चाळीस वर्षांपूर्वी मी आलो, तेव्हा इथे आय टी मध्ये तीन प्रकारचेच कामकरी लोक प्रामुख्याने दिसत. उतरत्या संख्याक्रमाने - ज्यू, चिनी आणि भारतीय. गोरे लोक सहसा मॅनेजर वर्गाच्या ऊंटावर बसून, ह्या त्रिवंशीय शेळ्यांवर भिस्त ठेऊन, गुलाब हुंगत कचेरीय द्यूत वगैरे खेळतांना दिसत - निदान आम्हा पायदळाच्या नजरेला. काळे लोक फारच तुरळक असत; 'टोकन ब्लॅक' हा विषारी शब्दप्रयोग मी तेव्हा प्रथम ऐकला होता. चाळीस वर्षात, विशेषतः गेल्या पंचवीसेक वर्षात, भारतीयांनी इतर सर्वांना ह्या धंद्यातून हद्दपार करून आपले साम्राज्य प्रस्थापित केले हा इतिहास सर्वज्ञातच आहे. चिन्यांनी मैदानातून जवळजवळ पळच काढला; ज्यू लोक मात्र अजूनही थोडेफार दिसतात. त्यामुळे एवढ्या वर्षांत मिळून बऱ्याच ज्यू लोकांबरोबर, हाताखाली, डोक्यावर, काम करायची, त्यांना जवळून बघायची संधी मला मिळाली. ह्या एका थोड्या विक्षिप्त, पण खास वैशिष्ट्यपूर्ण जमातीच्या मला जाणवलेल्या ह्या गोष्टी, लक्षात राहिलेल्या ह्या आठवणी.
अमेरिकेत, विशेषतः न्यू यॉर्क भागात ज्यू लोक फारच मोठ्या प्रमाणात आढळतात. सोव्हिएट रशियाच्या ९०-९१ मधल्या विभाजनानंतर तर तेथील अनेक ज्यू लोकांना प्रथमच अमेरिकेत येण्याची संधी मिळाली. इथल्या बऱ्याच शहरात घेटो (सभ्य शब्द - आन्क्लेव्ह) असतात; म्हणजे एकाच धर्माच्या / वंशाच्या लोकांची दाटी असलेले भाग. नवखे, नवशिके लोक सहसा त्यांच्याच कळपामध्ये जास्त आकर्षित होत असल्यामुळे ह्या संख्येत आणखीच भर पडली. न्यू यॉर्क शहराच्या ब्रुकलीन भागात एके काळी (अजूनपर्यंत?) काही वस्त्यांमध्ये पूर्णपणे ज्यूंचंच साम्राज्य होतं; त्यात सुद्धा, 'हेसिडिक ज्यू' ह्या कट्टर धार्मिक ज्यू पंथाच्या लोकांचं. त्यांना ओळखण्याची दृश्य खूण म्हणजे त्यातल्या पुरुषांचे केस लांब, वेण्या घातल्यासारखे असतात आणि डोक्यावर बहुतेकांना जिथे टक्कल पडते तिथे एक छोटीशी गोल टोपी (यामुल्का) असते; शिवाय खूप लांबलचक दाढ्या असतात. तर, बायका स्वतःचे केस झाकण्यासाठी चारचौघात नेहमी टोप्या किंवा विग घालतात. ते शुक्रवार सूर्यास्तापासून शनिवार सूर्यास्तापर्यंत साबाथ पाळतात. त्या काळात ते काहीही काम करत नाही, आणि कुठलीही यांत्रिक उपकरणं वापरत नाहीत. सीनेगॉगमधील प्रार्थनेसाठी सुद्धा कुटुंबच्या कुटुंबं रस्त्याच्या कडेकडेने पायी चालत जातात; अमेरिकन उपनगरांमध्ये एरवी मोठ्या रस्त्यातून चालणारी माणसे दिसणे जवळजवळ अशक्यच! परमेश्वराने सहा दिवसात सृष्टी निर्माण करून सातव्या दिवशी विश्रांती घेतल्याच्या संकल्पेननिमित्त हा साबाथ पाळला जातो.
अस्सल ज्युईश खाद्यपदार्थ हा मात्र एक फार चिंतनीय विषय आहे. बरेच ज्यूज फक्त कोशर अन्नच खातात. कोशर अन्न म्हणजे त्यांच्या तोरा ह्या धर्मग्रंथामध्ये सांगितलेल्या नियमांनुसार असलेले अन्न - त्यामध्ये कुठले पदार्थ खावे, खाऊ नये, एकत्र खाऊ नये, एकत्र शिजवू नये, कुठल्या भांड्यात शिजवावे वगैरे अनेक किचकट नियम आहेत. उदा. मांस आणि दुग्धजन्य पदार्थ एकत्र करण्याला परवानगी नाही, त्यामुळे चीजबर्गर हा अमेरिकेतील लोकप्रिय पदार्थ त्यांना निषिद्ध! हॅम्बर्गरमध्ये असलेल्या सबगोलंकारी मांसामुळे तो तसाही निषिद्ध असेलच बहुतेक! अंडी आणि दूध एकत्र करण्यावरही निर्बंध असल्यामुळे बऱ्याच ज्यू लोकांना सामान्य आईस्क्रीम वर्ज असते. द्राक्षांसारखे काही पदार्थ तर फक्त ज्यू लोकांनीच बनवलेले असायला हवेत, त्यामुळे कोशर वाईन्स वेगळ्या असतात. ह्या नियमांचे काटेकोर पालन होते आहे ना, ह्यावर नजर ठेवायला निदान मोठ्या ज्युईश रेस्टोरंट्समध्ये तरी खास राबाय (मराठीत राबी) असतात.
काही जेन्युईन ज्युईश पदार्थ चाखल्यावर मला स्वतःला तरी, त्यांच्या एकूण नियमावलीमध्ये 'पदार्थामध्ये चवीचा मागमूसही आढळता कामा नये' असा एक अलिखित नियम असावा असा संशय आहे. त्याशिवाय 'पदार्थ जेवढा शुष्क आणि नीरस, तेवढा चांगला' अशीही एक श्रद्धा असावी. त्यांना मात्र, त्यांच्या सगळ्याच प्रथांप्रमाणे, ह्या पदार्थांचा फार अभिमान असतो. इथे आल्याआल्या सुरुवातीलाच मी साधा बेगल खाऊन बघितला, आणि चुकून कागदाचा/पुठ्ठ्याचा लगदा खातो आहे की काय ह्या भितीने घास तोंडाबाहेर काढणार होतो. ह्यावर माझ्या ज्युईश सहकाऱ्यांनी मला बेगल आवडायला लागेपर्यंत त्यांच्या आवडत्या बेकऱ्यांमधून आणून खायला घालायचा चंग बांधला. परिणामतः आता बेगल, क्रीम चीज आणि लॉक्स (साल्मन माशाचे खारवलेले काप) हा माझ्या आवडत्या पदार्थांपैकी एक आहे; आणि न्यू यॉर्क/न्यू जर्सी एवढा उत्कृष्ट बेगल खरोखर कुठ्ठेच मिळत नाही ह्या सत्याचा मलाही साक्षात्कार झालेला आहे. पुढचे काही जन्म इथेच राहिलो, तर इतर ज्युईश पदार्थही थोडे आवडू शकतीलही; पण मातझा बॉल्स ह्या पराकोटीच्या नीरस आणि कोरड्या पिठाच्या गोळ्यांसाठी मात्र बहुतेक ज्युईश निर्वाणापर्यंत वाट पहावी लागेल.
ऑफिसातील कामाच्या बाबतीत त्यांच्या डोकेबाजपणाची वारंवार जाणीव होत असे. माझ्या बहुतांश ज्युईश सहकाऱ्यांमध्ये अतिशय तल्लख बुद्धी, कामावरील केंद्रित लक्ष, प्रामाणिकपणा, ते नीट पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडणे हे गुण नेहमीच दिसून येत. आय टी सिस्टम डिझाईनमध्ये त्यांचा एखाद्या प्रश्नाकडे संपूर्ण वेगळ्याच नजरेने पाहण्याचा - आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंगचा - अनुभवही मी बऱ्याच वेळा घेतला.
ह्या गुणांच्या जोडीला त्यांच्या वागणुकीमध्ये काही खाचखळगेही जाणवले. ते सहसा चटकन तुमच्या जवळ नाही येणार (जसे आयरीश लोक सहज येतात!). त्यांच्या नजरेत तुम्ही त्या सन्मानासाठी पात्र ठरायला हवं, जवळजवळ 'गिल्टी अंटील प्रूव्हन इनोसंट' म्हणाना! आणि त्यानंतरही व्यावसायिक जवळीक आणि दिलखुलासपणा ह्यातील सीमारेषा सदैव जागृत असतात. त्यांना स्वतःच्या धर्माचा, रूढींचा आणि वारशाचा फार आग्रही अभिमान असतो. सर्वसामान्य ज्यू, सर्वसामान्य मुस्लीम माणसासारखाच अतिशय धार्मिक असतो (ख्रिश्चन किंवा हिंदूंच्या तुलनेत!), असं मला जाणवलंय. पण महत्वाचा फरक म्हणजे, त्यांना इतरांना सक्तीने आपल्या धर्मात ओढण्याची अजिबात इच्छा नसते. आंतरधर्मीय विवाहाला बंदी नसली, तरी अशा दाम्पत्याची मुले आपोआप ज्यू समजली जात नाहीत. प्रत्यक्ष कामामध्ये सुद्धा थोडा हेकटपणाकडे झुकणारा परखडपणा, 'मी म्हणेन तेच...' किंवा 'मी म्हणतो म्हणून...' हा त्रासदायक भाग जाणवतो. पण एकतर असे इगोज बऱ्याच खऱ्या टॅलेन्टेड टेक्निकल जनतेमध्ये असतात; शिवाय कित्येकदा त्यांचा मार्गही चुकीचा नसल्यामुळे तडजोड करायला फार त्रास होत नसे.
सर्वात जास्त लक्षात राहिली आहे ती त्यांची अतिशय आनंदी, उत्साही वृत्ती आणि मिश्कील विनोदबुद्धी! अगदी फिड्लर ऑन द रूफ च्या नायकासारखे - परिपक्व, सगळ्याकडे एका अलिप्त, थोड्या प्रेमळ आणि थोड्या साशंक नजरेने बघणारे - बरेच लोक मी प्रत्यक्षात बघितले आहेत. त्यांच्या लोभीपणाबद्दल, कंजुषीबद्दल जे काही योग्य अयोग्य समज-गैरसमज आहेत त्याची जाण ठेवून केलेले कित्येक चांगले विनोद मी ह्याच ज्युईश सहकाऱ्यांकडून ऐकले होते. काही वेळा मी ऑफिसात कोणाला तरी माझ्या हिशेबाने 'कोकणी तिरकस' टोमणा मारल्यावर, दिलखुलासपणे दाद देऊन, 'आर यु शुअर यूअर अँसेस्टर्स वेअर नॉट ज्युईश?' असं मिश्कीलपणे विचारणं - हे अनुभव वेगवेगळ्या ज्युईश सहकाऱ्यांकडून आलेले आहेत. त्यांच्या नजरेत तो अर्थात माझा कौतुकास्पद बहुमान होता.
आता ऑफिसातले सहकारी नाहीत. सध्या फक्त माझा गेल्या तीसेक वर्षांचा ज्युईश डॉक्टर तेवढा संपर्कात आहे. कालच त्याला वार्षिक तपासणीसाठी भेटलो होतो. तोही माझ्याच वयाचा आहे. जबरदस्त गप्पिष्ट आहे. पेशंट मॅनर्स किंवा बेडसाईड मॅनर्स वगैरे तो उपजत घेऊनच आलेला असावा. प्रत्येक वेळी त्याला भेटून बाहेर पडतांना मी आत जातानाच्या कित्येक पट जास्त आनंदी, उमेदी आणि उत्साही मनोवृत्तीने बाहेर पडतो. काल आम्ही प्रवासाबद्दल बऱ्याच गप्पा मारल्या. त्याने ऑस्ट्रेलिया सोडून उरलेलं बहुतेक जग पाहिलेलं आहे; आणि ऑस्ट्रेलियासकट ते बघायचं माझं स्वप्न आहे. संभाषणाला सध्याच्या मध्यपूर्वेतील परिस्थितीची पार्श्वभूमी होतीच. बोलताना सहज त्याने मला ९/११ च्या हल्ल्याच्या वेळी त्याचा मेहुणा वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या १०१ व्या मजल्यावर काम करत होता हे सांगितलं. विमानाने ९३ ते ९९ ह्या सात मजल्यांना धडक दिली असल्यामुळे, 'आणि...?' हा माझा पुढचा प्रश्न, प्रश्न नसून केवळ एक अनावश्यक उद्गार होता. त्याने शांतपणे 'त्याच्या दोन लहान मुलांना आम्ही वाढवलंय. त्यामुळे दहशतवादाचा माझ्या आयुष्याला प्रत्यक्ष स्पर्श झालेला आहे' हे सांगितलं. पुढे मात्र, सध्याची परिस्थिती थोडी निवळली की इस्राएलला नक्की जा; जेरुसलेम, बेथलेहेम, वेलिंग वॉल कसे मॅजिकल आहेत ते बघ, जमल्यास काही किबुत्झ बघ... बरंच सांगत होता.
माझ्या लक्षात राहिलंय ते फक्त त्याच्या डोळ्यातलं शांत आत्मविश्वासी हास्य! माझ्या आठवणीतल्या ज्युईश लोकांची ओळख आहे ती!
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...