न्यायमूर्ती कोर्टात प्रवेश करतात तेव्हा लोकांनी उठून उभे राहण्याची रीतच आहे. आज ते जास्तच गंभीरपणे उभे राहतात; कारण आज ह्या खटल्याचा निर्णय होणार आहे. न्यायमूर्ती स्थानापन्न होतात, मग त्यांचे दोन सहकारी, आणि मग सगळे लोक खाली बसतात. कोर्टाखालच्या तळघरातून तीन आरोपींना आणले जाते.
मी, आणि माझ्या सहकाऱ्यांनी, ह्या केसवर प्रदीर्घ विचार विनिमय केला आहे. आमच्यासमोर मांडले गेलेले सर्व पुरावे
आम्ही लक्षपूर्वक ऐकले आहेत, त्यांच्यावर चर्चा केली आहे आणि त्यांची पुरेशी छाननी
केली आहे.
अनुवादक, न्यायमूर्ती जे बोलतात त्याचे, झुलूमध्ये भाषांतर करून सांगतो.
आरोपी अब्सलम कुमालोने त्याचा गुन्हा नाकारण्याचा प्रयत्न केला नाही. बचावपक्षाने आरोपीला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे करायचे ठरवले. तेथे आरोपीने, दिवंगत आर्थर जार्विस ह्यांचा पार्कवॉल्ड येथील त्यांच्या राहत्या घरात आपण कसा खून केला, ह्याची कहाणी अगदी साध्या आणि सरळ भाषेत सांगितली. त्याने पुढे असेही म्हटले, की खून करण्याचा किंबहुना गोळी झाडण्याचा सुद्धा त्याचा इरादा नव्हता, की हे शस्त्र केवळ रिचर्ड म्पिरिंग ह्याला घाबरवण्यासाठी आणलेले होते, की दिवंगत व्यक्ती तेथे उपस्थित असणे त्याला अपेक्षित नव्हते. ह्या निवेदनाचा आपण पुढे जास्त खोलात जाऊन विचार करू. परंतु, ह्यातला एक भाग आरोपी क्रमांक दोन आणि तीन ह्यांचा गुन्ह्यामधील वाटा ठरवण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आरोपी क्रमांक एकच्या म्हणण्याप्रमाणे, आरोपी क्रमांक तीन - जोहान्स पाफुरी - ने, ह्या घरफोडीचा बेत रचला होता, पाफुरीनेच म्पिरिंगला बेशुद्ध करणारा आघात केला होता. ह्या बाबतीत, म्पिरिंगची स्वतःची साक्ष ह्या विधानाला दुजोरा देते. म्पिरिंगने आरोपी क्रमांक तीनला त्याच्या मुखवट्याबाहेरून दिसणाऱ्या, उडणाऱ्या भुवयीच्या लकबीवरून ओळखला. एवढेच नव्हे, तर तसाच मुखवटा घातलेल्या दहा लोकांमधून, त्यातल्या काहींना भुवयीची तीच लकब असतांना देखील, म्पिरिंगने पाफुरीला अचूक ओळखला. पाफुरीच्या वकिलाने बचावात असा दावा केला आहे, की ह्या माणसांच्या लकबी सारख्या होत्या, पण एकच नव्हत्या. असा दावा केला आहे, की इतपत सारख्या लकबी असणारे लोक शोधणे सुद्धा अत्यंत कठीण होतं, आणि म्पिरिंग पाफुरीला आधीपासून ओळखत होता. त्यांनी पुढे असाही दावा केला आहे, की दहाच्या दहा लोक जर पाफुरीच्याच उंचीचे, शरीरयष्टीचे आणि तीच लकब दाखवणारे असते, तरच म्पिरिंगने त्याला ओळखणे योग्य झाले असते. कोर्ट ह्याच्याशी संपूर्णपणे सहमत होऊ शकत नाही, कारण ह्याचा निष्कर्ष असा होतो की तपासणीच्या रांगेतले सगळे लोक आरोपीसारखे अगदी हुबेहूब दिसत नसतील तर त्या ओळखण्याला महत्व नाही. परंतु हा मुद्दा अंशतः खरा आहे, की एखादी लक्षणीय लकब ओळखीमध्ये चूकही घडवू शकते. विशेषतः चेहऱ्याचा अर्धा भाग झाकलेला असतांना. संपूर्ण चेहरा ओळखणे, आणि अर्धामुर्धा चेहरा, एखाद्या खुणेवरून ओळखणे ह्यात फरक आहे, हे मान्य करायलाच हवं. किंबहुना, हे धोकादायक आहे; कारण सारखे नसलेले भाग लपवल्याने, आणि सारखे असलेले भाग दाखवल्याने गोंधळ होऊ शकतो. उदाहरणार्थ, एकाच जागी जखमेचा वण असलेल्या दोन पुरुषांच्यात, वण दाखवून आणि उरलेला भाग झाकून, ओळखण्यामध्ये गोंधळ घडू शकतो. ह्यामुळे, आमचा असा निष्कर्ष आहे, की केवळ म्पिरिंगची साक्ष, त्याचा मारेकरी पाफुरीच होता हे ठरवण्यासाठी पुरेशी नाही.
ह्याहीपुढे जाऊन, हे लक्षात घेतलं पाहिजे, की आरोपी क्रमांक एक कुमालोने, पाफुरी तेथे हजर होता, व त्यानेच म्पिरिंगवर हल्ला केला हे विधान, पोलिसांनी त्याला पाफुरीबद्दल विचारल्यानंतर केले. पोलिसांच्या त्या प्रश्नाने पाफुरीला ह्या गुन्ह्यात गुंतवायचा विचार त्याच्या डोक्यात आला असेल का? का खरच, पाफुरीचा ह्या गुन्ह्याशी काही संबंध होता? कुमालोच्या वकिलांनी दावा केला आहे, की कुमालोवर कित्येक दिवस भितीचा जबरदस्त पगडा होता; आणि त्याला अटक केल्यानंतर पाफुरीचेच नव्हे, तर कुठचेही नांव त्याला दाखवले असते, तरीही स्वतःच्या मनावरचा बोजा हलका करण्यासाठी त्याने गुन्हा कबूल केलाच असता. त्याची स्वतःची घाबरलेल्या मनस्थितीची साक्ष ह्यालाच दुजोरा देते. परंतु, एवढ्या मोठ्या गंभीर गुन्ह्यामध्ये आपण एकटेच सापडू नये, म्हणून त्याने पाफुरीचं नांव गुंतवले असेल, ही शक्यता नजरेआड करणे योग्य नाही. अर्थात, म्पिरिंगच्या साक्षीप्रमाणे त्या घरात तीन लोक तर आले होते; मग, खऱ्या दोन साथीदारांना सोडून दुसऱ्या निरपराध दोघांची नांवे घेण्यामधून कुमालो काय साधणार? त्याने स्वतःच्या सर्व कृत्यांची तपशीलवार माहिती सरळपणे कबूल केली, मग तो विनाकारण इतर दोन निरपराध व्यक्तींना ह्यात का बरे ओढवेल?
ज्या पाफुरीला ह्यात विनाकारण ओढले जात आहे असा दावा आहे, त्याच पाफुरीच्या शोधात असतांना खऱ्या खुन्याचा शोध लागला, व त्या खुन्याने ताबडतोब कबुलीजबाब दिला, हा वैशिष्ट्यपूर्ण भागही लक्षात घेणे आवश्यक आहे.
ह्या गोंधळात टाकणाऱ्या खटल्याचा आणखी एक भाग आहे. तिन्ही आरोपी आणि बेबी म्कीझे ह्यांचे, ते सर्व खुनाच्या दुसऱ्या दिवशी रात्री, अलेक्झांड्रामधील घरात भेटले ह्याबाबत एकमत आहे. आता ही भेट योगायोगाने झाली, आणि तिथे आरोपी क्रमांक एकला इतर दोघांना ह्या खुनात गोवायची कल्पना सुचली? का ही भेट खरच तो म्हणतो तशी घडली? ह्या भेटीत खुनाची चर्चा झाली होती - का नाही? बेबी म्कीझे ह्या बाईंची साक्ष अत्यंत कमकुवत आहे, ही गोष्ट सरकारी वकिलाने आणि कुमालोच्या वकिलाने दाखवून दिलीच आहे; परंतु दोघांपैकी कोणीही खुनाची चर्चा झाली होती का नाही, ह्याचा ठाम पुरावा सदर करू शकले नाही. ह्या बाईंनी, प्रथम पोलिसांना खोटे सांगितले की त्यांनी आरोपी क्रमांक एकला वर्षभरात पाहिलेला नाही. ह्या बाई साक्ष देतांना घाबरलेल्या होत्या आणि गोंधळात टाकणारी आणि परस्परविरोधी विधाने करत होत्या. ही भिती आणि हा गोंधळ, केवळ कोर्टात उभ्या असल्यामुळे होता, का इतर काही गुन्ह्यात त्यांचाही सहभाग असल्यामुळे होता, का खुनाची चर्चा झाली होती ह्या अपराधी जाणिवेनी होता - ह्यातले काहीच स्पष्टपणे उघड झाले नाही असा आमचा निष्कर्ष आहे.
सरकारी वकिलाने ह्या तीन आरोपींच्या पूर्वीच्या मैत्रीचा आणि गुन्हेगारीचा वारंवार उल्लेख केला. त्यात तथ्य होते आणि त्या भागीदारीचा आणखी तलाश घायला हवा; परंतु केवळ पूर्वी मित्र होते, किंवा पूर्वीच्या गुन्ह्यांमध्ये भागीदार असले तरीही, त्याचा ह्या एवढ्या मोठ्या गुन्ह्यामध्ये संबंध जोडणे योग्य नाही.
बऱ्याच काळजीपूर्वक विचारानंतर, मी आणि माझे सहकारी, ह्या निर्णयावर आलो आहोत, की आरोपी क्रमांक दोन आणि तीनचा दोष संपूर्ण निस्संशयरित्या शाबित झाला नाही - म्हणून कोर्ट त्या दोघांची ह्या खटल्यामधून मुक्तता करत आहे. मात्र मला खात्री आहे, त्यांच्या ह्यापूर्वीच्या गुन्हेगारीची संपूर्ण तपासणी होईल.
कोर्टामध्ये एक सुस्कारा सुटतो. नाटकाचा एक अंक तर संपला. आरोपी अब्सलम कुमालो काहीच हालचाल करत नाही; सोडून देण्यात आलेल्या दोघांकडे बघत सुद्धा नाही. पण पाफुरी मात्र चौफेर नजर टाकतो - जणू काही म्हणतो आहे, झालं हे योग्यच आहे, न्याय्यच आहे.
बऱ्याच काळजीपूर्वक विचारानंतर, मी आणि माझे सहकारी, ह्या निर्णयावर आलो आहोत, की आरोपी क्रमांक दोन आणि तीनचा दोष संपूर्ण निस्संशयरित्या शाबित झाला नाही - म्हणून कोर्ट त्या दोघांची ह्या खटल्यामधून मुक्तता करत आहे. मात्र मला खात्री आहे, त्यांच्या ह्यापूर्वीच्या गुन्हेगारीची संपूर्ण तपासणी होईल.
कोर्टामध्ये एक सुस्कारा सुटतो. नाटकाचा एक अंक तर संपला. आरोपी अब्सलम कुमालो काहीच हालचाल करत नाही; सोडून देण्यात आलेल्या दोघांकडे बघत सुद्धा नाही. पण पाफुरी मात्र चौफेर नजर टाकतो - जणू काही म्हणतो आहे, झालं हे योग्यच आहे, न्याय्यच आहे.
आरोपी क्रमांक एक विरूद्धचे आरोप अजून शिल्लक आहेत. त्याच्या साक्षीची पुरेपूर छाननी झाली आहे, आणि जेवढ्या गोष्टी तपासता आल्या त्या सगळ्या खऱ्या ठरल्या आहेत. कोणी निरपराध व्यक्ती विनाकारण हा गुन्हा आपल्यावर ओढवून खोटी कबुली देत आहे, असे मानण्याला काही कारण नाही. त्याच्या विद्वान वकिलांनी विनंती केली आहे, की त्याला सर्वात कठोर शिक्षा दिली जाऊ नये. दावा केला आहे, की त्याला त्याच्या कृत्याचा धक्का बसला आहे, त्याने तो फार खचला आहे. त्यांनी त्याच्या प्रांजळ आणि सरळसोट कबुलीचे कौतुक केले आहे; त्याच्या लहान वयाकडे, गावाहून आलेल्या साध्यासुध्या मुलावर ह्या महानगराचे कसे घोर परिणाम होतात त्याकडे लक्ष वेधले आहे. जमातींवर ओढवलेल्या महान संकटाची, ह्या दुर्घटनेमधील आपल्या सर्वांच्या नैतिक हिश्शाची बाजू त्यांनी मोठ्या हिरीरीने मांडली आहे. पण जरी हे खरे मानले, की आपण आपल्या भितीपायी, स्वार्थीपणापायी आणि बेपर्वा वृत्तीपायी हा विध्वंस ओढवून घेतला, त्याला आळा घालण्याचा प्रयत्न केला नाही; जरी हे खरे मानले, की आपल्याला ह्याबद्दल शरमिंदा असायला हवे, आता करतो आहोत त्यापेक्षा जास्त जोरदार आणि भरीव कामगिरी करायला हवी - तरीही शेवटी हे मान्य करायलाच हवे, की ह्या देशात कायदा म्हणून काही आहे. ह्या मोडक्या तोडक्या समाजाने सुद्धा कायदे रचले, त्यानुसार निर्णय करायला न्यायाधीश नेमले, त्या न्यायाधीशांना न्याय करण्याव्यतिरिक्त इतर सर्व बंधनांमधून मुक्त ठेवले - ही एक सर्वश्रेष्ठ कामगिरी आहे. समाजव्यवस्थेमध्ये दोष आहेत, म्हणून न्यायाधीश कायद्यात ढवळाढवळ करू शकत नाही. जर ह्या समाजाने केलेला कायदा काहींना अन्य्याय्य वाटत असेल, तर तो समाज आणि तो कायदा बदलला पाहिजे. मधल्या काळात, आहे त्या कायद्यानुसार निर्णय करणे हेच न्यायाधीशांचे सर्वात महत्वाचे कर्तव्य आहे. न्यायाधीशांना असा निर्णय करण्याचे स्वातंत्र्य आहे, ही ह्या मोडक्यातोडक्या समाजातली एक धडधाकट गोष्ट आहे, जिचा आपल्याला अभिमान असायला हवा. मला खात्री आहे, की बचावाचे विद्वान वकील क्षणमात्रही असे सुचवणार नाहीत, की न्याय गुंडाळून ठेवावा. मी फक्त हे सांगू इच्छितो, की न्यायाधीशाने न्याय देतांना, समाजातल्या वैगुण्यांचा, त्रुटींचा आणि दोषांचा तिळमात्र विचार करता कामा नये; त्याने फक्त न्यायानुसार निर्णय देण्यावर आपले लक्ष केंद्रित करावे.
कायद्यानुसार, प्रत्येक
माणूस त्याच्या कृत्यांसाठी संपूर्ण जबाबदार धरला जातो. ह्याला अपवाद असतात, पण त्यातला
कुठचाही इथे लागू होत नाही. एखाद्या माणसाची एखाद्या कृत्याबद्दल प्रत्यक्षात किती
अंश जबाबदारी आहे, हे ठरवणं न्यायाधीशाचं काम नाही; कायद्यानुसार तो माणूस पूर्णपणे
जबाबदार आहे. तसंच, दया दाखवणं हे न्यायाधीशाच काम नव्हे. तो उच्चाधिकार गव्हर्नर जनरलचाच
आहे. ह्या केसमध्ये खऱ्या घडलेल्या गोष्टी काय आहेत? हा तरुण एका घरात दरोडा घालायच्या,
चोरी करण्याच्या उद्देशाने जातो. त्याच्याकडे एक गोळ्या भरलेलं रिव्हॉल्वर आहे. तो
म्हणतो ते फक्त घाबरवण्यासाठी होतं. मग त्यात गोळ्या कशाला भरायला हव्या? तो म्हणतो,
खून करायचा त्याचा इरादा नव्हता. आणि तरीही, त्याच्या एका साथीदाराने, काळ्या नोकराच्या
डोक्यात निर्घृणपणे प्रहार केला. आपल्याला असं गृहीत धरायलाच हवं, की तो नोकर मरु शकला
असता. तो स्वतः सांगतो, की हा हल्ला एका लोखंडी काम्बीने केला होता - ह्यापेक्षा जास्त
क्रूर आणि घातकी अस्त्र दुसरं नसेल. ह्या बेताला त्याची संमती होती. कोर्टाने विचारल्यावर
ह्याने कबूल केलं, की हे खुनशी आणि धोकादायक शस्त्र घेऊन जाण्याला त्याने काही विरोध
केला नाही. हे खरं आहे, की त्याचा बळी एक काळा मनुष्य होता; आणि एक विचारप्रवाह असाही
आहे की तो काळा असल्यामुळे हा गुन्हा थोडा क्षम्य आहे, पण कुठचही कोर्ट हे मान्य करणार
नाही.
इथे सर्वात महत्वाचा
लक्षणीय मुद्दा हा आहे, की आरोपी म्हणतो की त्याचा खुनाचा इरादा मुळीच नव्हता, तो गोरा
मनुष्य अनपेक्षितरित्या आला आणि ह्याने ती गोळी घाबरून आणि गोंधळून जाऊन झाडली. कोर्टानी
जर हे सत्य म्हणून स्वीकारलं, तर कोर्टाला ह्या आरोपीला खुनाच्या आरोपामध्ये निर्दोष
ठरवायला हवं.
पुन्हा तपासून बघू,
इथे सत्य घटना काय आहेत? त्या घरात गेलेले हे तीन तरुण खुनशी आणि धोकेबाज होते, हे
मान्य न करणं कसं शक्य आहे? हे मान्य, की ते तिघं त्या घरात एका माणसाचा खून करायच्या
खास उद्देशानी गेले नसतील. पण हे खरच आहे, की त्यांच्या बेकायदेशीर वर्तणुकीच्या आड
जो कोणी येईल त्याचा जीव घेऊ शकतील अशी शस्त्रं ते आपल्याबरोबर घेऊन गेले होते.
ह्या बाबतीमध्ये कायद्याचा
मुद्दा एका महान दक्षिण आफ्रिकन न्यायाधीशाने स्पष्ट केला आहे. ते म्हणतात "कुठच्याही
खुनामध्ये प्राण घेण्याचा उद्देश हा एक महत्वाचा भाग आहे. पण, संबंधित परिस्थितीच्या
अनुषंगाने सुद्धा तो उद्देश स्पष्ट होऊ शकतो. प्रश्न फक्त एवढाच, की सिद्ध केलेल्या
सत्याच्या जोरावर असा निष्कर्ष काढता येतो का? हा उद्देश एखाद्याला ठामपणे मारण्याचाच
असायला हवा असं नाही, एखाद्याला गरज पडल्यास अतोनात शारीरिक इजा करणं, जी त्याचे प्राण
घेऊ शकेल, मग प्रत्यक्षात त्याचे प्राण जावोत अगर न जावोत, हा सुद्धा खुनाचा उद्देश
म्हणता येतो." एका छोट्याशा खोलीमध्ये, छोट्याशा अवधीमध्ये, जिथे एका निरपराध
काळ्या माणसाला क्रूरपणे मारून बेशुद्ध करण्यात आलं, जिथे एका निरपराध गोऱ्या माणसाचा
गोळी घालून खून झाला - तिथे 'गरज पडल्यास प्राणघातक शारीरिक इजा' करण्याचा उद्देश नव्हता
असं आपण म्हणू शकतो का? मी तरी असा उद्देश नव्हता ह्यावर विश्वास ठेवायला तयार नाही.
कोर्टामध्ये निःशब्द
शांतता आहे. न्यायमूर्ती सुद्धा गप्प आहेत. कोणी खोकत नाही, का हलत नाही, का श्वास
घेत नाही. संपूर्ण शांतता. मग न्यायमूर्ती पुन्हा बोलू लागतात.
अब्सलम कुमालो, हे
कोर्ट तुला, आर्थर ट्रेवेलियन जार्विस ह्यांचा ८ ऑक्टोबर १९४६ रोजी त्यांच्या राहत्या
घरात खून केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवत आहे. मॅथ्यू कुमालो आणि जोहान्स पाफुरी, हे
कोर्ट तुम्हाला दोघांना निर्दोष ठरवत आहे आणि त्यानुसार तुमची सुटका करण्यात येत आहे.
ते दोघं पायऱ्या उतरून
कोर्टाच्या तळघराकडे जाऊ लागतात, उरलेल्याला एकटा सोडून. तो त्यांना जाताना बघतो आहे,
कदाचित मनाशी म्हणत, आता मात्र मी खरच एकटा पडलो.
न्यायमूर्ती
पुन्हा बोलू लागतात. कशी, कुठच्या कारणासाठी ह्या केसमध्ये क्षमायाचनेची शिफारस करायची?
मी ह्यावर फार दीर्घकाळ गंभीरपणे विचार केला; पण मला इथे खास वेगळी वागणूक द्यावी अशी
काहीच परिस्थिती दिसत नाही. हा वयाने लहान आहे, पण पोरसवदा नाही, चांगला जवान पुरुष
आहे. हा त्याच्या दोन साथीदारांबरोबर एका घरात जातो, बरोबर दोन प्राणघातक अस्त्रं घेऊन.
ह्यापैकी एका शस्त्राने गंभीर प्रकारच्या जखमा केल्या, दुसऱ्याने प्राणच घेतला. समाजाला
अशा घातकी जीवघेण्या हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवणं, अशा मारेकऱ्यांना - ते तरुण असोत
का म्हातारे - योग्य ती शिक्षा देणं, हे ह्या कोर्टाचं सर्वोच्च महत्वाचं कर्तव्य आहे.
म्हणून मी दयेची शिफारस करू शकत नाही.
न्यायमूर्ती
त्या मुलाशी बोलतात.
- मी शिक्षा फर्मावण्यापुर्वी तुला काही सांगायचं
आहे का?
- मला फक्त एवढंच सांगायचय, की मी ह्या माणसाला
मारलं, पण त्याचा खून करायचा माझा इरादा नव्हता. मी घाबरलो होतो.
कोर्टामध्ये
शांतता आहे, तरीही एक गोरा माणूस 'शांतता' अशी मोठ्याने गर्जना करतो. कुमालो त्यांचा
चेहरा ओंजळीत खुपसतात; त्यांना कळला आहे न्यायमूर्तींच्या बोलण्याचा अर्थ. जार्विस
ताठ आणि निश्चल बसतात. तो गोरा तरुण अधिकारी कपाळावर जबरदस्त आठ्या घालून नुसता शून्यात
टक लावून बघत बसतो. ती मुलगी, कुठच्याही लहानशा मुलीसारखीच बसते, तिची नजर न्यायमूर्तींवर
स्थिर आहे, तिच्या प्रियकरावर नव्हे.
अब्सलम
कुमालो, मी तुला कोठडीत परत जाण्याची आणि मरेपर्यंत फाशीची शिक्षा देत आहे. ईश्वर तुझ्या
आत्म्याला सद्गती देवो.
न्यायमूर्ती
उठतात आणि लोक उठतात. पण आता शांतता नाही. अपराधी जमिनीवर कोसळतो, हुंदके देत, रडत.
एका बाई आक्रोश करते आहे, एक म्हातारा रडत पुटपुटतो आहे 'परमेश्वरा, परमेश्वरा'. न्यायमूर्ती
अजून कोर्टाच्या बाहेर गेले नाहीत, पण आता कोणी 'शांतता' म्हणून गर्जना करत नाही. उध्वस्त
झालेल्या हृदयाच्या तुकड्यांचे आक्रोश कोण थांबवणार?
ते
सगळे कोर्टामधून बाहेर पडतात, रितीनुसार; गोरे एका बाजूनी, काळे दुसऱ्या बाजूनी. पण
तो गोरा तरुण अधिकारी ही प्रथा मोडतो आहे. तो आणि सिमांगु, त्या उन्मळून पडलेल्या वृद्धाला
दोन्ही बाजूनी धरताहेत. प्रथा अशी क्वचितच तोडली जाते, पण असा उचंबळून टाकणारा गहरा
अनुभवही क्वचितच दिसतो ना? त्या तरुणाच्या भुवया पार आकुंचित झाल्या आहेत, आणि तो तीक्ष्णपणे,
ठामपणे सरळ समोर नजर रोखून आहे. कदाचित अशा एखाद्या दुर्मिळ गहऱ्या अनुभवामुळे, कदाचित
अशी प्रथा मोडून पडत असल्यामुळे. कारण ह्या गोष्टी फार क्वचितच घडतात.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...