भाषांतर - २४

जार्विसना वाटलं पुन्हा त्या घरात जावं. स्वैपाकघरामधून, जमिनीवरचा तो डाग ओलांडून, पायऱ्या चढून वर बेडरूममध्ये जाणं हा वेडेपणा होता. पण ते तसेच गेले, बेडरूममध्ये नव्हे; त्या पुस्तकांनी भरलेल्या अभ्यासिकेमध्ये. ते पुन्हा पुस्तकांच्या बाजूनी फिरले, अब्राहम लिंकननी भरलेल्या कपाटापुढून, दक्षिण आफ्रीकेनी आणि आफ्रिकान्सनी भरलेल्या कपाटापुढून, धर्म, समाजशास्त्र, गुन्हे आणि गुन्हेगारीनी भरलेल्या कपाटापुढून आणि कविता आणि कादंबऱ्या आणि शेक्सपिअरनी भरलेल्या कपाटापुढून. त्यांनी भिंतीवरच्या चित्रांकडे नजर टाकली. ते टेबलाजवळ येउन बसले. त्यांच्या समोर हे करायला आणि ते करायला बोलावणारी, ह्या नाहीतर त्या कार्यक्रमाला बोलावणारी निमंत्रणं पडली होती. आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये काय करणं योग्य होतं आणि काय करणं योग्य नव्हतं ह्यासंबंधी लिहिलेले कागद पडले होते.
त्यांनी त्यांच्या मुलाच्या टेबलाचे खण उघडले. त्यात थोडे जमा-खर्चाचे कागद होते, थोडे सुटे कागद आणि पाकिटं होती, थोड्या पेन-पेन्सिली होत्या, बँकेनी स्टँम्प मारून परत पाठवलेले चेक होते. एका मोठ्या खणामध्ये नीट टाईप करून, पिन लावून एकावर एक रचून ठेवलेले लेख होते. एक लेख होता 'सामाजिक केंद्रांची गरज का आहे?', दुसरा 'पार्कवॉल्ड उद्यानामधील पक्षी'. आणखी एक होता 'भारत आणि दक्षिण आफ्रिका'. आणि एक होता 'एका दक्षिण आफ्रिकन घडणीसंबंधी (खाजगी)'. त्यांनी तो वाचायला सुरुवात केली.

एक दक्षिण आफ्रिकन म्हणून जन्माला येणं कठीण आहे. तुम्ही आफ्रीकानेर असू शकता, किंवा इंग्रजी-भाषिक दक्षिण आफ्रिकन असू शकता, किंवा करड्या रंगाचे, किंवा झुलू असू शकता. तुम्ही हिरव्यागार टेकड्यांवरून आणि दऱ्या-खोर्यामधून प्रवास करू शकता, मी लहान असतांना केला तसा. मी लहान असतांना बघितल्या तशा बाण्टु लोकांच्या राखीव वसाहती तुम्ही बघू शकता - तिथे आतमध्ये काय चाललंय ह्याचा थांगपत्ताही लावून घेता. लहानपणी मी ऐकलं तसं तुम्हीही ऐकलं असेल, की इंग्रजी-भाषिक लोकांपेक्षा आफ्रीकानेर लोकांची संख्या कितीतरी जास्त आहे; मात्र एकही आफ्रीकानेर नजरेला पडता, किंवा त्यांच्याबद्दल काहीही माहिती नसताना. मी वाचली तशी तुम्हीही वाचली असतील आपल्या गोजिरवाण्या आफ्रिकेबद्दलची पुस्तकं, झळाळत्या सूर्याचा आणि जगातल्या सगळ्या वावटळीपासून सुरक्षित असलेला देश. तुम्हालाही ह्या देशाबद्दल प्रेम आणि अभिमान वाटला असेल, ह्या देशाबद्दल काहीही जाणून घेता. आपण जसजसे मोठे होतो, तसं आपल्याला समजायला लागतं की इथे सूर्य आणि सोनं आणि संत्री ह्यांच्यापलीकडेही काही गोष्टी आहेत. तेव्हा कुठे आपल्याला ह्या देशातला द्वेष, ह्या देशातली भिती समजायला लागते. तेव्हा कुठे आपलं ह्या देशावरचं प्रेम खोल आणि उत्कट व्हायला लागतं. एखाद्या प्रामाणिक, ढोंगी, थंड, प्रेमळ, दुष्ट आणि भ्यालेल्या स्त्रीवरचं प्रेम असावं तसं.
मी शेतावर लहानाचा मोठा झालो, मोठा आदर करायचे लोक माझ्या आई वडिलांचा. त्यांनी मला छान वाढवलं, माझ्या सगळ्या गरजा आणि हौशी पुरवल्या. ते सज्जन होते, प्रेमळ होते, पापभीरु होते. ते मला नियमितपणे चर्च मध्ये घेऊन जात, प्रार्थना करायला शिकवत. त्यांच्याकडे नोकरांची काही कमी नव्हती, आणि काही त्रासही नव्हता. कोणीही मुलानी भलंबुरं, प्रेम, औदार्य वगैरे बद्दल जे काही शिकावं ते सगळं शिकलो मी. दक्षिण आफ्रिकेबद्दल मात्र काहीच नाही शिकलो मी.

धक्का बसून आणि दुखावून जाऊन, जार्विसनी ते कागद खाली ठेवले. क्षणभर त्यांना जवळजवळ राग आला होता, पण त्यांनी बोटांनी डोळे चोळले आणि तो झटकून टाकला. पण ते थरथरत होते, आणि त्यांच्याच्यानी पुढे वाचवेना. ते उठून उभे राहिले, हॅट चढवून, जिना उतरून खाली गेले, जमिनीवरच्या त्या डागापर्यंत. तिथला पोलिस त्यांना सलाम ठोकायला तयारच होता. पण ते वळले, जिना चढून वर गेले, आणि पुन्हा टेबलापाशी जाऊन बसले. त्यांनी ते कागद काढले आणि पुन्हा शेवटपर्यंत वाचून पाहिले. त्यांना शब्दांची जाण असावी, कारण त्या शेवटच्या परिच्छेदाने ते हेलावून गेले. त्यांना कल्पनांची जाण असावी.

म्हणून, मी स्वतःला वाहून घेणार आहे, माझा वेळ, माझी ताकद, माझी बुद्धी सगळं मी दक्षिण आफ्रिकेच्या सेवेला अर्पण करणार आहे. मी स्वतःला हे विचारणार नाही, की अमुक गोष्ट करणं सोयीस्कर आहे का; फक्त एवढंच विचारेन अमुक गोष्ट करणं बरोबर आहे का. मी कोणी परोपकारी महंत आहे म्हणून नाही मी हे करणार. आयुष्य निसटून जातं आहे, आणि उरलेल्या प्रवासामध्ये मला दिशा दाखवणारं एक सच्चं होकायंत्र हवं आहे, एक अढळ निश्चल ध्रुवतारा हवा आहे. मी हे करणार कारण हे नव्हे, की मला निग्रोंचा फार पुळका आहे, किंवा माझ्या वर्णाचा द्वेष आहे. मी हे करणार कारण माझ्या अंतःकरणात मला दुसरं काहीच योग्य दिसत नाही. हे सगळं तराजूत घालून मापायला लागलो की मी हरवून जातो. हे करण्यात धोका आहे का विचारायला लागलो, की मी हरवून जातो. गोरे आणि काळे, इंग्लिश आणि आफ्रीकानेर, ज्यू आणि इतर लोक ह्याला पाठींबा देतील का विचारायला लागलो की मी हरवून जातो. म्हणून मी मला जे बरोबर वाटतं ते करायचा, आणि सत्य तेच सांगायचा प्रयत्न करणार आहे.
मी फार धाडसी किंवा प्रामाणिक आहे म्हणून नाही मी हे करत. पण माझ्या अंतरात्म्यामधला झगडा मिटवण्याचा हा एकच मार्ग मला माहिती आहे. माझ्या स्वतःच्या एका भागाला उदात्ततेकडे झेपावायचं असताना, दुसऱ्या भागाला मी जखडून नाही ठेवू शकत. मला नाही असं जगायचं, असं जगण्यापेक्षा मरण पत्करेन मी. स्वतःच्या निष्ठांसाठी प्राणार्पण करणारे लोक मला समजू शकतात. त्यांच्या दृष्टीनी प्राणार्पण करणं फार शूर वीर उदात्त वगैरे नसतं, त्यांच्या तत्त्वांविरुद्ध जगण्यापेक्षा ते मरण स्वीकारतात - एवढंच.
पण, एक संपूर्ण आत्ममग्न स्वार्थीपणा मला हे करायला लावतो आहे असा आव आणणं प्रामाणिक होणार नाही. माझ्या आवाक्याच्या बाहेरचं काहीतरी मला हे करायला लावतं आहे, कुठलीही किंमत देऊन, जे योग्य आहे तेच करायचा धोशा लावतं आहे. त्या बाबतीत मी फार सुदैवी आहे, की माझ्या बायकोचे विचारही माझ्याचसारखे आहेत. तीही स्वतःची भिती आणि द्वेष ह्याच्या पलीकडे जायचा प्रयत्न करते आहे. आमच्या दोघांची स्वप्नं त्यामुळे सत्याच्या थोडी जास्त जवळ आल्यासारखी वाटतात. आमची मुलं हे सगळं समजायला अजून लहान आहेत. ती मोठी झाल्यावर जर मला घाबरत असली, माझा द्वेष करत असली, किंवा 'आमच्या' वाटणाऱ्या गोष्टींशी मी प्रतारणा केली आहे असं जर त्यांना वाटलं, तर ती एक मोठी जखम असेल माझ्या उरात. जर ती आमच्यासारख्याच विचारांची निघाली, तर तो अनमोल, अवर्णनीय आनंदाचा, ईश्वराचे आभार मानावेत असा मोठा ठेवा असेल. पण, ह्या गोष्टींचा सौदा नाही होऊ शकत. त्या एकतर मिळतात, किंवा नाही मिळत. आणि काही झालं तरी. त्या विचाराने आपल्या वागण्याची दिशा बदलणं योग्य नाही.


जार्विस बराच वेळ धुम्रपान करत बसून राहिले. त्यांनी आणखी काही वाचलं नाही. त्यांनी ते कागद खणात ठेऊन तो बंद केला. त्यांचा पाईप संपल्यानंतर, त्यांनी हॅट चढवली आणि जिना उतरले. पायथ्याशी आल्यावर, ते सरळ पुढच्या दाराकडे वळले. त्यांना त्या जमिनीवरच्या डागाची भिती होती असं नव्हे; ते यापुढे परत त्या दिशेनी जाणार नव्हते, एवढंच. पुढच्या दाराला अंगचंच कुलूप होतं. ते त्या दाराने बाहेर आले. शेतकऱ्याच्या सवयीनी त्यांनी आकाशाकडे नजर टाकली, पण ह्या परक्या प्रदेशातलं आकाश त्यांच्याशी काहीच बोललं नाही. ते फाटकातून बाहेर पडले. मागच्या दाराजवळ असलेल्या पोलिसाने फाटक बंद झाल्याचा आवाज ऐकला, आणि समजूतदारपणे स्वतःशीच मान डोलावली. 'नाही सहन होत आहे आता त्यांना. म्हातारबाबांना नाही सहन होत आता हे' तो स्वतःशीच म्हणाला.

Comments