आमचे शेट्ये सर

गणित विषयाबरोबरचं माझं प्रेम प्रकरण अस्सल हिंदी सिनेमांमधल्या प्रेमाच्या वळणांनी गेलं. म्हणजे, 'पहले नफरत, फिर उल्फत' वगैरे. पाचवी-सहावी मध्ये कधी तरी एका सहामाही परीक्षेत काठावर पास झाल्याची जखम अंगावर बाळगून, मुरार बाजी सारखा तरीही लढतच राहिलो होतो ह्या विषयाबरोबर; धीरोदात्त शौर्य वगैरे नव्हे, केवळ सुटका नाही म्हणून. मोठ्या बहिणीकडून पुस्तकामधली गणिते सोडवून घेऊन, ती 'पाठ' करून परीक्षा देण्याचा अभिनव उपक्रमही करून बघितल्याचं आठवतं. पुन्हा काळ असा, की शाळेबाहेर 'कोचिंग क्लास' मध्ये जाणं ही महानामुष्कीची गोष्ट मानली जात असे - अगदीच नापास होऊन वर्षभर मागे राहण्याच्या खालोखाल. शेवटी SSC ला असताना भलतं रिस्क नको, म्हणून गणित आणि इंग्रजी ह्या दोन विषयांसाठी क्लासला जाण्याचा खास परवाना मिळाला.

गणिताच्या अद्भुतरम्य खजिन्याच्या गुहेचं दार उघडण्याचाच तो परवाना ठरला. गिरगावातल्या 'साहित्य संघ मंदिरा' जवळच्या केळेवाडी ह्या अतिसूक्ष्म गल्लीमध्ये मान खूप उंच केल्यावर 'व्हिक्टरी क्लासेस' अशी एक धुळीच्या पुटांमधून अस्पष्ट वाचता येऊ शकणारी पाटी दिसत असे. त्या मोडकळीस आलेल्या, चाळवजा बिल्डीन्गीचे दोनतीन लक्ष्मणझुला थाटाचे जिने चढून गेल्यावर तिथे खोलीवजा जागांमध्ये वर्ग भरत. तिथे शेट्ये सर ह्या महानुभावाशी पहिली ओळख झाली होती. साठीचे तरी असावेत, मध्यम उंची, काळा तुकतुकीत वर्ण, चष्म्याआडून मिश्किलपणे न्याहाळणारे डोळे आणि संपूर्ण चंदेरी मागे वळवलेले केस - हे त्यांचं पहिल्या भेटीतलं रूप अजूनही लक्षात आहे.

त्यांच्या धारदार जिभेची आणि अस्सल कोकणी तिरकस विनोदाची झलक पहिल्याच तासाला जाणवली होती. संध्याकाळी सहाच्या वर्गासाठी, खोली पावणेसहालाच तुडुंब भरलेली असे. त्यातून एखादा / दी चुकूनमाकून सहा-पाच (त्यापेक्षा उशिरा येणारे जिन्यातुनच मागे परतत असावेत) ला वर्गात आले तर त्यांना 'केळेवाडीत रहाता वाटतं?' ह्या थंड शेऱ्याला तोंड देऊन दाटीवाटीने भरलेल्या वर्गात बसायला जागा शोधावी लागे. पण ह्या माणसाने हसत-खेळत चेष्टा-मस्करी करत गणिताच्या ब्रम्हराक्षसाला माझा मित्र कधी केला कळलंच नाही! त्यांचं अविस्मरणीय ऋण म्हणजे, त्यांनी गणिताबद्दलची भिती डोक्यातून काढून टाकली. गणितामधली, एका मुद्द्यानंतर येणारी पुढच्या मुद्द्याची तर्कशुध्द अटळता दाखवून दिली – ‘अगदी बालवर्ग करू नका हं' अस आर्जवून विनवत, पण महत्वाच्या स्टेप्स पुन्हापुन्हा उगाळत. पाठांतराला वाव नाही, आणि त्याची गरजही नाही - हे समजल्यावर मी जो सुटकेचा निश्वास टाकला होता तो सबंध वर्गाला ऐकू गेला असेल. घोकंपट्टी वरचा त्यांचा विनोद अजून आठवतो - बंड्या गॅलरीत बसून करतोय पाठ 'अब = कड' कसं सिद्ध करायचं; दुसऱ्या दिवशी परीक्षेत 'कख = गघ' सिद्ध करायला सांगितलं, की म्हणायचं 'हे शिकवलं नव्हतं'!

ह्या माणसाच्या तिरकस विनोदी बोलण्याच्या पाठीमागे शिकवण्याबद्दलची, मुलांना हे यायला हवं, काय केल्याने त्यांना ते जास्त चांगलं समजेल ह्या विचारांची केवढी आस्था, तळमळ आणि अनुभव होता हे समजायला दुर्दैवाने बरीच वर्ष आणि त्यांच्यापासून बरंच अंतर दूर जायला लागलं. ‘तीन तास वेळ, शंभर मार्क, मुलींना कॉपी अलाउड; पण मुळात गणितच येत नसेल तर काय करणार हो!’ असले त्यांचे विनोद आता बऱ्याच अंगांवर शहारा आणतील, कारण त्याआडचा प्रेमळ खेळकरपणा बघायला वेळच नसेल! 'साताचं वर्गमूळ कस काढायचं ते शिकवलं, पण वर्गमुळाखाली साताची किंमत कशी काढायची ते नाही शिकवलं. शिक्षण म्हणजे धंदा होऊन बसलाय' ह्या त्यांच्या पालकांच्या तक्रारीवरील टोमण्यामागची - ह्या शिकवण्याच्या पेशावर, धर्मापेक्षा जास्त निष्ठा ठेवणाऱ्या माणसाची - व्यथा कळायला फार काळ जायला लागला. मी शिकत असतानाच त्यांचा मुलगाही खालच्या इयत्तांचे, क्वचित आमचेही गणिताचे क्लासेस शिकवू लागला होता. सगळे त्यांचेच जोक्स, त्यांचीच उदाहरणे वापरत असे. पण तो ह्या सगळ्याकडे एक टेक्निक म्हणून बघतो आहे, आणि त्यांचा उमाळा मात्र पोटातून आलेला होता हा फरक स्पष्ट जाणवत असे.

SSC माझ्या अपेक्षेपेक्षा बऱ्याच चांगल्या पद्धतीने, विशेषतः गणितामध्ये, पास झाल्यावर त्यांना पेढे द्यायला गेलो होतो. माझ्या गणितातल्या मार्कांकडे आणि शेट्ये सरांकडे आळीपाळीने, हवेतून अंगठी काढून दाखवणाऱ्या बाबाकडे बघावं तशा आदराने टकमका बघत होतो. माझा गणिताचा पूर्वेतिहास माहिती नसल्यामुळे ते त्यांच्या सवयीने पटकन म्हणाले 'आणि, चार मार्क कुठे गेले?'. माझा माझ्या कानांवर विश्वास बसेना. 'गेलेल्या चार मार्कांचं काय घेऊन बसलात हो, एवढ्या तळागाळातून वर आलेल्या मला तुमच्याकडून वरदान मिळालेल्या शहाण्णवचं केवढं मोल आहे ते विचारा ना' - हे बोलायचं होतं. तसा वाकून नमस्कारही करायचा होता, पण 'अस करणं बावळटासारखं दिसेल' ह्या बावळट भितीने तो केला नाही. थोडं शहाणपण अंगी आल्यावर आतापर्यंत शेकडो वेळा तो नमस्कार केला; पण ते फक्त मनामध्ये होते, प्रत्यक्षात डोळ्यासमोर नव्हते.

अर्थात, कानांवर विश्वास माझ्या शाळेतल्या गणिताच्या बाईंचाही बसला नव्हता - माझ्या 'प्रगती' चे पेढे घेताना. मला पुढे कॉलेजमध्ये गणित विषयात डिग्री मिळवायची आहे ऐकल्यावर तर त्यांच्या डोळ्यात 'आई-वडिलांकडे पैसे एवढे जास्त झालेत का' इथपासून ‘तू आणि तुझं नशीब’ इथपर्यंत अनेक दयार्द्र भाव ओसंडून वहात होते.

माझ्या नशिबाने, एकदा गणिताचं सौंदर्य समजल्यावर मी पुढे प्रगती करू शकलो. ISI मध्ये अजूनही एक-दोघे अशीच संख्याशास्त्राची सौंदर्यस्थळं आस्थेने उकलून दाखवणारे जागतिक किर्तीचे शिक्षक लाभले. पण पाया शेट्ये सरांनी भक्कम रचला होता हे वारंवार जाणवत राहिलं. उगाचच जंगलातल्या दाट झाडीचा बागुलबुवा न करता, एकदा मुळापर्यंत जाता आल, की सगळं कसं सरळ सोपं असतं हे रहस्य उकलून दाखवलं. शेट्ये सरांनी त्या शहाण्णव मार्कांच्यापेक्षा खूप मोलाचं, प्रश्नं तपासून बघण्याचं, ते सोडवायचं तंत्र शिकवलं. हे तंत्र गणितातच नव्हे, आयुष्यातही उपयोगी पडतं हे ध्यानात यायला, मुळात आयुष्य थोडं बघावं लागलं. कित्येकदा ओहोळामध्ये सुरुवातीलाच बांध घालून बसलेला लाकडाचा ओंडका हलवावा लागतो; मग पाणी त्याच्या कलाप्रमाणे खळाळत त्याचा मार्ग शोधू शकतं. तो पहिला बांध नाहीसा करणाऱ्याचं महत्व फार मोठं असतं. असे ओंडके हलवणारी, आयुष्याला गती देणारी माणसं दर वेळी ओळखता येतातच असं नाही, पण जाणीव आणि आठवण झाली की मात्र मन भरून येतं. एकदम 'आयुष्याची दिशा बदलली' हे शब्द पुस्तकी आणि खोटारडे न राहता, त्याचा प्रत्ययाने जाणवलेला अर्थ उमजतो आणि मग हात आपोआपच जुळतात.

शेट्ये सर, आज जिथे कुठे असाल, तेवढ्या अंतरावरही तुम्हाला हा नमस्कार पोचू दे.

Comments

  1. Great! Reminded me of my English teacher Mrs. Kalelaker.

    ReplyDelete
  2. I wish there is someone who will say this about me ...

    ReplyDelete
  3. Superb! Just superb! Straight from the heart!

    ReplyDelete
  4. Thanks Mukund! Surely, we all have at least one or two teachers, who truly made a difference.

    ReplyDelete
  5. Hemant, looking at your FB page, I think you haven't had to wait at all; you are getting the deserved respect now - :)

    ReplyDelete
  6. Thanks Ajita, it is from the bottom of my heart!

    ReplyDelete

Post a Comment

I would love to hear from you. Please post your comments here...