भाषांतर - २९

त्या तुरुंगाच्या कठोर भिंतीमधील उंच दरवाजामधून ते पुन्हा आत शिरले; फादर विन्सेंट आणि कुमालो, गर्ट्रूड, ती लहान मुलगी आणि सिमांगु. त्या मुलाला तिथे आणलं गेलं, क्षणमात्र त्याच्या डोळ्यांमध्ये एक आशा तरळली, आणि तो तिथे उत्कंठेनी थरथरत, कांपत उभा राहिला. पण कुमालो हळुवारपणे म्हणाले, आम्ही लग्नासाठी इथे आलो आहोत, आणि ती आशा लुप्त झाली.
-    बाळ, ही तुझी होणारी पत्नी.
तो मुलगा आणि मुलगी एकमेकाकडे बघून परक्या माणसांसारखे हसले, त्यांनी निष्प्राण हात हातात तर घेतले, पण धरून ठेवण्यासाठी नव्हे, स्पर्श केल्यागत. त्यामुळे ते लगेच सुटून मोकळे पडले. युरोपिअन पध्दतीनी त्यांनी एकमेकांच चुंबन नाही घेतलं, एखाद्या मोठ्या दडपणाखाली असल्यासारखे नुसते एकमेकांकडे बघत उभे राहिले. शेवटी ती म्हणाली, तुझी तब्बेत ठीक आहे ना? त्यावर तो म्हणाला, उत्तम; तुझी कशी आहे? ती म्हणाली, माझीही छान आहे. ह्यापलीकडे दोघांच्यात काहीच संभाषण झालं नाही.

फादर विन्सेंट त्यांना तिथे सोडून बाहेर गेले, आणि तरीही सगळे त्याच अनामिक दडपणाखाली गप्प उभे होते. सिमांगुने पाहिलं, की गर्ट्रूड कुठच्याही क्षणी हुंदके द्यायला आणि रडारड करायला सुरुवात करणार आहे. तो इतरांकडे पाठ करून, तिच्याशी खासगीत गंभीरपणे बोलू लागला. हे बघ, फार भयानक गोष्टी घडलेल्या आहेत, पण शेवटी हे लग्न आहे. इथे रडून ओरडून शोभा करण्यापेक्षा तू आत्ताच बाहेर जाणं जास्त चांगलं होईल. ती काहीच बोलेना, तेव्हा तो थंड कठोरपणे म्हणाला समजलं ना, मी काय म्हटलं? ती नाराजीनी म्हणाली होय, समजलं. तो तिला तिथेच सोडून एक खिडकीजवळ जाऊन उभा राहिला; ती तिथेच हिरमुसली होऊन गप्प. पण त्याला माहिती होतं, तिच्या मनात जे होतं, ते ती आता करणार नाही.

शेवटी कुमालो काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाले, बाळ, तब्बेत ठीक आहे ना तुझी? आणि मुलगा उद्गारला, उत्तम आहे. तुमची तब्बेत कशी आहे, बाबा? मग ते म्हणाले, माझीही चांगली आहे तब्बेत. दुसरं काहीतरी बोलावं असं त्यांच्या फार मनात होतं, पण काय बोलायचं त्यांना अजिबात सुचेना. एकदाचा एक गोरा मनुष्य त्यांना तुरुंगातील प्रार्थनामंदिरात घेऊन जायला आला, तेव्हा सगळ्यांनाच हायसं वाटलं.

फादर विन्सेंट तिथे धर्मगुरूची वस्त्रं चढवून त्यांची वाटच बघत होते. त्यांनी हातातल्या पुस्तकातले उतारे वाचून दाखवले. मग मुलाला आणि मुलीला वेगवेगळं विचारलं, तुम्ही एकदुसऱ्याशी लग्नाला तयार आहात का? जेव्हा दोघांनीही एकमेकांची सुखदुःखात, श्रीमंती-गरिबीत, आजारपणात सुद्धा, आजन्म साथ द्यायला होकार दिला, तेव्हा फादर विन्सेंटनी त्यांचं रितीनुसार लग्न लावलं. त्यांना थोडा उपदेश केला, एकमेकांशी एकनिष्ठ राहण्याबद्दल, मुलं झाली तर त्यांनाही देवा-धर्माची चाड ठेवायला शिकवण्याबद्दल. अशा रितीनी त्यांचं लग्न लागलं, आणि त्यांनी रजिस्टरमध्ये सह्या केल्या.

ह्यानंतर, बाप-लेकांना एकत्र सोडून बाकीचे सर्वजण बाहेर गेले. कुमालो मुलाला म्हणाले, खूप बरं वाटलं मला, तुझं लग्न झालं.
-    मलाही खूप आनंद झालाय, बाबा.
-    बाळ, मी तुझ्या मुलाची काळजी घेईन, अगदी माझं स्वतःचं असल्याप्रमाणे.

जेव्हा त्यांच्या लक्षात आलं ते काय बोलून गेले, तेव्हा त्यांचे ओठ थरथरले. जे हुंदके बाहेर पडू नयेत म्हणून त्यांनी कटाक्षानी काळजी घेतली होती, ते बाहेर पडलेच असते; तेवढ्यात नशिबानी त्यांचा मुलगा, स्वतःचं दुःख लपवत म्हणाला; बाबा, डोत्शेनीला कधी परतणार आहात?
-    उद्या, बाळ.
-    उद्याच?
-    हो, उद्याच.
-    आईला सांगाल, मला तिची खूप आठवण येते?

होय, नक्की सांगेन बाळा. खरंच, अगदी नक्की देईन हा निरोप मी तिला. खरंच, कसा नाही देणार. हे सगळे शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर नाही पडू शकले; त्यांनी नुसतीच पुन्हापुन्हा मान हलवली.
-    आणि बाबा.
-    हो, बाळ?
-    माझे पोस्ट ऑफिस बुकात थोडे पैसे आहेत, चार पौंड. आमच्या बाळासाठी मी बाजूला ठेवले होते. ते माझ्या वडिलांना द्या असं मी सांगून ठेवलं आहे; ते देतील तुम्हाला.
-    हो, मी घेईन ना ते. नक्कीच, तू एवढं सांगून ठेवलं आहेस. मी घेईन ते.
-    आणि बाबा.
-    हो, बाळ?
-    मुलगा झाला ना, तर मला त्याचं नांव पीटर ठेवायला आवडेल.
कुमालोंचा आवाज घशात कोंडला, पीटर?
-    हो, मला पीटर नांव आवडेल.
-    आणि मुलगी झाली तर?
-    नाही, मुलगी झाली तर काय मी विचार नाही केलाय. आणखी एक.
-    काय?
-    जर्मिस्तनला, जोसेफ भेन्गुच्या घरात माझं एक पार्सल आहे. ते विकूनही बाळासाठी काही पैसे जमा होतील.
-    आलं लक्षात.
-    पाफुरीकडे माझ्या आणखी काही गोष्टी होत्या, पण मला वाटतं तो म्हणणार त्या माझ्या नव्हत्याच मुळी.
-    हा तोच का तो पाफुरी?
-    हो, बाबा.
-    आतातरी विसर त्याला.
-    बरोबर आहे, बाबा.
-    आणि हे जर्मिस्तनमधलं पार्सल, मला कळत नाहीय मी त्याचं काही कसं बघू शकेन; मला उद्या निघायला हवय.
-    मग जाऊ द्या, बाबा.

पण कुमालोंच्या लक्षात आलं, जाऊ देणं बरं नाही; तेव्हा ते म्हणाले, मी रेव्हरंड सिमांगुंशी बोलून बघतो.
-    ते छान होईल.
-    हा पाफुरी, कुमालो कडवटपणे म्हणाले, आणि तुझा तो चुलत भाऊ; दोघांना माफ करणं फार कठीण जातंय मला.

मुलाने हताशपणे त्याचे खांदे उडवले.
-    बाबा, ते खोटं बोलले. ते तिथे होते, मी म्हटल्याप्रमाणे.
-    होते ना, खरच तिथे होते ते. पण आत्ता इथे नाहीत ना.
-    आहेत, इथेच आहेत ते. दुसरी केस चालू आहे त्यांच्यावर.
-    ते नाही मला म्हणायचय. माझ म्हणणं, ते इथे ... तुझ्यासारखे... नाहीत...

त्यांना मनातलं वाक्य पूर्ण करणं अशक्य होतं. मुलाच्या लक्षात नाही आलं; तो परत म्हणाला, ते इथेच, याच तुरुंगात तर आहेत.
-    खर तर बाबा, मी... मला जायला हवं...
-    जायला?
-    हो, म्हणजे जायला हवं ना मला...

कुमालो चाचरत अस्पष्टपणे म्हणाले, प्रिटोरियाला?

त्या भयानक शब्दांवर तो मुलगा जमिनीवर आडवा कोसळला, साष्टांग नमस्कार घालून, ढसाढसा रडू लागला, घसा खरवडणाऱ्या प्रत्येक हुंदक्याबरोबर, त्याचं शरीर गदगदा हलत होतं. कारण, कुठल्याही लहान मुलाला मृत्युचं भय असणारच. त्याचं ते आक्रंदन बघून, म्हाताऱ्याच्या आतड्यातली सगळी माया उफाळून वर आली, तेही खाली बसले, त्याच्या डोक्यावरून हळूहळू हात फिरवत म्हणाले,
-    धीर बाळग, बाळ.
-    मला भिती वाटते, मुलगा ओरडला, मला भिती वाटते.
-    धीर बाळग.

मुलगा उठून ढुंगणाखाली पाय ठेवून गुडघ्यांवर बसला. तो काहीही लपवायचा प्रयत्न करत नव्हता. रडण्या-ओरडण्याने त्याचा चेहरा पिळवटून टाकला होता. बाबा; बाबा, मला फाशीची भिती वाटते; तो हुंदके देत म्हणाला. मला गळफासाची भिती वाटते.
बसल्या अवस्थेतच, कुमालोंनी त्याचे हात आपल्या हातात घेतले. आता ते निष्प्राण नव्हते; ते त्यांचे हात घट्ट पकडू पहात होते, थोडासा आधार, थोडासा दिलासा शोधत होते. म्हाताऱ्याने ते हात गच्च पकडून ठेवले. ते पुन्हा म्हणाले, बाळा, धीर बाळग.

गोरा वार्डन हे रडणं-ओरडणं ऐकून आत आला, म्हातारबाबा, आता जायला हवं तुम्हाला. त्याच्या आवाजात थोडी अनुकंपा होती.
-    साहेब मी जातोच आहे; निघालोच आहे. पण आम्हाला थोडासा जास्त वेळ हवाय.

मग वार्डन म्हणाला, बरं ठीक आहे; पण थोडाच वेळ. तो बाहेर गेला.
-    बाळा, पूस डोळे पूस बघू.

बाबानी दिलेल्या रुमालाने त्याने डोळ्यातले अश्रू पुसले, आणि तो गुडघ्यांवर बसला. आता हुंदके थांबले असले, तरी त्याची भ्यालेली नजर दूर शून्यात बघत होती.
-    बाळा, आता मला निघायला हवं. जपून राहा. तुझ्या बायकोची आणि बाळाची काळजी आम्ही घेऊ.
-    छान, तो म्हणतो, ते चांगलंच होईल.

पण त्याच्या मनात बायको-मुलाचे विचार नाहीयेत. त्याच्या विचारांमध्ये बायको-मुलाला थारा नाहीय. त्याची नजर जे बघते आहे, तिथे लग्नालाही थारा नाहीय.
-    बाळा, मी येतो हं.

ते उठून उभे राहिले; पण तो त्यांचे पाय घट्ट धरून ओरडू लागला, मला सोडून नका जाऊ, मला सोडून नका जाऊ तुम्ही. पुन्हा हमसाहमशी रडत थरथरु लागला. रडत, ओरडत म्हणाला, नाही, मला सोडून नाही जायचं तुम्ही.

गोरा वार्डन पुन्हा आत आला, आणि ह्यावेळी कठोरपणे म्हणाला, म्हातारबाबा, आता मात्र तुम्हाला जायलाच हवं. कुमालो गेलेही असते, पण मुलगा त्यांचे पाय घट्ट पकडून रडत होता. वार्डनने त्याच्या हातांची मिठी सोडवायचा निष्फळ प्रयत्न केला. शेवटी त्याने दुसऱ्या माणसाला मदतीला बोलावलं, आणि दोघांनी मिळून मुलाला बाजूला खेचून काढलं. कुमालो कष्टाने त्याला म्हणाले, जपून रहा बाळा. पण मुलाला ते काही ऐकू गेलं नाही.

त्यांच्या भेटीची सांगता ही अशी झाली.

अतीव दुःखाने त्याला सोडून कुमालो तुरुंगाच्या भिंतीच्या बाहेर, जिथे इतर सर्वजण थांबले होते तिथे गेले. ती मुलगी त्यांच्या जवळ आली, आणि लाजून हसत म्हणाली, उम्फुन्डीस.
-    काय बेटा?
-    आता मी तुमची मुलगी झाले, ना?

त्यांनी महत्प्रयासांनी चेहऱ्यावर हसू आणून तिच्याकडे बघितलं आणि म्हणाले, खरच की! ती उत्साहानी फुलून आणखी बरंच काही बोलायला जाणार होती, पण तिने जेव्हा त्यांच्याकडे बघितलं तेव्हा तिला जाणवलं त्यांचं लक्ष असल्या कसल्याच विचारांकडे नाहीय. आणि मग ती गप्पच राहिली.
* * *

तुरुंगातून परतल्यावर, कुमालो ती छोटीशी टेकडी चढून त्यांच्या भावाचं सुतारकामाचं दुकान होतं तिथे गेले. आश्चर्य म्हणजे आज त्या दुकानात तो बुलंद मनुष्य सोडून दुसरे कोणीच नव्हते. त्याने त्यांचं स्वागत थोडंसं आखडलेल्या सुरातच केलं.
-    मी परतण्यापूर्वी तुझा निरोप घ्यायला आलो आहे.
-    वा, वा, वा. म्हणजे डोत्शेनीला परत जायची तयारी झाली तर! बरेच दिवस झाले तुम्हाला इथे येउन, वहिनी वाटच बघत असतील. कधी जाणार आहात?
-    आम्ही उद्या सकाळी ९ वाजताच्या गाडीनी जातो आहोत.
-    म्हणजे गर्ट्रूड सुद्धा जाते आहे तुमच्याबरोबर? आणि तिचा मुलगा. फार चांगलं करताय हे तुम्ही. ही जोहानसबर्ग काही एकट्या बाईने राहण्यासारखी जागा नाही. अरे, पण आपण आधी चहा घेऊ या ना…

तो उठला, मागच्या बाजूला जाऊन आतल्या बाईला बोलवायला. पण कुमालो म्हणाले, नाही, मला नको आहे चहा.
-    तुमची मर्जी, जॉन कुमालो म्हणाला. आलेल्या सगळ्यांना चहा द्यायची माझी आपली पद्धत आहे.

तो खाली बसला आणि एक भला मोठ्ठा पाईप ओठात धरून तो पेटवायचा साग्रसंगीत देखावा करू लागला. उगीचच इकडचे कागद तिकडे करत, काड्यापेटी शोधत असल्याचं नाटक करू लागला... भावाची नजर टाळून.
-    फार चांगलं करताय हे तुम्ही, पाईप तोंडात धरूनच तो म्हणाला. ही जोहानसबर्ग काही एकट्या बाईने राहण्यासारखी जागा नाही. तिचा मुलगा सुद्धा तिथे गावात वाढणं जास्त चांगलं.
-    मी दुसरही एक मुल बरोबर घेऊन जातो आहे. माझ्या मुलाची बायको. ती गरोदर आहे.
-    ओ हो हो, ऐकलय मी त्याच्याबद्दल, जॉन कुमालो सगळं लक्ष हातातल्या काडीवर केंद्रित करून म्हणाला. आणखी एक चांगली गोष्ट करताय तुम्ही.

त्याचा पाईप आता पेटला होता. त्याने अंगठ्याने त्यात तंबाखू ढकलण्याचं काम अतिशय मन लावून पुरं केलं. आणि शेवटी करायला काहीच उरलं नसल्यामुळे, धुराच्या ढगांमधून भावाकडे पाहिलं.
-    एकदोघांनी नव्हे, बऱ्याच लोकांनी मला सांगितलं आहे, तुमचा भाऊ ह्या फार चांगल्या गोष्टी करतो आहे, बरं का. वा, वा; वहिनींना सांगा मी आठवण काढली होती, आणि आपल्या सगळ्या मित्रांना सुद्धा. तर मग आता तुम्ही पीटरमरीत्झबर्गला पोचाल उद्या सकाळी, तिथून मग डॉनीब्रुकची ट्रेन पकडाल, मग संध्याकाळी डोत्शेनी! वा, वा, वा; मोठा लांबचा प्रवास आहे हा!
-    हे बघ, आपल्या आपसातल्या आणखी एका गोष्टीबद्दलही मला बोलायचं होतं.
-    जशी तुमची इच्छा.
-    मी खूप विचार केला आहे ह्यावर. मी तुला इथे काही सुनावायला आलो नाहीय.

जॉन कुमालो ह्याची वाटच बघत असल्यासारखा पटकन मध्ये म्हणाला, सुनावायला? मला का म्हणून सुनावणार तुम्ही? एक कोर्ट होतं, एक न्यायाधीश होता. त्यांनी काय तो निर्णय दिला, तुम्ही, मी किंवा आणखी कोणी ठरवण्यासारखी ही गोष्ट नाही.

त्याच्या भक्कम मानेवरच्या शिरा तटतटून उभ्या राहिल्या होत्या; पण कुमालो पटकन म्हणाले.
-    मी म्हटलं नाही मी तुला सुनावायला आलो आहे. तू म्हणालास तसा एक खटला आणि एक न्यायाधीश होता. पण आणखी एक, ह्याहूनही मोठा न्यायाधीश असतो - त्याचं जाऊ दे, आपलं एकमत नाही त्याच्याबद्दल. मी तुला सांगायला आलो तो मुद्दा दुसराच होता.
-    ओ, हो, हो; असं होय? काय बरं तो मुद्दा?
-    एक तर तुझा निरोप घ्यायचा होता; पण काही न बोलता नुसता निरोप घेणं मला जमणार नाही. तू माझ्या मुलाचं बघितलस; तो घर सोडून गेला आणि ह्या शहरानी त्याला गिळंकृत करून टाकलं. मला वाटलं तुला हे सांगायलाच हवं, ... तुझ्या मुलाचं काय? तोही घर सोडून गेला आहे.
-    करतो आहे मीही त्याचा विचार, जॉन कुमालो म्हणाला. हे आत्ताचं झंझट मिटलं, की मी त्याला घरी घेऊन येणार आहे.
-    नक्की?
-    अगदी नक्की, वचन देतो मी तुम्हाला. जॉन कुमालो गदगदून हसला. दादा, सगळीच सत्कृत्य काय तुम्हीच करायची का? त्याला परत घेऊन येईन, आणि चांगला मोठा बोकड कापेन. बघा, माझ्या सुद्धा अजून लक्षात आहेत बायबलमधल्या गोष्टी!
-    फार अविस्मरणीय आहे ती गोष्ट!
-    हो तर, आहेच ती अविस्मरणीय. मी कधीच चांगल्या शिकवणी टाकून देत नाही, कारण ... तुम्हाला तर माहितीच आहे.
-    आणखी एक, शेवटची गोष्ट.
-    तुम्ही वडील बंधू आहात; जे मनात असेल ते सांगा.
-    तुझं ते राजकारण. कुठे घेऊन जातंय ते तुला?

पुन्हा एकदा त्या मानेवरच्या शिरा तटाटून उभ्या राहिल्या, घसा गुरगुरु लागला.
-    दादा, माझं राजकारण माझा वैयक्तिक मामला आहे; मी तुमच्या धर्माबद्दल तुम्हाला काही सांगत नाही.
-    तू म्हणाला तर होतास, जे मनात असेल ते सांगा.
-    हो, खरं आहे ते. बरं, ठीक आहे, ऐकतोय मी.
-    कुठे घेऊन जातंय ते तुला?
-    मला माहिती आहे मी कशासाठी लढतोय. माफ करा मला - तो गडगडून हसला - तुमचे ते रेव्हरंड सिमांगु आत्ता नाहीयेत इथे, तेव्हा मला इंग्लिशमध्ये बोलायला हरकत नसावी.
-    तुला हव्या त्या भाषेत बोल.
-    दादा, तुम्ही इतिहास वाचलाय. तुम्हाला माहिती आहे, इतिहास आपल्याला शिकवतो की जे लोक कामं करतात त्यांना कायम खाली दाबून ठेवता येत नाही. त्यांच्यात जर एकजूट असेल, तर कोणाची छाती होणारे त्यांच्या विरुद्ध उभं ठाकायची? आपल्यातल्या जास्त जास्त लोकांना हे आता समजायला लागलं आहे. त्यांनी जर मनावर घेतलं, तर उद्या दक्षिण आफ्रिकेमध्ये काही कामं होणार नाहीत.
-    म्हणजे, त्यांनी संप केला तर.
-    होय, तेच म्हणायचय मला.
-    पण मागला संप तर अयशस्वी झाला होता.

जॉन कुमालो त्याच्या पायांवर भक्कम उभा राहिला, त्याचा आवाज घशात गुरगुरत होता.
-    बघा त्यांनी काय केलं आपल्या लोकांना. आपण गुलाम असल्यासारखं, आपल्याला खाणींमध्ये जबरदस्तीने ढकललं. आपल्याला आपले श्रम आणि कष्ट थांबवण्याचा हक्क नाही?
-    तू गोऱ्यांचा द्वेष करतोस?

जॉन कुमालोने त्यांच्याकडे संशयाने बघितलं. मी कुठच्याच माणसाचा द्वेष करत नाही, तो म्हणाला; मी फक्त अन्यायाचा द्वेष करतो.
-    पण तू म्हटलेल्या काही गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत.
-    कसल्या गोष्टी?
-    मी ऐकलंय की तू काही भीतीदायक गोष्टी बोलत होतास. मी ऐकलंय की ते तुझ्यावर नजर ठेवून आहेत; त्यांच्या मर्जीनुसार योग्य वेळ आली, की ते तुला तुरुंगात टाकतील. ह्याबद्दल मला तुझ्याशी बोलायचं होतं; कारण तू माझा भाऊ आहेस.

शंकाच नको त्याच्या डोळ्यात भिती आहे. हा एवढा धिप्पाड मनुष्य, चोरी पकडल्या गेलेल्या लहानशा मुलासारखा दिसतो आहे. मला नाही माहिती कसल्या गोष्टींबद्दल बोलता आहात तुम्ही, तो म्हणतो.
-    मी ऐकलंय, की ह्यातल्या काही गोष्टी इथे, ह्या दुकानात बोलल्या गेल्या होत्या.
-    दुकानात? इथे दुकानात बोललेलं कोणाला कळणार आहे?

त्याला क्षमा करायच्या अनंत प्रार्थना करूनही, कुमालोंच्या मनात ह्याक्षणी त्याचे हाल करण्याची इच्छाच तीव्र होती. दुकानात येणाऱ्या प्रत्येक माणसाला तू ओळखतोस? ते म्हणाले. तुला फसवण्यासाठी एखाद्याला कोणी पाठवलं असलं तर?

त्या धिप्पाड अजस्त्र माणसाने कपाळावरचा घाम टिपला. कुमालोंना माहिती होतं, त्याच्या मनात विचार चाललाय, खरंच असं होऊ शकेल? त्याला दुखावण्याचा विचार आणखीच बळावत चालला होता, एवढा, की ते त्याला बळी पडले, आणि खोटं बोलले. मी ऐकलंय, ते म्हणाले, की अशा एखाद्या माणसाला दुकानात पाठवलं गेलंय, तुला फसवायला. तुझा मित्र म्हणून.
-    असं ऐकलंय तुम्ही?

आता कुमालोंना लाज वाटत असली तरी त्यांना म्हणणं भागच होतं, हो, मी ऐकलंय.
-    हा कसला मित्र! तो धिप्पाड मनुष्य गरजला. असला कसला हा मित्र?

आणि कुमालो त्यांच्या स्वतःच्या वेदनेतून किंचाळले, माझ्या मुलाला होते असले दोन मित्र!

त्या अजस्त्र माणसाने त्यांच्याकडे बघितलं. तुमचा मुलगा? तो म्हणाला. मग लक्षात येउन, अनावर संतापाने तो गरजला; चालते व्हा, चालते व्हा, माझ्या दुकानातून.

तो समोरच्या टेबलाला लाथ मारून कुमालोंवर झेपावून गेला. म्हातारा दारातून चटकन रस्त्यावर आला. त्यांनी त्यांच्यामागे दार धाडकन लावून कडी घालून बंद करून घेतल्याचा आवाज ऐकला.
बाहेर रस्त्यावर, ते अपमानित आणि लज्जित होऊन उभे राहिले. अपमानित, कारण येणारे-जाणारे त्यांच्याकडे चकित होऊन बघत होते. लज्जित, कारण ते ह्या उद्देशाने मुळीच आले नव्हते. ते त्यांच्या भावाला सांगायला आले होते, की सत्ता भ्रष्ट करते, की ज्या माणसाला न्यायासाठी लढायचं आहे त्याने स्वतः स्वच्छ आणि शुद्ध रहायला हवं, की प्रेमाची ताकद कुठच्याही शक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि ह्यातलं काहीच त्यांनी केलं नाही. देवा, मला माफ कर; येशु ख्रिस्ता मला माफ कर. ते पुन्हा दाराकडे वळले, पण ते कडी-कोयंडा घालून बंद केलं होतं. त्यांच्या स्वतःच्या भावाने, त्यांच्याच सख्ख्या, एकाच रक्ताच्या भावाने त्यांना घरात यायला बंदी केली होती.

लोक टक लावून बघत होते, म्हणून ते दुःखाने परतीची वाट चालायला लागले.
* * *

-    खरंच, मी तुमचे पुरेसे आभार सुद्धा मानू शकणार नाही. जार्विस म्हणाले.
-    आणखी काही करणं शक्य असतं, तर ते सुद्धा केलं असतं आम्ही, जार्विस.
जॉन हॅरीसन गाडी घेऊन आला. जार्विस आणि हॅरीसन क्षणभर गाडीच्या बाहेरच थांबले.
-    मार्गारेटला, आणि मेरीला आणि मुलांना आम्ही विचारलंय हे सांगा, जार्विस. आम्ही लवकरच येऊ, तुम्हाला सगळ्यांना भेटायला.
-    अवश्य, कधीही या हॅरीसन; तुमचं स्वागतच आहे.
-    एक गोष्ट सांगायची होती जार्विस, हॅरीसन खालच्या आवाजात म्हणाले. त्या शिक्षेबद्दल. गेलेलं माणूस परत येत नाही हे खरं आहे; पण ती शिक्षा योग्य होती, अगदी बरोबर होती. माझ्या मते, दुसरी काही शिक्षा पुरेशीच नव्हती. इतर काही झालं असतं, तर ह्या जगात न्यायच शिल्लक नाही असं मी म्हटलं असतं. दुसरे दोघे सुटले ह्याचंच वाईट वाटतं. पोलिसांनी वाट लावली ह्या केसची. त्या म्कीझे बयेला चांगलं बदडायला हवं होतं.
-    हो, मलाही तसंच वाटलं. ठीक आहे, येतो मी; पुन्हा एकदा आभार.
-    मी आनंदानीच केलं हे सगळं.

स्टेशनवर जार्विसनी जॉन हॅरीसनच्या हातात एक पाकीट दिलं.
-    मी गेल्यावर ते उघड, ते म्हणाले.

ट्रेन सुटल्याक्षणी हॅरीसनने ते उघडलं. 'तुमच्या क्लबसाठी' - त्यात चिठ्ठी होती. आर्थर आणि तू मिळून क्लबसाठी जे बेत केले होते, ते सगळे पूर्ण करा. क्लबला 'आर्थर जार्विस क्लब' नांव दिलंत, तर मला आनंदच होईल; पण ती माझी अट नाही.

हॅरीसनने खालचा चेक उघडून बघितला. ट्रेनच्या मागोमाग धावत सुटावं असा आनंद त्याच्या डोळ्यात ओसंडत होता. एक हजार पौंड, तो उद्गारला, परमेश्वरा, एक हजार पौंड!
* * *

लिथबींच्या घरी, सिमांगुने एक छोटीशी मेजवानी केली. मेजवानी आनंदाची नव्हती, कारण तसं काही कारण नव्हतं. पण जेवण चिक्कार होतं, आणि त्या दुःखातही थोडं सुख होतं. सिमांगुने युरोपिअन पद्धतीनुसार अध्यक्षपद स्वीकारलं. कुमालोंच्या गुणांची आणि मिसेस लिथबींच्या, सगळ्यांवर धरलेल्या मायेच्या छत्राची स्तुती करणारं एक भाषण ठोकलं. कुमालोंनी सुद्धा एक भाषण केलं - पण ते चाचरत आणि अडखळत केलं; कारण भावाबरोबरचं खोटं बोलणं आणि भांडण त्यांच्या अजूनही मनामध्ये होतं. पण त्यांनी सिमांगु आणि मिसेस लिथबींचे त्यांच्या मदतीबद्दल आभार मानले. मिसेस लिथबींनी भाषण करायला नकार दिला, त्याऐवजी त्या नुसत्याच लहान मुलीसारख्या हसतहसत म्हणाल्या, ही अशी मदत करण्यासाठीच तर आपण जन्माला येतो ना. पण त्यांच्या वतीनी ती शेजारची गलेलठ्ठ बाई बोलली. एवढं मोठ्ठ भाषण की ते संपता संपेचना. ती दोन्ही प्रिस्टच्या आणि मिसेस लिथबींच्या चांगुलपणाबद्दल बोलली, गर्ट्रूड आणि त्या मुलीने आयुष्य सुधारायला पाहिजे, त्यांना मिळालेल्या सगळ्या प्रेमाची आणि मायेची परतफेड करायला हवी ह्या त्यांच्या कर्तव्याबद्दल रोखठोक बोलली. मग त्यावरून जोहानसबर्ग, त्या महानगरातले धोके, सोफियाटाऊन आणि अलेक्झांड्रा आणि पिमव्हील मधल्या लोकांच्या ढिसाळ आणि भ्रष्ट रहाणीबद्दल बोलली. एवढं, की शेवटी सिमांगुने तिला सांगितलं, की बाई आम्हाला उद्या सकाळी लवकर उठायला हवं आहे, नाहीतर आम्ही तुझं सगळं भाषण ऐकलंच असतं. ह्यावर ती खुश होऊन बोलायची थांबली. मग सिमांगुने त्या सर्वांना एक बातमी दिली, त्याने आतापर्यंत हे कोणालाच सांगितलं नव्हतं आणि तो प्रथमच ह्याची जाहीर वाच्यता करत होता. तो सर्वसंगपरित्याग करून वानप्रस्थाश्रम स्वीकारणार होता. असं करणारा तो दक्षिण आफ्रिकेतला पहिलाच काळा प्रिस्ट होता. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन केलं, गर्ट्रूड सगळ्यांची ही भाषणं ऐकत मजेत रमून गेली होती. तिचा मुलगा तिच्या खांद्यावर डोकं टेकून कधीच झोपी गेला होता. ती मुलगी सुद्धा उत्सुक आणि हसऱ्या चेहऱ्याने ह्या सर्व प्रकारात रस घेत होती. तिच्या आयुष्यात तिने असलं काही पाहिलं नव्हतं.

मग सिमांगु म्हणाला, उद्या आपल्याला ट्रेन पकडण्यासाठी लौकर उठायचं आहे, तेव्हा आता सगळ्यांनी झोपू या. टॅक्सीवाला सकाळी सात वाजता येउन उभा राहील इथे.

म्हणून मग सगळ्यांनी प्रार्थनेने समारोप केला. त्या जाड्या बाईने पुन्हा एकदा सिमांगु आणि लिथबींच्या चांगुलपणाबद्दल तोंड भरून त्यांची स्तुती केली. कुमालो त्यांच्या मित्राबरोबर फाटकापर्यंत गेले, तेव्हा सिमांगु त्यांना म्हणाला, बघा, मी सगळ्या जगाचा आणि ऐहिक गोष्टींचा त्याग करतो आहे, पण माझ्याजवळ थोडे साठवलेले पैसे आहेत. माझे आई-वडील नाहीत, आणि दुसरं कोणीच माझ्यावर अवलंबून नाही. तर हे पैसे मी तुम्हाला इथल्या सगळ्या झालेल्या आणि तुमच्या नवीन जबाबदारयांमध्ये होणाऱ्या खर्चासाठी देऊ इच्छितो. मी चर्चची संमतीही घेतली आहे, हे मी तुमच्याच नांवे केलेलं आहे.

त्याने ती पुस्तिका कुमालोंच्या हातात ठेवली; कुमालोंना स्पर्शानेच समजलं, की ते पोस्ट ऑफिस बुक आहे. कुमालोंनी हात फाटकावर विसावले, आणि मस्तक हातांवर ठेऊन ते ओक्साबोक्शी रडू लागले. सिमांगु त्यांना म्हणाला माझ्या आनंदाला तुम्ही विरजण नका ना लावू, एवढा मोठा आनंद मला आयुष्यात कधीच मिळाला नाहीय. त्याच्या ह्या शब्दांनी तर म्हातारा मोठमोठ्याने हुंदके देऊ लागला. तेव्हा सिमांगु म्हणाला, शांत व्हा, कोणीतरी येत आहे.

तो मनुष्य बाजूनी जाईपर्यंत दोघं शांत होते. मग कुमालो म्हणाले, माझ्या सबंध आयुष्यात मला तुमच्यासारखं कोणी भेटलं नाहीय. त्यावर सिमांगु फटकन म्हणाला, मी एक सर्वसामान्यांसारखा, चुका आणि पापं करणारा माणूस आहे; देवानी त्याचा हात माझ्या डोक्यावर ठेवला आहे, एवढंच. तुमच्या मुलाबद्दल बोलायचं, तर आता दया दाखवणं गवर्नर जनरलच्याच हातात आहे. फादर विन्सेंटना कळल्याबरोबर ते तुम्हाला सांगतील.
-    आणि जर दयेचा अर्ज नामंजूर झाला तर?
-    नामंजूर झाला तर, सिमांगु शांतपणे म्हणाला, आमच्यापैकी एकजण त्या दिवशी प्रिटोरियाला जाईल ... आणि सगळं झालं... की तुम्हाला कळवेल. पण दोस्त, आता मात्र मला निघायलाच हवं, उद्या उठायचय ना. जाण्यापूर्वी, माझं तुमच्याकडे एक मागणं आहे.
-    माझ्याजवळ जे काही आहे ते सगळं माग, दोस्त.
-    मी हे जे नवीन पाऊल टाकायला बघतो आहे, त्यात मला यश मिळो म्हणून माझ्यासाठी प्रार्थना कराल?
-    माझ्या आयुष्यातले उरलेले सगळे दिवस, रोज, सकाळ आणि संध्याकाळ!
-    गुड नाईट, बंधू.
-    गुड नाईट सिमांगु, मित्रोत्तमा. देव तुझी नेहमीच काळजी घेवो.
-    तुमची सुद्धा.

कुमालोंनी त्याला रस्ता चालून मिशन हाउसकडे वळेपर्यंत बघितलं. माग ते त्यांच्या खोलीत गेले. मेणबत्तीच्या प्रकाशात त्यांनी ते पोस्ट बुक उघडून पाहिलं, त्यात पस्तीस पौंड, चार शिलिंग आणि पाच पेन्स होते. ते गुडघ्यांवर कोसळले, त्यांच्या घशातून हुंदकाही फुटेना. त्यांना भावाशी खोटं बोलल्याचा आणि भांडल्याचा फार पश्चात्ताप झाला. रिवाजानुसार आत्ताच जाऊन त्याची माफी मागायची त्यांची तयारी होती, पण रात्र फार झाली होती. त्यांनी पत्र लिहून कळवायचा निश्चय केला. देवाचे जगातल्या चांगुलपणाबद्दल मनापासून आभार मानले, तेव्हा कुठे त्यांना थोडं चैन पडलं.

मग त्यांनी स्वतःच्या मुलासाठी प्रार्थना केली. उद्या ते सगळेजण घरी जाणार - सगळे, फक्त त्यांचा मुलगा मात्र नाही. तो त्याला ठेवतील त्या तुरुंगात, प्रिटोरियाच्या सगळ्यात मोठ्या तुरुंगात, एकांतवासात राहणार. दया जर नाकारली, तर त्याला फाशी होईपर्यंत, तिथेच राहणार. अयाई, ज्या हातांनी खून केला, ते हात एके काळी त्याच्या आईच्या छातीवर विसावले होते. काळोखात चालतांना ते हात नकळत त्याच्या बाबांचं बोट घट्ट पकडत होते. तो खुनी, जो आता फाशीला घाबरत होता, ते एके काळी अंधाराला घाबरणारं एक लहान मुल होतं.

सकाळी ते लवकरच उठले, अजून काळोख होता बाहेर. त्यांनी मेणबत्ती लावली, आणि एकदम आठवण झाल्यावर, गुडघे टेकून सिमांगुसाठी प्रार्थना केली. त्यांनी आवाज न करता दार उघडलं, आणि हलकेच मुलीला जागं केलं. चल, उठायची वेळ झाली. तिने लगेच उत्साहानी पांघरूण बाजूला केलं आणि म्हणाली मी होतेच तयार पटकन. तिचा उत्साह बघून त्यांना हसू आलं. डोत्शेनी, ते म्हणाले, उद्या आपण डोत्शेनीमध्ये असणार. त्यांनी गर्ट्रूडच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि मेणबत्ती उंचावून धरली. पण गर्ट्रूड तिथे नव्हती; तो छोटा मुलगा होता, लाल ड्रेस होता, पांढरी टोपी होती... पण गर्ट्रूड मात्र नव्हती.

Comments