Originally written on Oct 3, 2015
"तसेच घुमते शुभ्र कबुतर ....."
मनात माझ्या उंच मनोरे, उंच तयावर कबुतरखाना
शुभ्र कबुतर घुमते तेथे, स्वप्नांचा खाउनिया दाणा
शुभ्र कबुतर युगायुगांचे - अधि जन्मले? आणि कशास्तव?
किती दिवस हे घुमावयाचे? अर्थावाचुनी व्यर्थ न का रव?
प्रश्न विचारी असे कुणीतरी? कुणी देतसे अगम्य उत्तर.
गिरकी घेऊन अपणाभवती, तसेच घुमते शुभ्र कबुतर
* * *
फेसबुकवरील
मित्रवर्य श्री. अशोक पाटील
ह्यांच्या सौजन्याने विंदा करंदीकरांची
ही अद्भुत कविता
हाती आली. वाचताक्षणीच
इतकी मनाला भिडली,
की हे कबुतर
डोक्यात घुमतच राहिलं. त्या
बेचैनीचा आस्वाद शब्दात प्रकट
करण्याचा हा प्रयत्न.
लहान, अजाण मुलाच्या
हातात पहिल्यांदाच रुबिक
क्यूब द्यावा, आणि
त्याला त्याच्याशी झगडताना, समज
आणि नासमज ह्यांच्या
हद्दीवर खेळताना पहावे, तशातला
हा प्रकार!
तर कोण हे
कबुतर? विंदांनी अनेक hints दिल्या
आहेत. मनातल्या सगळ्या
उंच मनोऱ्यांच्या - आशेच्या,
आकांक्षांच्या, स्वप्नांच्या सगळ्या सगळ्या उंच
मनोऱ्यांच्याही वर - ते
आहे. पण कितीही
उंचावर असलं तरी
ते कबुतरखान्यामध्ये बंदिस्त
आहे, स्वैर उडू
शकत नाहीय. स्वप्नांचे
दाणे खातंय, पण
सुखात गुटरगू नाही
करत आहे. नुसतंच
घुमतंय. युगायुगांपुर्वी जन्मलंय (हा आपला
तर्क, कोणास ठाऊक
कधीपासून आहे! हा
particular कबुतरखाना तर नक्कीच
नवा असणार). आणखी
किती दिवस असं
घुमत राहायचं, का,
आणि ह्या सगळ्या
(कबुतर) बडबडीचा अर्थ काय
- नुसते प्रश्नच प्रश्न. काहीजण
अगम्य उत्तरं द्यायचा
प्रयत्न करत असले
तरीही अंदरकी बात
अशी असते की
बहुतेकांना उत्तरं माहिती नसतात,
शेवटी प्रत्येकजण आपापल्याभोवतीच
गिरक्या घेऊन ढुंढाळत
असतं.
विंदांच्या
अनेक कवितांना तत्वचिंतनाची
सुरेल बैठक असते
हे लक्षात घेता,
मला ह्यातही आत्मा-परमात्म्याच्या ओढीचा संदर्भ जाणवला.
हे कबुतर 'शुभ्र'
उगीच नाहीय आणि सगळ्या मानवी मनोऱ्यांच्याही वर उगीच नाहीय. ते कबुतरखान्यात
बंदिस्त आहे, म्हणून
नुसतंच घुमतंय. एक दिवस
त्याचा सखा / सखी मिळेल
तेव्हा ते तृप्त
असेल. मधल्या काळात
त्याचा निरर्थक वाटणारा आवाज व्यर्थ.
अर्थात हे आपलं
माझ स्वतःच्या भोवती
गिरक्या घेण (ही कविताच एक शुभ्र कबुतर होऊन जाते).
पण इतकं अप्रतिम
घुमण ऐकवल्याबद्दल (ज्याच्या
स्वरास्वराचा मागोवा घ्यावासा, हाती
येतंय - निसटतंय हा मोहक
खेळ खेळावासा वाटावा)
विंदांचे अनंत धन्यवाद.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...