कुठल्याच दिंडीत भाग घेण्याएवढा पेशन्स माझ्यात नाही. पण टाळ-मृदुंगाच्या तालात भान हरपून वारकरी जात असतांना दिसले तर त्यांच्याबरोबर दोन पावलं आपणही टाकावीशी वाटतात खरी. तशी ही दोन पावलं म्हणा हवी तर. पण कवितांचा विचार मनात घोळत असतांना वसंत बापटांची आठवण होणं अपरिहार्यच होतं. सामाजिक जाणिवांचे, सेवा-दलामधले मेळ्यांचे गीतकार, काव्य-वाचन-त्रयी मधले, अगदी दख्खनच्या राणीचे बापट सुद्धा जास्त प्रसिद्ध असले; तरी माझ्या मनात राहिले ते 'मानसी' मधील अप्रतिम सुंदर प्रेमकाव्य करणारे बापट. ह्या कविता, सुट्या सुट्या, दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध होत असत तेव्हाच वाचल्या होत्या आणि मला आवडल्या होत्या. एकत्रित पुस्तक रूपांनी त्या 'मानसी' मध्ये प्रकाशित झाल्या. ७७ साली प्रकाशित झालेल्या ह्या पुस्तकाच्या वेळी बापट प्राध्यापक म्हणून, नांव-लौकिकवाला कवी म्हणून एका भारदस्त स्टेजला येउन पोचले होते. त्या काळात ही कॉलेज तरुणासारखी, पहिल्या प्रेमाची, पालवी फुटल्यासारखी ताजीतवानी कविता त्यांच्याकडून अपेक्षित नव्हती आणि म्हणून कदाचित जास्त मोहक होती. त्यांनीच प्रस्तावनागत कवितेत म्हटल्याप्रमाणे "तशा सगळ्याच कविता तुझ्यामुळे आणि तुझ्यासाठी / अस्तित्वच जर तू भारलेले, तर काय नवल सगळेच शब्द तू गर्भारलेले...". अशा ३६ लहानशा सुरेख कवितांचा हा संग्रह. त्यातली ही एक आपली आत्ता आठवली.
वेड लागत नाही हीच खरी शोकांतिका
वेड किती सुंदर असते:
एका गोड अंधारात
आपण आपले गुडूप व्हायचे
साई सुट्ट्यो साद घातली
तरी कोणी नाहीच यायचे
आपण आपले, आपले आपण
ओसाडगावचे जहागिरदार
शहाणपणही वाईट नसते
जिकडे तिकडे लक्ख उजेड, सरळ वाटा
शहाण्याचा आत्मादेखील
औरस चौरस नीटस असतो
आमचा आपला एकच खेळ
एक पाय तळ्यात, एक पाय मळ्यात
वेड किती सुंदर असते:
एका गोड अंधारात
आपण आपले गुडूप व्हायचे
साई सुट्ट्यो साद घातली
तरी कोणी नाहीच यायचे
आपण आपले, आपले आपण
ओसाडगावचे जहागिरदार
शहाणपणही वाईट नसते
जिकडे तिकडे लक्ख उजेड, सरळ वाटा
शहाण्याचा आत्मादेखील
औरस चौरस नीटस असतो
आमचा आपला एकच खेळ
एक पाय तळ्यात, एक पाय मळ्यात
ह्या पलीकडे भाष्याची गरज आहे असं वाटत नाही.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...