गुजराथी थाळी

अगदी आकडेवारीच बघायची, तर अमेरिकेतील सर्वात जास्त भारतीय न्यूयॉर्क-न्यू जर्सी भागात आहेतपुढच्या चार भागांच्या (शिकागो, वॉशिंग्टन, लॉस अँजेलिस आणि सान फ्रान्सिस्को) बेरजेपेक्षाही जास्त! त्यात सुद्धा सर्वात जास्त संख्येने उपस्थित असलेला प्रादेशिक गट म्हणजे गुजराथी. अगदी आत्ताआत्ता इंटरनेटच्या शोधानंतर हैदराबादमध्ये 'आमचे येथे IT मधील सर्व प्रकारच्या डिग्र्या झटपट बनवून मिळतील' असे कारखाने सुरु होईपर्यंत 'गुजराथी' हाच सर्वात बहुसंख्य भारतीय घटक होता. त्यांच्या उद्योगी स्वभावामुळेच आता, न्यू जर्सीच्या 'Oak Tree Road' ची गणना म्हणे मुंबईच्या रानडे रोड किंवा पुण्याच्या तुळशी बागेच्या बरोबरीनी केली जाते - असं आमच्या समोरचे हसमुखभाई स्वतःच मला सांगत होते. ह्या तीन ठिकाणी जर एखादी वस्तू मिळत नसेल तर ती वस्तू भारतियांच्या वापरातली नाही असं खुशाल समजावं. ह्या पराक्रमी गुजराथ्यांनी न्यूयॉर्क मधले न्यूजपेपर स्टँन्ड्स, आणि सगळ्या अमेरिकेमधली डोनटची दुकानं, सबवे सँडविचची दुकानं आणि मोटेल्स तर कबजात घेतलीच, पण 'स्वाध्याय', स्वामीनारायण मंदिर आणि गरबा वगैरे सगळं अध्यात्मिक सांस्कृतिक जगही पादाक्रांत केलं.

एवढ्या महान गुजराथी साम्राज्यात मला मात्र कित्येक वर्ष एक रुखरुख होती की इथे एकही नाव घेण्यासारखं गुजराथी रेस्टॉरन्ट नसावं. नाही नाही, गैरसमज नको - कहनेको तो दुनियामें, मयखानें हजारों हैं म्हणावं तशी फाफड़ा अने फरसाण, सेव गाठीया अने जलेबी, खाकरा अने मुठिया बेचणारे बहु दुकान छे, काय समजले तुमी. पण अस्सल गुजराथी थाळी कुठे मिळत नसे. जे मिळत असे ते कच्छी, काठेवाडी, राजस्थानी वगैरे जेवण – ज्यात तिखट आणि मिठाच्या ऐवजी लवंग आणि दालचिनीचा; आणि पाण्याऐवजी तेलाचा सढळ हातानी वापर केलेला असतो. ह्याच्याही पलीकडे जाऊन, कित्येकदा गुजराथी लोकांनी चालवलेली पंजाबी किंवा दाक्षिणात्य रेस्टॉरन्ट्स सुद्धा बरीच दिसतात. अर्थात तिथे मिळणारे मोहरीची फोडणी दिलेले छोले आणि डोश्याबरोबर सांबार आणि चटणीच्या जोडीनी मिळणारी दही-साखर बघितल्यावर, 'जेनु काम तेनु थाय' ही गुजराथीमधली अत्यंत अर्थपूर्ण म्हण ह्यांना कोणी का शिकवली नाही ह्याचं कुतूहल वाटतं. स्वतःची एवढी समृद्ध आणि परिपक्व पाककला संस्कृती सोडून ते नको त्या डोश्या-भटूरयाच्या नादाला का लागतात समजत नाही.

मी शोधत होतो ती माझ्या लहानपणाची आठवण करून देणारी गुजराथी पाक-संस्कृती. ढोकळा, पपयीची चटणी, अमिरी-खमण, सुरळीच्या वड्या... आणि नशिबाला कसालाच लावायचं, तर विल्सन कॉलेजच्या जवळचं 'आहार' का अशाच काहीश्या नावाचं अस्सल गुजराथी रेस्टॉरन्ट - जिथे उत्कृष्ट बाजरीनो रोटला, बटाकानी शाक अने खिचडी-कढी मिळू शकेल. एवढी वर्ष इथे तो शोध घेतल्यावर, मी ही स्वप्नवत आशा सोडून द्यायच्याच मार्गावर होतो.

आणि अशा निराश अवस्थेत एकदम 'खुशबू' (उच्चारी 'खुसबू') चा शोध लागला. (बाकी काही म्हणा, गुजराथी लोकांची नांवं प्रदान करण्याची पद्धत हा एक चिंतनीय विषय आहे - आमच्या शेजारच्या कुटुंबातल्या दोन नवजात जुळ्या मुलींची नांवं लिमका आणि लिप्सी ठेवल्याचं ऐकून मी फसफसून हसलो होतो). ह्या सुगंधित नांवाचं दुकान फुलांचं वगैरे नसून, ते एक तद्दन गुजराथी रेस्टॉरन्ट निघालं. प्रवेश जरा दबकतच केला होता. कारण त्याचं दृश्य स्वरूप अस्सल भारतीय 'साधी रहाणी, उच्च आहारसरणी', 'रुपात काय आहे' वगैरे वैरागी संस्कृतीला साजेसंच होतं. ब्रॉंक्समधले काही डायनर्स ह्याच्यापेक्षा जास्त देखणे बघितल्याचं आठवतंय. आतमध्ये आमच्या दोघांशिवाय फक्त दुकानाचेच दोन इसम होते. त्यापैकी एक बाबूसारखा दिसणारा, आत किचनमध्ये कुकिंग करण्याऐवजी बाहेर हिशेबाच्या चोपड्यांचं कुकिंग बघत असावा हे त्याचा चष्मा, त्यातल्या त्यात बरा शर्ट-पँन्ट आणि टेबलावरचा कॅलक्युलेटर बघून लक्षात आलं. दुसरा वयस्कर असला तरी वेटर निघाला. अतिशय अदबीनी त्यांनी ऑर्डर घेतली. थाळीमध्ये पुऱ्या किंवा 'च्यपातीच्या' जागी बाजरीचा रोटला देण्याचं औदार्यही दाखवलं.

पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे, पुढच्या पाच-सात मिनिटात जेवण हजरही झालं. अगदी, 'काय वर्णू महाराजा त्याची ख्याती' टाईप दिव्य नसलं, तरी अस्सल गुजराथी, घरगुती पद्धतीचं होतं. म्हणजे, थोड्याशा गोडसर भाज्या आणि उसळी, पीठ घालून दाट केलेली पण अप्रतिम चवीची कढी, मसालेभात टाईपची खिचडी आणि गरमागरम रोटलो. क्या बात है! वेटर म्हणवणारा मनुष्यच तिथला सर्वेसर्वा असावा. गुजराथी असूनही बोलायला अघळ-पघळ नाही; नव्हे, मितभाषीच - हे एक नवलच!इतक सुंदर जेवण करता, आणखी नाही का उघडायची रेस्टॉरन्ट्स तुम्हाला (आमच्या भागात)’ - असं मी विचारल्यावर 'नाही, हे आहे ते जेमतेम चालवतो मी; आणखी कुठे व्याप वाढवत बसू' हे त्याचं उत्तर ऐकून माझी खात्रीच पटली, की एका हाडाच्या पुणेकराला गुजराथी कुटुंबानी दत्तक वगैरे घेतलं असावं. मग नंतर समजलं, त्याचा खरा वीज्यनेस केटरिंग हा आहे, हे रेस्टॉरन्ट कदाचित 'खाली शो के लिये' असेल.


असो, जेवण तर उत्तम झालं. बिल द्यायला म्हणून बघतो तर वेटर महाशय (कदाचित माझ्या बडबडीला कंटाळून) अदृश्य! म्हणून त्या दुसऱ्या बाबूंना विचारलं. ते जेव्हा म्हणाले, 'इनवोइस' वेटर आणून देईल; तेव्हा त्यांच्या पेशाबद्दल माझा अंदाज अचूक ठरल्याच्या सूक्ष्म आनंदानी सुखात आणखीच भर घातली.

चार दिवस बाहेर सतत 'अमेरिकन' जेवणं जेवल्यावर, बदल म्हणून ही थाळी एवढी आवडली असेल का? शक्य आहे. पण खरं-खोटं पडताळण्यासाठी परत(परत) तिथे जायची इच्छा आहे हे मात्र नक्कीच!

Comments