भाषांतर - २६

तो बुलंद आवाज चौकामध्ये भाषण देतो आहे. बरेच पोलिस - गोरे आणि काळे - जमा आहेत. त्यामुळे, एवढ्या प्रचंड जमावापुढे बोलतांना त्या आवाजात एक प्रकारची गुर्मी आहे. घनगर्जनेसारखा तो आवाज चढतो आहे, उतरतो आहे. सिंहनादासारखा गुरगुरतो आहे.

कित्येकांना नुसता तो आवाज हेलावून टाकतो. कित्येकांना त्यांनी तो आवाज प्रथम कधी ऐकला होता ते आठवतं - तो उन्माद, ती अंगातून सळसळलेली वीज - सगळं आत्ता-आत्ता झाल्यासारखं आठवतं. कारण त्या आवाजात एक जादू आहे. त्या आवाजात एक धमकी आहे. जणू काही सबंध अफ़्रिकाच त्या आवाजात सामावली आहे. त्या आवाजातून एक सिंह गुरगुरतो आहे. काळ्या पहाडावरच्या घनगर्जनेचे पडसाद आहेत त्याच्यात.

दुबुला आणि टॉमलिन्सन भाषण ऐकताहेत. तुच्छतेनी, हेव्यानी. कारण हा आवाज हजारोंना उत्तेजित करू शकतो, पण कशासाठी उत्तेजित करायचं हे कळण्याची बुद्धी त्याच्यात नाही; आणि असली, तर ते बोलायचं धाडस त्याच्यात नाही.

पोलिस भाषण ऐकताहेत. एक दुसऱ्याला म्हणतो, काय डेंजर माणूस आहे रे साला! आणि दुसरा पहिल्याला म्हणतो; हे बघ, असल्या गोष्टींकडे लक्ष देणं काय आपलं काम नाही, काय?

जे मिळणं अशक्य आहे, असलं काही आम्ही मागत नाही आहोत, जॉन कुमालो म्हणतो. आमच्या कष्टांनी जे निर्माण होतंय त्यातला वाटाच मागतो आहोत आम्ही. नवीन सोनं सापडलंय, आणि दक्षिण आफ्रिका पुन्हा श्रीमंत होते आहे. आम्ही फक्त त्यातला आमचा वाटा मागतो आहोत. आम्ही जर खणून बाहेर काढलं नसतं, तर हे सोनं असंच पृथ्वीच्या उदरातच दडून राहिलं असतं. मी असं म्हणत नाही हे आमचं सोनं आहे, मी फक्त म्हणतो की ह्यातला आमचा वाटा आम्हाला मिळायला हवा. हे सोनं सगळ्या लोकांचं आहे - गोऱ्या, काळ्या, करड्या आणि भारतियांचं सुद्धा. पण ह्यातला मोठा वाटा कोणाकडे जाणार आहे?

इथे तो महान आवाज घशात गुरगुरतो. जमावामधून उन्मादाची एक लाट पसरते. ज्यांनी पूर्वी हे असलं भाषण ऐकलं नाहीय, ते पोलिस एकदम सज्ज होऊन उभे रहातात. ज्यांनी पूर्वी ऐकलय, त्यांना माहिती आहे, हा कुमालो इथपर्यंत जातो, पण ह्यापुढे नाही जात. हा आवाज खाजगीमध्ये जेवढं सगळं बोलतो तेवढं जर लोकांमध्ये बोलला तर? वर चढतच राहिला, आणि खाली उतरलाच नाही तर? बगावतीच्या आणि कबजा करण्याच्या विचारांनी, सत्तेच्या आणि लुटारूपणाच्या विचारांनी लोकांना चढवत, वेड लावत, वर वर चढतच राहिला तर? काळ्याकुट्ट आणि रानटी, निद्रिस्त आफ्रिकेला जाग आणण्याची, जोमानी चाल करून जाण्याची स्वप्नं दाखवायला लागला तर? काही कठीण नाही असं करणं, त्यासाठी फार डोकं लागत नाही; पण हा माणूस घाबरट आहे. तो घशात गुरगुरणारा, घनगर्जनेसारखा आवाज शांत होतो. आणि लोक एक शहारा येउन भानावर येतात.

काय चूक आहे जास्त पैसे मागण्यामध्ये? एवढेसेच तर पैसे मिळतात आम्हाला. आमचा वाटाच तर आम्ही मागतो आहोत ना? आमच्या बायकांना आणि कुटुंबांना भूकेमारीपासून वाचवण्यापुरता? कारण नाही मिळत आम्हाला पुरेसे पैसे. लान्सडाऊन कमिशननी सांगितलं आम्हाला पुरेसे पैसे मिळत नाहीत. स्मिट कमिशननी सांगितलं आम्हाला पुरेसे पैसे मिळत नाहीत.

इथे पुन्हा तो आवाज गुरगुरतो, आणि लोक चुळबूळ करू लागतात.

आम्हाला माहिती आहे आम्हाला पुरेसे पैसे मिळत नाहीत, कुमालो म्हणतो. जगातल्या प्रत्येक देशातले मजूर ज्या गोष्टींसाठी लढताहेत, त्याच गोष्टी आम्हीही मागतो आहोत. आमच्या मजुरीचा योग्य दाम हा आमचा हक्क आहे. इतर कुठच्याही सभ्य माणसाप्रमाणे संसार करायचा आम्हाला हक्क आहे. लोक म्हणतात जास्त मजुरी दिल्याने खाणी बंद पडतील. उपयोग काय असल्या ह्या खाण धंद्याचा? जर आमच्या गरीबीवर तो जगणार असेल, तर गरज काय त्याला जगवायची? लोक म्हणतात त्यामुळे देश श्रीमंत होतो. आम्हाला कुठे दिसते आहे ती श्रीमंती? इतरांनी श्रीमंत व्हावं, म्हणून आम्ही कायम गरीब राहायचं का?

एखादा झंझावाती वारा वहावा, तसा तो जमाव थरथरतो. हाच क्षण आहे जॉन कुमालो, तुमच्या त्या महान आवाजाला स्वर्गाच्या उंबरठ्यापर्यंत नेउन पोचवायचा. हाच क्षण आहे, त्या जोशील्या शब्दांचा, त्या बेभान अनिर्बंध शब्दांचा, जे लोकांना जाग आणतील, वेडं करून सोडतील आणि मुक्त करतील. पण त्यांना जाणीव आहे. त्यांना जाणीव आहे त्यांच्या असामान्य ताकदीची, ज्या ताकदीला ते घाबरतात. म्हणून तो आवाज आता विरत जातो, ती काळ्या पहाडावरची घनगर्जना विरत जाते, आणि तिचे पडसाद हळूहळू पुसट होतात.

-    मी सांगतो तुला, ह्ये बेणं लय आडवळणी हाय. एक पोलिस म्हणतो.
-    आता ह्याचं भाषण ऐकल्यावर पटतंय मला. दुसरा म्हणतो. हरामखोराला आत का नाही घालत?
-    किंवा गोळी घालून उडवून का नाही लावत? पहिला म्हणतो.
-    हो, गोळी का नाही घालत? दुसरा सहमती दाखवतो.
-    सरकार विस्तवाशी खेळतंय, पहिला म्हणतो.
-    खर आहे, दुसरा दुजोरा देतो.

आम्ही फक्त न्याय मागतो आहोत. आम्ही समानता किंवा धंद्यातला वाटा नाही मागत. आम्ही वर्णभेद दूर करा नाही म्हणत. जगातल्या सर्वात श्रीमंत उद्योगाकडून आम्ही फक्त थोडे पैसे जास्त मागतो आहोत. आमचे श्रम नसले, तर ह्या धंद्यात काहीच उरणार नाही. आम्ही काम थांबवलं तर हा धंदा बंद पडेल. आणि मी म्हणतो, ह्या असल्या फडतूस रोजगारीवर काम करण्यापेक्षा काम बंद करणं जास्त श्रेयस्कर आहे.

काळे पोलिस सज्ज आणि दक्ष उभे आहेत. आपापल्या जागांवर सैनिकांसारखे उभे आहेत. कोणास ठाऊक ह्या भाषणाबद्दल त्यांचे काय विचार आहेत. कोणास ठाऊक ते विचार तरी करतात का? ही सभा अजूनपर्यंत शांत आणि सुरळीत चालू आहे. जोपर्यंत ती शांत आणि सुरळीत आहे, तोपर्यंत करण्यासारखं काहीच नाही. बेशिस्तीची काहीही लक्षणं दिसली, तर जॉन कुमालोंना खाली खेचतील, व्हॅनमध्ये भरतील आणि दुसरीकडे कुठेतरी घेऊन जातील. आणि मग त्या सुतारकामाच्या दुकानाचं काय - आठवड्याला आठ, दहा, बारा पौंड मिळवणाऱ्या? आणि त्या सुतारकामाच्या दुकानातल्या गप्पांचं काय - ज्या ऐकायला देशाच्या कान्याकोपऱ्यातून लोकं येतात?

काही लोकांना हौतात्म्य हवं असतं. काही लोकांना तुरुंगवास पत्करल्याचं महात्म्य हवं असतं. काही लोकांची, महात्म्य मिळो वा ना मिळो, तुरुंगात जायची तयारी असते. पण जॉन कुमालो अशा लोकांपैकी नाहीत. तुरुंगात टाळ्या नसतात ना?

मी तुमचा फार वेळ घेऊ इच्छित नाही. उशीर झाला आहे, आणि अजून एक वक्ता आहे. तुम्हाला घरी जायला उशीर झाला तर तुम्हाला परत पोलिसांचा जाच असेल. मला काही फरक पडत नाही, पण तुमच्यापैकी ज्यांना पास ठेवावा लागतो त्यांना फरक पडतो. आणि आपल्याला पोलिसांबरोबर कटकटी नको आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, की आपल्याकडे विकायला फक्त श्रमच आहेत. आणि त्या श्रमाचा योग्य मोबदला मिळवण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असायला हवं. ह्या स्वातंत्र्यासाठी तर एक युद्ध लढलं जात आहे. आपले आफ्रिकन सैनिक ह्याच युद्धासाठी तर लढताहेत.

तो आवाज पुन्हा गुरगुरतो; आता काहीतरी होणार.

नुसते इथेच नव्हे, आपल्या ह्या सबंध महान आफ्रिका खंडामध्ये.

लोकंही गुरगुरतात. ह्याचा एक अर्थ साधा सरळ आहे; दुसरा अर्थ चांगला तिरपागडा आहे. जॉन कुमालो बोलतात एक, पण त्यांना म्हणायचं दुसरं असतं.

म्हणून, आपण आपले श्रम योग्य मोबदल्यालाच विकू. आणि ह्या धंद्याला आपले श्रम परवडत नसतील, तर जाऊ दे हा धंदा खड्ड्यात. कुठचाही धंदा जिवंत ठेवण्यासाठी आम्ही आमचे श्रम सस्त्यात दान करणार नाही.

जॉन कुमालो खाली बसतात, लोक टाळ्यांचा कडकडाट करतात. शिट्ट्या आणि टाळ्यांची एक मोठी लाट पसरते जमावातून. हे साधे लोक आहेत. त्यांना माहिती नाही हा देशातल्या सर्वोत्कृष्ट वक्त्यांपैकी एक असला, तरी त्यात एकच कमी आहे. त्यांना त्याच्या मोठ्या बुलंद आवाजाने हेलावून वर चढवलंय, तसच खाली आणलंय. हा मनुष्य मनात आलं की पुन्हा वर चढवू शकतो.

-    तर, ऐकलंत तुम्ही आता, सिमांगु म्हणाला.
स्टीफन कुमालोंनी मान हलवली. मी ह्या प्रकारचं काही कधी ऐकलं नव्हतं, ते म्हणाले. मी स्वतः - त्याचा सख्खा भाऊ - आणि एखाद्या लहान मुलाला खेळवावं, तसा तो माझ्याशी खेळत होता.
-    ताकद - सिमांगु म्हणाला - ताकद! परमेश्वर एखाद्याला अशी ताकद का देतो हे समजण आपल्या आवाक्याबाहेरचं आहे. हा मनुष्य जर धर्मोपदेशक असता, तर सबंध जग ह्याचं अनुयायी बनलं असतं!
-    अतुलनीय. मी ह्याच्याएवढ चांगलं कोणाला बोलताना ऐकलं नाहीय, कुमालो म्हणाले.
-    खर तर आपण देवाचे आभार मानायला हवेत, की हे ढोंगी आहेत. हे जर ढोंगी नसते, तर त्यांनी देशामध्ये रक्तपात घडवून आणला असता. त्यांच्या सत्तेच्या लालसेनी, जी थोडी सत्ता आहे ती जाईल ह्या भितीनी, ते भ्रष्ट झाले आहेत. जाऊ दे, आपल्याला समजणार नाही ते. चला, जायचं आपण; का तुम्हाला ह्या टॉमलिन्सनचं भाषण ऐकायचंय?
-    मला आवडेल ऐकायला.
-    मग थोडे पुढे जाऊ या आपण. त्याचा आवाज एवढा मोठा नाही.
* * *

-    जार्विस, निघायचं आपण?
-    हो जॉन, चल.
-    मग, काय वाटलं तुम्हाला?
-    मला ह्या असल्या गोष्टींमध्ये फार रस नाही, जार्विस तुटकपणे म्हणाले.
-    तसं नव्हतं म्हणायचं मला. पण, हे सगळं घडतंय आपल्या आजूबाजूला, नाही?
-    जार्विसनी नुसतं हुं म्हटलं. मला फार रस नाही त्याच्यात. चल, आपण तुमच्या त्या क्लबामध्ये जाऊ.
त्यांचं फार वय झालंय आता, जॉन हॅरीसनच्या मनात आलं, बाबांसारखच.
तो गाडीत चढला, आणि गाडी सुरु करतांना स्वतःशीच म्हणाला, पण हे घडतंय ह्याची दखल तर घ्यायलाच हवी आपल्याला.
* * *

कॅप्टननी त्याच्या साहेबाला सलाम ठोकला.
-    साहेब, हा रिपोर्ट.
-    मग कॅप्टन, कशी झाली सभा?
-    काही विशेष नाही घडलं, साहेब. पण हा माणूस, कुमालो, फार धोकेबाज वाटतो मला. तो लोकांना असं वर वर चढवतो, आणि मग खाली आणतो. मला कल्पना मात्र आली, आम्ही तिथे नसतो, तर काय झालं असतं.
-    ठीक आहे मग, आपण तिथे हजर असायलाच पाहिजे. गंमत आहे, हे सगळे रिपोर्ट्स नेहमी हेच म्हणतात, तो लोकांना वर चढवतो आणि खाली आणतो. पण धोकेबाज म्हणजे नक्की काय म्हणायचय तुम्हाला?
-    त्याचा आवाज, साहेब. मी असला भारी आवाज कोणाचा ऐकला नाहीय. एखाद्या ऑर्गनचा घनगंभीर नाद असावा तसा. सबंध जमाव झुलत होता. मला स्वतःला जाणवलं ते. जणू काही त्याला दिसतं आजूबाजूला काय घडतंय, आणि तो स्वतःला त्यात लोटून घेतो.
-    हो, त्या आवाजाबद्दलही मी ऐकलंय, साहेब तुटकपणे म्हणाले. एक दिवस जाऊन मला स्वतःच बघायचय काय प्रकार आहे हा.
-    साहेब, संप होणार?
-    मला माहिती असतं तर काय पाहिजे होतं! कटकटी नुसत्या! आपल्याला आधी पुरेशी कामं नाहीत का? जा तुम्ही, तुम्हाला उशीर होतो आहे.
-    गुड नाईट, साहेब.
-    गुड नाईट. हॅरी, हॅरी!
-    काय साहेब?
-    मी ऐकलंय तुम्हाला बहुतेक बढती मिळणार आहे.
-    थॅंक्यू साहेब
-    म्हणजे एक दिवस तुम्ही माझ्या हुद्द्यावर पोचाल. चांगला पगार, वरचा हुद्दा, मानमरातब... आणि जगातल्या सगळ्या काळज्या! ज्वालामुखीच्या तोंडावरच बसायचं. खरच तेवढं उपयोगाचा आहे का हा हुद्दा देवच जाणे. गुड नाईट, हॅरी.
-    गुड नाईट, साहेब.
साहेबांनी एक सुस्कारा टाकला, आणि फायली जवळ ओढल्या. त्यांच्या भुवया चिंतेच्या रेषांनी आक्रसल्या. चांगला पगार, वरचा हुद्दा आणि मानमरातब; ते म्हणाले आणि कामाला लागले.
* * *

संप झाला तर फार वाईट होईल. कारण इथे विटवॉटर्सरॅंडमध्ये तीन लाख काळे खाण मजूर म्हणून काम करताहेत. ट्रान्स्की आणि बासूटोलॅन्ड आणि झुलूलॅन्ड आणि बेचूआनालॅन्ड आणि दक्षिण आफ्रिकेच्या बाहेरच्या देशातून सुद्धा लोक येतात. साधे भोळे, अशिक्षित, जमातींमधले लोक असतात हे, कोणाच्याही हातातलं खेळणं सहज बनतात. संप झाला की वेड लागल्यासारखे वागतात. खाणीतल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या खोलीत कोंडून ठेवतात, दगड आणि बाटल्या भिरकावतात, आगी लावतात. हे खरं, की ते शंभरेक खाणींच्या कम्पाउंडमध्ये राहतात, त्यामुळे त्यांच्यावर कब्जा करणं तसं सोपं जातं. पण ते बराच विध्वंस करू शकतात, लोकांच्या जीवाला धोका पोचवू शकतात आणि दक्षिण आफ्रिकेमधला हा धंदा बंद पडू शकतात. ह्या धन्द्यावरच तर दक्षिण आफ्रिका उभी आहे, अवलंबून आहे.

काय काय भयावह अफवा उठताहेत. हा संप म्हणे फक्त खाणिन्पुरता मर्यादित राहणार नाही, रेलवे आणि जहाज धन्द्यांपर्यंत जाऊन पोचेल. म्हणे प्रत्येक काळा पुरुष आणि स्त्री काम करणं बंद करेल. प्रत्येक शाळा आणि चर्च बंद राहील. प्रत्येक गावात आणि शहरात, प्रत्येक गल्लीत आणि रस्त्यावर, हे लोक - ऐशीच्या ऐशी लाख - नुसते उभे राहतील थंडपणे. पण ह्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. त्यांच्यात तेवढी एकजूट नाही. त्यांनाही प्रचंड खस्ता खाव्या लागतील, भुकेनी मरतील ते. पण हा नुसता विचारच केवढा अजब आहे, केवढा भयावह आहे. गोऱ्या लोकांच्या लक्षात येतंय, काळ्या मजुरीवर ते किती अवलंबून आहेत. हे दिवस काळजीचे आहेत. सगळ्या जगात विचित्र गोष्टी चालल्या आहेत, दक्षिण आफ्रिका काय जगापासून वेगळी राहू शकणार का?
* * *

संप आला आणि गेला. तो खाणींच्या पलीकडे कधी गेलाच नाही. सगळ्यात मोठी दंगल ड्रायफ़ोण्टेनमध्ये झाली. काळ्या मजुरांना खाणींमध्ये पाठवण्यासाठी पोलिस बोलवावे लागले. मारामाऱ्या झाल्या आणि तीन काळे मजूर मेले. पण सगळं शांत आहे, बातम्यात म्हटलंय, सगळं शांत आहे.

जोहानसबर्गच्या वार्षिक चर्च परिषदेला खाणींच्या व्यवहारांची फारशी माहिती असण्याची अपेक्षा ठेवणं चूक आहे. ह्या असल्या परिषदा एके काळी धर्माबद्दलच फक्त बोलत, गेले ते दिवस. एका धर्मोपदेशकाने ह्या संपाबद्दल वक्तव्य केलं. त्याने कळकळीने सांगितलं, की ह्या आफ्रिकन खाण मजूर संघटनेला मान्यता द्यायला हवी, नाहीतर रक्ताच्या नद्या वहातील. त्याला बहुतेक म्हणायचं होतं, की ही संघटना खाणमालकांशी कामाचं स्वरूप आणि पगार ह्याबद्दल वाटाघाटी करायला जबाबदार आणि समर्थ आहे. पण, प्रवक्ता म्हणवणाऱ्या एकाने सांगितलं, की हे काळे मजूर साधे भोळे असतात, वाटाघाटींचे डावपेच त्यांना समजत नाहीत, कोणीही समाजकंटक त्यांना बहकावू शकतात. आणि शेवटी सर्वांना माहिती आहेच, की वाढते उत्पादन खर्च हा खाणींच्या, आणि पर्यायानी दक्षिण आफ्रिकेच्या अस्तित्वालाच धोका आहे.

ह्या जटील प्रश्नाला अनेक बाजू आहेत. आणि लोकं जमिनीची धूप, जमात व्यवस्थेचा ऱ्हास, शाळांचा अभाव, गुन्हेगारी ह्या सगळ्या मुद्द्यांवर हिरीरीनी चर्चा करतात, जणू काही ते सगळे मुद्दे ह्याच्याशी संबंधित आहेत. थोडा जास्त विचार केलात ना, तर तुम्हाला प्रजासत्ताक पद्धती, द्विभाषिक पद्धती एवढंच काय, पॅलेस्टाईन चा सुद्धा ह्या सगळ्याशी संबंध दिसायला लागेल. म्हणून एक प्रकारे, ह्याबद्दल विचार न करणंच उत्तम!

मधल्या काळात, संप संपला आहे. सगळं शांत आहे, बातम्यात म्हटलंय, सगळं शांत आहे.
* * *

आणि तरीही, ओसाड पडलेल्या बंदरामध्ये, पाण्याच्या लाटा बांधावर येउन आदळतच आहेत. सुनसान आणि घनदाट जंगलामध्ये एक पान गळून खाली पडतंय. चकचकीत पॉलीश केलेल्या लाकडाच्या मागे वाळवी भुसा करतेच आहे.


थोडे अडाणी सोडले, तर शांत असं काहीच नसतं.

Comments