मिसेस लिथबी आणि गर्ट्रूड
घरात शिरतात. मिसेस लिथबी मागे दार ओढून घेतात.
-
हे बघ
पोरी, मी तुला समजून घ्यायचा बराच प्रयत्न केला; पण मला काही ते जमत नाहीय.
-
आता काय
केलं मी!
-
तू काही
केलंस असं नाही म्हणत मी. पण तुला हे घर समजून घेता येत नाहीय. तुला त्यातली माणसं
समजून घेता येत नाहीयेत.
गर्ट्रूड हिरमुसून
उभी राहिली. मला नाही समजत!
-
अगं वेडे,
अशा लोकांशी का बोलत बसतेस तू?
-
मला काय
माहिती ते लोक चांगले नाहीत?
-
ते कसे
बोलतात, कसे हसतात ते ऐकू नाही का येत तुला? हे असे वेंधळ्यासारखे ही ही ही करून दात
काढत असतात दिसत नाही का तुला?
-
त्यात
काही चुकलं असं समजलं नाही मला.
-
हे बघ,
चुकलं असं नाही म्हणत मी. पण असं बोलणं आणि हसणं रिकामटेकडे फालतू लोक करतात. तुला
चांगल्या घरातली बाई व्हायचंय ना?
-
प्रयत्न
तर करतेय मी.
-
मग असल्या
लोकांपासून लांब रहा.
-
कळलं.
-
तुला सारखं
सारखं बोलायला मला आवडत नाही. पण तुझ्या भावानी फार सोसलंय.
-
त्यानी
सोसलंय हे खरं.
-
मग त्यांना
आणखी दुःख देऊ नकोस.
-
ही जागा
एकदाची सोडायची आहे मला. कस वागायचं इथे तेच समजेनासं होतं मला.
-
पण नुसती
ही जागा नाही, बाळ. डोत्शेनीमध्येही तुला असे खिदळणारे हाहा-हुहू करणारे लोक भेटतीलच.
-
नाही,
ही जागाच घाणेरडी आहे. ह्या जोहानसबर्गमध्ये आल्यापासून कटकटीच फक्त नशिबी लागल्या
आहेत माझ्या. कधी एकदा इथून जाते असं झालंय मला.
-
तुला परत
जायला काही फार वेळ उरला नाहीय आता. ही केस बहुतेक उद्या संपेल. मला मात्र तुझ्या,
आणि उम्फुन्डीसच्या बद्दल काळजीच वाटते आहे.
-
काही नका
काळजी करू.
-
एवढं बरं
वाटलं हे ऐकून, पोरी. मला त्या मुलीची नाही काळजी वाटत. ती उत्साही आहे, आणि निमुटपणे
ऐकते सांगितलेलं. उम्फुन्डीसना खुश करायची सारखी धडपड असते बिचारीची, आणि असायलाच हवी.
तिच्या जन्मदात्या बापानी जे तिला दिलं नाही ते सगळं उम्फुन्डीस देताहेत तिला.
-
ती सुद्धा
ह्याह्या हुहू करते की.
-
मलाही
दिसतंय ते, मुली. पण ती चटकन शिकते बर वाईट. आता हा विषय इथेच पुरे, कोणीतरी येतंय.
दारावर टकटक झाली.
बाहेर एक भली मोठी धिप्पाड बाई उभी होती. पेपरात एक वंगाळ बातमी आल्येय; मी तुम्हाला
दाखवायला आणल्येय. तिने पेपर टेबलावर ठेवला आणि त्यातला मथळा दोघी बायकांना दाखवला.
"शहरात आणखी एक खुनी दुर्घटना. युरोपिअन घरमालकाची काळ्या घरफोड्याकडून हत्त्या."
त्या दोघी हादरल्या
ते वाचून. आजकालच्या जगात ह्या असल्या बातम्यांचीच लोकांना भिती असे. घरातले बाप्ये
ह्यांना घाबरत, आणि त्यांच्या कारभारणी त्यांना घाबरत. दक्षिण आफ्रिकेसाठी झटणाऱ्या
कोणालाही त्यांची भिती असे. सरळ मार्गांनी चालणारे काळे त्यांना घाबरत असत. काही लोकांना
वाटे, की वर्तमानपत्रांनी हा 'काळे' शब्द मथळ्यात वापरू नये; इतरांचं म्हणण होतं नुसते
शब्द लपवून आतलं दुःखद सत्त्य झाकता येणार आहे का!
-
किती वाईट
ना, नेमकी ह्याच वेळी, उद्या खटला संपायला आलेला असतांना, ही घटना व्हावी.
तिला ह्या खटल्याबद्दल
सगळं माहिती होतं; लिथबींच्या बरोबर ती रोज कोर्टात जात असे.
-
अगदी खरं
बोललीस बाई! मिसेस लिथबी म्हणाल्या.
फाटकाची कडी उघडल्याचा
आवाज त्यांनी ऐकला, आणि तो पेपर पटकन खुर्चीखाली दडवला. कुमालो आणि ती मुलगी आले होते.
ती त्यांचा हात धरून त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन गेली. आजकाल त्यांच्या अंगात फार
त्राणच राहिलं नव्हतं.
ते गेले न गेले, आणि
परत फाटक वाजलं आणि सिमांगु आत आला. त्याची नजर पहिल्यांदा त्या पेपरावर गेली. त्याने
तो खुर्चीखालून बाहेर काढला. त्यांनी बघितला हा? सिमांगुने विचारलं.
-
नाही उम्फुन्डीस.
ती धिप्पाड बाई म्हणाली. पण फार वाईट झालं की नाही, नेमकं आत्ताच हे घडावं?
-
हे न्यायाधीश
फार चांगले आहेत, पण झालं खरं वाईट तुम्ही म्हणता तसं. त्यांना पेपर वाचायला फार आवडतं;
आता काय करणार?
-
इथे तिनी
आणलेला पेपर आहे तेवढाच एक. पण ते मिशन हाउस मध्ये जेवायला जातील तेव्हा? तिथे दिसेलच
ना त्यांना?
-
म्हणून
तर मी इथे आलो. मदर, आज रात्री इथेच जेवलो तर?
-
ओह, अगदीच
मामुली गोष्ट आहे ती. घरात जेवण आहे तयार; साधंसं आहे मात्र.
-
मदर, खरच!
कधीही तुम्ही आमच्या मदतीला असताच उभ्या!
-
जन्माला
येउन एवढं तरी करायलाच हवं ना?
-
जेवून
मग आपण तसेच चर्चच्या मिटिंगला जाऊ. उद्या तसं सोपं आहे. कोर्टात जायच्या दिवशी ते
पेपर वाचत नाहीत. आणि मग त्यानंतर काही फरकच पडत नाही.
म्हणून मग त्यांनी
तो पेपर लपवला. सगळे मिसेस लिथबींच्या घरीच जेवले. आणि नंतर चर्चमधल्या सभेला गेले.
तिथे एक काळी स्त्री स्वतःच्या अनुभवांबद्दल बोलत होती. सर्वसंगपरित्याग करून ती नन
कशी झाली, स्त्रीसुलभ सगळ्या इच्छा विसरायला देवानी तिला कशी मदत केली ह्याबद्दल ती
बोलली.
चर्चमधून आल्यावर सिमांगु
त्याच्या घरी गेला, आणि कुमालो त्यांच्या खोलीत गेले. ती मुलगी जेवायच्या खोलीत अंथरूण
घालत असतांना, गर्ट्रूड मिसेस लिथबींच्या मागोमाग त्यांच्या खोलीत आली.
-
आई, मी
थोडं बोलू तुमच्याशी?
-
ह्यात
काय विचारायचं बाळ!
त्यांनी खोलीचं दार
बंद केलं, आणि गर्ट्रूड बोलायची वाट बघत थांबल्या.
-
मी त्या
काळ्या ननचं बोलणं ऐकलं आई, आणि मला वाटतंय आपणही तसं करावं.
मिसेस लिथबींनी चक्क
टाळ्या वाजवल्या; आणि मग गंभीरपणे म्हणाल्या, तू नन व्हावस असं मला वाटतं म्हणून नाही
मी टाळ्या वाजवल्या. तुझ्या मनात तो विचार आला ह्याचं मला बरं वाटलं. पण, तुला एक मुलगा
आहे.
गर्ट्रूडचे डोळे भरून
आले.
-
माझ्या
भावाची बायको माझ्यापेक्षा त्याला चांगला वाढवू शकेल, ती म्हणाली. मी फार दुबळी आहे,
तुमच्या लक्षात आलंय ते. मी हसते, खिदळते, वाटेल तशी बोलते. कदाचित नन झाल्यानी मला
सुधारायला मदत होईल.
-
म्हणजे,
तुझ्या वासना?
-
गर्ट्रूडनी
मान खाली घातली. हो, तेच म्हणायचं होतं मला.
मिसेस लिथबींनी गर्ट्रूडचे
हात आपल्या हातात घेतले. फारच छान होईल ते. पण, हा निर्णय इतक्या घाईघाईनी आणि फटकन
घेऊ नको. ती पण असंच म्हणाली की नाही?
-
हो, ती
म्हणाली असं.
-
मग आत्ता
हे आपल्या दोघींच्या मध्येच राहू दे. मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन, तूही प्रार्थना
कर. काही दिवसांनी परत बोलू आपण ह्यावर. बरोबर वाटतंय ना तुला हे?
-
हो, बरोबर
आहे.
-
मग जा
आता, शांत झोप. हे होईल का नाही मला माहिती नाही; पण झालं, तर त्या म्हाताऱ्या जीवाला
फार बरं वाटेल.
-
बरं, गुड
नाईट मदर.
गर्ट्रूडनी लिथबींच्या
खोलीचं दार लावलं, आणि तिच्या खोलीत जात असतांना एकदम काहीतरी डोक्यात येउन ती जमिनीवर,
त्या मुलीजवळ आडवी झाली.
-
मी नन
व्हायचा विचार करते आहे, ती म्हणाली.
-
आई ग,
ती मुलगी पांघरुणातच उठून बसली. खूप कठीण असेल ना पण तसं राहणं?
-
कठीण आहे
खरं, आणि माझं अजून निश्चित ठरलं नाहीय. पण समज मी तसं केलं, तर तू माझ्या मुलाची काळजी
घेशील ना?
-
अर्थात!
मुलगी म्हणाली. तिचा चेहरा फुलून आला होता. अर्थातच मी त्याची काळजी घेईन.
-
तुझ्या
स्वतःच्या मुलाप्रमाणे?
-
हो, हो.
अगदी माझ्या मुलासारखीच.
-
आणि त्याच्यासमोर
कधी फालतू बकबक करणार नाहीस?
ती मुलगी एकदम प्रौढ
गांभीर्याने म्हणाली, मी यापुढे कधीच फालतू बकबक करणार नाही.
-
मी सुद्धा,
गर्ट्रूड म्हणाली. आणि लक्षात ठेव हं. अजून नक्की नाही.
-
हो, ठेवीन
लक्षात.
-
आणि कोणाशी
ह्याबद्दल बोलू नको. मी जर नुसतंच बोलले आणि तसं केलं नाही, तर माझ्या भावाला फार वाईट
वाटेल.
-
मला समजतं.
-
नीट झोप
हं, बाळ.
-
तुम्ही
पण झोपा.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...