नऊ ते पाच

परवा चॅनेल सर्फिंग करतांना कुठेतरी '9 to 5' चालू असलेला बघितला. जेन फोंडा, लिली टॉमलिन आणि डॉली पार्टन ह्या तीन सुप्रसिद्ध - आणि संपूर्ण वेगळ्या पार्श्वभूमीच्या - नट्यांची ही कॉमेडी. 'वीमेन्स लिब' चळवळ थोडी जुनी झाल्यानंतर आलेल्या ह्या सिनेमात ऑफिसात काम करणाऱ्या तत्कालीन स्त्रियांना त्यांच्या (अर्थातच पुरुष) बॉसकडून मिळणारी वागणूक आणि त्याविरुद्ध त्यांनी घेतलेला बदला ह्याची हलकीफुलकी कॉमेडी आहे ही. मी अमेरिकेत पहिल्यांदा येण्याच्या काही दिवसच आधी हा सिनेमा मुंबईत बघितला होता. तेव्हाही हसवलं होतंच ह्यानी. त्यामुळे थोडा वेळ नॉस्टॅल्जिया म्हणून बघितली. अमेरिकेबद्दलचं अपार कुतूहल त्या काळी बहुतांशी हॉलिवूडच्या सिनेमांमधूनच शमवता येत असल्याने, हे सिनेमामधलं ऑफिस डोळे भरून बघत होतो. त्या नेट-आणि-गूगल-पूर्व काळात ह्या सिनेमानं 'अमेरिकन ऑफिस' संस्कृतीशी पहिली ओळख करून दिली होती. इथे आल्याबरोबर माझं तेव्हाचं ऑफिस ह्या सिनेमात बघितलेल्या ऑफिसबरोबर पडताळून बघत होतो... परवा सिनेमा बघतांना, पस्तीस वर्षात इथल्या ऑफिस संस्कृतीमध्ये किती बदल बघितले त्याचा विचार करायला लागलो. यादी लांबत चालली आणि सिनेमा कधी संपला कळलंच नाही!
किती गोष्टी गेल्या, किती नव्या आल्या...
माझ्याही ऑफिसात डॉली पार्टनची एक सडपातळ, खरं तर कृश, आवृत्ती होती. बॉसला कॉफी करून देणं हे तिचं काम नव्हतं. पण अनुक्रमे, प्रचंड मेकअप करणं, सुंदर दिसणं, सहा किंवा जास्त इंच उंच टाचांच्या बुटांमध्ये ऑफिसात चालत राहणं, इंडिया नावाच्या निमिषारण्यातून नुकत्याच आलेल्या काही प्राण्यांशी गोड बोलणं, वेळ उरल्यास बॉस कडून डिक्टेशन घेणं आणि पत्रं टाईप करणं ह्या कामांसाठी तिची नेमणूक झालेली होती. तिला सेक्रेटरी म्हणणं ह्यात तिचा अपमान आहे, असं तिला किंवा आणखी कोणालाही वाटत नसे. हळूहळू ह्या 'सेक्रेटरीएट' मध्ये बरीच घट व्हायला लागली, ज्या थोड्या उरल्या त्यांना 'ऍडमिन असिस्टंट' असं भारदस्त नांव मिळालं आणि वरील पाचही कामांच्या बंधनांमधून त्यांची मुक्तता झाली. वर्ड प्रोसेसर आल्यापासून टाईपरायटर हे यंत्र मोडीत निघालं, आणि शॉर्टहँड ही लिपी मोडीच्या जोडीला जाऊन बसली. आजकाल ह्या 'ऍडमिन असिस्टंट' बायका (हो, अजूनही बायकाच असतात) पेन, पेन्सिली, खोडरब्बर, नोटपॅड अशा मौल्यवान खजिन्याची मोजदाद ठेवणं, बॉसचे फोन कॉल घेणं आणि क्वचित प्रसंगी त्यांचे प्रवास खर्च सांभाळणं ह्यापलीकडे नक्की काय करतात ह्याबद्दल आम जनतेमध्ये अज्ञान आहे. त्या काळी स्वतःच्या डेस्कवर फोन असणं ही दुर्मिळ गोष्ट होती, आता फोन खूप स्वस्त झालेत आणि ऍडमिन असिस्टंट दुर्मिळ!
'ड्रेस कोड' नावाच्या तत्कालीन जुलमी राजवटीमध्ये - पुरुषांनी सूट-टाय आणि बायकांनी ड्रेस (ज्याला भारतीय इंग्रजीत तेव्हा फ्रॉक म्हणत असत), किंवा शर्ट-स्कर्ट आणि कोट घालायलाच पाहिजे - अशी सक्ती होती. बायकांनी पॅन्ट-सूट घालणं तेव्हाही फार लोकप्रिय नव्हतं (त्याला लगेच 'स्त्री-मुक्ती वाली' असा एक वास असे) आणि अजूनही नाही. हिलरीने त्याबद्दलचे बरेच कुजकट टोमणे सहन केले आहेत. मानेभोवतीची टायची गाठ सुटल्यावर मी ह्या देशात पहिला सुखाचा श्वास घेतला. जुलमी हुकूमशाही झुगारून दिल्यावर जसं काही देशात अराजक माजतं, तसं कॅलिफोर्नियामध्ये लोकांनी हापिसात चक्क अर्ध्या चड्डीत, फ्लिप-फ्लॉप चपला घालून जाण्यापर्यंत ताळतंत्र सोडला. हे वेस्ट कोस्टचं बाळ आगाऊपणात ह्या देशात थोडं पुढेच असतं एकंदरीत! सभ्य सुसंस्कृत (!) न्यूयॉर्कच्या ऑफिसात मात्र 'बिझनेस कॅज्युअल' कपड्यांचा राजमान्य तोडगा निघाला. म्हणताक्षणीच असले पेहराव पुरवणारी डॉकर्स नावाची नवीन कंपनी जन्माला आली आणि तडक गगनाला जाऊन भिडली.
मी इथे आलो त्यावेळी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणं ह्यात कोणालाच काही गैर वाटत नसे. विमानात शेवटच्या काही रांगा धुरांड्यांसाठी राखीव असत - क्वचितप्रसंगी त्यांच्या फार जवळची सीट मिळाल्याने सबंध प्रवासभर डोकेदुखी सहन केलेली आहे. अर्थात, ह्याला काही इलाज असेल, होईल अशी स्वप्नंही कधी कुणी पाहिली नव्हती. ऑफिसातही नुसत्या सर्रास सिगारेटी ओढल्या जात एवढं नव्हे - कधी कधी मला सिगारेट न ओढणाऱ्यांना बढत्या मिळत नसाव्यात अशी शंका येई, कारण बॉस असणं आणि समोरच्याच्या तोंडावर धूर सोडणं हे एक अतूट समीकरण होतं. गेल्या कित्येक वर्षात परिस्थिती पूर्णपणे बदलली. ऑफिसात तर नाहीच, पण बिल्डिंगच्या दारात सुद्धा आता सिगारेट ओढायला परवानगी नसते, पार बिल्डिंगच्या कोपऱ्यावर जाऊन सिगारेट ओढता येते. आता कधी परदेश प्रवासात, विशेषतः युरोपिअन शहरात किंवा हॉंगकॉंग, मनिला मध्ये वगैरे लोक सिगारेटी ओढतांना बघून धक्का बसतो - इथे अजून ज्ञानाचा सूर्योदय कसा झाला नाही म्हणून!
भारतात दिवसाची सुरुवात ही सूर्योदयापेक्षाही चहाशी जास्त निगडित होती. इथे आल्यावर उकळत्या पाण्यात बुडवायच्या त्या चहाच्या पिशव्या बघूनच निम्मा उत्साह मावळला; तशा त्या पचकवणी चहाची चव घेतल्यावर उरलासुरलाही अदृश्य झाला. ही अर्थातच जास्मिन टी, शॅमोमिल टी वगैरे नाजूकसाजूक भानगडींच्या, स्टारबक्सच्या दशसहस्त्र 'चाय' च्या आवृत्त्यांच्या आधीची गोष्ट आहे. त्या काळी एक दक्षिण भारतातच काय ती थोडी तरी चांगली कॉफी मिळत असे; बाकी आनंदच असे. जायफळ घालून शिजवलेल्या मराठी कॉफीची तर मला दहशतच आहे - त्यामुळे ह्या पेयापासून मी सहसा दोन घोट दूरच राहत असे. पण अमेरिकेत चहा चांगला मिळायची अपेक्षा ठेवणंच चूक (जशी इंग्लंडात चांगली कॉफी मिळणंच दुरापास्त!) हे लक्षात आलं आणि कॉफी धर्म स्वीकारला. त्या काळी ऑफिसात कॉफी आणि लहानसहान पेस्ट्री, मफिन नाहीतर डेनिश विकणारी ट्रॉली सकाळी आणि दुपारी एक एक चक्कर मारत असे. आपल्या टेबलावर चहा-कॉफी आणून देणारा पांड्या, गणप्या असा देवगण इथे नसल्यामुळे स्वतःची स्वतःलाच जाऊन ती घेऊन यावी लागे. आजच्या कॉफी मशीनच्या आणि कॉफी पॉडच्या जमान्यात ती ट्रॉली सुद्धा लुप्त झाली - कॉफी फुकट असते ह्याचंच कौतुक!
कितीतरी गोष्टी बदलल्या. माझ्या व्यवसायक्षेत्रामध्ये - कॉम्प्युटर्सच्या जगात - तर प्रचंड उलथापालथ झाली. एके काळी ज्या गणनक्षमतेचे कॉम्प्युटर्स संपूर्ण कंपनीचा पेरोल (कसाबसा) सांभाळत होते, तेवढी क्षमता मनगटावरच्या घड्याळात आल्याला एक दशक उलटून गेलं! टेलिकम्युनिकेशन्सच्या प्रगतीमुळे इंटरनेट चा शोध आणि विस्तार ह्यांनी दुसरी औद्योगिक क्रांती घडवून आणली - जिचे संपूर्ण परिणाम आता कुठे दिसायला सुरुवात झाली आहे. एका सुप्रसिद्ध पुस्तकाच्या नावाप्रमाणे, ह्या क्रांतीने संपूर्ण पृथ्वी सपाट करून टाकली, जगातल्या कुठच्याही देशाला - निदान ह्या एका क्षेत्रात तरी - दुसऱ्या कुठच्याही देशाच्या बरोबरीला आणलं. ह्या क्रांतीचा ऑफीस संस्कृतीवर परिणाम झाला नसता तरच आश्चर्य!
मी इथे आलो तेव्हा ऑफिसं बरोब्बर आठ तास असत - नुसती आठवण लिहितांना सुद्धा हुंदका दाटून आला, आणि काही आसवं की-बोर्डावर ओघळलीच. एक तास लंचसाठी - म्हणायला, प्रत्यक्षात बऱ्याचदा एकाचे दोन होत आणि तरी कोणी फारसं मनावर घेत नसे; दिलेलं काम ठरल्या वेळी होतंय तोपर्यंत. माझ्या ऑफिसातून लंचसाठी आठवड्यातून एखाददा तरी पार चायना-टाऊन पर्यंत किंवा सॅन जेनॅरो फीस्ट साठी अगदी लिट्ल इटली पर्यंत - अर्धा अर्धा तास चालत - जाऊन येणं शक्य होतं. कोणा दुष्टाची नजर लागली त्या दिवसांना, आणि काही वर्षातच तळमजल्यापर्यंत जाऊन गाडीवर मिळणारं सँडविच डेस्कवर आणून खाणं सुद्धा दुरापास्त झालं. मिलिटरीतल्या सारखं सात मिनिटात भोजनसमारंभ उरकण्याची शिस्त लागली! आताच्या ग्लोबल व्हिलेजच्या जमान्यात तर कुठच्याही वेळी जगात कुठेतरी 'नऊ-ते-पाच' वालं ऑफिस चालू असतंच, त्यामुळे फोन म्यूट करून मुक्या जनावरासारखं एकाकीपणे डेस्कवरच 'लंच' नांवाचा रवंथ करायची सवयच झाली आहे.
नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला मी प्रथम 'घरून काम करा' मोहिमेचा जन्म (कुठे होणार? अर्थातच कॅलिफोर्नियात!) झाल्याची बातमी ऐकली होती. रोज ट्रेनच्या धकाधकीला आणि तासंतासाच्या दीर्घ प्रतिक्षेला कंटाळलेल्या मला देवच मदतीला धावून येणार असं वाटलं होतं. प्रत्यक्षात न्यूयॉर्कच्या पारंपरिक आणि अत्यंत जुनाट वळणाच्या ऑफिसातून ही प्रथा सुरु व्हायला आणखी दहा वर्ष थांबावं लागलं. ११ सप्टेंबरच्या त्या भयानक हल्ल्यानंतर जेव्हा वॉल स्ट्रीटची ऑफीसं काही दिवस बंद राहिली, तेव्हा काही सुपीक डोक्यात ट्यूब पेटली, की कॉम्प्युटरवर तर घरूनही काम करता येतं. रोजचा प्रवास खर्च आणि दगदग नाहीशी झाली - पण त्याच्या बदल्यात ऑफिसच्या फोन आणि लॅपटॉपचा गळपट्टा आला.
त्या घटकेला, मी सिनेमात बघितलेल्या ऑफिसचा आणि माझ्या प्रत्यक्षातल्या ऑफिसचा संबंध पार तुटला - राहतं घरच ऑफिस बनलं आणि नऊ ते पाच शब्दांना काही खास अर्थच उरला नाही!
ह्या नवीन ऑफिसात डॉली, लिली आणि जेन ना त्यांच्या उर्मट, अरेरावी आणि आगाऊ बॉसचं तोंड रोज पहावं लागलं नसतं - कारण बहुतेक त्यांची नोकरीही त्या नऊ ते पाच वाल्या ऑफिसच्याच मार्गानी इतिहासजमा झालेली असती!

Comments