भाषांतर - २५

मार्गारेट जार्विसची एक आवडती भाची आहे, बार्बरा स्मिथ नांवाची. स्प्रिंग्स मधल्या एका माणसाशी तिनी लग्न केलंय. कोर्टाला एक दिवस सुटी असतांना जार्विस आणि त्यांची बायको ह्या भाचीला भेटायला आले आहेत. जार्विसनी विचार केला त्यांच्या बायकोच्या दृष्टीनी हे बरं होईल. त्यांच्या मुलाच्या मृत्यूचा घाव सोसणं त्यांच्या बायकोला अपेक्षेपेक्षाही जड जात होतं. त्या दोघी बायका इकोपो आणि लुफाफा आणि उम्झीमकुलूच्या लोकांच्या आठवणी काढून गप्पा मारत होत्या, तेव्हा मात्र ते बाहेर बागेत फिरायला आले. शेवटी त्यांचा जीव मातीतच रमत असे. थोड्या वेळानी त्या दोघी म्हणाल्या त्या बाहेर गावात जात आहेत, त्यांना बरोबर यायचं आहे का. पण ते म्हणाले, नाही त्यापेक्षा मी घरी बसून शांतपणे वर्तमानपत्र वाचून काढेन. त्याप्रमाणे ते वाचायलाही लागले.
वर्तमानपत्र नुसतं ओडेनडालस्रस्टमध्ये सापडलेल्या नवीन सोन्याच्या आणि शेअर बाजारातल्या आनंदाच्या बातम्यांनी भरून गेलंय. कोणी अधिकारी व्यक्ती धोक्याची सूचना देत होती की लोकांनी ह्या दररोज वर चढत असलेल्या किमतींना शेअर्स विकत घेणं शहाणपणाचं नाही. ह्या शेअर्सचं खर मूल्य तेवढं आहे ह्याची काही खात्री नाही, आणि ह्याच किंमती उद्या धाडकन खालीही येऊ शकतील, आणि लोकांचं पैशाचं मोठं नुकसान होऊ शकेल, दुःख तर वेगळीच गोष्ट. इतर थोड्या गुन्हेगारीच्या बातम्याही होत्या, बहुतेक सर्व काळ्यांनी गोरयांवर केलेल्या हल्ल्यांच्या. पण आजकाल ज्या भयानक बातम्यांना घाबरून लोकांना पेपर उघडणं नको व्हायचं, तशा प्रकारच्या बातम्या मात्र नव्हत्या.
ते वाचत असतांना स्वैपाकघराच्या दारावर टकटक ऐकू आली. त्यांनी बाहेर जाऊन बघितलं, तर एक काळा पाद्री दाराबाहेरच्या पायऱ्यांच्या तळाशी उभा होता. पाद्री म्हातारा होता, आणि त्याचे जुनाट काळे कपडे हिरवट दिसत होते. त्याच्या शर्टाची कॉलर घामानी किंवा जुनाट होऊन पिवळी पडली होती. त्याने डोक्यावरची हॅट काढली, तेव्हा संपूर्ण पांढरे झालेले केस नजरेस पडले. वर बघितल्यावर तो एकदम दचकला आणि भितीनी थरथरा कापायला लागला.
-    गुड मॉर्निंग, उम्फुन्डीस. जार्विस झुलूमध्ये म्हणाले. ते झुलू उत्कृष्ट बोलत.
पाद्री थरथरत्या आवाजात म्हणाला, सरकार. जार्विसना आश्चर्य वाटलं म्हणजे तो एकाएकी सगळ्यात खालच्या पायरीवर बसला, आजारी किंवा पार उपाशीपोटी थकून बसावं तसा. जार्विसच्या लक्षात आलं, की हा काही त्याचा उद्धटपणा नव्हता, कारण एरवी तो अतिशय नम्र आणि सभ्य दिसत होता. म्हणून ते पायऱ्या उतरून खाली आले, आणि म्हणाले, उम्फुन्डीस तुम्हाला बरं वाटत नाही का? पण म्हातारा काही न बोलता, थरथरा कापत जमिनीकडे बघतच राहिला. त्यामुळे जार्विसना त्याचं तोंड दिसत नव्हतं, आणि अगदी खाली वाकून त्याची हनुवटी उंचावल्याशिवाय ते दिसलंही नसतं. ते काही जार्विसनी केलं नाही, कारण असलं कोणी करत नाही.
-    तुम्हाला बरं वाटत नाही का, उम्फुन्डीस?
-    नाही सरकार, मी ठीक आहे.
-    तुम्हाला पाणी हवंय का? काही खायला देऊ का? उपाशी आहात का?
-    नाही सरकार, मी ठीक आहे.
जार्विस पायरीच्या तळाच्या चौथऱ्यावर उभे राहिले, पण म्हातारा काही चटकन सावरेना. तो अजूनही थरथरा कापत, जमिनीकडे बघतच राहिला होता. एखाद्या गोऱ्या माणसाला असं तिष्ठत ठेवणं बरं नाही, पण जार्विस थांबले. कारण म्हातारा अगदी उघडच आजारी किंवा दुबळा होता. म्हाताऱ्याने त्याच्या काठीच्या आधाराने उठायचा प्रयत्न केला, पण ती पायरीवरून सटकून आपटत आपटत खालच्या चौथऱ्यावर पडली. जार्विसनी उचलून त्याला ती परत दिली. पण ह्यावेळी म्हाताऱ्याने ती अडचण असल्यासारखी बाजूला ठेवून दिली, हॅटही बाजूला ठेवली आणि पायऱ्यांवर दोन्ही हात टेकून तो उठायचा प्रयत्न करू लागला. पहिल्या प्रयत्नात पुन्हा खाली पडला, आणि बसून थरथरत राहिला. जार्विसनी त्याला उठायला मदत केली असती, पण सहसा असं कोणी करत नाही; काठी उचलून देणं ठीक आहे. शेवटी तो म्हातारा पायऱ्यांवर जोरात हात रोवून उठला आणि उभा राहिला. त्याने चेहरा वर करून जार्विसकडे बघितलं. आणि जार्विसना जाणवलं, की त्याच्या चेहऱ्यावर अतिशय क्लेश दिसत होते, पण ते आजारपणामुळे किंवा उपाशी असल्याचे नव्हते वाटत. जार्विसनी खाली वाकून त्याची हॅट आणि काठी उचलली आणि त्याला दिली. हॅट बोटांच्या चिमटीत धरली होती, कारण ती फार जुनाट आणि मळकट होती.
-    फार मोठे उपकार आहेत तुमचे, सरकार.
-    तुम्हाला नक्की बरं वाटतय?
-    मी ठीक आहे, सरकार.
-    कशासाठी आला आहात उन्फुन्डीस?
म्हाताऱ्याने पुन्हा काठी आणि हॅट खाली ठेवली. त्या जुन्या हिरवट कोटाच्या खिशातून थरथरत्या हातांनी एक पाकीट बाहेर काढलं. त्यातले कागद सगळे खाली पडले, कारण त्याचे हात अजिबात स्थिर नव्हते. माफ करा, सरकार. तो ते कागद उचलायला खाली वाकला. पण त्या म्हाताऱ्याला धड वाकवत नव्हतं, थोडे कागद हातात धरले, की आणखी गोळा करतांना आधीचे खाली पडत. पाकीट पुन्हापुन्हा खाली पडे. जार्विस आता सहानुभूती आणि संत्रस्तता ह्यांच्यामध्ये कात्रीत सापडले होते.
-    तुमचा खोळंबा करतो आहे, सरकार. मला माफ करा.
-    ठीक आहे.
शेवटी एकदाचे सगळे कागद गोळा झाले. त्यातला एक वगळून, बाकीचे त्याने पाकिटात भरले. तो एक कागद त्याने जार्विसच्या समोर धरला. त्याच्यावर एक पत्ता लिहिला होता. ते उभे असलेल्या जागेचाच पत्ता होता तो.
-    हाच तो पत्ता आहे, उन्फुन्डीस.
-    सरकार, मला इथे यायला सांगितलं होतं. डोत्शेनी मध्ये सिबेको म्हणून एक माणूस आहे....
-    डोत्शेनी? मला माहिती आहे, मी तिथलाच आहे.
-    तर सरकार, ह्या माणसाची एक मुलगी आहे, इकोपोच्या इस्मिथ नावाच्या गोऱ्या साहेबांकडे ती कामाला होती...
-    हो, हो.
-    आणि इस्मिथ साहेबांच्या मुलीचं लग्न एका गोऱ्या साहेबांशी झालं, त्यांचा हा पत्ता आहे....
-    ते सगळं ठीक आहे…
-    आणि ते जेव्हा इथे स्प्रिंग्स मध्ये राहायला आले, तेव्हा सिबेकोची मुलगी सुद्धा त्यांच्याबरोबर इथे आली. पण आता सिबेकोला गेल्या वर्षभरात त्याच्या मुलीची काहीच खबरबात कळली नाही. म्हणून त्याने विचारलंय, म्हणजे, मला विचारायला सांगितलंय, कुठे असते, कशी आहे त्याची मुलगी.
जार्विस वळले आणि घरात जाऊन एका नोकराला घेऊन आले. ह्याला विचारा, असं म्हणून ते पुन्हा घरात जायला वळले. पण त्यांना एकाएकी आठवलं, हाच तो डोत्शेनीमधला काळा पाद्री. म्हणून ते पुन्हा बाहेर आले.
-    तुम्हाला हवं होतं ते सापडलं का, उम्फुन्डीस?
-    सरकार, त्या मुलाला तिच्याबद्दल काही माहिती नाही. तो इथे येण्यापूर्वीच ती इथून गेली होती.
-    ह्या घराची मालकीण, स्मिथ साहेबांची मुलगी, बाहेर गेली आहे. पण ती लवकरच परत येईल. तुम्हाला हवं तर तुम्ही थांबू शकता.
जार्विसनी त्या मुलाला जायला सांगितलं, आणि तो जाईपर्यंत ते थांबले.
-    मी तुम्हाला ओळखतो, उम्फुन्डीस.
आता मात्र त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरचे क्लेश जार्विसच्या मनावर जोरदार आघात करून गेले; म्हणून ते म्हणाले, बसा उम्फुन्डीस. म्हणजे म्हातारा निदान खाली बसेल, जमिनीकडे बघत. म्हणजे त्यांना एकमेकांकडे बघावं लागणार नाही. कारण ते बघणं एवढं अवघड होतं. मग तो म्हातारा खाली बसला. जार्विस त्याच्याकडे न बघताच म्हणाले, आपल्या दोघांच्या मध्ये काहीतरी आहे; पण मला माहिती नाही काय आहे ते.
-    सरकार?
-    तुम्ही मला घाबरला आहात, पण मला माहिती नाही का. मला घाबरायची काही गरज नाही.
-    खरं आहे सरकार, तुम्हाला माहिती नाही कारण काय ते.
-    मला माहिती नाही, पण जाणून घ्यायची इच्छा आहे माझी.
-    सरकार, तुम्हाला सांगू शकेन का नाही खात्री नाही मला.
-    तुम्ही सांगायलाच हवं उम्फुन्डीस. कठीण आहे का?
-    फार कठीण आहे सरकार. माझ्या आयुष्यातली सर्वात कठीण गोष्ट आहे ती.
त्याने त्याचा चेहरा वर उचलला. एवढं पराकोटीच दुःख जार्विसनी पूर्वी बघितलं नव्हतं. सांगा मला, ते म्हणाले, तुमचा भार हलकाच होईल.
-    मला भिती वाटते, सरकार.
-    मला दिसतंय तुम्हाला भिती वाटते आहे ते; तेच तर मला समजत नाही. पण भिती वाटायची गरज नाही. मी काही रागावणार नाही. माझ्या मनात तुमच्याबद्दल राग नसणार आहे.
-    ही, म्हातारा म्हणाला, माझ्या आयुष्यातली सर्वात कठीण गोष्ट, ती तुमच्याही आयुष्यातली सर्वात कठीण गोष्ट आहे.
जार्विसनी त्याच्याकडे बघितलं, प्रथम गोंधळून. मग हळूहळू त्यांना काहीतरी जाणवलं. तुम्ही फक्त एकाच गोष्टीबद्दल बोलत असणं शक्य आहे, फक्त एकाच. पण तरीही मला समजत नाही.
-    तुमच्या मुलाचा खून झाला, तो माझ्या मुलाच्या हातून, सरकार.
मग ते गप्प झाले. जार्विस त्याला सोडून बागेतल्या झाडांच्या दिशेनी गेले. कुंपणापलीकडे माळाकडे, त्यापलीकडच्या खाणीतून उपसलेल्या पांढऱ्या ढिगारयांकडे ते बघत राहिले. ते ढिगारे सूर्याच्या झळाळीत टेकड्यांसारखे दिसत होते. ते परत यायला मागे वळले, तेव्हा त्यांना दिसलं की म्हातारा उठून हॅट घालून, काठी हातात घेऊन उभा होता, जमिनीकडे नजर खिळवून. ते त्याच्याकडे परत गेले.
-    तुम्ही बोललात ते मी ऐकलं. मला जे समजत नव्हतं ते आता समजलं. माझ्यामध्ये काही राग नाही.
-    सरकार?
-    घराची मालकीण, स्मिथ साहेबांची मुलगी परत आली आहे. तुम्हाला तिला भेटायचय का? तुम्ही पुरेसे सावरला आहात का?
-    त्या कामासाठीच तर इथे आलो होतो मी.
-    समजलं. मला इथे बघून तुम्हाला धक्का बसला. मी इथे असणं तुम्हाला अपेक्षित नव्हतं. तुम्ही मला कसे ओळखता?
-    मी डोत्शेनीमधल्या चर्चमध्ये काम करतो, तिथे मी तुम्हाला बाहेरून घोड्यावरून जातांना पाहिलं आहे.
जार्विसनी घरातून येणारे आवाज ऐकले. मग ते हलक्या आवाजात म्हणाले. मग तुम्ही माझ्या छोट्या मुलालाही बघितलं असेल. तोही घोड्यावर बसून जायचा. लाल रंगाच्या, पांढऱ्या तोंडाच्या लहानशा घोड्यावरून. लहान मुलं लावतात, तशी लुटूपुटूची लाकडी बंदूक तो कमरेला लावत असे.
म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर काही हालचाल झाली. तो अजूनही जमिनीकडे टक लावूनच बघत होता. पण जमिनीवर पडत असलेले अश्रू जार्विसना दिसले. ते स्वतः भावनावश झाले, हळवे झाले. ते सगळं थांबवायचं त्यांच्या मनात होतं, पण त्यांच्या तोंडून वेळेत शब्द उमटले नाहीत.
-    मला आठवतं सरकार, त्याच्यात एक चलाखपणा होता.
-    हो, हो, जार्विस म्हणाले. त्याच्यात एक चलाखपणा होता.
-    सरकार, फार कठीण आहे मला योग्य शब्द शोधायला. पण माझ्या अंतःकरणात तुमच्याबद्दल अपार दुःख आहे, आणि राणी सरकारांबद्दल. आणि सूनबाईंबद्दल, मुलांबद्दल.
-    हो, हो जार्विस म्हणाले. हो, हो ते कठोरपणे म्हणाले. मी बोलावतो घराच्या मालकीणबाईंना.
ते आत जाऊन तिला घेऊन आले. तिला इंग्लिशमध्ये म्हणाले, हा म्हातारा सिबेको नांवाच्या काळ्याच्या मुलीची चौकशी करतो आहे. ती म्हणे तुझ्याकडे इकोपोमध्ये काम करत असे. तिची गेल्या कित्येक महिन्यात ह्यांना काही खबरबात मिळाली नाही.
-    मला तिला काढून टाकायला लागलं, स्मिथची मुलगी म्हणाली. सुरुवातीला ती बरी होती. मी म्हटलं होतं तिच्या बापाला, मी तिची काळजी घेईन. पण नंतर ती बहकली. घरात दारू गाळायचे उद्योग करायला लागली. पोलिसांनी पकडलं आणि महिनाभर तुरुंगात होती ती. त्यानंतर मी काही तिला परत कामावर ठेवणार नव्हते.
-    ती कुठे असते तुला माहिती नाही? जार्विसनी विचारलं.
-    मला नाही माहिती कुठे आहे ती. स्मिथची मुलगी इंग्लिशमध्ये म्हणाली. आणि काही पडलंही नाही मला; कुठे का असेना.
-    तिला माहिती नाही, जार्विस झुलूमध्ये म्हणाले. तिला काही पडलं नाहीय हा भाग ते बोलले नाहीत.
-    तुमचे आभार, म्हातारा झुलूमध्ये म्हणाला. जपून रहा, सरकार. स्मिथच्या मुलीपुढे तो लवून झुकला. तिने मान झुकवून दखल घेतली.
त्याने त्याची हॅट डोक्यावर चढवली आणि रितीप्रमाणे तो मागच्या दाराकडे चालू लागला. स्मिथची मुलगी घरात गेली. जार्विस म्हाताऱ्याच्या मागोमाग चालू लागले. पण हळूहळू, जणू मागोमाग जात नसावेत, असे. म्हाताऱ्याने फाटक उघडलं, बाहेर गेला आणि मागे ओढून घेतलं. बंद करतांना मागे वळून त्याने पाहिलं, की जार्विस त्याच्या मागोमाग आले आहेत. त्याने झुकून त्यांना अभिवादन केलं.
-    जपून जा, उम्फुन्डीस. जार्विस म्हणाले.
-    जपून रहा, सरकार.
म्हाताऱ्याने त्याची हॅट काढून उंचावली आणि पुन्हा घातली. मग तो स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरून हळूहळू चालू लागला. तो दृष्टीआड होईपर्यंत जार्विस त्याच्याकडे बघत राहिले. ते मागे वळले तेव्हा त्यांना दिसलं त्यांची बायको त्यांच्या दिशेनी येत होती. तीही म्हातारी झाल्यासारखी हळूहळू चालतांना बघून त्यांचं काळीज चुकचुकलं.
ते तिच्या जवळ गेले, तिनी त्यांचा हात हातात घेतला.
-    जेम्स, कसल्या एवढ्या काळजीत आहात? तिने विचारलं. घरात आलात ते फार काळजीत दिसत होतात.
-    काहीतरी ग, जुन्या आठवणी. तुला माहिती आहे ना, कशा अचानक डोक्यात येतात.
तिचं समाधान झालं, समजतं मला, ती म्हणाली.
तिने त्यांचा हात जास्तच घट्ट धरला. चला, बार्बरा जेवायला बोलावते आहे.

Comments