यात कोणीतरी आगलावी व्यक्ती पण यूजर्सचं काय हा एक त्रासदायक मुद्दा उपस्थित करते. 'यूजर्स' ह्या अखंड किरकिऱ्या, असंतुष्ट आणि छिद्रान्वेशी जमातीविषयी ह्या मीटिंगमध्ये कोणालाच प्रेम नसते. पण पगार देणारी कटकट म्हणून त्यांना सांभाळावे लागते. त्यांना हव्या असलेल्या हत्तीऐवजी बगळाच जास्त उपयुक्त कसा हे पटवून देण्यासाठी ट्रेनींग आणि कम्युनिकेशन्स कॅम्पेन लॉन्च करायचा तोडगा मान्य होतो. कॉम्सवाले ह्या मीटिंगमध्ये नसल्यामुळे अर्थातच त्यांच्यासहीत पुढील मीटिंग घ्यावी असे ठरते, आणि पुढच्या आठवड्यात भेटूच ह्या आश्वासनावर आजची मीटिंग बरखास्त होते.
(इ.स. २०१५ च्या आवृत्तीमधील ता.क. - नव्या बाटल्यांमध्ये जुनीच दारू भरायच्या आय टी कुटिरोद्योगामध्ये पूर्वीच्या धबधब्याप्रमाणे संथपणे कोसळणाऱ्या मीटिंगाऐवजी नवीन चपळ मिटींगा घेण्याची फॅशन आली आहे. म्हणजे पाच अंकी संगीत नाटकाऐवजी, छबिलदासच्या सुटसुटीत एकांकिकाच म्हणाना. परंतु कलाकार पूर्वीचेच ‘नेहमीचे यशस्वी’ असल्यामुळे, तासाभराच्या बैठ्या मीटिंगऐवजी तीस मिनिटाच्या सहा सात उभ्याउभ्या मिटींगा होतात, एवढाच फरक. ह्या मीटिंगमध्ये ब्रिटिश नागरिकांना मज्जाव असल्यामुळे त्यातल्या काही तीस मिनिटात संपतात सुद्धा अशी अफवा आहे.)
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...