माझं लग्न अमेरिकेतून एक महिन्यासाठी सुटीवर येऊन लग्न करण्याच्या प्राचीन परंपरेनुसार झालं होतं. एवढ्या छोट्या कालावधीमध्ये साड्या-दागिने खरेदी, हॉल मिळवणे, भटजी मिळवणे इत्यादी महत्वाची कार्ये लग्नाआधी उरकायची असल्यामुळे त्यामध्ये हिच्याकडील नातेवाईकांना भेटायला वेळच नव्हता. त्यातून ते एखाददोन नातेवाईक नसून, काका-मामा-आत्या-मावश्या मिळून शंभरेक लोकांचा ताफा होता. सगळ्यांना एकाच घाऊक बैठकीत भेटायचे म्हणून मला जेवायला बोलावले आहे असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात तो मला दाखवण्याचा कार्यक्रम होता. तसे सासरकडचे अगदीच पुराणमतवादी नसल्यामुळे, मला चालून वगैरे दाखवावे लागले नाही, तरी 'अमेरिकेतून आलाय म्हणे!' म्हणून माझ्या इंग्रजी ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी अस्सल मुंबैकर, पुणेरी, कोंकणी, वऱ्हाडी, नागपुरी, सरकार-दरबारी, कॉन्व्हेंट अशा इंग्रजीच्या अनेक डायलेक्ट्सचा मारा करून मला ते प्रश्न आणि पर्यायाने इंग्रजी भाषा समजतात का नाही ह्याची खातरजमा झाली. 'आमच्या त्या ह्यांची ही तिकडे कुठल्यातरी पोलिसात असते, मिनी पोलीस का इंडिया पोलीस असंच काहीतरी म्हणाले बुवा ते! तर ते पोलीस तुमच्यापासून किती जवळ?' अशा चौकशांच्या मिषाने माझ्या अमेरिकन भूगोलाची चाचपणी झाली. जीवनोपयोगी वस्तूंच्या किमती विचारून माझ्या होम इकॉनॉमिक्स पासून खाजगी इकॉनॉमीपर्यंत तपासणी झाली; त्यात गॅलन-लिटर, पौंड-किलोग्रॅम… डॉलर-रुपये इत्यादी गणितं आलीच.
शेवटी एकदा हे समग्र बौद्धिक आटपल्यानंतर, 'पानं घेतली आहेत बरं का' ही सुवार्ता कानी येऊन मी (बहुतेक) पास होऊन आता गज्जर का हलवा प्राप्त होईल अशी आशा वाटली. पाटावर बसून जेवायची वेळ फारफार वर्षानंतर येत होती. नशीब मला नेहमीच्या जीन्स - टीशर्ट ऐवजी लेंगा-झब्बा घालायची सुबुद्धी झाली होती. पंगत झकास होती, अगदी लाल पाट, चांदीचं ताट, रांगोळी, उदबत्त्या वगैरे सगळं एकदम कम्प्लिट! नवरानवरी आणि पुरुषमंडळी आधी बसले. घरातल्या बायका त्यांना वाढत होत्या. सगळे पदार्थ वाढून झाले असावे, कारण कोणीतरी 'वदनी कवळ घेताs म्हणायचं का?' अशी विचारणा केली. त्यावर, कोणीतरी काकू किंवा मावशींनी येऊन घाईघाईने भाताच्या मुदीवर तूप घातलं, आणि 'हो, उशीर झालाच आहे फार; सावकाश होऊ द्या' हा नेहमीचा डवायलाक म्हटला. मला तूप वाढून त्या जाणार तेवढ्यात 'हीच अखेरची संधी!' ह्या विचाराने मी त्यांना कुजबुजत 'मला एक चमचा द्याल का हो?' असा अतिशय गरीब प्रश्न अत्यंत शालीनपणे, नम्रतेची पराकाष्ठा करून विचारला. ह्या प्रश्नाचा अमेरिकेशी, किंवा माझ्या साहेबीपणाशी, किंवा शो ऑफशी काही संबंध नव्हता. प्रॉब्लेम असा होता, की मायदेशातल्याच कॉलेजच्या दिवसापासून मला हाताने जेवण्याची अजिबात सवय नव्हती. त्यामुळे भाजीच्या फोडी, भाताची शितं, आमटीचे ओघळ वगैरे माझी बोटं सोडून, चुकार मुलांसारखी सैरावैरा धावायला लागतात. पहिल्याच भेटीत, एवढ्या लोकांसमोर शोभा नको म्हणून मी इमानदारीत चमचा मागितला.
मुदपाकखान्यामधून हास्याच्या खळखळाटात 'नवऱ्यामुलाला चमचा s हवाय!' हा उद्गार बाहेर समस्तांस ऐकू आला. खळखळाटाचा धबधबा झाला, बऱ्याच नद्या येऊन मिळाल्या, लाटा आल्या, पण अंतःपुरामधून दुसरं कोणीच बाहेर येण्याचं लक्षण दिसेना. बाहेरच्यांची कवळं वदनात जाण्याऐवजी हातातच होती. बरं, शेजारची पुरुषमंडळी केवळ पोटात खवळलेल्या भुकेखातर तरी 'द्या ना त्याला चमचा एवढा मागतो आहे तर' अशी सामोपचाराची भाषा काढतील, तर तेही नाही. तीही ह्या तुफान विनोदाच्या ऍपेटायझरवरच संतुष्ट दिसली. शेजारी बसलेली भावी नवरी, 'चारचौघात कुठठे म्हणून न्यायची सोय नाही!' ही गाठ मनाशी घट्ट घालत सलज्ज (म्हणजे लाजिरवाण्या) मुद्रेने, पण ज्या तीक्ष्णपणे बघत होती, त्यामुळे आमच्या दोघांपैकी एकाच्या पाटाखालची धरणी लवकरच दुभंगण्याची शक्यता दाट होती.
मी हताश होऊन 'श्रीखंडाला लावून पुरी तरी खाता येईल. थोडंसंच घेतलं तर नाही सांडणार कदाचित. बाकीचं भाजी-भात वगैरे नंतर बघू!' असं स्वतःशीच पुटपुटू लागलो होतो. तेवढ्यात त्या काकू माझ्या दिशेने येतांना दिसल्या. जवळ येऊन त्यांनी हात पुढे केला. मी जहागिरीची सनद घ्यावी त्या कृतज्ञतेने डोळे मिटून दोन्ही हातानी तो चमचा घेतला आणि मस्तकी लावला. एवढ्या प्रतीक्षेनंतर हाती आलेला तो रत्नजडीत, बावन्नकशी सोन्याचा चमचा एकदा डोळे भरून पाहूदे म्हणून डोळे उघडले तर काय! साधा स्टेनलेस स्टीलचाच चमचा होता तो.
त्या क्षणीच मी लग्नामध्ये फोर्ड गाडीसाठी हटून बसण्याचा विचार कॅन्सल केला. 'जेवणासाठी वापरण्यापुरता मागितलेल्या स्टीलच्या चमच्यासाठी पंधरा मिनिटं हशा सहन करावा लागतो; मालकीच्या अमेरिकन गाडीसाठी काय आणि किती वेळ सहन करावं लागेल, धर बोटे आणि मोज' असा आदेश मीच माझ्या मनाला दिला.
लवकरात लवकर अमेरिकेला परत जाणं जास्त महत्वाचं होतं!
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...