भाषांतर - २१

पार्कवॉल्ड चर्च मधले अंत्यसंस्कार संपले. त्यासाठी जेवढ्या सगळ्यांना येण्याची इच्छा होती, त्याच्या मानानी ते चर्च फारच लहान होतं. गोरे लोकं, काळे लोकं, मिश्र, भारतीय. जार्विस आणि त्यांची पत्नी आयुष्यात प्रथमच अशा चर्च मध्ये बसले होते, की जिथे गोरयांखेरीज इतर कोणी उपस्थित होते. बिशप स्वतः बोलले - दु:खदायक आणि स्फूर्तीदायक शब्द. बिशप सुद्धा म्हणाले - माणसांना हे कोडं कधी उलगडत नाही, एखादा एवढा होतकरू तरुण ऐन तारुण्यामध्येच का मारला जावा; एखादी स्त्री का विधवा व्हावी, मुलं का अनाथ व्हावीत, एखादा देश त्याच्या एका मोठ्या सुपुत्राला का गमावून बसावा. दक्षिण आफ्रिकेबद्दल बोलतांना त्यांचा आवाज चढला, त्यांची भाषा अतिशय सुंदर झाली. एवढी, की काही काळ जार्विस त्या मंतरलेल्या शब्दांमध्ये त्यांचं स्वतःच दुःख विसरू शकले. आणि जेव्हा बिशप म्हणाले, की हे एक दक्षिण आफ्रिकेला समर्पित जीवन, एक हुशार आणि धाडसी आयुष्य, एक भितीला झुगारून लावणारं प्रेमळ हृदय होतं - तेव्हा जार्विसचं हृदय त्यांच्या ह्या अनोळखी मुलाबद्दलच्या अभिमानानी उचंबळून आलं.
दहन विधी संपला. मोठाले पितळी दरवाजे जराही आवाज न करता उघडले, आणि शवपेटिका निःशब्दपणे राख होऊन जाण्यासाठी आगीमध्ये सरकली. ज्या लोकांशी काही ओळखदेख नव्हती असे लोक त्यांच्याशी येउन हस्तांदोलन करून गेले. काहीजण असल्या प्रसंगी बोलायची औपचारिक वाक्य बोलत होते, तर काही सरळ त्यांच्या मुलाविषयी बोलत होते. काळे लोक - हो, काळे सुद्धा - त्यांनी तर आयुष्यात प्रथमच काळ्या लोकांशी हातमिळवणी केली होती.
ते हॅरीसनच्या घरी परतले. येणाऱ्या अनेक रात्रींपैकी सर्वात भयानक रात्र घालवायला. मार्गारेटच्या दृष्टीनी निःसंशय सगळ्यात भयानक; आज ते पुन्हा तिला एकटीला झोपायला पाठवून देणार नव्हते. पण त्यांच्या दृष्टीनी मात्र हा अध्याय संपला होता. ते शांतपणे हॅरीसनच्या अभ्यासिकेमध्ये बसू शकले असते - त्यांची  व्हिस्की पीत, पाईप ओढत, ते म्हणतील त्या विषयावर चर्चा करत, अगदी त्यांच्या मुलाविषयी सुद्धा.
-    तर मग जार्विस, तुम्ही किती दिवस राहणार आहात? अर्थात, तुम्हाला हवे तेवढे दिवस तुम्ही नक्की राहू शकता बर का इथे.
-    थँक्यू, हॅरीसन. मला वाटतं मार्गारेट मेरीला आणि मुलांना घेऊन परत जाईल. आमच्या शेजाऱ्याचा मुलगा आहे तिथे. चांगला आहे, नुकताच आर्मीमधून परतलाय, त्याला ह्यांच्याबरोबर सोबत म्हणून रहायची व्यवस्था करू. पण मी मात्र आर्थरचा इथला कारभार आवरायला, निदान काही काळ तरी, थांबेन.
-    आणि, एक विचारू का; पोलिस काय म्हणाले?
-    ते अजून तो नोकर शुद्धीवर यायची वाट बघताहेत. त्यांना आशा आहे की तो त्यातल्या एकाला तरी ओळखू शकेल. त्यांचं म्हणणं आहे, की एरवी हे अतिशय कठीण जाईल. इतक्या पटकन हा सबंध प्रसंग घडला ना. त्यांना हेही वाटतंय, की कोणीतरी त्यांना पळून जातांना पाहिलं असेल. ते घाबरलेले होते आणि घाईत होते, त्यामुळे त्यांच्या हालचाली डोळ्यात भरण्यासारख्या असतील.
-    माझी अगदी देवाजवळ प्रार्थना आहे की मिळूच देत ते सगळे. आणि लटकवा एकेकाला! सॉरी हं, जार्विस! नाही, मला कळतंय तुम्हाला काय वाटतंय ते. आपण अजिबात सुरक्षित नाही आहोत, जार्विस. ह्यांना लटकावून सुद्धा आपल्याला काही मोठ संरक्षण मिळेल अशातली गोष्ट नाही. कधीकधी वाटतं हे सगळं आपल्या हाताबाहेर गेलंय.
-    मला समजतं तुम्हाला काय म्हणायचय. पण मी, मला... कदाचित एवढ्यातच ह्याचा विचार करता येत नाहीय.
-    मला माहिती आहे तुम्हाला काय म्हणायचय. मला समजतं, निदान मला वाटतं समजतं. ही बाजू आत्ता तुम्हाला जाणवतच नाहीय. माझंही असंच होईल. मला खरच कळत नाही.
-    मलाही कळत नाही. तुमचं बरोबर आहे, ती बाजू मला आत्ता, अजूनतरी महत्वाची वाटत नाहीय. पण हेही जाणवतं, की त्याकडे बघण्याचाही, दुसरा एक मार्ग आहे.
-    आम्ही जास्त पोलिसांची मागणी करतो आहोत, जार्विस. उद्या रात्री इथे पार्कवॉल्डमध्ये प्रचंड मोठी सभा आहे. इथे संतापाचा अगदी कळस झालाय. तुम्हाला माहिती आहे जार्विस, ह्या उपनगरांमध्ये बहुतेकांना त्यांच्या नोकरांच्या बरोबर आणखी कोण राहतं कल्पनाही नसते. मी नाही असलं खपवून घेत. मी माझ्या नोकरांना सक्त ताकीद दिलेली आहे, ह्या घराजवळ कोणी परका मनुष्य फिरकता कामा नये, रात्री झोपायला थांबणं सोडूनच द्या. आमच्या कामवाल्या बाईचा नवरा येतो, तो कामाला आहे कुठेतरी स्प्रिंग्स का बेनोनी का कुठून तो. ती इमानदारीत विचारते, आणि मी परवानगी देतो. पण दुसऱ्या कोणाला नाही हं. एवढी जर काळजी घेतली नाही ना मी, तर दोन दिवसात हे घर काके-मामे, भाऊ आणि भाचे ह्यांनी भरून जाईल - कोणी हातात धरायच्या लायकीचा नसेल त्यातला.
-    हो, जोहानसबर्गमध्ये हे असलंच चालत म्हणायचं.
-    आणि ही घरामागची गटारं! आम्ही एवढ्या वेळा सांगितलय, आता चांगले संडास झालेत, आता तरी ही घाणेरडी गटारं बंद करा. काळोखी आणि भीतीदायक. हे भिकारडे मवाली ह्यांचा लपायला म्हणून वापर करतात. ह्या देशाचं काय होत चाललय देवच जाणे, मला तर समजत नाही. मी काही ह्या काळतोंड्यांचा तिरस्कार नाही करत, बरं का जार्विस. मी त्यांना योग्य तसं वागवायचा प्रयत्न करतो, धड पगार देतो, स्वछ खोली देतो रहायला आणि व्यवस्थित सुट्टी देतो. आमचे नोकर वर्षानुवर्ष राहताहेत आमच्याकडे. पण हे काळे एकंदरीत हाताबाहेर जात चाललेत. कल्पना आहे तुम्हाला, ह्यांनी युनिअनगिरी सुरु केल्येय आता तर.
-    हे नव्हतं मला माहिती.
-    मी सांगतो ना. इथे खाणींमध्ये दिवसाला दहा शिलिंग हवेत म्हणून संप करायची धमकी दिल्येय. आत्ता त्यांना एका पाळीचे तीन शिलिंग मिळतात, आणि आधीच काही खाणी बंद पडायच्या मार्गावर आहेत. ह्यांना रहायला चांगली आवारं बांधली आहेत. त्यातल्या नवीन आवारांमध्ये मला सुद्धा रहायला आवडेल. चांगलं चारठाव जेवण मिळतंय, घरी मिळतं त्यापेक्षा कितीतरी चांगलं. फुकटच्या वैद्यकीय सोयी आहेत, आणि कायकाय देव जाणे. मी सांगतो जार्विस तुम्हाला, हे असले खर्च जर वाढत राहिले, तर खाणी शिल्लक राहणार नाहीत. आणि मग दक्षिण आफ्रिकेचं काय होईल? आणि ह्या काळ्यांचं स्वतःच काय होईल? हजारांनी भुकेनी तडफडून मरतील ना?
-    मी तुमच्या बोलण्यात व्यत्यय तर नाही ना आणत? जॉनने त्याच्या वडिलांच्या अभ्यासिकेमध्ये येत विचारलं.
-    जॉन, बस ना. हॅरीसन म्हणाले.
तो बसला, आणि त्याचे वडील, जे नुकतेच रंगात येत होते, ते त्यांचा मुद्दा आणखी खुलवून मांडू लागले.
-    तर, सांगा ना जार्विस. कुठे जातील हे शेतकरी? कोणाला विकतील त्यांची फळफळावळ आणि धान्य? कोणाला परवडणारे ते विकत घ्यायला? त्यांना काही सरकारी मदत नसणार आहे. काही उद्योगधंदेही नसणार आहेत. कारण खाणी जो पैसा पुरवतात त्याच्या जोरावर ह्यांच्या वस्तू विकत घेतल्या जातात ना. आणि हे आपलं सरकार, खाणींच्या नफ्याच्या सत्तर टक्क्यांवर आरामात कर वसूल करतंय! काय होईल ह्या सरकारचं, खाणीच नसल्या तर - हां? ह्या देशातले अर्धे आफ्रीकानेर बेकार होतील. शासकीय सेवा म्हणून काही राहणार नाही - त्यातले अर्धेही नोकऱ्या गमावून बसतील.
त्यांनी दोघांना आणखी थोडी व्हिस्की ओतली आणि आपलं भाषण पुढे चालू ठेवलं.
-    मी सांगतो तुम्हाला, ह्या खाणी जर नसल्या तर दक्षिण आफ्रिका म्हणून काही जिन्नस राहणारच नाही. हे दुकान बंद करून, काळ्यांच्या हातात सोपवून निघून जावं लागेल आपल्याला. म्हणून हे लोक जेव्हा खाणींना नांवं ठेवतात ना, तेव्हा मला संताप येतो तो हा. विशेषतः हे आफ्रीकानेर. त्यांच्या डोक्यात काहीतरी खुळचट कल्पना आहेत की हे खाणींचे मालक कोणी परके लोक आहेत, नुसत रक्त शोषायला बसले आहेत. एकदा ही कोंबडी अंडी द्यायची थांबली की गाशा गुंडाळून परत जाणार आहेत. मी सांगतो तुम्हाला, ह्या खाणींमधले बहुतांश शेअर्स इथे, ह्या देशातल्याच लोकांकडे आहेत. आपण - आपण स्वतः - ह्या खाणींचे मालक आहोत. मला ह्या मूर्खासारख्या बडबडीचा कंटाळा आलाय. प्रजासत्ताक पद्धती म्हणे! आली ती डोंबलाची प्रजासत्ताक पद्धती तर काय होणारे ह्या देशाचं?
-    हॅरीसन, मी झोपायला जातो. मार्गारेट परत एकटी झोपायला नको आहे मला.
-    ओ, माफ करा बुवा! मी मुळी सगळं विसरून बोलतच सुटलो.
-    नाही, माफ करा म्हणण्याएवढं काही नाही त्यात. तुमचं बोलणं ऐकून थोडा फायदाच झाला मला. मी बोललो नाही, ते मला त्यात रस नाही म्हणून नव्हे. तुम्हाला समजत असेलच.
-    सॉरी, सॉरी! मी साफ विसरूनच गेलो. हॅरीसन अगदी अजीजीनी म्हणाले.
-    माझ्यावर विश्वास ठेवा. मी जे म्हटलं की तुमच्या बोलण्याचा मला फायदाच झाला, ते अगदी मनापासून म्हटलं होतं.
त्यांनी हॅरीसन पिता-पुत्रांकडे बघितलं. मी काही तासंतास मृत्यूविषयी बोलत बसणाऱ्या लोकांपैकी नव्हे. हॅरीसन अगदी बेचैन होऊन त्यांच्याकडे बघत म्हणाले, तुम्ही आम्हाला बरं वाटावं म्हणून बोलताय असं.
-    एकच इच्छा आहे, तो आत्ता इथे पाहिजे होता. त्याला तुमच्याबरोबर वाद घालतांना मला बघायला मिळालं असतं.
-    तुम्हाला ते बघून फार आनंद झाला असता, मिस्टर जार्विस. जॉन हॅरीसन अगदी तत्परतेनी म्हणाला. नुकत्याच दिवंगत झालेल्या ह्या माणसाबद्दल बोलण्याची संधी तो सोडत नव्हता. त्याच्याइतक सुंदर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतांना मी कोणालाच पाहिलं नाहीय.
-    मला त्याची मतं पटत नसत, पण तो जे काय बोलायचा त्या सगळ्याबद्दल फार कौतुक होतं मला.
-    फार चांगला माणूस होता तो, आम्हाला अभिमानच आहे तो आमचा मुलगा असल्याचा. गुड नाईट.
-    गुड नाईट, जार्विस. काल झोप नीट लागली ना? आणि मार्गारेटला?
-    हो, आम्हाला दोघांनाही मिळाली थोडी झोप.
-    आज आणखी थोडी मिळू दे. लक्षात ठेवा हं, हे घर तुमचंच आहे.
-    थँक्यू, आणि गुड नाईट. जॉन?
-    काय, मिस्टर जार्विस?
-    तुला तो ग्लॅडिओलस स्ट्रीट वरचा आफ्रिकन मुलांच्या क्लब माहिती आहे का?
-    हो अर्थात. आमचाच - आर्थरचा आणि माझा - क्लब होता तो.
-    मला तो बघायला आवडेल, तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा.
-    आनंदानी घेऊन जाईन मी तुम्हाला. आणि मिस्टर जार्विस...
-    काय?
-    बाबा जेव्हा आफ्रीकानेर म्हणतात ना, त्यांना खर 'राष्ट्रवादी' म्हणायचं असतं. आर्थर नेहमी त्यांना बजावून सांगत असे, ते हो-हो म्हणायचे. पण लक्षात ठेवायला कठीण जातं त्यांना बहुतेक.
जार्विस हसले, प्रथम मुलाकडे बघून, मग बाबांकडे बघून.
-    बरं बोललास, गुड नाईट.
* * *
दुसऱ्या दिवशी सकाळी हॅरीसन त्यांच्या पाहुण्यासाठी जिन्याच्या पायथ्याशीच थांबले होते. या, माझ्या अभ्यासिकेत जाऊ. ते दोघं आत गेल्यावर हॅरीसननी दरवाजा ओढून घेतला.
-    जार्विस, पोलिसांचा आत्ता फोन आला होता. तो मुलगा शुद्धीवर आलाय. तो म्हणाला तिघंजण होते नक्कीच. त्यांची नाकं-तोंडं झाकलेली होती, पण त्याला खात्री आहे की ज्याने त्याला मारून खाली पाडलं तो पूर्वी त्यांच्याकडे बागेचं काम बघत असे. मेरीनी त्याला काहीतरी भानगडीवरून हाकलला होता. ह्याने त्याला ओळखलं, कारण त्याच्या डोळ्यांची विचित्र मिचमीच होत असे त्यावरून. ही मेरीकडची नोकरी गेल्यावर तो म्हणे डूर्नफॉंन्टेनमध्ये एका कापड गिरणीत काम करत असे. नंतर त्याने ती गिरणी सोडली, आणि कोणालाच माहिती नव्हतं तो कुठे होता ते. पण आता त्यांना ह्याच्याशी मैत्री असलेल्या दुसऱ्या एका काळ्याची माहिती मिळाली आहे. ते त्याला शोधताहेत, ह्या बागकामवाल्याचा तलास लावण्यासाठी. तेव्हा प्रगती नक्कीच आहे.
-    दिसतंय खरं तसं.
-    ही मी आर्थरच्या काळ्या गुन्हेगारीबद्दलच्या लिखाणाची कॉपी करून ठेवली आहे. ब्रेकफास्ट नंतर सावकाशिनी तुम्ही वाचू शकाल.
-    थँक्यू, ठेवा तिथे टेबलावर.
-    आणि, झोप कशी लागली? तुम्हाला? मार्गारेटला?
-    ती छान गाढ झोपली होती. गरजही होती तिला त्याची.
-    अर्थातच. चला, ब्रेकफास्ट घेऊ.
ब्रेकफास्ट नंतर जार्विस पुन्हा त्या अभ्यासिकेमध्ये आले आणि त्यांच्या मुलाचं लिखाण वाचू लागले. ते पहिल्यांदा शेवटच्या पानाकडे वळले, आणि त्यांनी मोठ्या दुःखानी तो अपूर्ण राहिलेला परिच्छेद वाचला. ही त्यांच्या मुलाची जवळजवळ शेवटची कृती होती. हे लिहिलं तेव्हा तो जिवंत होता. आणि ह्या क्षणी, हे वाक्य असंच अर्धवट टाकून, तो उठून जिन्यावरून खाली गेला होता - त्याच्या मृत्यूला भेटायला. जर कोणी ओरडलं असतं, नको जाऊ खाली. जर कोणी ओरडलं असतं, थांब, पुढे धोका आहे. पण असं ओरडायला कोणीच नव्हतं. आता जे सगळ्यांना माहिती आहे, ते तेव्हा कोणालाच माहिती नव्हतं. पण हे सगळे विचार व्यर्थ होते. काय घडू शकलं असतं, पण आता कधीच होऊ शकणार नाही असल्या विचारात बुडून जायची त्यांना सवय नव्हती. उगाचच ही असली अकल्पित घटना आपण असतो तर थांबवू शकलो असतो, असल्या कल्पना करत बसण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यांच्या उरातलं दुःख त्यांना असले निरर्थक विचार करायला लावत होतं. त्यांना त्यांच्या मुलाला समजून घेण्याची इच्छा होती, जी इच्छा पूर्ण होऊ शकणार नाही अशा कसल्याचीच इच्छा नव्हती त्यांना. म्हणून त्यांनी सक्तीनी स्वतःला शेवटचा परिच्छेद वाचायला लावला - मनातल्या भावना बाजूला ठेवून, नुसत्या तर्कशुद्धपणे.

सत्य परिस्थिती ही आहे, की आपली खिश्चन संस्कृती द्विधा प्रश्नांनी छिन्न-विच्छिन्न झाली आहे. आपला माणसाच्या बंधुत्वावर विश्वास आहे, पण आपल्याला ते दक्षिण आफ्रिकेमध्ये नको आहे. ईश्वर माणसाला अनेक देणग्या देतो, आणि ह्या देणग्यांचा योग्य वापर माणसाचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी आवश्यक असतो असं आपण मानतो. पण ह्या विश्वासाचा फार खोलवर जाऊन तलास घ्यायची आपल्याला भिती वाटते. दलितांना मदत करण्यावर आपली श्रद्धा असते, पण आपल्याला त्यांना दलितच ठेवायचं पण असतं. आणि म्हणून, आपल्या खिश्चन असण्यावरचा विश्वास शाबूत ठेवायचा, तर त्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या, तिन्ही लोकांच्या स्वामीच्या माथी, आपले मानवी मतलब लादून, असं म्हणावं लागतं की काळ्या लोकांची प्रगती रोखणारी कुठचीही मानवी कृती ह्या जगन्नियंत्याला मान्य आहे. ह्या सर्वशक्तिमान परमेश्वराने काळ्यांची निर्मिती केवळ गोरयांकरता लाकूड तोडण्यासाठी आणि त्यांच्यासाठी पाणी भरून आणण्यासाठीच केली, असं म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते. त्याने स्वतः काळ्या लोकांना बहाल केलेल्या कुठच्याही देणगीचा पूर्ण वापर त्यांना करता येऊ नये म्हणून आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीला त्याचा आशिर्वादच आहे, असं मानण्यापर्यंत आपली मजल गेलेली आहे. ह्या असल्या विचारांच्या बरोबरीनी, आपण काळ्यांना अंगठ्याखाली दाबून ठेवण्याच्या आरोपाला प्रत्युत्तर म्हणून संपूर्ण असंबद्ध असे मुद्दे मांडतो. आपण म्हणतो की काळ्यांना शिक्षण देऊ नये, कारण त्यांच्या मुलांमध्ये शिक्षणाचा फायदा करून घेण्याएवढी बुद्धिमत्ताच नाही. आपण त्यांना त्यांच्या अंगच्या गुणांचा फायदा करून घेण्यासाठी संधी नाकारतो, त्यांच्या अंगी गुणच नाहीत असं म्हणून. आम्हाला आमची प्रगती करून घ्यायला हजारो वर्षं लागली, काळ्यांना ती पटकन जमेल अस मानणं वेडेपणा आहे असं म्हणत आपण आपल्या निष्क्रीयतेचं समर्थनही करतो. एखाद्या काळ्याने जर काही उल्लेखनीय यश मिळवलं, तर आपण आपला मोहरा परत बदलतो. एवढ्या अयशस्वी जमातीमध्ये त्या एकुलत्या एकाचं यश त्याला कस एकटा पाडत असेल ह्याची आपल्याला दया येते. हे टाळण्याकरता काळ्यांना यशस्वी होऊ न देणं ह्याला आपण ख्रिश्चन दयाबुद्धी मानतो. देणग्या देणारा पण त्यांचा लाभ मिळू न देणारा आपला देव सुद्धा गोंधळलेला आणि बेताल वाटू लागतो. मग काय नवल की आपली संस्कृती द्विधा प्रश्नांनी विच्छिन्न वाटते? खरं सत्य हे आहे, की आपली संस्कृती खिश्चन संस्कृती नाही आहे. आपली संस्कृती म्हणजे उच्च विचार आणि भेदरलेले आचार, मोठाली वचनं आणि भयानक काळज्या, प्रेमळ दयाळूपणा आणि भेकड स्वार्थी वृत्ती ह्यांचं अतिशय दुःखदायक मिश्रण आहे. मला एक मिनिट द्या . . .

जार्विस हेलावून जाऊन सुन्न बसून राहिले. हे त्यांच्या मुलाने लिहिलं होतं म्हणून, ही त्याची शेवटची कृती होती म्हणून की काय, त्यांना सांगता नसतं आलं. हे शब्द सुंदर होते की नाही, त्यांना सांगता नसतं आलं. कारण त्यांच्या आयुष्यात शब्दांना न्याहाळणं, त्यांचा आस्वाद घेणं ह्यावर त्यांनी कधीच वेळ घालवला नव्हता. हे विचार सुंदर होते का नाही, हेही त्यांना सांगता नसतं आलं. कारण असल्या गोष्टींवर त्यांनी आयुष्यात कधी विचारच केला नव्हता. ते उठले आणि जिना चढून त्यांच्या खोलीत गेले. बायको तिथे नाही बघून त्यांना बरंच वाटलं. कारण त्यांच्या विचारांत त्यांना व्यत्यय नको होता. त्यांनी अब्राहम लिंकन उचलला आणि पुन्हा अभ्यासिकेमध्ये आले. त्यांनी अमेरिकन अध्यक्षाच्या दुसऱ्या निवडणुकीनंतरच भाषण उघडलं. संपूर्ण वाचून काढलं आणि एखादं रहस्य उलगडावं, एखाद्या रस्त्याचा उगम सापडावा, तसा त्यांना आनंद झाला. ह्या त्यांच्या अनोळखी मुलाशी ओळख थोडी थोडी वाढत चालली होती. त्यांना ह्या माणसाचा फोटो त्यांच्या मुलाच्या घरात का होता, त्याच्यावरची एवढी भारंभार पुस्तकं इथे का होती ते समजायला लागलं. त्यांनी पुन्हा ते पान उघडलं, त्यांच्या मुलासाठी, शब्दांसाठी किंवा विचारांसाठी नव्हे.

मला एक मिनिट द्या

पुढे काही नाही. ती बोटं पुढे काही लिहू शकली नव्हती. मला एक मिनिट द्या, मला खाली काहीतरी आवाज येताहेत. मला एक मिनिट द्या, मला माझा मृत्यू बोलावतो आहे. मला हजारो मिनिटं द्या, मी आता काही परत येणार नाही.

जार्विसनी ते विचार झटकून टाकले. काडीनी पाईप पेटवला, आणि तो लेख पुन्हा वाचून काढला. मग ते शांत, आपल्याच तंद्रीमध्ये, धुम्रपान करत बसून राहिले.

-    जेम्स.
ते दचकुन भानावर आले. काय ग? ते म्हणाले.
-    असं एकट्यांनी बसू नका.
ते हसले, म्हणाले माझा स्वभाव नाही असं कुढत बसून रहायचा.
-    मग काय करताय तुम्ही?
-    विचार करतो आहे, कुढत नाही. वाचतो आहे आणि विचार करतो आहे. हे बघ मी काय वाचतो आहे.
तिनी ते कागद घेतले, एकदा बघितलं, आणि छातीशी गच्च कवटाळून धरले.
-    वाच ते, ते शांतपणे म्हणाले. अतिशय वाचनीय आहे ते.

ती खाली बसली ते वाचायला. ते तिच्याकडे बघत होते. त्यांना माहिती होतं ती काय करणार. ती शेवटच्या पानाकडे, शेवटच्या शब्दांकडे गेली. मला एक मिनिट द्या. त्या शब्दांकडे नुसती बघत राहिली. त्यांच्याकडे बघितलं. ती आता बोलणार, त्यांच्या लक्षात आलं. दुःख एवढ्या पटकन थोडंच संपून जातं?

Comments