हवाई - निसर्गाची ’रंग' भूमी


अमेरिकेचं पन्नासावं राज्य. सहा एवढीशी बेटं! भर प्रशांत महासागराच्या मध्ये, सगळ्या जनसमुदायापासून दूर अंतरावर ठाकलेली. एक सुप्त, आणि एक जिवंत, ज्वालामुखी उदरात सांभाळणारी. निसर्गसौंदर्याच्या वेड्या पीरांची मक्का. समुद्राच्या तुफानी लाटांवर आरूढ होण्याची कसरत करणाऱ्या शौकिनांचा स्वर्ग.

आता परत येऊन काही दिवस उलटले, अकरा तासांच्या फ्लाईटचा जेट लॅग ओसरला... पण डोळ्यापुढचं ते स्वप्नवत सौन्दर्य जराही हटत नाही. काय लिहायचं? कसं लिहिणार, आणि किती लिहिणार ह्या बेटांबद्दल! अजूनही शब्दशः अवाक करणारं ते निसर्गसौन्दर्य! परमेश्वराने एखाद्या प्रदेशावर कृपादृष्टी किती करावी तिला काही सीमा? आणि त्या अनंत हस्ते दिलेल्या सौन्दर्याला सहा लहानशा बेटांत सामावायचं असल्यामुळे असेल बहुतेक, पण नजर टाकावी तिथे, पदोपदी, ओसंडून वहाणारं, 'आणि हे बघितलं का' म्हणून आर्जवणारं सौन्दर्य. छ्या! ह्या स्वर्गलोकी वावरायचं तर इंद्रासारखं सहस्त्र डोळे घेऊनच वावरावं - नाहीतर कायम अतृप्ततेचा शाप माथी!

हॉनोलुलू सारखं एखादं 'मोठं झालं की ना, मी न्यूयॉर्क, नाही तर गेला बाजार मायामी तरी होणार' असलं भ्रमिष्ट स्वप्न बाळगणारं शहर सोडलं तर ही बेटं म्हणजे निसर्गाला पडलेलं सौन्दर्याचं स्वप्न आहेत. रंगांचा असा जल्लोष फारच क्वचित बघायला मिळतो - फुलांच्या बागा आपण बघतो, पण सबंध बेटच एक मोठी फुलबाग झाल्याचं प्रथमच पाहिलं. फुलं तर फुलं, इथल्या पानांनाही फूल व्हायचं स्वप्न असतं. म्हणून संपूर्ण हिरव्यागार आसमंतात सुद्धा, ती परंपरागत हिरवे चुडे सोडून, पिवळे, गुलाबी, लाल आणि किरमिजी असे वाट्टेल ते रंग ट्राय करतात, स्वतःचेच गुच्छ करून पाहणाऱ्याची फसगत करतात. आकाशाला निळ्या रंगांच्या अगणित छटा अपुऱ्या वाटू लागल्या, की गंमत म्हणून ते मध्येच डोक्यावर इंद्रधनुष्य जडवून ऐटीत मिरवतं - दिवसातून तीनचार वेळा. सभोवार पसरलेल्या समुद्राला आकाशाचा निळा आरसा व्हायचा कंटाळा आला, की तो बाजूच्या वनराईकडून हिरव्या रंगाच्या छटा उसन्या मागून आणतो आणि मोरपिशी रंगांच्या लाटा काढतो - फेसाची शुभ्र किनार लावलेल्या. किनाऱ्यावरची वाळू कधी कधी 'एवढ्या लक्ख उन्हात मी कशी गोरी रहाणार', म्हणून रेशमासारखी तकतकीत काळीशार होऊन जाते - तलम मऊशारपणा जराही न गमावता. इथल्या ओबडधोबड डोंगरांना सुद्धा ह्या रंगेल रंगोत्सवामध्ये दगडासारखं बसून रहायची लाज वाटत असावी; म्हणूनच वायमिया कॅनियनचे अजस्त्र फत्तर सुद्धा मावळत्या सूर्याच्या साक्षीने झटाझट अद्भुत रंग बदलतात - तो एक विलक्षणच अनुभव. उगाच नाही त्याला पॅसिफिकचा ग्रँड कॅनियन म्हणत!

एवढ्या दिव्य सौन्दर्याला दृष्ट लागू नये म्हणून एखादं गालबोट नसतं तरच नवल, ना? तिथे असतांना मूळच्या हवाईयन रहिवाशांच्या अनेक दंतकथा आणि मिथकं ऐकली, त्यातलीच ही एक बहुतेक ऐकायची राहून गेली असावी - ह्या हवाईच्या स्वर्गलोकामध्ये राहणाऱ्या कुबेराला एकदा काहीतरी दुर्बुद्धी झाली म्हणे आणि देवांची सगळी संपत्ती पळवून तो दूरदेशी निघून गेला. त्याच्या वंशजांना हवाईयन भाषेत 'टूरिस्ट' म्हणतात. कुबेराच्या ह्या पापाची भरपाई म्हणून हवाईमध्ये जाणाऱ्या त्याच्या ह्या वंशजांकडून पैन पै वसूल करणं आपलं धर्मकर्तव्य आहे असा तिथल्या जनतेमध्ये गाढ विश्वास आहे - आणि एकदा श्रद्धा म्हटलं की त्यापुढे काही उपायच नाही ना!


Comments