भाषांतर - २३

आर्थर जार्विसच्या खुनाच्या खटल्याकडे आता कोणाचंही लक्ष नाही. कारण नवीन सोन्याचा शोध लागला आहे - अजून सोनं, लखलखीत सोनं! ऑरेंज फ्री स्टेटमधील ओडेनडालस्रस्ट म्हणून गांव आहे म्हणे. कालपर्यंत कोणी नांवही ऐकलं नव्हतं; आज ते जगप्रसिद्ध झालंय.
हे सोनं म्हणे दक्षिण आफ्रिकेमध्ये आतापर्यंत सापडलेल्या कुठच्याही सोन्याइतकंच, जोहानसबर्गमधल्या कुठच्याही गोष्टीएवढंच मौल्यवान आहे. लोकांना आत्ताच भविष्य दिसतंय, एक नवीन जोहानसबर्ग उभ रहाणार, उंच इमारतींच, गजबजलेल्या रस्त्यांचं एक महानगर. जोहानसबर्गमधलं सोनं काही कायमचं रहाणार नाही म्हणून दुःखी झालेले लोक आता खुशीमध्ये जल्लोष करताहेत. पुनर्जीवन मिळालं, दक्षिण आफ्रिकेला पुनर्जीवन मिळालं.

जोहानसबर्गमध्ये अमाप उत्साह आहे. शेअर बाजारात लोक वेडे झाले आहेत, ओरडताहेत, किंचाळताहेत, हॅट्स हवेत भिरकावून देताहेत. अस्तित्वात नसलेल्या खाणींचे जे शेअर्स त्यांनी केवळ आशेवर विकत घेतले होते, ते शेअर्स आता कल्पनेबाहेर वर चढले आहेत.

ह्या ऑरेंज फ्री स्टेटमध्ये नुसत्या सपाट उलगडत जाणाऱ्या माळापलीकडे काही नव्हतं. थोड्याफार शेळ्या-बकऱ्या, गाई-गुरं आणि गावठी गुराखी ह्यांच्यापलीकडे काही नव्हतं. गवत, झुडपं आणि अधूनमधून थोडीशी मक्याची शेतं ह्यापलीकडे काही नव्हतं. खाण म्हणावी असं काही नव्हतं, एक जमीन खोदण्याच मशीन आणि जमिनीखालची रहस्य तपासत बसलेले थोडे इंजीनिअर्स वगळता. त्यांच्याकडे ढुंकून बघायला सुद्धा कोण, तर एखादा वाटसरू गावकरी, एखादा गुराखी, एखादा घोड्यावरून बाजूनी जात असलेला म्हातारा आफ्रिकान्स शेतकरी. हे सगळे त्यांच्याकडे तुच्छतेनी, भितीनी किंवा आशेनी बघायचे - ज्याच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे.
ट्वीड व्लेचा शेअर बघा - आधी वीस शिलिंगला होता, मग चाळीस, नंतर साठ झाला आणि आता - विश्वास बसेल? - ऐंशी शिलीन्गाला पोचलाय. दोन वाजताऐवजी बाराला शेअर विकला म्हणून किती लोक रडत बसले आहेत; किंवा बाराऐवजी दोन वाजता विकत घेतला म्हणून. आणि ज्यांनी विकले ते उद्या हा शेअर शंभरवर गेला की आणखी रडणार आहेत.

वाह, काय सुंदर आहे हे सगळं! दक्षिण आफ्रिका इतकी सुंदर आहे! आणि आम्ही परदेशात फिरायला गेलो की मान मोठी ताठ करून चालू, कारण तिथले लोक म्हणतीलच ना, 'तुम्ही काय बाबा, दक्षिण आफ्रिकेमधले श्रीमंत लोक'.

ओडेनडालस्रस्ट - काय जादुई नांव आहे! पण आत्ताच शेअर बाजारातले काही लोक म्हणताहेत (त्यांचं आफ्रिकान्स भाषेच ज्ञान मुळात फार दृष्ट लागण्यासारखं नाही), हे कसलं नांव, काहीतरी सोपं नांव हवं. स्मट्स किंवा स्मट्सव्हील कसं सोपं आहे! किंवा हॉफमायर ... पण हॉफमायर नांवाच गांव आधीच आहे, नाही का... आणि त्याशिवाय...जाऊ दे, ते काही फार चांगलं नांव नाही. ह्या खाणींची ही एक पीडा असते, उच्चारदेखील करता येणार नाही असली नांवं असतात त्यांची. एवढा महान धंदा, एवढ्या सुपीक डोक्यांनी चालवलेला, एवढ्या मोठ्या धडाडीनी चालवलेला; आणि ह्या असल्या अनुच्चरणीय नांवांमध्ये जखडून पडावा, काय दुर्दैव ना? ब्लायव्हुरुतझिक्त, वेल्गेदाच्त आणि लांगलगटे आणि आता हे ओडेनडालस्रस्ट!

पण हे सगळं बोलायचं मात्र आपलं दाढीतल्या दाढीतच बरं का. आपल्या क्लबांमध्ये, आपल्या घरामध्ये, खाजगीत. कारण आपण तर युनायटेड पक्षाचे सभासद आहोत ना, त्यांची तत्व आहेत सहकार्य, मित्रत्व, बंधुभाव आणि एकदुसऱ्यांना समजून घेण. अर्थात, ह्या आफ्रीकानेर लोकांनी हे द्वैभाषिकतेचं खूळ डोक्यातून काढून टाकलं, तर प्रचंड पैसे वाचतील हे मात्र खरं आहे.

सोनं सोनं सोनं! हा देश परत एकदा श्रीमंत होणार. शेअर्स वीस शिलिंगपासून शंभर शिलिंगपर्यंत पोचले आहेत, कल्पना करा, आभार माना देवाचे. अर्थात असेही लोक आहेत, ज्यांना ह्यात काही मोठ वाटत नाही. पण हेही खरं आहे की त्यांच्याकडे फारसे शेअर्स नाहीत, किंबहुना अजिबात काहीच शेअर्स नाहीत. ह्यातले काही लोक बाहेर चार-चौघात बोलताहेत. इतर काही जणांना ह्याचं कुतूहल वाटतंय आणि काहींना कंटाळा आलाय - की नेमक्या ज्यांच्याकडे काही शेअर्स आणि पैसे नाहीत, अशाच लोकांना जणू निसर्गाने किंवा दैवाने शब्दांचं वरदान दिलेलं असावं. ह्याचं फार कौतुक आहे, किंवा राग आहे असं नव्हे, अगदी तटस्थपणे त्यांच्या मनात असं येतं. अर्थात, ही आपली नुसती एक कल्पना आहे, आणि कदाचित त्याबद्दल जास्त न बोलणच बरं. आता, जवळ एक दमडी नसलेले, पण शब्दांची किमया करणारे लोक, लहानलहान डाव्या विचारसरणीच्या क्लबांमध्ये, नाहीतर चर्चमध्ये, नाहीतर प्रेम आणि बंधुभावाचा वगैरे पुरस्कार करणाऱ्या संघटनांमधून बोलतात. लिहितात सुद्धा, 'नव-समाज' किंवा 'मानवतेची वाटचाल' वगैरे लहानशा प्रकाशनांमध्ये. नाहीतर त्या काही आठवडे उपाशी असल्यासारखा दिसणाऱ्या फादर बेरेस्फोर्डनी चालवलेल्या, कोणी वाचत नसलेल्या दुर्बोध आठ-पानी साप्ताहिकामध्ये. बेरेस्फोर्डच्या केसांनी कधी कंगवा बघितला नसावा असे विस्फारलेले असतात, आणि त्यांच्या पँटींना कधी इस्त्री नसते. पण ते इंग्रजी मात्र सुंदर बोलतात हं, म्हणजे अगदी ऑक्सफर्डमधल्या सारखं; इथल्या ऱ्होड्स किंवा स्टेलंबोशसारखं नव्हे. त्यामुळे ते चालून जातात. बऱ्याच जणांना ते माणसाळलेल्या वाघासारखे वाटतात, तसेच खदिरांगी डोळे. रात्ररात्र जागून त्यांचा तो असाधारण पेपर लिहित असतात. मिशनरी आहेत, आणि देवावर फार उत्कट श्रद्धा आहे त्यांची. हुं:, सगळ्या प्रकारचे लोक असतात ह्या जगात हेच खरं!

आता, आणखी काही लोक म्हणतात की हे शेअर्स वीस शिलिंगलाच राहिले असते, आणि उरलेले ऐंशी शिलिंग काही विधायक कामाला, उदाहरणार्थ जमिनीची धूप थांबवायला वापरले असते तर जास्त बरं झालं असतं. मुलांच्या आणि मुलींच्या क्लब्ससाठी, सामाजिक केंद्रांसाठी, हॉस्पिटलसाठी ह्या पैशाचा वापर झाला असता तर जास्त चांगलं झालं असतं. खाणीतल्या मजुरांना रोजगार वाढवून मिळाला असता तर जास्त बरं झालं असतं.

अर्थात, कोणाच्याही लक्षात येईल, की हे बुरसटलेले विचार आहेत. शेअरच्या किमतीचा रोजगाराशी काहीच संबंध नाही, त्या केवळ खाणींचा खर्च आणि सोन्याची किंमत ह्या दोघांवरच अवलंबून असतात. आणि हो, हेही दाखवून दिलं जातं, की खाणींच्या व्यवसायामध्ये काही बडी मंडळी आहेत ज्यांच्याकडे एकही शेअर नाही. हे महत्वाचं आहे, कारण लोभ तर त्यांनाही असेलच ना?

काही असो, हे ऐंशी शिलिंग वायफळ गोष्टींवर खर्च होताहेत असं समजून एवढं दुःखी व्हायचं काही कारण नाही. असं बघा, वीस शिलिंगचा शेअर जेव्हा शंभरला पोचतो, तेव्हा कोणाला तरी त्यात ऐंशी शिलींगाचा फायदा होत असतो. हा काही एकटा मनुष्य नसतो, कारण एक तर ते अघटितच, किंवा तो माणूस जादूगार तरी असायला हवा, किंवा सरकारी नोकर वगैरे. जास्त शक्यता म्हणजे बऱ्याच लोकांना असे ऐंशी शिलिंग मिळणार आहेत. आता हे खरं, की त्यांनी हे पैसे मिळवायला प्रत्यक्ष काम - म्हणजे घाम गाळून, हाताला घट्टे पडून, असं काम - केलेलं नाही; पण त्यांच्या धाडसाचा, दूरदृष्टीचा आणि मनस्तापाचा विचारही करायला हवाच ना? आता हे लोक ते ऐंशी शिलिंग खर्च करणार, म्हणजे दुसऱ्या कोणासाठी तरी काम निर्माण होईल ना? एकंदरीत देश ऐंशी शिलीगानी जास्त श्रीमंतच होईल ना? आणि ह्यातले बरेच लोक उदारपणे मुला-मुलींच्या क्लब्सना, सामाजिक केंद्रांना, हॉस्पिटलांना देणगी देतीलच ना? हे लांबलांबचे ब्लूमफ़ोण्टेन आणि ग्रॅहॅम्सटाउन आणि ब्यूफोर्ट वेस्ट मधले लोक समजतात तसं जोहानसबर्ग काही नुसतं पैशाचाच विचार करत नाही. इतर कुठच्याही शहराप्रमाणे इथेही चांगले घरगृहस्थी सांभाळणारे नवरे आणि बाप आहेतच. इथल्या कित्येक मोठ्या लोकांना मौल्यवान चित्रं जमवायचा छंद आहे, त्यातून चित्रकारांनाच उत्पन्न मिळतं ना, उपाशीपोटी मरण्यापेक्षा? कित्येकांची उत्तरेकडे मोठी शेती आहे, जिथे जाऊन ते शिकार करतात, निसर्गाशी तद्रूप होतात.

आता इतर लोकांना काम मिळालं की तेही त्यांच्या उत्पन्नामधला काही भाग खर्च करतीलच ना? सगळा नाही अर्थातच! कारण, ज्यांनी शंभरला विकला आहे, त्यांनाही थोडे पैसे ठेवायला हवेत ना, शेअर खाली आले की परत विकत घेण्यासाठी? पण शेतकऱ्यांना आणखी धन्य पिकवता येईल, आणि कारखानदारांना उत्पादन वाढवता येईल, आणि सरकारला नवीन भरती करता येईल (सरकारला आणखी नोकर कशाला हवेत हा वेगळाच प्रश्न, पण इथे नको त्याची चर्चा). आणि गावामधल्या नेटीवांना भुकेनी मरायला नको, ते इथे खाणींमध्ये काम करायला येऊ शकतील. त्यांच्यासाठी जास्त मोठी आणि जास्त चांगली कंपाउण्ड्स बांधता येतील. त्यांना जेवणात जास्त व्हिटामिन्स पुरवता येतील. हे मात्र जरा जपून हां, कारण नुकताच म्हणे कोणीतरी शोध लावलाय, की मजुरांना फार व्हिटामिन्स देणं योग्य नाही; त्याचा फायदा हळूहळू कमी होत जातो.

आणि कदाचित एक नवीन महानगर तयार होईल, दुसरं जोहानसबर्ग. दुसरं पार्कटाऊन आणि दुसरं हौटन. दुसरं पार्कवॉल्ड आणि दुसरं केन्सिंग्टन. दुसरं जेपे आणि दुसरं व्रेडेड्रोप. दुसरं पिमव्हील आणि दुसरं शांती नगर. कुठल्याही ओडेनडालस्रस्टची शानच असेल हे शहर. छे! पण त्या नांवाचं काही तरी करा बुवा!
* * *

पण काही लोक आहेत की जे म्हणतात हे असं होता कामा नये. सगळे समाजसेवक, हे फादर बेरेसफोर्ड आणि इतर सगळे निग्रो-धार्जिणे म्हणतात हे असं असता कामा नये. अर्थात, हे मान्य, की त्या सगळ्यांकडे एकावर एक घासायला दोन शेअर सुद्धा नसतील. त्यांना एवढाच दिलासा आहे की ह्या खाणींच्या व्यवसायातला एक मोठा मनुष्य सर अर्नेस्ट ओपेनहायमर सुद्धा म्हणतो की हे असं असायची गरज नाही. ते म्हणतात, ही संधी आहे खाणमजुरांना कंपाउंडमध्ये ठेवण्याऐवजी त्यांच्यासाठी गांवं वसवायची, जिथे ते त्यांच्या बायका-मुलांसह राहू शकतील. आणि, सरकार फ्री स्टेटमधील खाणींच्या उत्कर्षासाठी एक खास कमिशन निर्माण करेल अशीही चर्चा चालू आहे. सर अर्नेस्ट ओपेनहायमर, लोकांना तुमचं भाषण परतपरत ऐकायचं आहे. त्यातले कित्येक जण टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करताहेत, तुम्हाला फार मोठा दुवा देताहेत, मनापासून. कारण खाणी लोकांसाठी असाव्यात, पैशासाठी नव्हे. आणि पैसा ही वेडं होऊन मागे धावत सुटण्याएवढी, किंवा हॅट्स हवेत भिरकावून देण्याएवढी थिल्लर गोष्ट नाही. पैसा असतो तो जेवण-खाण, कपडे, थोड्या सुखसोयी आणि अधून मधून करमणुकीसाठी. मुलांना आनंदात वाढवायला. पैसा असतो उद्याच्या सुरक्षेसाठी, स्वप्नांसाठी, आशांसाठी, उद्दिष्टांसाठी. ह्या पृथ्वीतलावरची, तुम्ही ज्या मातीत वाढलात तिथली फळं उपभोगण्यासाठी.


ह्या पृथ्वीतलावर दुसऱ्या जोहानसबर्गची काही गरज नाहीय. एक पुरेसं आहे.

Comments