भाषांतर - २०

जार्विस त्यांच्या मुलाच्या खुर्चीत बसले होते. त्यांची बायको आणि सून त्यांना तिथे सोडून हॅरीसनच्या घरी गेले होते. पुस्तकं, पुस्तकं, पुस्तकं, अफाट पुस्तकं. एका घरात त्यांनी एवढी पुस्तकं कधी बघितली नव्हती. टेबलावरती कागद, पत्रं आणि अजून पुस्तकं. मिस्टर जार्विस, तुम्ही पार्कवॉल्ड मेथॉडिस्ट सभेमध्ये बोलायला याल का? मिस्टर जार्विस, तुम्ही जोहानसबर्गच्या अॅंग्लिकन युवा संघटनेमध्ये भाषण द्यायला याल का? मिस्टर जार्विस. तुम्ही युनिव्हर्सिटीच्या एका परिषदेमध्ये बोलू शकाल का? नाही, मिस्टर जार्विस यापैकी कुठेही बोलू शकणार नाहीत.
मिस्टर जार्विस, तुम्हाला ज्यू आणि ख्रिश्चन समाजाच्या वार्षिक सभेसाठी आमंत्रित करतो आहोत. मिस्टर जार्विस, श्री आणि सौ सिंग तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला, त्यांच्या थोरल्या सुपुत्रीच्या - सरोजिनीच्या - विवाह सोहळ्याच आमंत्रण देत आहेत. मिस्टर जार्विस, तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला व्हॅन विक व्हॅली मध्ये एका कार्यक्रमाला बोलावीत आहोत. नाही, मिस्टर जार्विस यापैकी कुठेही येऊ शकणार नाहीत.
भिंतींवर, पुस्तकांच्या मध्ये चार चित्रं आहेत. एक क्रुसावरचा येशु ख्रिस्त, एक अब्राहम लिंकन, एक आहे वर्गेलजेनमधल्या कौलारू घराचं चित्र आणि एक आहे हिवाळ्यातल्या नदीकाठच्या निष्पर्ण विलो वृक्षाचा फोटो.
ते पुस्तकं चाळायला उठले. शेकडो पुस्तकं, नुसती अब्राहम लिंकनवरती. एका माणसावर एवढी पुस्तकं लिहिली गेली असतील त्यांना कल्पनाही नव्हती. एक पुस्तकाचं कपाट नुसत त्यांनी भरलेलं. दुसरं एक नुसत्या दक्षिण आफ्रिकेवरच्या पुस्तकांनी. सारा गर्ट्रूड मिलिनचं “Life of Rhodes", तिचं स्मट्सबद्दलच, एन्गेलेनबर्गचं "Life of Louis Botha", दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेषाच्या समस्येबद्दल, दक्षिण आफ्रिकन पक्षांबद्दल, क्रुगर पार्कबद्दल आणि असंख्य इतर. दुसऱ्या एका कपाटात फक्त आफ्रिकान्स भाषेतली पुस्तकं होती, ज्यांचा त्यांना काहीच अर्थबोध झाला नाही. धर्माबद्दल, सोविएत रशियाबद्दल, गुन्हे आणि गुन्हेगारीबद्दल होती, कवितासंग्रह होते. शेक्सपिअर आहे का म्हणून त्यांनी बघितलं, आणि शेक्सपिअर सुद्धा होता.
ते पुन्हा जाऊन खुर्चीवर बसले, त्या चार चित्रांकडे बराच वेळ डोळे भरून पहात. मग त्यांनी काही कागद जवळ ओढून चाळायला सुरुवात केली. पहिलं पत्र चाळल ते होतं ग्लॅडिओलस स्ट्रीट वरील क्लेअरमोंट आफ्रिकन मुलांच्या क्लबच्या चिटणिसांच, त्यांचा मुलगा क्लबच्या वार्षिक बैठकीला हजार राहू शकला नाही ह्याबद्दल खेद व्यक्त केला होता, तसंच त्याची यंदाही पुन्हा अध्यक्ष म्हणून निवडणूक झाल्याची बातमी कळवली होती. पत्राचा शेवटचा परिच्छेद अतिशय वैशिष्ट्यपूर्ण भाषेत होता.
वार्षिक सभेच्या ठरावानुसार, मी ह्याबाबत आपले अभिनंदन करण्यास बद्ध आहे. त्याचप्रमाणे आपण आमच्यासाठी खर्च केलेल्या अमुल्य वेळाबद्दल, तसेच आपण क्लबसाठी देत असलेल्या अनेक देणग्यांबद्दल मला आभार मानायलाच हवेत. आपल्या सहयोगाशिवाय हा क्लब कसा चालू शकेल हे आमच्यापैकी बऱ्याच जणांना कोडंच आहे. ह्या सर्व कारणांसाठी आपली पुन्हा अध्यक्षपदी निवड करण्याची आमची इच्छा आहे.
आपला आज्ञाधारी सेवक,
वॉशिंग्टन लेफिफी.
दुसरे इतर कागद त्यांच्या मुलाच्या हस्ताक्षरात होते, नक्कीच एखाद्या मोठ्या लेखाचा भाग असावेत; कारण पहिले काही शब्द एका वाक्याचा शेवटचा भाग होते, आणि शेवटचं वाक्य अर्धवटच सोडलं होतं. त्यांनी उरलेले कागद शोधायचा प्रयत्न केला, पण मिळेनात तेव्हा ते खुर्चीत बसून जेवढं होतं ते वाचायला लागले.
… क्षम्य होतं. आपण जेव्हा दक्षिण आफ्रिकेमध्ये आलो, तेव्हा केलेल्या काही गोष्टी क्षम्य होत्या. मिळतील त्या श्रमिकांकडून, ह्या देशातील नैसर्गिक संपत्तीचा विकास करून घेणं योग्य होतं. अ-कुशल, अशिक्षित मजुरांकडून अंग-मेहनतीची कामं करून घेणं योग्य होतं. पण अंग-मेहनतीची कामं करण्यासाठी मजुरांना अ-कुशल आणि अशिक्षित ठेवणं योग्य नाही.
जेव्हा येथील जमिनीमध्ये सोन्याचा शोध लागला, तेव्हा मजुरांना खाणीत कामं करण्यासाठी आणण योग्य होतं. त्या मजुरांसाठी आवारं बांधणं, त्यांच्या बायका-मुलांना शहरांपासून दूर ठेवण योग्य होतं - आपल्याला तेव्हा जेवढी माहिती होती तिच्या आधारावर, एक प्रयोग म्हणून. पण आता उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, थोडे अपवाद वगळता, ते योग्य नाही. आता आपल्याला जेव्हा समजत आहे, की ह्याने कौटुंबिक जीवनाची हानी होते, तेव्हा ती हानी करत रहाण योग्य नाही.
जेव्हा मजूर सहज मिळत असतील, तेव्हा नैसर्गिक संपत्तीचा विकास करणं योग्य आहे. पण हा विकास जर फक्त मजुरांच्या पोटावर पाय आणून होणार असेल, तर तो योग्य नाही. सोन्याच्या खाणी काय, कारखान्यातल्या वस्तूंची निर्मिती काय किंवा शेतांची मशागत काय - ह्यातून मिळणारी समृद्धी जर मजुरांना गरीब ठेवण्यावर अवलंबून असेल, तर ते योग्य नाही. काही लोकांचे खिसे भरण्यासाठी, दुसऱ्या काही लोकांच्या पोटावर पाय यावा हे योग्य नाही. ह्या असल्या विकासाचं खर नांव आहे पिळवणूक. ह्या देशाच्या सुरुवातीच्या काळामध्ये, जेव्हा ह्या सगळ्याची किंमत - काळ्या समाजव्यवस्थेच्या हानीची, काळ्या लोकांच्या कौटुंबिक जीवनाच्या मोडकळीची, दारिद्र्य, झोपडपट्टी आणि गुन्हेगारीची किंमत - आपल्याला माहिती नव्हती, तेव्हा हे सगळं कदाचित क्षम्य असेल. पण आता, ही किंमत लक्षात आल्यावर ते अजिबात क्षम्य नाही.
एतद्देशीय लोकांच्या शिक्षणाची व्यवस्था, जे कोणी करू इच्छितात त्यांच्या हाती सोपवणं एके काळी योग्य असेल. त्याच्या उपयुक्ततेबद्दल साशंक असणं एके काळी योग्य असेल. पण आता आपल्या लक्षात येत असलेल्या गोष्टींच्या संदर्भात ते योग्य नाही. त्यामुळे शक्य झालेल्या औद्योगिक प्रगतीमुळे आणि ती आपल्या सहकाऱ्याशिवाय झाल्यामुळे आता काळ्या जमातींच मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालं आहे. बहुतेक समाज, इतर काही नाही तर निदान स्वसंरक्षणासाठी, आपल्या मुलांना शिकवतात, चांगले संस्कार करून मोठं करतात, शिस्तशीर, कायदेशीर आणि समाजाभिमुख बनवतात. समाज असा घडवण्याला दुसरा मार्गच नाही. आणि तरीही, आपण मात्र आपल्या काळ्या नागरी समाजाच्या शिक्षणाची जबाबदारी ह्याबद्दल उत्कट आस्था असणाऱ्या मूठभर युरोपिअनांवर सोडून मोकळे होतो. त्यासाठी जास्त संधी आणि पैसा उपलब्ध करत नाही. हे योग्य नाही. आपल्या स्वार्थी स्वसंरक्षणाच्या दृष्टीकोनातून सुद्धा हे धोकादायक आहे.
ह्या देशाच्या विकासाच्या आड येत असलेली काळी जमात व्यवस्था मोडून टाकणं योग्य होतं. तिचा विनाश अटळ होता हे मानणं योग्य होतं. पण तिचा विनाश होत असतांना, नुसत बघत राहणं, तिच्या जागी नवीन कुठची व्यवस्था उभी न करणं योग्य नव्हतं. ह्यातून फक्त माणसांची शारीरिक आणि नैतिक हानी झाली.
भले जुन्या काळ्या जमात व्यवस्थेमध्ये हिंसा आणि रानटीपणा, अंधश्रद्धा आणि जादूटोणे असतीलही; पण त्याला एक नैतिक बैठक होती. आज काळ्यांमध्ये एवढे गुन्हेगार, वेश्या आणि दारुडे आढळतात, ते ती त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे म्हणून नव्हे. त्यांची साधीसुधी परंपरागत रूढींवर रचलेली समाजाची बांधणी मोडली आहे म्हणून. आपल्या संस्कृतीच्या तडाख्याने ती कोलमडली आहे. म्हणून, आपल्या संस्कृतीसाठी एक नवीन प्रथांची, रुढींची, समाजाची निर्मिती करणं हे अनिवार्य कर्तव्य आहे.
खरं आहे, की गोऱ्यांना काळ्यांपासून वेगळं ठेऊन, आपल्याला त्यांची जमात व्यवस्था सुरक्षित ठेवता येईल अशी आशा होती. आणि ते ठीक होतं. पण आपण त्याबद्दल प्रामाणिक नव्हतो. आपण ऐंशी टक्के लोकांसाठी फक्त दहा टक्के जमीन बाजूला ठेवली. ह्यातून आपण मजुरांना शहरामध्ये येणं अटळ करून ठेवलं, काहीजण म्हणतात आपण ते जाणूनबुजून केलं. आता आपण आपल्या स्वार्थाची फळं भोगतो आहोत.
ही समस्या क्षुल्लक आहे असं कोणालाच म्हणायचं नाही. ह्याचं उत्तर फार सोपं आहे असा कोणाचाच दावा नाही. आपल्याला ग्रासून टाकणाऱ्या भीतीची टिंगल करायचा कोणाचाच इरादा नाही. पण आपल्याला भिती असो किंवा नसो, आपण ह्यातल्या नैतिक बाजूकडे दुर्लक्ष करू शकत नाही - कारण आपण ख्रिश्चन आहोत.
आत्ता ही वेळ आहे...
आणि तिथे ते हस्तलिखित पान संपलं. ते वाचण्यात पार बुडून गेलेल्या जार्विसनी पुन्हा एकदा टेबलावर कागद शोधायचा प्रयत्न केलं; पण ह्यापलीकडे काही लिहिलेलं असावं ह्याचा काहीच पुरावा त्यांना सापडला नाही. त्यांनी त्यांचा पाईप पेटवला, आणि पुन्हा एकदा ते कागद पुढे ओढून वाचायला सुरुवात केली.

ते कागद दुसऱ्यांदा वाचून संपवल्यानंतर ते पाईपचे झुरके घेत, विचारात बुडून बसून राहिले. थोड्या वेळाने उठून ते लिंकनच्या पुस्तकांच्या कपाटाकडे जाऊन उभे राहिले - त्यांच्या मुलाच्या मनावर एवढा प्रभाव पाडणाऱ्या ह्या माणसाच्या चित्राकडे बघत. त्यांनी काचेचं तावदान सरकवलं, आणि त्या शेकडो पुस्तकांमधून एक पुस्तक बाहेर काढलं. ते खुर्चीकडे परतले, आणि त्या पुस्तकाची पानं चाळू लागले. एका प्रकरणाचं नांव होतं 'गेटिसबर्ग येथील सुप्रसिद्ध भाषण'. त्या भाषणाचा त्यावेळी काही फायदा झाला नाही असं दिसत होतं, पण आता ते जगातल्या सर्वोत्कृष्ट भाषणांमध्ये गणलं जात होतं. त्यांनी सुरुवातीची पानं पटापट ओलांडली आणि मुख्य भाषण मात्र लक्षपूर्वक वाचून काढलं. ते झाल्यावर, विचारमग्न अवस्थेत ते धुम्रपान करत राहिले. थोड्या वेळानी उठून त्यांनी ते पुस्तक पुन्हा कपाटात ठेऊन दिलं, आणि काच बंद केली. पुन्हा काच उघडून पुस्तक काढलं, आपल्या खिशात घातलं आणि काच बंद करून ठेवली. घड्याळ बघितलं, पाईप विझवून टाकला, हॅट डोक्यावर चढवली आणि काठी घेतली. हळूहळू जिना उतरून खाली आले, आणि जिथे त्यांच्या मुलाचा मृत्यू ओढवला होता, त्या भागात आले. त्यांनी हॅट काढून हातात घेतली आणि जमिनीवरच्या गर्द काळपट डागाकडे पाहू लागले. अनाहूतपणे, अनिच्छेने एका छोट्या मुलाचं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर उभ राहिलं - उत्तुंग विहारमधला छोटासा मुलगा, लाकडी बंदुकींशी खेळणारा छोटा मुलगा. सगळं नजरेआड करून ते त्या भागातून चालत दरवाजापर्यंत आले - ज्या दरवाजातून मृत्यू एवढ्या एकाएकी आत आला होता. बाहेरच्या पोलिसाने त्यांना सलाम ठोकला. ते निरर्थक असे काही शब्द पुटपुटले. हॅट डोक्यावर चढवून ते फाटकापर्यंत गेले. अनिश्चितपणे त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाहिलं आणि महत्प्रयासानी चालायला सुरुवात केली. एक मोठा निश्वास टाकून पोलिस पुन्हा आरामात बसला.

Comments