माझे काका (श्री. बा. जोशी)

मी अगदीच लहान असतापासून ते कलकत्त्याला रहात होते. दोन-तीन वर्षातून एखाददा ते मुंबईला येत; त्यातल्या एखाद दिवशी आमच्याकडे. त्यामुळे लहानपणी मी त्यांना खूपच कमी पाहिलं होतं. सख्खे काका असले तरी त्यांचा सहवास, ओळख वगैरे अगदीच ओझरती होती. त्यातून ते स्वतः अतिशय मितभाषी, जवळजवळ अबोलच! ह्या सगळ्यामुळे लहानपणी एक भीतीयुक्त आदर आणि दडपणच होतं त्यांच्याबद्दल.
 
नंतर कॉलेजमध्ये असतांना, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या मास्टर्सच्या प्रवेशासाठीचा इंटरव्ह्यू कलकत्त्याला होता, तेव्हा मी आठवडाभर त्यांच्याकडे राहिलो होतो. तेव्हा कुठे मला काकांची ओळख व्हायला हळूहळू सुरुवात झाली. शाळेच्या वयातच टागोर, शरदचंद्र वगैरेंच्या कादंबऱ्यांची भाषांतरं वाचल्यामुळे मला बंगालीबद्दल अपार कुतूहल होतंच. कलकत्ता मेलने जातानाच, खरगपूरपासून दिसायला लागणाऱ्या स्टेशनांच्या बंगाली पाट्या लावूनलावून वाचत मी बंगाली लिपीची बरीच ओळख करून घेतली होती. तिथल्या पहिल्याच संध्याकाळी, काका मला कुठल्यातरी मोठ्या सुप्रसिद्ध बाऊल गायकाच्या खाजगी मैफिलीला घेऊन गेले होते. ते गायक, बाऊल संगीत, बंगाली भाषा ... कसलीकसलीच मला काही ओळख नव्हती, हे सगळं आयुष्यात पहिल्यांदा ऐकत होतो; पण तरीही ती गाणी, शेवटचे प्रदीर्घ आलाप, एकतारीचे सूर आणि खोल-मृदंग-मंजीरी चा ताल सगळं मनाला भिडलं. परततांना बसमध्ये काका बंगाली भाषेबद्दल, बाऊल संगीताबद्दल भरभरून बोलत होते. त्यांच्या नेहमीच्या अबोल स्वभावामुळे, त्यांना एवढ्या प्रेमाने कशाविषयी बोलतांना ऐकून तसंच बोलतं ठेवण्यासाठी मी प्रश्न विचारून ऐकत राहिलो होतो. तेव्हा जाणवलं, ह्या माणसाची काही खास बटणं आहेत; ती दाबली, की हा बोलत रहातो - बंगाली संस्कृती हे त्यातलं एक होतंच, पण लवकरच जाणवलेलं सर्वात मोठठं बटन होतं ते लेखन, वाचन आणि पुस्तकं हे!

'आपण मराठी लोक पुस्तकवेडे असतो' अशी एक समजूत मराठी माणसांमध्येच बऱ्याच वेळा आढळते. पण काकांसारखी खरीखुरी, शाब्दिक आणि सखोल अर्थाने संपूर्ण पुस्तक-वेडी माणसं खरंच फार विरळा असतात. नुसती पुस्तकं, ती सुद्धा इंग्लिश, मराठी, हिंदी, गुजराथी, बंगाली अशा वेगवेगळ्या भाषेतली; आणि त्यांचं वाचन, ही त्या वेडाची केवळ तोंडओळख झाली. पुस्तक मुद्रण, छपाई, सजावट, विक्री, पुस्तकं मिळवण्याची योग्य स्थळं ह्या सगळ्याच लेखनविषयाशी संबंधित गोष्टींमध्ये त्यांना तेवढाच मनस्वी रस होता. हा सगळा साठ-सत्तर-ऐंशीच्या दशकांमधला इंटरनेट पूर्वीचा काळ होता. म्हणताक्षणी संदर्भ आणि उतारे उपलब्ध करून द्यायला गुगल आणि विकिपीडिया नव्हतं. युसिस, ब्रिटीश कौन्सिल, आशियाटिक अशा दगडामातीच्या भारदस्त वाचनालयातून छापील कागदी पुस्तकं आणि संदर्भग्रंथ असत. अभ्यासू माणसं अशा वाचनालयांमध्ये हवा तो संदर्भ शोधण्यासाठी तासंतास खर्च करत. त्या काळात दर्दी आणि माहितगार ग्रंथपालांना फार महत्व होतं.

त्या काळात काका कलकत्त्याच्या नॅशनल लायब्ररीमध्ये कित्येक वर्षे मराठी पुस्तकसूची विभागाचे प्रमुख संपादक होते. पुस्तकांच्या वेडापायी मुद्दाम शोधून काढून स्वीकारलेल्या, घरादारापासून, आपल्या माणसांपासून एवढ्या दूर, ह्या नोकरीमध्ये ते अतिसंतुष्ट होते. ह्या नोकरीमधील कामाच्या अनुषंगाने त्यांची मराठी पुस्तकांची माहिती समजू शकते (तरीही, हाताखालून जाणारं प्रत्येक पुस्तक किमानपक्षी चाळलं जावं अशी काही अट नव्हती, तो काकांच्या प्रेमाचा भाग होता!), पण समकालीन इतर भाषेतील पुस्तकांची ओळख करून घेणं हे संपूर्णपणे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आचारसंहितेच्या विरुद्धच होतं. माझ्या कलकत्त्याच्या पहिल्या दोन-तीन दिवसातच त्यांनी मोठ्या अभिमानाने आणि कौतुकाने मला लायब्ररीची टूर दिली. ह्या पुस्तकवेडामुळेच, बऱ्याच नामवंत आणि श्रेष्ठ मराठी लेखकांशी त्यांचे जवळचे मैत्रीबंध होते. पुलंच्या वंगचित्रे मध्ये तर काकांचा उल्लेख आहेच; पण नंतर शांतिनिकेतनने पुलंना दिलेला पुरस्कार सुद्धा त्यांच्या वतीने काकांनीच स्वीकारला होता. बंगालीमध्येही अनेक मोठमोठ्या लेखकांशी आणि कलाकारांशी त्यांचा घनिष्ट परिचय होता. शंभू आणि तृप्ती मित्रा ह्या बंगाली नाट्यसृष्टीमधील नामांकित अभिनेता-दिग्दर्शक जोडप्याला पुलंच्या लिखाणाचा परिचयही एकेकाळी काकांनी करून दिला होता.

काकांनी स्वतःच त्यांच्या वाचनाबद्दल 'भटक्या वृत्तीचा वाचक' असं लिहिलं आहे. ह्याच मधुकर वृत्तीने ते लायब्ररीत येणाऱ्या असंख्य दैनिकांचा, पुस्तकांचा आणि नियतकालिकांचा आस्वाद घेत. आवडलेल्या उताऱ्यांची, वाक्यांची, संदर्भांची हाताने टिपणे काढून ठेवत. (फ्रॉस्टच्या 'माईल्स टू गो बिफोर आय स्लीप' ह्या जगप्रसिद्ध कवितेची अनेक भारतीय भाषांमधली भाषांतरे त्यांच्या संग्रहात होती. हरिवंशराय बच्चन ह्यांनी केलेलं हिंदी रूपांतरही त्यात होतं ही माझी आठवण आहे). अशा टिपणांनी भरलेल्या अनेक वह्या त्यांच्याकडे होत्या. वरवर असंबद्ध वाटणाऱ्या, पण मनोरंजक आणि सखोल माहितीपूर्ण अशा 'नगेट्स' ची त्यांना खास आवड होती. गोविंदराव तळवलकर आणि विजय कुवळेकर ह्यांच्यासारख्या विचक्षण संपादकांच्या आग्रहाखातर, ह्या छंदाच्या अनुषंगानेच ते, महाराष्ट्र टाइम्स आणि 'सकाळ' च्या रविवार पुरवण्यांमधून साप्ताहिक सदरे लिहायला लागले. ह्या सदरांना मिळालेल्या थोड्या अनपेक्षित लोकप्रियतेमधून 'संकलन' आणि 'गंगाजळी' सारखी त्यांची संग्रहित पुस्तकं निघाली. गंगाजळीचे तर चार भाग प्रसिद्ध झाले.

माझ्या पहिल्या कलकत्ता भेटीत मला ते शहर इतर सगळ्यांच्याचप्रमाणे महाबकाल वाटलं होतं, आणि मी आय एस आय दिल्लीमध्ये ऍडमिशन बदलून घेतली. पण नंतर पुन्हा दोन वर्षातच पुढच्या अभ्यासक्रमासाठी कलकत्त्यालाच परतलो. कॅंपस तेव्हाच्या कलकत्ता शहराच्या हद्दीच्याही बाहेर, काकांच्या घरापासून फारच लांब होता. मी दोनतीन आठवडयांमधून एखादा रविवार काकांकडे घालवत असे. ते रहात असलेला, नॅशनल लायब्ररीचा अलिपूरमधील भाग, त्या काळच्या कलकत्त्यामधल्या फारच थोड्या दृष्टिसुखद परिसरांपैकी एक होता. कलकत्त्याचा सगळा बकालपणा दाराबाहेर बंद करून ठेवल्यासारखा सुंदर, स्वच्छ आणि तजेलदार असे लायब्ररीचा परिसर! विशेषतः मुसळधार पाऊस पडत असतांना त्यांच्या बाल्कनीमधून समोरचं विस्तीर्ण लॉन आणि प्रचंड मोठी, जुनी झाडं बघणं हेच एक सुख होतं. दिवसभर दोघांबरोबरच्या गप्पा, दोघांबरोबर विषय संपूर्ण वेगळे; पण त्याचं मोल तेवढंच होतं. काका मोजक्याच, त्यांच्या आवडीच्या विषयांवरच गंभीरपणे आणि आत्मीयतेने बोलत; पण माझी काकू मात्र कुठल्याही विषयावर अतिशय बोलकी होती. तिचं उत्साहाने त्यांच्या दैनंदिन आयुष्यातल्या गंमतीजमती, थोड्या नाटकी धाटणीने सांगणं, प्रेमाने आणि हौसेने वेगवेगळे पदार्थ करून घालणं, प्रत्येक पदार्थ 'हा कसा केला असेल ओळख बघू!' असं माझ्यासारख्या पाककलेतील निरक्षराला विचारणं, उत्तर न देता आल्याची थट्टा करणं - सगळंच अतिशय लोभस होतं. कलकत्ता सोडून मला चाळीस वर्ष झाली, पण त्या दोघांबरोबर घालवलेले ते दिवस आठवणींमध्ये अजूनही तसेच ताजे आहेत. घरापासून आयुष्यात प्रथमच दूर रहात असतांना मला त्या भेटींचं, घरगुती वातावरणाचं काय महत्व होतं हे मला खूप उशिरा कळायला लागलं; त्यांना कदाचित कधीच कल्पनाही नसेल.

तीनचार वर्षांपूर्वी काकू गेली, आणि कालच काकाही गेले! आपल्याच आयुष्यातली काही वर्ष पुसून टाकल्यासारखी वाटायला लागतात. मोठं झाल्यावर डोळ्यात पाणी आणू नये हे शहाणपण येतं, पण घशात एक हुंदका यायचा थांबत नाही. मग एकदम त्यांच्या घरापुढचं ते विस्तीर्ण हिरवंगार लॉन आठवतं, काकांचा संथ गंभीर आवाज, आणि काकूंचं उकळ्या फुटत असलेलं हास्य ऐकू येतं आणि हे मात्र मनातून आणि कानातून हिरावून नेणं कोणालाच शक्य नाही एवढ्याचा दिलासा वाटतो. आवंढा गिळून मी पुन्हा कामाला लागू शकतो.



Comments