कोर्टामध्ये समोरच्या
बाजूला एका उच्चासनावर न्यायाधीश बसतात. त्यांच्या खाली, कोर्टाच्या अधिकाऱ्यांच टेबल
असतं. त्या टेबलाच्या डाव्या-उजव्या बाजूला खुर्च्या असतात. ह्यापैकी काही खुर्च्या
एका गटात बंदिस्त केलेल्या असतात - ह्या केसमध्ये जर ज्यूरी असेल, तर ज्युरीतल्या लोकांसाठी.
टेबलासमोर आणखी काही अर्ध-वर्तुळाकार मांडलेल्या खुर्च्या असतात, त्या दोन्ही पक्षाच्या
वकिलांच्यासाठी असतात. त्यांच्या मागे, एक पिंजऱ्यासारखा बंदिस्त चौथरा असतो. तिथून
खाली तळघराकडे कुठेतरी जाणारा एक मार्ग असतो. ह्या तळघरामधून ज्यांचा न्याय करायचा
त्या कैद्यांना बाहेर आणलं जातं. कोर्टाच्या मागच्या बाजूला चढत जाणाऱ्या रांगांमध्ये
खुर्च्या मांडलेल्या असतात. त्यातल्या उजवीकडच्या युरोपिअनांसाठी आणि डावीकडच्या इतरांसाठी
असतात. ही अशी प्रथा आहे.
कोर्टामध्ये धूम्रपान
करायचं नसतं, कुजबुज किंवा बडबड करायची नसते, हसायचं नसतं. व्यवस्थित कपडे घालूनच जायचं
असतं. पुरुषांनी डोक्यावर टोपी घालायची नसते - अगदीच तुमच्या धर्माची तशी सक्ती नसेल
तर. हे सगळं असतं, ते न्यायाधीशाचा आणि तो ज्या राजाचा अधिकारी आहे त्या राजाचा मान
राखण्यासाठी. त्या न्यायाधीशाच्या मागे असलेल्या कायद्याच्या तत्वासाठी, आणि त्या कायद्याच्या
मागे असलेल्या लोकांचा मान राखण्यासाठी. न्यायाधीश प्रवेश करतील तेव्हा सगळ्यांनी उठून
उभं रहायचं असतं, आणि ते बसेपर्यंत कोणीही बसायचं नसतं. ते बाहेर जातील तेव्हा सगळ्यांनी
उठून उभं रहायचं असतं, आणि ते बाहेर जाईपर्यंत कोणीही हलायचं सुद्धा नसतं. हे सगळं
न्यायाधीशांचा आणि त्यांच्या मागच्या सगळ्या गोष्टींचा मान राखण्यासाठी.
कारण न्यायाधीशावर
फार मोठी जबाबदारी सोपवलेली असते. न्याय करायचा आणि शिक्षा फर्मावायची - अगदी मृत्यूदंडाची
शिक्षा सुद्धा. त्यांच्या उच्च अधिकारासाठी न्यायाधीशांना 'न्यायमूर्ती' अस संबोधलं जातं.
मोठाल्या प्रसंगी ते सगळ्यांच्या अग्रगणी असतात. काळे आणि गोरे, दोन्ही लोकं त्यांना
मोठा मान देतात. सबंध देशभर भीतीचं राज्य असलं, तरी न्यायाधीश संपूर्ण निर्भय असले
पाहिजेत, तरच न्याय कायद्याप्रमाणे देता येईल. त्याकरता न्यायाधीश निःस्पृह असले पाहिजेत.
न्यायाधीश कायदे करत
नाही, लोकं कायदे करतात. म्हणून एखादा कायदा जर अन्यायी असेल, आणि न्यायाधीश कायद्यानुसार
निर्णय देत असेल, तर त्यालाच न्याय म्हणतात - जरी तो अन्याय्य वाटला तरीही.
न्याय करणं ही न्यायाधीशाची
जबाबदारी असते. पण न्याय्य मात्र फक्त लोकच असू शकतात. म्हणून निर्णय जर न्याय्य नसेल,
तर त्याचं पाप न्यायाधीशाच्या नव्हे, तर लोकांच्या माथी बसतं. म्हणजे गोऱ्या लोकांच्या
माथी बसतं, कारण कायदे फक्त गोरेच लोकं करतात.
दक्षिण आफ्रिकेमध्ये
लोकांना त्यांच्या न्यायाधीशांचा अभिमान आहे, कारण ते अतिशय निःस्पृह असतात. काळ्या
लोकांचा सुद्धा त्यांच्यावर विश्वास आहे, कायद्यावर विश्वास नसला तरीही. ह्या भितीनी
भारलेल्या प्रदेशामध्ये, अशी निःस्पृहता एखाद्या उंच टांगलेल्या, घरभर प्रकाश देणाऱ्या
दिव्यासारखीच!
कोर्टामध्ये शांततेचं
आवाहन केलं जातं, आणि लोकं उठून उभे राहतात. न्यायाधीशापेक्षा कोणी मोठा मनुष्य इथे
उपस्थित असला तरी तोही उठून उभा राहील, कारण न्यायाधीश ज्या गोष्टींच प्रतिक मानला
जातो, त्या गोष्टींपेक्षा कुठचाच माणूस मोठा नसतो. न्यायाधीश त्याच्या दोन सहकाऱ्यांबरोबर
प्रवेश करतो. ते आपापल्या जागांवर स्थानापन्न होतात, आणि मग सगळे लोकही बसतात. कोर्टाला
आता सुरुवात झाली आहे.
जमिनीखालच्या भुयारातून,
ज्यांचा न्याय करायचा आहे ते तिघं बाहेर येतात. लोकं त्यांच्याकडे बघताहेत. काहींना
वाटतंच ते खुन्यासारखे दिसतात, ते तशी कुजबुज सुद्धा करतात. खरं तर अशी कुजबुज करायची
नसते. काहींना वाटतं दिसत तर नाहीत खुन्यासारखे. आणखी काहींना वाटतं तो हा खुनी वाटतो
खरा, पण तो पलीकडचा मात्र नाही हं वाटत. एक गोरा मनुष्य उभा राहून वाचतो, की ह्या तिघांवर
आर्थर ट्रेव्हेलिअन जार्विस ह्यांचा, प्लँटेशन रोड, पार्कवॉल्ड, जोहानसबर्ग येथील राहत्या
घरात, आठ ऑक्टोबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी दुपारी, खून केल्याचा आरोप आहे. पहिला आहे
अब्सलम कुमालो, दुसरा आहे मॅथ्यू कुमालो आणि तिसरा आहे जोहान्स पाफुरी. त्या तिघांना
तुम्ही स्वतःला दोषी मानता का निर्दोषी हा प्रश्न विचारला जातो. पहिला म्हणतो मी त्यांना
मारलं खरं, पण तसं करायचा माझा इरादा नव्हता. दुसरा म्हणतो तो निर्दोष आहे; तिसराही
तेच म्हणतो. ह्या तिघांना समजावं म्हणून सगळं इंग्लिश आणि झुलू दोन्ही भाषात बोललं
जातं. पाफुरी खरतर झुलू नाही, पण तो म्हणतो त्याला ते चांगलं समजतं.
तो गोरा वकील, 'देवाच्या
नांवानी' केस घेणारा, कोर्टाला सांगतो, की अब्सलम कुमालो मनुष्यहत्त्येचा आरोप स्वीकारेल,
पण खुनाचा नाही कारण त्याचा तसा उद्देश नव्हता. पण सरकारी वकील म्हणतो की आरोप मनुष्यहत्त्येचा
नाही, खुनाचा आणि फक्त खुनाचाच आहे. म्हणून मग अब्सलम कुमालोसुद्धा इतरांच्या प्रमाणे
'निर्दोष' असाच दावा करतो.
मग सरकारी वकील बराच
वेळ बोलतो. कोर्टाला खुनाची तपशीलवार माहिती सांगतो. अब्सलम कुमालो गप्प आणि स्तब्ध
उभा आहे, बाकीचे दोघे मात्र असली वर्णनं ऐकून आश्चर्यचकित आणि हिरमुसलेले दिसतात.
* * *
-
तर मग
हा बेत ठरवल्यावर तुम्ही आठ ऑक्टोबरची तारीख पक्की केली?
-
बरोबर
आहे.
-
हीच तारीख
का निवडली?
-
कारण जोहान्स
म्हणाला घरात कोणी नसेल.
-
हाच जोहान्स
पाफुरी?
-
होय, हाच;
माझ्याबरोबर आरोपी म्हणून उभा असलेला.
-
आणि तुम्ही
ही दीड वाजताची वेळ निवडली?
-
होय.
-
वाईट नव्हती
का ही वेळ? गोरे लोकं ह्या वेळी घरी जेवायला येतात.
आरोपी काहीच उत्तर
देत नाही.
-
तुम्ही
का निवडली ही वेळ?
-
जोहान्सनी
निवडली ती वेळ. तो म्हणाला, त्याला एका आवाजानी सांगितली ती वेळ.
-
कसल्या
आवाजानी?
-
नाही,
ते नाही मला माहिती.
-
भुताटकीच्या
आवाजानी?
पुन्हा काही उत्तर
नाही.
-
मग तुम्ही
तिघे घराच्या मागच्या दरवाजाकडे गेलात?
-
होय.
-
तू, आणि
हे दुसरे दोघे आरोपी?
-
मी आणि
हेच दोघे.
-
आणि मग?
-
आम्ही
तोंडावर हातरुमाल बांधले.
-
आणि मग?
-
मग आम्ही
स्वैपाकघरात गेलो.
-
तिथे कोण
होतं?
-
घरातला
नोकर होता.
-
रिचर्ड
म्पिरिंग?
-
नाही,
मला त्याचं नांव नाही माहिती.
-
हा इथे
मनुष्य आहे तोच?
-
होय तोच.
-
आणि मग?
कोर्टाला सांग नंतर काय झालं.
-
हा माणूस
घाबरला होता. त्याने माझं रिव्हॉल्वर बघितलं. तो काम करत होता, त्याच सिंकला टेकून
उभा राहिला. म्हणाला, 'काय हवंय तुम्हाला?'. जोहान्स म्हणाला 'आम्हाला पैसे आणि कपडे
हवेत.'. तो म्हणाला 'तुम्ही असं नाही करू शकणार.' जोहान्स म्हणाला 'मरायचय का तुला?'.
हा माणूस घाबरला होता, आणि काहीच बोलला नाही. जोहान्स म्हणाला 'आपुन बोललो, की लोकांचा
थरकाप होतो, काय?'. हा माणूस काहीच बोलला नाही, पण एकदम ओरडला 'साहेब, साहेब' करून.
मग जोहान्सने त्याला लोखंडाच्या काम्बीने डोक्यावर जोरात मारलं.
-
किती वेळा
मारलं?
-
एकदाच.
-
तो माणूस
परत ओरडला?
-
त्याने
काय आवाजपण नाय केला.
-
मग तुम्ही
काय केलं?
-
आम्ही
गपचीप होतो. जोहान्स म्हणाला गप बसा.
-
तुम्ही
काय केलं, कोणी येतंय का चाहूल घेत होतात?
-
होय.
-
तुझ रिव्हॉल्वर
कुठे होतं?
-
माझ्या
हातात.
-
आणि मग?
-
एक गोरा
माणूस घरातून तिथे आला.
-
मग?
-
मी घाबरलो
होतो, मी गोळी झाडली.
-
मग?
आरोपी जमिनीकडे बघत
म्हणतो, गोरा माणूस खाली पडला.
-
मग?
-
जोहान्स
म्हणाला, चला पटकन इथून खसकायला पाहिजे. म्हणून आम्ही पटकन खसकलो तिकडून.
-
मागच्या
दारानी?
-
हो.
-
आणि तिथून
शेताडीच्या रस्त्याकडे?
-
हो.
-
तुम्ही
एकत्र होतात?
-
नाही,
मी एकटाच गेलो.
-
आणि हे
दोघं तुला परत कधी भेटले?
-
बेबी म्कीझेच्या
घरी.
आता न्यायाधीश महाशय
मध्ये बोलतात. सरकारी वकीलसाहेब, तुम्ही लवकरच तुमची उलट तपासणी सुरु करा; पण त्या
आधी मला आरोपी क्रमांक एकला काही प्रश्न विचारायचे आहेत.
-
जशी न्यायमूर्तींची
इच्छा.
-
तू हे
रिव्हॉल्वर कशासाठी बाळगत होतास?
-
घरातल्या
नोकराला घाबरवायला.
-
पण रिव्हॉल्वरच
न्यायची गरज काय?
मुलगा गप्प आहे.
-
तुला माझ्या
प्रश्नाचं उत्तर द्यायलाच हवं.
-
ते म्हणाले
घेऊन जायला.
-
कोण म्हणालं?
-
नाही,
म्हणजे ते म्हणाले की जोहानसबर्ग खतरनाक शहर आहे.
-
कोण म्हणालं
असं?
मुलगा गप्प.
-
तुला असं
म्हणायचंय, की हे घरफोड्या आणि चोऱ्या करणारे लोक तुला असं म्हणाले?
-
नाही,
तसं नाही.
-
मग, कोण
म्हणालं?
-
मला आठवत
नाही. पण मी होतो तिथे कुठेतरी मी असं ऐकलं.
-
म्हणजे,
तुम्ही सगळेजण बसला होता, तिथे कोणीतरी म्हणालं की ही जोहानसबर्ग धोकादायक जागा आहे,
म्हणून एक रिव्हॉल्वर बरोबर ठेवायला हवं?
-
हां, तसंच
म्हणायचंय मला.
-
आणि ह्या
रिव्हॉल्वर मध्ये गोळ्या भरलेल्या आहेत माहिती होतं तुला?
-
हो, माहिती
होतं.
-
लोकांना
नुसती भीती दाखवायची, तर त्यात गोळ्या भरायची काय गरज आहे?
मुलगा उत्तर देत नाही.
-
ह्याचा
अर्थ, गोळी झाडायची तुझी तयारी होती.
-
नाही,
मी काय कोणा चांगल्या माणसाला मारलं नसतं. जर मला कोणी मारलं तरच मी त्याला मारलं असतं.
-
एखाद्या
पोलिसनी तुला त्याच्या अखत्यारीत गोळी झाडली असती तर त्याला मारलं असतंस तू?
-
नाय, पोलिसवाल्याला
नसतं मारलं.
न्यायाधीश महाशय थांबतात,
आणि सगळे गप्प असतात. मग ते अतिशय गंभीरपणे म्हणतात आणि ज्या गोऱ्या माणसाला तू मारलस,
तो चांगला नव्हता?
आरोपी पुन्हा जमिनीकडे
बघतो आणि अगदी खालच्या सुरात म्हणतो मी घाबरलो होतो, मी घाबरलो होतो. त्याला मारायचा
माझा बिलकुल इरादा नव्हता.
-
हे रिव्हॉल्वर
कुठे मिळालं तुला?
-
अलेक्झांड्रा
मध्ये एका माणसाकडून विकत घेतलं मी ते.
-
कोण हा
माणूस? नांव काय त्याचं?
-
नांव नाही
मला माहिती.
-
कुठे रहातो
तो?
-
कुठे रहातो
ते पण नाही माहिती.
-
तू त्याला
परत शोधू शकशील का?
-
हो, शोधू
शकेन मी.
-
तू विकत
घेतलंस तेव्हा ह्या रिव्हॉल्वर मध्ये गोळ्या भरल्या होत्या का?
-
हो, त्यात
दोन गोळ्या होत्या.
-
ह्या घरात
गेलास तेव्हा किती गोळ्या होत्या?
-
तेव्हा
एकच गोळी होती.
-
दुसरी
कुठे गेली?
-
मी ते
घेऊन अलेक्झांड्राच्या बाहेर शेताडी आहे ना, तिकडे गेलो होतो; आणि तिकडे झाडली एक.
-
कशावर
झाडली?
-
एका झाडावर.
-
आणि लागली
का झाडाला?
-
हो, लागली.
-
मग तुला
वाटलं आता मला हे रिव्हॉल्वर वापरता येतंय?
-
होय.
-
ती लोखंडी
कांब कोण घेऊन आलं होतं?
-
जोहान्स
ती घेऊन आला होता.
-
तुला माहिती
होतं तो ती घेऊन आला आहे?
-
हो, माहिती
होतं.
-
तुला माहिती
होतं, की ती कांब मोठं शस्त्र आहे, एखाद्याला ती मारू शकते?
त्या मुलाचा आवाज चढतो.
पण ती कोणाला मारायला किंवा खून करायला नव्हती आणली. ती नुसती लोकांना घाबरवायला आणली
होती.
-
पण घाबरवायला
तुझ्याकडे रिव्हॉल्वर होतं ना?
-
हो, पण
जोहान्स म्हणाला तो ती कांब आणणार, तिच्यात पावर आहे.
-
तिच्यात
पावर आहे म्हणजे काय म्हणायचं होतं जोहान्सला?
-
मला नाही
माहिती.
-
म्हणजे
एखाद्या प्रिस्टनी तिला आशीर्वाद दिला आहे?
-
मला नाही
माहिती.
-
तू विचारलं
नाहीस?
-
नाही,
मी विचारलं नाही.
-
तुझे वडील
प्रिस्ट आहेत ना?
मुलगा जमिनीकडे बघत,
खालच्या आवाजात म्हणतो होय.
-
ते अशा
काम्बिला आशीर्वाद देतील का?
-
नाही.
-
तू जोहान्सला
म्हटलं नाहीस, की ही कांब बरोबर घेऊ नको?
-
नाही.
-
तू त्याला
म्हटलं नाहीस, की अशी कशी काम्बिमध्ये पावर असू शकेल?
-
नाही.
-
ठीक आहे,
सरकारी वकीलसाहेब तुमची उलट तपासणी पुन्हा सुरु करा.
* * *
-
आणि हे
दोघं जेव्हा म्हणतात की बेबी म्कीझेच्या घरी कोणी कुठच्या खुनाबद्दल बोललं नव्हतं,
तर ते खोटं बोलताहेत?
-
ते खोटं
बोलताहेत.
-
आणि ते
जेव्हा म्हणतात, की ही सबंध गोष्ट त्यांना म्कीझेच्या घरी भेटल्यानंतर तू बनवलीस, तर
ते खोटं बोलताहेत?
-
हो, ते
खोटं बोलताहेत.
-
आणि जर
बेबी म्कीझे म्हणत असेल की तिच्यासमोर कुठच्याही खुनाची चर्चा झाली नव्हती, तर ती खोटं
बोलते आहे?
-
हो, ती
पण खोटं बोलते आहे. ती घाबरली होती. ती म्हणाली चालते व्हा आणि पुन्हा कधी इकडे येऊ
नका.
-
तुम्ही
तिघं एकत्रच गेलात?
-
नाही,
मी पहिला गेलो.
-
कुठे गेलास?
-
मी तिकडे
शेताडीमध्ये गेलो. आणि ते रिव्हॉल्वर पुरून टाकलं.
-
हे कोर्टासमोर
असलेलं रिव्हॉल्वर तेच का?
एक रिव्हॉल्वर आरोपीला
देण्यात येतं, आणि तो ते तपासून बघतो. हो, हेच ते.
-
कसं सापडलं
हे पोलिसांना?
-
मीच सांगितलं
पोलिसांना कुठे लपवलय ते.
-
आणि मग
तू काय केलंस?
-
मी प्रार्थना
केली.
सरकारी वकीलसाहेबांना
एकदम धक्काच बसतो. पण न्यायमूर्ती मध्येच विचारतात, कशासाठी प्रार्थना केलीस तू?
-
मी क्षमा
मागण्यासाठी प्रार्थना केली.
-
आणि कशासाठी?
-
नाही,
आणखी मागण्यासारखं काही नव्हतं.
* * *
-
आणि दुसऱ्या
दिवशी तू पुन्हा जोहानसबर्गला चालत गेलास?
-
हो.
-
आणि त्या
बसेसवर बहिष्कार घालत असलेल्या लोकांच्या बरोबर तू चालत होतास.
-
हो.
-
ते अजून
त्या खुनाबद्दल बोलत होते का?
-
हो, बोलत
होते. कोणी म्हणालं, त्यांनी ऐकलय की लवकरच ते लोक पोलिसांना सापडणार.
-
मग?
-
मी घाबरलो
होतो.
-
मग काय
केलंस?
-
मी त्या
रात्री जर्मिस्तनला गेलो.
-
पण केलंस
काय दिवसभर, लपून राहिलास?
-
नाही,
मी एक शर्ट घेतला. आणि ते खोकं हातात घेऊन चालत राहिलो.
-
असं कशासाठी?
-
म्हणजे
मला वाटलं की लोक मला मेसेंजर समजतील. मग मी जोसेफ भेन्गूच्या घरी गेलो. मी तिथे असतानाच
पोलिस आले तिथे. त्यांनी मला विचारलं की अब्सलम कुमालो मीच आहे का. मी म्हटलं होय.
मी घाबरलो होतो, मी ठरवलंच होतं त्या दिवशी पोलिसकडे जाऊन कबुली द्यायची. आता माझ्या
लक्षात आलं, मी मूर्खासारखा उशीर केला.
-
त्यांनी
तुला पकडून कैद केलं?
-
नाही,
ते विचारत होते की जोहान्स कुठे आहे ते मला माहिती आहे का. मी म्हटलं, नाही, पण त्या
गोऱ्याला जोहान्सने नाही मारला, मीच मारला. पण जोहान्सने त्या घरातल्या नोकराला मारलं
होतं. आणि मी त्यांना मॅथ्यू तिथे होता तेही सांगितलं. रिव्हॉल्वर कुठे लपवलय ते दाखवलं.मी
बोललो, मला स्वतःलाच येउन कबुली द्यायची होती, पण वेडपटासारखा भितीनी मी उगीचच उशीर
केला.
-
आणि मग
तू जोहानसबर्गचे मॅजिस्ट्रेट अॅन्ड्रियस कोटझी ह्यांच्या समोर कबुलीजबाब लिहून दिलास?
-
त्यांचं
नांव माहिती नाही मला.
-
हेच ते
विधान का?
एक छापील विधान मुलाला
देण्यात येतं. तो ते चाळतो आणि म्हणतो हो, हेच ते.
-
ह्यातला
प्रत्येक शब्द खरा आहे?
-
हो, प्रत्येक
शब्द खरा आहे.
-
आणि काहीही
खोटं नाही?
-
काहीही
खोटं नाही. कारण मी ठरवलं होतं की ह्यापुढे मी पुन्हा खोटं बोलणार नाही. उरलेल्या आयुष्यात
पुन्हा काही पाप करणार नाही.
-
म्हणजे
तुला पश्चात्ताप झाला तर?
-
हो मला
पश्चात्ताप झाला.
-
तू अडचणीत
सापडलास म्हणून?
-
हो.
-
पश्चात्ताप
व्हायला दुसरं काही कारण नव्हतं?
-
नाही,
दुसरं काही कारण नव्हतं.
* * *
कोर्ट संपायच्या वेळेला
लोक पुन्हा उठून उभे रहातात; न्यायाधीश आणि त्यांचे सहकारी कोर्टातून बाहेर पडेपर्यंत.
मग ते मागच्या दरवाजांनी बाहेर पडतात. युरोपिअन त्यांच्या दरवाजानी, आणि इतर लोक त्यांच्या
दरवाजानी. ही अशी प्रथा आहे.
कुमालो, सिमांगु, लिथबी
आणि गर्ट्रूड चौघजण बाहेर आले. त्यांनी लोकांना बोलताना ऐकलं, ते बघा ते बघा, त्या
खून झालेल्या गोऱ्याचे वडील. कुमालो बघतात, आणि खरच ते त्या खून झालेल्या माणसाचे वडील,
डॉटशेनीच्या टेकड्यांच्या माथ्यावर शेत असलेले, त्यांच्या चर्चच्या बाहेरून घोड्यावरून
जाताना पाहिलेले. आणि कुमालो थरारतात, आणि त्यांच्याकडे बघू नाही शकत. कसं बघणं शक्य
आहे अशा माणसाकडे!
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...